गडद झाल्या तिन्हीसांजा भाग १

वृध्द स्त्री ची कथा
गडद झाल्या तिन्हीसांजा …मी भाग १


शहरातील गजबजलेल्या वस्तीत सुखानंद या वृद्धाश्रमात जानकी बाईंनी पाऊल ठेवलं आणि एक आवंढा त्यांच्या घशात अडकला. त्या क्षणभर त्या वृद्धाश्रमाच्या गेटपाशीच थबकल्या.

" आई चल."

विनय मागे वळून बघत म्हणाला. त्याने जानकीबाईंची बॅग आणि एक छोटी पिशवी पकडली होती. त्याच्या आवाजाने जानकीबाई भानावर आल्या. त्यांनी खूप केविलवाण्या नजरेने विनयकडे बघीतलं. विनयचा चेहरा निर्विकार होता. तो जानकीबाईंची बॅग आणि पिशवी घेऊन सुखानंदच्या प्रतिक्षालयात शिरला.

जानकीबाईंची अवस्था विचीत्र झाली होती. त्यांना आपल्या पायात कोणीतरी मणामणाचे साखळदंड बांधले आहेत असं वाटत होतं. त्यांनी विनयकडे बघितलं तो सगळी कागदपत्रं भरण्यात व्यस्त होता.
जानकीबाईंचे डोळे अश्रूंनी तुडुंब भरले होते.


त्यांना आपल्या घरातून इथं येण्याची इच्छा नव्हती. जानकीबाईंचं जग म्हणजे त्यांचे पती अरविंदराव विनय आणि नेहा त्यांची मुलगी यांच्या भवतीच फिरत असायचं. अरविंदरावांना जाऊन आज दोन वर्ष झाली. आज विनयने घरातील सगळे पाश अगदी आवडत्या नातवंडांचे सुद्धा तोडून त्यांना इथे आणलं.

जानकीबाईंच्या डोळ्यातून गळणा-या अश्रूंना खंड नव्हता. त्यांच्या नजरेत बधीरपणा आला होता. विनय कधी त्यांच्याजवळ येऊ पोचला त्यांना कळलं नाही.

" आई चल आतमध्ये जा. तुझं समान ठेवलं आहे आतमध्ये."

विनय निर्विकार आवाजात बोलला.

" विनय मला घरी घेऊन चल. मला इथे नाही रह्यच. मला तुमच्या सगळ्यांबरोबर राह्यचय."

जानकीबाई केविलवाण्या आवाजात म्हणाल्या.

" आई तुझी इथे चांगली सोय केली आहे. मला आता तुझ्या आणि संध्यामधील भांडणाचा कंटाळा आला आहे. मी कधीतरी भेटायला येत जाईन. जा आत."

जानकीबाई विनयचा हात पकडण्यासाठी पुढे सरकल्या पण त्यांनी विनयचा हात पकडण्या आधीच विनय निघून गेला.

जाताना त्याने मागे वळूनही बघितलं नाही.

कितीतरी वेळ जानकीबाई तिथेच उभ्या होत्या. त्यांना वाटलं आतातरी विनय आपल्याकडे बघेल किंवा धावत येईल आणि आपल्याला घेऊन जाईल. पण यातील असं काहीच घडलं नाही. विनय गाडीत बसून गाडी सुरू करुन निघून गेला. जानकीबाई हताश झाल्या.

" मावशी कितीवेळ इथे थांबणार चला आता. ऊन खूप वाढलंय. त्रास होईल."

जानकीबाईनी मागे वळून बघितलं. सुखानंद वृद्धाश्रमाचा सेवक सुखानंद आश्रमाचा युनिफॉर्म घालून उभा होता.

" हो" एवढंच बोलून जानकीबाई आत जायला वळल्या.

आत जाता जाता त्यांना विनयचा बालवाडीचा पहिला दिवस आठवला.
जानकीबाई विनयला शाळेत सोडून निघणार तेवढ्यात विनयने भोकाड पसरलं.
" आई तू नको जाऊ. मला घेऊन जा."

त्याचा रडवेला चेहरा बघून त्याही रडवेल्या झाल्या. त्या विनयला घ्यायला पुढे जाणार तोच तिथल्या बाईंनी त्याला आत नेलं. क्षणभर जानकीबाईना वाटलं त्याचं गोष्टीची शिक्षा विनयने आज मला दिली असेल का! या विचारसरीशी त्यांना एक हुंदका फुटला.

जानकीबाई आलेला हुंदका आवरता त्या सुखानंद आश्रमाच्या नोकरा मागोमाग चालू लागल्या. त्यांना तो सुखानंदचा नोकर त्यांना दिलेल्या खोलीपाशी घेऊन आला. त्यांची बॅग खोलीत ठेवत. खोलीतील खुर्चीवर बसलेल्या मलतीबाईना म्हणाला,

" मालती काकू या तुमच्या नवीन रूम पार्टनर."

" हो का!"

डोळ्यावरचा चष्मा खाली करत मालतीकाकु म्हणाल्या.

" नाव काय याचं?" मालतीबाईनी विचारलं.

" जानकी" जानकीबाई म्हणाल्या.

" तुमचं सगळं समान इथ ठेवलंय.मी निघतो "

एवढं बोलून तो नोकर निघून गेला.

जानकीबाई उभ्याच होत्या. त्यांना काहीच कळलं नाही काय करावं.

" जानकीबाई बस तिथे तो पलंग,ते कपाट,ती खुर्ची तुमची आहे. बसा. एवढ्या कावऱ्या बावऱ्या होऊ नका."

जानकीबाई अस्वस्थपणे खुर्चीवर बसल्या. पलंगाच्या बाजूला असलेल्या खिडकीतून त्या आकाशाकडे बघत होत्या. त्यांची नजर निर्विकार होती. विनयची जशी निर्विकार नजर होती अगदी तशीच.

" दोन दिवस तुम्हाला अस्वस्थ वाटेल नंतर सवय होईल. घडलेल्या गोष्टीवर फार विचार करू नका. ते होणारच होतं हे स्वीकार केला की इथे रहाणं तुम्हाला टोचणार नाही." मालतीबाई म्हणाल्या.

जानकीबाई अजुनही खिडकीबाहेरच बघत होत्या. त्यांच्या डोक्यात हे का घडलं यावरच विचार चालू होता.
________________________________
जानकीबाईची काय कहाणी असेल? का त्यांना इथे विनयने आणून सोडलं असेल? बघू पुढील भागात.


🎭 Series Post

View all