शीर्षक: तिमिरातूनी तेजाकडे
रात्र सरत गेली की हळूहळू पहाटेची चाहूल लागते. मग लख्ख प्रकाश देत रविराजाचे आगमन होते. प्रसन्न करणारी सकाळ जशी प्रिय तशीच दिवसभर काम करून थकलेली संध्याकाळ थोडी विश्रांती घेण्यासाठी रात्रीला आमंत्रण देत असते असेच वाटते.
जीवनात सुखासोबत दुःखही येते. कधी आपल्याला वेदना देवून जाते तर कधी तेच दुःख एक अनुभवाचा धडा देवून जाते.
राष्ट्रीय स्पर्धेत सर्वच स्पर्धक विजयी होतात का तर नाही. अगदी काहीच खेळाडू त्यात शेवटपर्यंत टिकून राहतात. यशाचे गमक कोणाला कधी सापडलेच नाही, असे नाही. कित्येक स्पर्धकांतून कोणी एकच विजेता होतो तर तो असाच झालेला नसतो. त्यापाठी सराव, चिकाटी, जिद्द आणि सातत्य हे असते. रात्रीचा दिवस करून मेहनत केलेली वेळ ही त्या विजेत्याला यशस्वी ठरवते.
'अपयश ही यशाची पायरी आहे.' हा सुविचार खूपदा वाचला तरी तो फक्त वाचणे आणि त्याला आत्मसात करणे गरजेचे आहे, परंतु हरण्याचे कारण शोधणारे कमी आणि त्यावर जास्त विचार करून हार पत्करणारे जास्त दिसतात. कारण अपयश आले की आपली केलेली मेहनत ही वाया झाली हेच आताची इंस्टा म्हणजेच इन्स्टंट पिढी म्हणत आहे.
बहिणाबाई खूप छान सांगतात की, 'आधी हाताला चटके तेव्हाच मिळतें भाकर ' पण इथे तर भाकरी करताना चुकली म्हणून चपाती वर भूक भागविणारी आणि त्याला अनेक पर्याय शोधणारी नवी पिढी ह्यातच मार खाते.
असे म्हणतात की काही वेळा,वेळ जाऊन द्यायची असते.का तर पुढे तयारी करण्यासाठी आपल्याला लागणारी मनाची तयारी आणि शांत डोक्याने विचार करण्याची गरज असते. तेव्हाच वाईट विचार बाजूला सारून चांगल्या विचाराला जागा देता येते.
माणूस म्हंटला तर तो चुकतो पण त्या चुकातून पुढे शिकणाराच प्रगती करतो. त्यासाठी संयमता अंगी असणे खूप आवश्यक आहे.
संधीचे सोने हे केले तर चांगले पण खूप प्रयत्न केल्यावरही यश मिळत नसेल तर मार्ग बदलणे केव्हाही चांगले. आधीच्या काळी प्रलोभन दाखवणारी साधने नव्हती का तर होती पण त्याचा वापर मर्यादित होता.
वेळेचे नियोजन आणि संकटे आले तरी आशेचे ढग मात्र सोबत ठेवण्याचं काम करता आले की गड सर केला म्हणता येईल.
चंद्राचे काम रात्री प्रकाश देणे आणि सूर्याचे काम हे दिवसा असते पण चंद्र एक दिवस दिसत नाही. ह्याचा अर्थ असा नसतो की तो त्याचे अस्तित्त्व गमावून बसतो. कारण कला कलाने लहान जसा होतो तसाच तो कला कलाने मोठाही होतो. तसेच अपयश आले तर थोडे थांबा आणि विश्रांती घ्या पण पुन्हा पौर्णिमेच्या चंद्रासारखे पूर्ण तयारीनिशी रिंगणात उतरा. कारण अंधार जरी आला तरी त्यातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी एक आशेची मेणबत्ती पेटवून मार्गस्थ होणे केव्हाही चांगले नाही का?
© विद्या कुंभार
सदर साहित्याचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा