Login

मैत्रीची व्याख्या

मैत्रीची सटीक व्याख्या आणि निखळ आनंद.

*विषय: आभासी जगातील मैत्री*
*दिनांक : 4 ऑगस्ट 2025*

मैत्रीच्या निरनिराळ्या व्याख्या मी सतत ऐकत आले आहे. पण खरी मैत्री काय असते हे अनुभवल्याशिवाय कळत नाही. भारतीय परंपरेत एखादे नाते हे काही नियम लागू केल्यावर सुरु अथवा संपतात. उदा. लग्न, रक्ताचे नाते, आडनाव जुळले की नाते, एका गावातील असल्याचे नाते आणि बरेच. मुख्य म्हणजे आजकाल स्वार्थ पाहून किंवा आर्थिक बरोबरी पाहून मैत्री करणाऱ्या लोकांची ही भरमार आहे. नात्यांचे अनेक सोहळे पार पाडून ही त्यांच्यातील कमकुवत दुआ काही जात नाही. *पण आश्चर्य म्हणजे मैत्रीच्या नात्याला निर्मळ मन आणि शुद्ध हेतू सोडून काहीही लागत नाही.* या वाक्यात सत्यता आहे हे त्यांनाच कळेल ज्यांना खरी मित्रता लाभली आहे. दहा लोकांमध्ये एकच व्यक्ती आपल्याला वेगळी वाटून जाते. त्या व्यक्तीचे कलागुण आपल्यापेक्षा वेगळे असले की आपोआप अप्रूप वाटतं. साधा संवाद ही मनात खोलवर आणि कायम रुजून राहतो. तर सांगायचं असं की आपल्या कर्म-धर्म संयोगाने आपल्या नशिबात मित्र/मैत्रिणी येत असतात. कधी कधी वावटळ बनून येणारे मात्र हळुवार झुळूक बनून कायम आसपास राहतात.

स्वानुभव सांगायचा तर मला... मैत्री कशी करावी यासाठी कदाचित एखादा तज्ञ शोधावा लागेल. कारण दिवसेंदिवस वाढत जाणारा संवाद म्हणजे मैत्री असं मी मुळीच मानत नाही. ज्याच्या / जिच्या सोबत मन मोकळं करून हसता-बोलता येतं ही मैत्री आहे का? नाही... कदापि नाही. आजवर ज्या ज्या व्यक्तींना मी मित्र / मैत्रीण मानलं त्यांनी बेस्टफ्रेंड म्हणून माझं नाव कधीही घेतलं नाही. मी माझ्यापरीने त्यांच्या सगळ्या सुखदुःखात सहभागी होते तरीही. फक्त विनोद करून हसवणारी म्हणून ते माझ्याकडे पाहत होते का? असो... अशा लोकांना मी मैत्रीच्या वर्तुळातून कायम बाहेर ठेवले आहे.

मनात घर ऐवजी बंगला बांधून राहणारी मैत्रीण फायनली या आभासी जगात सापडली_ ती म्हणजे मनी. शुद्ध पुणेकर. आमची मुंबई पुणे गट्टी भारीच जमून आली. तिच्याबद्दल काय बोलाव? दुर्गुण जुळले की मैत्री होते म्हणे. ?खरं आहे हे अगदी. दोघी आळशी आणि प्रचंड बडबड्या आहोत. नेहमीच शांत असणारी मी तिच्यासोबत नॉनस्टॉप बोलू शकते. एक तास म्हणजे एक मिनिट आमच्यासाठी. आमचे जन्मदिनांक लागोपाठ असल्याने आम्ही जुळ्या बहिणी शोभून जातो.

*अजूनही मला वाटतं की आपण स्वतःला आरश्यात पाहिल्यावर जो स्वाभिमानी, खंबीर चेहरा, ते प्रतिबिंब म्हणजे आपला आधार, आपला मित्र. मित्र कधी खरा खोटा नसतो.... ते फक्त क्षण असतात जिव्हाळ्याचे.*

*उन्नती सावंत*?
*धन्यवाद*
0