फ्रिजचे रहस्य. ( भाग दुसरा )

फ्रिजची भीती बाळगणारा आणि सतत हात धुण्याची सवय असलेला एक पेशंट, आणि त्या मागचं भीषण सत्य
फ्रीज ( भाग दुसरा )

" काल न सांगता कुठं निघून गेला. सांगायचंही सौजन्य नाही का तूझ्या जवळ ? " तिने थोड्या हक्काने रागवल्या सारखे विचारले.

" सॉरी, सॉरी. काल मला एकदम अर्जंट कामाची आठवण झाली. यू नो, मी नेहमी कामाला प्रायोरिटी देतो. खूपच अर्जंट होतं."

" कसलं काम होतं, विचारू शकते का ?"

" का नाही. मला अचानक आठवलं की मी गॅस वर भाजी ठेऊन. गॅस तसाच चालू ठेऊन आलो होतो. सॉरी. मी हात धुऊन येतो."

" तुझ्या हाताची जखम बरी आहे का ? आज तरी गॅस चालू ठेऊन आला नाही ना?" तिने मित्रत्वाच्या नात्याने विचारले. खरं म्हणजे तो तिच्या पेक्षा वयाने मोठा होता. पण एकेरी बोललं की पेशंट जास्त मोकळेपणाने आणि विश्वासाने बोलतात हे तिला माहीत होत.

" मी कालच म्हणालो ना की माझा प्रॉब्लेम झोप न येणे आणि वारंवार हात धुणे हा आहे. "

" ओके . बस माझ्या समोर आणि मला सगळ काही खरं खरं सांग. कधी पासून तुला हा त्रास होतोय. तू कुठे राहतोस. घरी कोण कोण असते, सगळ मला सांग. म्हणजे आपण त्यावर योग्य उपचार करू. खरं म्हणजे तू स्वतःहुन माझ्या क्लिनिक मध्ये आलास हेच आश्चर्य. "

" माझा विकार मानसीक आहे हे मला समजते म्हणून मी तुमच्या क्लिनिक मध्ये आलो."

" तुमच्या नाही. निकिता म्हण. नो फॉर्मालिटी प्लीज. बी फ्री अँड टेल. आय एम यूवर फ्रेंड. " 

क्षणभर तो घुटमळला आणि म्हणाला, " ओके निकिता "

त्याच्या हातात हात देत ती म्हणाली, " आता मला सगळ शहाण्या मुलासारख खरं खरं सांग. "त्याने तिचा हात हातात घेतला आणि तो बोलायला लागला.

" अजून एक गोष्ट मला सांगायची होती खरं सांगू का " , तो घुटमळत, अडखळत बोलला.

" बोल ना", ती त्याला म्हणाली.

" माझी गोष्ट ऐकून तुला हसू येईल. पण हे खरं आहे. नुकताच मी एक फ्रिज घेतला आहे. मला त्या फ्रिजची भयानक भीती वाटते. असं वाटतं कोणी तरी बसलेलं आहे त्या फ्रिज मधे . म्हणून मी ते उघडत देखील नाही "

" तू वेडा आहेस. सोप्पं आहे अगदीं. अरे, उघडून बघायचं ना फ्रिज. "

" बघितलं ना. दिवसा काहीचं नसतं. पण रात्री कोणीतरी त्यात बसलेलं असतं. नक्की. तू मला सोडवशील ना या त्रासातून ? " त्याने कळवळून विचारलं.

" नक्कीच सोडवेल. घाबरु नकोस. मी आहे ना तूझ्या सोबत आता."ती त्याला आश्वासक आवाजात म्हणाली.

" आपण समजतो तसं जग नसतं. ते आपण जसे असतो तसे वाटते. या जगात कोणावर विश्वास ठेवावा तेच समजत नाही. "

एखादी कविता वाचावी असा त्याचा खर्जातला आवाज तिला वेगळ्या दुनियेत घेऊन गेला. तो बोलतं होता. ती काय ऐकत होती हे तिचे तिलाच कळत नव्हतं. याला आपण खूप आधी पासून ओळखतो असं तिला वाटायला लागलं.

नंतर तो नेहमीच येत गेला. ते दोघं केंव्हा एकमेकांचे मित्र झाले तेच तिला समजल नाही. सायकीएट्रीस्ट असून ही भावना तिच्या साठी खूप वेगळी होती. तिला देखील जगात कोणीच नव्हत. मामाच्या घरी राहून तिने शिक्षण पुर्ण केलं होतं. आणि आता स्वतःच्या पायावर उभी राहिल्यावर एका वन बीएचके फ्लॅट मध्ये ती एकटीच स्वतंत्रपणे रहात होती. मामाच्या घरून वेगळी राहतांना तिला खूप आनंद झाला होता. पण त्या पेक्षा आजचा आनंद काही वेगळाच होता.

" समीर, चल आज संध्याकाळी कुठंतरी फिरायला बाहेर जावू या. बाहेरचं जेवण करु. " मग दोघं त्याच्या गाडीवर दूरवरच्या टेकडीवर फिरायला गेले.

" समीर, आता तुझा आजार काय म्हणतो. झोप लागते की नाही ? " तिने खट्याळपणे विचारले.

" नाही ना लागत. पण मला आता त्याचं कारण सापडलं आहे. "

" काय कारण आहे ते मलाही कळू दे बरं जरा " ती लाडात म्हणाली.

तिच्या गोऱ्यापान चेहऱ्याकडे आपल्या नजरेने नजर मिळवत तो त्याच्या खास खर्जातल्या आवाजात म्हणाला, " माझा आजारही तूच आहेस आणि ईलाजही तूच आहेस निकीता. अगदी स्पष्ट सांगायचं तर आय लव्ह यू. "

तिला काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना. आपण काय ऐकलं यावर तिचाच विश्वास बसेना.

" समीर, मला काय बोलावं हेच समजत नाही. मलाही तू आवडतोस. पण मला तुझ्याविषयी काहीचं माहिती नाही. " ती अडखळत बोलली. तिला जवळ ओढत तो म्हणाला, " माझ्या बद्दल तुला काय माहिती हवी आहे सांग. नाहीतर असं कर आज माझ्या रूमवर ये. "

" एव्हढ्या रात्रीsss कदापी नाही. " ती ठामपणे म्हणाली.

" आता नाही तर नाही. उद्या दुपारी तरी ?"

" ठीक आहे. मी उद्या दुपारी येते. उद्या तूझ्या रूमवर तूझ्या हातचं जेवण करू या. "

" उद्या नक्की. डन. मी तुला दुपारी घ्यायला येतो. तयार राहा. "

त्याने तिला तिच्या फ्लॅट जवळ सोडले आणि तो निघून गेला.

तो आपल्याला एव्हढा मान देतो हे पाहून तिला खूप भरून आले. आज पर्यंत त्याने तिला त्या हेतूने स्पर्शही केलेला नव्ह्ता की कोणता गैर फायदाही घेतला नव्हता.

हवेत तरंगत, गाणे गुणगुणत ती घरात गेली. आपल्याला पंख फुटले आहेत असे तिला वाटले. रात्री तिला काही केल्या झोप येत नव्हती. तिला वाटलं त्याला फोन करावा. कदाचीत त्यालाही झोप येत नसावी. अशीही यायचीच नाही म्हणा, त्याला उद्याच्या ऐवजी आत्ताच बोलवावं आणि आश्चर्याचा सुखद धक्का द्यावा असं मनाशी म्हणत तिने त्याचा नंबर दाबला. जोरजोरात रींग वाजत होती. पण तो फोनच उचलत नव्हता. तिला आश्चर्य वाटलं. थोड्यावेळाने तिने पुन्हा फोन लावला. पण तो फोन उचलतच नव्हता.

रात्री तिने खूप वेळा प्रयत्न केला. रिंग वाजत होती पण फोन उचललाच जात नव्हता.

तिला त्याच्या वागणुकीचा अर्थच लागत नव्हता. फोन करून करून ती कंटाळली. तो फोन का उचलत नव्हता समजत नव्हतं. काही बरं वाईट घडू नये म्हणून ती प्रार्थना करत झोपी गेली.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all