गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ३

वृद्ध स्त्री ची कथा
गडद झाल्या तिन्हीसांजा भाग ३

मागील भागात आपण बघीतलं की मालती आणि जानकी एकमेकींच्या मिठीत आधार शोधतात आहे. आता पुढे काय होईल बघू

ब-याच वेळाने मालतीने जानकी भोवतीची आपली मिठी सैल केली.

" जानकी वृद्धाश्रमात येणाऱ्या प्रत्येकाची एक दु:खाची झालर असलेली कथा असते. प्रत्येकासाठी स्वतःचं दु:ख खूप मोठं असतं. मलासुद्धा माझं दुःख खूप मोठं वाटतं होतं. इथे आल्यावर लक्षात आलं प्रत्येकाच्या दु:खाचं गाठोडे वजनदार आहे. कोणाचं वजन जास्त कोणाचं कमी हे नाही ठरवू शकत. मलातर इथे असलेल्या लोकांचं दु:ख ऐकल्यावर माझं दु:ख काहीच नाही असं वाटलं आणि त्याच क्षणापासून मी दुसऱ्यांच्या दु:खाची धार कमी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. "
मालती जानकीचा हात थोपटत म्हणाली.

" मालती तुझं बोलणं ऐकून मलापण माझ्या दु:खाचं गाठोडं फेकून इतरांच्या दु:खाच्या गाठोड्याचं वजन कमी करावसं वाटतंय."

" चांगली गोष्ट आहे. जानकी तुझी कथा काय आहे?"

" मालती माझं आयुष्य सर्वसामान्य होतं. मी वीस वर्षांची होताच माझं लग्न झालं . आमची परिस्थिती खूप चांगली नव्हती. आपल्यावेळी गृहकृत्यदक्ष मुलगी सून म्हणून हवी असायची. आतासारखं नोकरी हवी हा हट्ट नसायचा. माझे बाबा म्हणाले होते. जानकी तू हुशार आहेस तुला पुढे शिकावं वाटतं पण तुला आपली परिस्थिती माहिती आहे. तू आज छान दिसतेस. हळुहळू वय वाढलं की मुली जरड दिसतात. तू तशी झालीस तर हुंडा द्यायला आपल्याकडे तेवढा पैसा नाही. तुझ्या पाठीवर अजून दोघीजणी आहेत. त्यांना लग्न होईपर्यंत शिकवावं लागेल नंतर त्यांचं लग्नाचं बघावं लागेल म्हणून तुझं मन कळूनही तुला विनंती करतो तू लग्नाला हो म्हण.

मालती माझे बाबा काकूळतीला येऊन माझ्या पुढे हात जोडून उभे होते. त्यांच्या डोळ्यातून त्यांची अगतिकता ओघळत होती. मी ते दृश्य बघून शकले नाही. मी चटकन पुढे झाले आणि बाबांचा हात पकडून म्हणाले
बाबा मला ओशाळवाणं करू नका. मी तुमची मुलगी आहे . तुम्ही मला विनंती नाही करायची मला सांगायचं. तुम्ही दोघांनी आम्हा तिघींना खूप ममत्वाने वाढवलंय. बाबा पुन्हा कधी असे हात जोडून नका. मी लग्नाला तयार आहे. तुम्ही माझं वाईट कधीच चिंतणार नाही याची खात्री आहे मला.

एक दिवस अरविंदचं स्थळ आलं. अरविंद सरकारी नोकरीत आहे हेच आईबाबांसाठी महत्त्वाचं होतं.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी अरविंद, त्यांचे आईवडील आणि लहान भाऊ मला बघायला आले. त्या मंडळींना आमच्या घरात शिरल्यावरच आमच्या परिस्थितीचा अंदाज आला. आईबाबांच्या चेहऱ्यावर ओशाळवाणं भाव होते. ते बघून माझा खूप संताप झाला पण ही वेळ माझा संताप व्यक्त करण्याची नाही तर मी अरविंदना पसंत कशी पडेन हे बघण्याची आहे हे माझ्या लक्षात आलं. मी माझी अस्वस्थता मनात दाबून टाकून चेहे-यावर कसंतरी हसू आणत पोह्याच्या प्लेट बाहेर घेऊन गेले.

मालती अरविंदशी माझी एकदाच नजरानजर झाली पण मला तो लगेच आवडला कारण त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं जे मला प्रोत्साहित करून गेलं. जाण्यापूर्वी अरविंद ने माझ्याशी एकट्यात बोलण्याची इच्छा व्यक्त केली.त्या काळी हे नवीनच होतं त्यामुळे काय उत्तर द्यावं हे आईबाबा दोघांनाही कळलं नाही. तेव्हा अरविंदचे बाबा हसत म्हणाले घाबरू नका तुमच्या घरीच आत्ताच अरविंद तुमच्या मुलीशी बोलेल. तेव्हा बाबा भानावर आले आणि म्हणाले स्वयंपाकघरात बोलू शकतात. आम्ही दोघं स्वयंपाक घरात गेलो."

" त्याकाळी अरविंदच्या घरचे खूपच पुढारलेले होते."
मालती आश्चर्याने म्हणाली.

" हो ना. आम्हाला हे नवीनच असल्याने आम्ही सगळेच खूप अवघडलो."
जानकी म्हणाली.

"अरविंद तुझ्याशी कसे बोलले?" मालतीने उत्सुकतेने विचारलं.

" माझ्या मनात धाकधूक होती तसंच आमचं स्वयंपाक घर पण खूप लहान आणि अस्ताव्यस्त पसरलेले होतं. मी शरमेने अरविंदला म्हटलं आमचं घर खूप लहान आहे. स्वयंपाकघरात पसारा पण आहे. यावर अरविंद म्हणाला माणसाचं मन मोठं असावं मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित मावतात पसारा होत नाही. मालती मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं तर तो हसत म्हणाला मला फक्त एवढंच तुला विचारायचं आहे की तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस का? कोणी तुझ्यावर जबरदस्ती नाही नं केली? एक देखणं व्यक्तीमत्व असलेला तरूण एका मुलीची संम्मती विचारतोय हे केवढे आश्चर्य होतं यावरून मला कळलं की आमच्यावर आमच्या आईवडिलांनी जसे संस्कार केलेत त्याच संस्कारात वाढलेला हा मुलगा आहे जो मला आयुष्यभर सुखी ठेवेल. मला माझ्या आईवडलांच्या डोळ्यात माझ्या मुळे दु:ख्खाश्रू आलेले बघायचे नव्हते. मी त्याला सांगितलं आमच्या घरी माझ्या वर कोणतीही जबरदस्ती नाही झाली. त्या एका प्रश्नाच्या उत्तरासाठी अरविंद वाट बघत होते. माझं ऊत्तर ऐकल्यावर लगेच म्हणाले आता तू काळजी करू नकोस मी तुला आयुष्यभर आनंदात ठेवीन. तुझं सुख बघून तुझ्या घरच्यांच्या चेह-यावर नेहमीच हसू राहील याची मी तुला खात्री देतो."

" व्वा! किती संस्कारी होता तुझा नवरा. त्याही काळात मुलाच्या घरच्यांचा वरचष्मा असायचा. किती स्पष्टपणे आणि समजुतीच्या स्वरात तुझ्याशी बोलला. मग काय झालं?"

मालतीला जानकीच्या आयुष्याचा पट उलगडून बघण्यात खूप छान वाटत होतं.

" नंतरचं आयुष्य माझं खूप छान गेलं.अरविंदने मला सुखाच्या हिंदोळ्यावर खूप झुलवलं. विनयच्या वेळी मला दिवस असताना घरातल्या सगळ्यांना मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं. माझ्या माहेरी पैसा कमी होता पण आईबाबांच्या प्रेमात आम्ही तिघी मनसोक्त भिजायचो.

दोन वर्षांपूर्वी अरविंदला कॅन्सर झाला आणि माझ्या सुखाला ग्रहण लागलं ते आजपर्यंत कायम आहे."
जानकीने डोळे पुसले.

" जानकी आता तुझ्या वाईट दिवसांना विसर फक्त अरविंदचं प्रेम लक्षात ठेव. त्याच्या सहवासात घालवलेले क्षण हीच तुझी उरलेल्या आयुष्यासाठी शिदोरी आहे. खूप पौष्टिक आहे ती."

" हो मालती मी अरविंदच्या आठवणीत या वृद्धाश्रमातील दिवस आनंदात घालवणार आहे."

" शाब्बास! " मालतीने जानकीच्या खांद्यावर थोपटलं .

" आम्ही दोघी चिमण्या जोडीच्या…जोडीच्या"
मालती हसत म्हणाली. दोघीजणी हसू लागल्या.
_________________________________
जानकीची कथा ऐकली.मालतीची कथा काय असेल? वाचू पुढील भागात.


🎭 Series Post

View all