फ्रिजचे रहस्य ( भाग पहिला )

फ्रिजची भीती बाळगणारा आणि सतत हात धुण्याची सवय असलेला एक पेशंट, आणि त्या मागचं भीषण सत्य
फ्रीज ( भाग पहिला )

समोरचा पेशंट गेल्यावर, तिने आपल्या मनगटावरच्या सोनेरी पट्टा असलेल्या घड्याळात पाहिलं. रात्रीचे नऊ वाजायला आले होते. बाहेर भकास चेहऱ्याचा अजून एक पेशंट, उदास नजरेने भिंतीकडे बघत बसलेला होता. नेहमीच झोप न येण्याची तक्रार करणारा तो नेहमीचाच पेशंट होता. तिने त्या पेशंटला आत घेतले.

पण तिची नजर त्याची वाट बघत होती. एव्हाना तो यायला हवा होता. न कळत आपण त्याच्यात गुरफटत चाललो आहे असं तिला वाटायला लागलं. तिचं सगळ लक्ष बाहेर कोणी येतं का याकडे होतं. आणि बरोबर नऊ वाजता त्याच्या गाडीचा आवाज तिच्या कानावर पडला. खरं म्हणजे ती त्याची वाट बघतच होती. नेहमी प्रमाणे तो आला होता. आज त्याने चौकटीचा निळा शर्ट घातलेला होता. पायातले ब्रँडेड शूज आणि कपडे यावरून त्याची चॉईस समजत होती. तो आल्याबरोबर परफ्युमचा सुगंध दरवळला. अगदी तिच्या पर्यन्त जाऊन पोहोचला. समोरच्या पेशंटला तिने कसेबसे वाटेला लावले आणि त्याला आत बोलावले.

" हॅलो समीर, कसा आहेस. कशी गेली कालची रात्र ? गाढ झोप लागली की नाही ? " तिने हसत विचारलं.

" काहीच फरक नाही. अगदी गोळ्यांनी आमंत्रण देऊन देखील माझी झोप कोसोमैल दूर असते. प्लीज, काहीतरी करा ना. मला याहून स्ट्राँग डोस हवा, झोपेच्या गोळ्यांचा. काल रात्री देखील मी पूर्ण वेळ जागी होतो ." तो तळमळीने म्हणाला.

त्याचा भारदस्त आवाज ती मोहिनी घातल्या सारखी ऐकत राहिली. सहजपणे ती त्याला न कळत न्याहाळू लागली.

साधारण सहा फूट उंची. व्यायामाचे सुदृढ शरीर.  धारदार, सरळ नाक ,काळ्याभोर मिशा आणि फ्रेंच कट दाढी कोणाचंही लक्ष वेधून घेई.  त्याचे घारे डोळे, कुठल्या तरी दूसऱ्या अंतरळाचा भेद घेताहेत अस वाटतं असे. खरं म्हणजे तिला तो या जगातला वाटतच नसे. सारखा स्वतःच्याच दुनियेत कुठे तरी हरवलेला. सतत कुठल्यातरी विचारात गढलेला. शक्यतो तो फार कमी लोकांशी बोलायचा. फार थोड्या लोकांजवळ व्यक्त व्हायचा. त्या कमी लोकांमध्ये आपण एक आहोत याचा तिला अभिमान वाटला.

तिला तिची आणि त्याची पहिली भेट आठवली. तिचं क्लिनिक बंद व्हायच्या वेळेवर तो आला होता. मानसोपचार तज्ञ म्हणून ती काम करत असे.

" डॉक्टर, मला रात्रींची खूप भीती वाटते. अजीबात झोप येत नाही. एक मिनिट हं डॉक्टर. तुमच्या ईथे बेसिन आहे का , मला माझे हात धुवायचे आहेत. "

" का काय झालं हाताला. येतांना थोड खरचटल आहे. मी हात धुऊन घेतो. "तो लगबगीने उठत म्हणाला.

" आहे ना बेसिन. डाव्या बाजूच्या कोपऱ्यात बेसिन आहे. " तो तातडीने बेसिनकडे धावला. तिला ओलांडून जातांना तिला त्याने लावलेल्या अत्तराचा वास जाणवला. लिक्वीड सोप लाऊन त्याने अगदी कोपऱ्या पासून हात स्वच्छ धुऊन काढले.

" जन्नत ए फिरदौस, बरोबर  ? " तिने 

"करेक्ट" हात पुसत पुसत, तो हसत म्हणाला. " कसं ओळखलं ? "

" माझा देखील तो आवडता ब्रँड आहे. "

" पुढच्या वेळी तुमच्या साठी घेऊन येईल. "

" त्या साठी नाही म्हणाले मी. ते राहू दे. काय लागलं बघू दे आधी. नाव काय आहे तुझ ? " ती त्याचा हात बघत म्हणाली. त्याचा हात हातात घेतल्यावर एक वेगळ्याच संवेदना तिच्या शरीरातून वाहायला लागल्या. हे योग्य नाही, तिची सद्सद विवेक बुध्दी तिला सांगत होती. पण तिला काय होत आहे हे तिलाच कळत नव्हते. त्याने लावलेल्या अत्तराचा सुगंध तो जवळ आल्याने अधिकच तीव्र झाला. तिने दीर्घ श्वास घेऊन तो शोषून घेतला. त्याच्या हाताला बरीच मोठी जखम झालेली होती.

" समीर"

" काय लागलं आहे हे एव्हढ ?" तिने काळजीने विचारलं.

" काही नाही, भाजी कापतांना चुकून कापलं गेलं. पण माझा खरा प्रॉब्लेम दुसराच आहे. मला रात्र रात्र झोप लागत नाही."

" का, काय झालं म्हणजे नेमकं काय होतं ?"

" गादीवर अंग टाकल की सगळा भूतकाळ जमा होतो काळोखात. "

" स्पष्ट विचारू ? "

" तू काही पाप केलं आहेस का, ज्याचा तुला पाश्चाताप होतोय. जे तूझ्या मनाला पटत नव्हत असं एखादं कृत्य. "

" नाही, नाही " तो दोन्ही हातांनी डोकं गच्च धरून म्हणाला. ती त्याच्या पाणीदार डोळ्यांकडे एकटक बघत म्हणाली,

" मग तुझ ब्रेक अप झाल की काय ? "

" नाही नाही . मी एकटाच आहे."

" तू जॉब काय करतोस ?"

" मी शेफ आहे. माझ्या बऱ्याच रेसिपी यू ट्यूब वर मी अपलोड केलेल्या आहेत. माझं स्वतःचं यू ट्यूब चॅनल आहे. " तो अभिमानाने म्हणाला.

" अरे व्वा, पण चॅनल बघून थोडीच तूझ्या हाताची चव समजणार आहे. प्रत्यक्ष बनवून दाखवाव लागेल."

" नक्कीच, एकदिवस खाऊ घालेल. पण माझा प्रॉब्लेम सुटायला हवा. मला झोप हवी आहे. मी रात्र रात्र टक्क जागा असतो. एक मिनिट ह, मी परत हात धुऊन येतो." असं म्हणत तो पुन्हा बेसिन कडे धावला.

"आत्ता तर याने हात धुतले होते. का म्हणून हा वारंवार हात धूत असतो. " ती मनाशी विचार करत होती. मानसोपचार तज्ञ असूनही तिला त्याचे वागणे समजत नव्हते. वारंवार हात धुणे, रात्री झोप न येणे. त्याला पाठमोरं न्याहाळत ती त्याच्या लक्षणांचा अभ्यास करत होती. स्वतःच्या विचारात ती गुंग होती. आज रात्री साठी त्याला औषधं देवू या, आणि उद्या बघू काय करायचं ते असा मनाशी विचार करून ती फ्रिज मधून मेडीसिन काढायला फ्रिज कडे वळली. फ्रिजचा दरवाजा तिने उघडला, त्या बरोबर तो एकदम ओरडला.

" फ्रिज उघडू नका. प्लीज. " त्या वेळी त्याच्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा वाहात होत्या. भीतीने तो थरथरत होता.

" अरे, काय झाले. काही नाही होत. औषध तर फ्रिज मधेच असतात. " असं म्हणत तिने फ्रिजचा दरवाजा उघडून मेडीसिन बाहेर काढले. आणि तिच्या लक्षात आले की, तिला न सांगता तो त्वरेने निघून गेला होता.
त्याच्या गाडीचा आवाज हळुहळू कमी कमी होत गेला. तिला त्याच्या वागण्याचा अर्थच लागत नव्हता.

आणि आज तो पुन्हा दवाखान्यात हजर झाला होता.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all