निरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2

Story of friendship

भाग 2
कॉलेजला जाताच तिला समजलं. तो मघाचा विमान चालवणारा पण आपल्याच कॉलेजला आहे. " अरे देवा, हा माणूस पण आपल्याच कॉलेजला आहे तर.....म्हणजे आता आपण कधी याच्यासमोर गेलो तर मघाचेच भांडण पुन्हा उकरुन काढेल. राहु देत. त्याच्यापेक्षा समोर न गेलेलंच ठिक." तिने मनातुन विचार केला. तो दिवस खरंतर समरसाठी आनंदाचा होता. ब्याण्णव टक्के गुण मिळवुन तो कॉलेजात पहिला आला होता. सायलीलाही अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले होते. ती आणि तिच्या मैत्रिणी सगळे खुश होते.

कॉलेजच्या हॉलमध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्व एकत्र जमले होते. निमित्त होतं दिवसरात्र अभ्यास करून, मेहनत घेऊन उत्तुंग यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचं. समर आणि त्याचे मित्र हॉलमध्येच बसले होते. सर्वांत प्रथम प्राचार्यांनी हसत माईक हातात घेत त्यावरुन समरचं अभिनंदन केलं. त्याला दोन शब्द बोलण्याची विनंती केली. समर उठताच टाळ्यांचा कडकडाट झाला. तो शांतपणे माईकजवळ गेला. "सर्वप्रथम मला मार्गदर्शन करणार्‍या गुरुजनांचे आभार. हे त्यांचेच यश आहे. मी खरंच काय बोलणार? मीही तुमच्यातला, तुमच्यासारखाच एक आहे. आज या जागी मी उभा आहे. तुमच्यातलाही कुणी उद्या इथे असेल या पुढे. एवढंच. मला खुप आनंद झाला आहे." तो बोलत होता. हॉलमध्ये शांतता पसरली. अरे हा उद्धट माणूस छान बोलतो कि सायली मनातुन म्हणाली. तो दिवस तसाच आनंदात,मजेत गेला.

संध्याकाळी सायली आणि तिच्या मैत्रिणींनी फिरायला जाण्याचा कार्यक्रम आखला. सगळ्याजणींनी चौपाटीवर धमाल केली. अंधार पडायला सुरुवात झाली तश्या सगळ्यांनी एकमेकींचा निरोप घेतला. ती एकटीच घरी यायला पटपट पावले टाकत निघाली. रस्त्याशेजारीच तिच्या घराच्या गल्लीच्या तोंडाशी चार पाच जणांचं टोळकं थट्टा मस्करी करत उभं होतं. सायली जशी समोर आली तशी त्यांची मस्करी आणखीच वाढली. तिला भिती वाटू लागली. समोर पाहते तर काय आश्चर्य ! रस्त्यावरुन चालत समर येत होता. ती धावतच त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली आणि मोठ्याने म्हणाली,"अभिनंदन, काय साहेब! कॉलेजचे टॉपर झाला म्हणजे दोस्तांना विसरायचं होय. या मैत्रिणीची काही आठवण! म्हटलं आपणच जाऊन मोठ्या लोकांचं अभिनंदन करावं." तिची हि एकामागोमाग फटकेबाजी पाहून तो आवासुन तिच्याकडे पाहत राहिला. काय चाललंय त्याला काहीच कळेना. त्याचं शेजारच्या घोळक्याकडे लक्ष गेलं. तो काहीच बोलला नाही. त्यांना बोलताना पाहून त्या घोळक्यातला एकजण म्हणाला," ए, हा... हा सकाळी माईकवरून बोलत होता तोच ना!" त्यावर दुसरा म्हणाला," हा रे, याचे बाबा अॅडव्होकेट आहेत. त्यांच्या फ्रेंड्स पैकी आहे काय ही! तिचं ऐकुन त्याने प्राचार्यांना कायतरी सांगितलं तर सोल्लिड वाट लागेल." हे बोलतच ते तिथुन उठले आणि निघाले.

" ओ,कोण मित्र, कोणाचा मित्र आणि तुमची  स्मरणशक्ती कमकुवत आहे वाटतं! सकाळीच मोठ्या हुशारीत म्हणाला होतात, मदत मागायला येणार नाही." समर चिडून म्हणाला. 
"मला तरि कुठे अश्या भांडकुदळ माणसासोबत फ्रेंडशीप करायची आहे." 
"ओके,मग आलात का माझ्यासमोर ?" 
"उगीच पराचा कावळा करण्याची गरज नाही", ती फणकारुन म्हणाली.
"इट्स ओके. मला भांडायची इच्छा नाही." असं म्हणून तो तिला इग्नोर करुन चालू लागला. तीही आपल्या रस्त्याने पुढे निघून गेली. क्रमशः

🎭 Series Post

View all