Login

लग्नासाठीच का जन्म आपुला 3

गोष्ट एका तरुणीची जी आपल्याच आई-वडिलांच्या खोटेपणाची शिकार झाली फक्त तिचे लग्न व्हावे म्हणून

तेव्हापासून सुनिता नियमितपने औषध घेत होती.
दिपक सारखं सुखवस्तु संस्कारीत स्थळ आपणहून आलेलं पाहून त्याला विश्वासात घेऊन थायराॅइड बद्दल सांगण्या ऐवजी लपवणंच गणेशरावांना योग्य वाटलं. कारण समाज अशा मुलींना लग्नाच्या योग्य मानत नाही असा त्यांचा अनुभव. लग्ना नंतरही सुनिता, दिपक व सासरच्यांच्या लपुन गोळ्या घेतच होती. मात्र दिवस गेल्यावर दिपक तिची खूप काळजी घेऊ लागला. अशातच एका सकाळी दिपकने तिला गोळी घेतांना पाहीलं.

"कसली गोळी घेतेस? काही त्रास होतेय का? डाॅक्टरकडे नेऊ ?" त्याने विचारना केली.

"नाही तसं काही गंभीर नाही. जरा जळजळ होतेय. म्हणून ॲसिडीटीची गोळी घेतली." तिने सांगितलं.

"अग मनाने गोळी नाही घ्यायची कोणतीच. यापुढे लक्ष ठेव, मला सांग आपण डाॅक्टरकडे जाऊ किंवा दादाला विचारू." त्याच्या बोलण्यावर तिने होकारार्थी मान हलवली होती.

दिपकच्या हाती गोळ्या लागू नये म्हणून सुनिताने तिच्याजवळ असतील नसतील त्या सर्व थायरॉईडच्या गोळ्या फेकून दिल्या. तिचे थायराॅइड वाढले, परिणामी तिचा गर्भपात झाला.

"मी माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडिलांना, सर्वांना विरोध करून सुनिताला निवडले माझी जीवन संगीनी म्हणून. कमीत कमी दिवस राहल्यावर तरी तिने मला थायराॅइड बद्दल सांगायचं होतं. मी नेलं असतं तिला डाॅक्टरकडे. घरी सांगितलं असतं की आता निघाले थायराॅइड. गरोदरपणात बऱ्याच स्त्रियांचे थायराॅइड वाढते. आमच्या घरात डॉक्टर आहेत. त्यांनीही हे समजून घेतलं असतं. त्यामुळे कोणी काही बोललं नसतं आणि आमचं बाळही छान असतं." दिपकने आपली बाजू मांडली.

"आताही काहीच बिघडले नाही हो जावईबापु. कशाला घटस्फोटाचं बोलताय. बघा पुन्हा लवकरच पाळना हलणार तुमच्या घरात. डाॅक्टरांनी हमी दिली आहे. झाली चूक आमची. पदरात घाला." सुनिताची आई दिपक पुढे पदर पसरून त्याला म्हणाली.

"मला माहीत आहे की निट ट्रिटमेंट घेतली की बाळ होईल तिला. बघा माझी आई सतत आजारी असते. सुनीताला घरात कोणी सासरवास करणारे नाही. तुमच्या संस्कारावर फार विश्वास होता माझा. पण तुम्हीही लपवलं सगळं. विश्वासघात झाला आहे माझा. माझ्या प्रेमाचा. असो ! आता मला क्षमा करा. मी विश्वास नाही करू शकणार सुनितावर किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकावर. त्यात घरचे आधीच विरोधात होते लग्नाच्या. आता मी सुनिताला परत नेलेही तर कहर करतील ते. तिचे जगणे कठीण होऊन जाईल आमच्या घरात. फक्त माझ्यासाठीच नाही तर तिच्यासाठीही आमचा घटस्फोट होणेच चांगले आहे. मला माफ करा. काळजी घ्या तिची." हात जोडून दिपक कधीही न परतन्यासाठी निघून गेला.

दोन वर्षांनी दिपकचं त्याच्या घराण्याला साजेशा, त्याच्या आई वडिलांनी निवडलेल्या, त्यांच्या तोला मोलाच्या मुलीसोबत लग्न झालं. पाळणाही लवकरच हलला.

पण सुनिताचे काय? जन्मदात्याने सांगितले तसे केले तिने. त्याचे काय फळ मिळाले तिला. ती वयाने लहान, अनुभवानेही कमीच, पण तिचे आई वडील इतर वयस्कर मंडळी यांना जाणीव होती ना ते करत असलेल्या गुन्ह्याची. झाले ते झाले आता आपणही पुढचा विचार करावा म्हणुन तिने शिक्षण पुर्ण केले. एका शाळेवर शिक्षिकेची नौकरिही करत आहे. मात्र लग्नासाठी साजेसा मुलगा मिळत नाही आहे. येतात ते अधेड वयाचे, मोठ मोठी मुलं असलेले.

तसं सुनिताला माहेरी कोणी अंतर देत नाही. लग्न समारंभ असो किंवा आणखी काही पारीवारीक कार्यक्रम तिला आवर्जून सोबत नेतात. तिही आनंदी असल्याचे दाखवते.
पण भावाचा संसार पाहून आत कुठेतरी झूरतच असेल ना ती? भावाची मुलं सांभाळताना स्वताच्या न जन्मलेल्या बाळाची आठवण येतच असेल ना तिला.

काही दिवसांआधी भेटली होती मला. म्हणाली, "माझ्यावर एखादा ब्लाॅग लिही. कमीत कमी, आईबाप नाही तर त्यांच्या पोरी तरी शहाण्या होतील. माझ्यासारखी कथा नाही होणार कोणाची."

मीच रडावली.

अशा घटना समोर आल्या कि माझ्या मनात ना खालील प्रश्न नेहमी येतात :-

लग्नाची इतकी घाई का असते आपल्या समाजात?

लग्नासाठी हवी ती तडजोड करायला का तयार असतात सर्व?

किती किती खोटं बोलल्या जातं आणि किती सत्य लपवल्या जातं केवळ एक लग्न जमवून यावं म्हणून?

सतत खरे बोलायचे शिक्षण देणारे आई-वडीलही अचानक खोटे का बोलायला सांगतात? कधी वय लपवतात, कधी पगार, कधी पहीलं लग्न, कधी शारिरीक मानसिक रोग!

वर म्हणतात एकदा अक्षदा डोक्यावर पडल्या की सगळं गंगेला भेटतं.

का?

आणि सर्वांत महत्वाचा प्रश्न,

आपण जन्माला येतो म्हणून लग्न करतो की फक्त लग्न करण्यासाठी आपला जन्म होतो?

लग्न सोडूनही खूप काही असतं एका जन्मात करायला. त्याचा विचार का नाही करत आपण?

तुमच्याकडे उत्तर असेल ना तर नक्की सांगा.?