गहिवरला श्वास तू - भाग 2

मराठी कथा
गार्गीची प्रेमकहाणी श्रीधर मन लावून ऐकत होता. संसाराच्या या टप्प्यावर त्याला हे ऐकून काहीच वाटत नव्हतं. तो अजून उत्साहाने विचारू लागला..

"पुढे काय झालं?"

त्याला भेटण्याची ओढ वाटू लागली. दुसऱ्या दिवशी त्याला बसमध्ये शोधू लागले. पैसेही परत करायचे होते. पण तो दिसला नाही. दोन तीन दिवस झाले, कुठेच दिसला नाही. मी हताश झाले. रोजच बसमधून येत नसावा असा अंदाज मी बांधला.

माझं कॉलेज सुरू होतं. कॉलेजमध्ये annual फंक्शन सुरू होतं. माझा डान्स होता आणि मी खूप छान तयारी केली होती. आम्ही स्पर्धक स्टेजच्या मागे उभे होतो. स्टेजवर प्रस्तावना झाली, प्रमुख पाहुण्यांचं स्वागत झालं आणि कार्यक्रम सुरू झाला.

एकेक परफॉर्मन्स चालू होता आणि माझं नाव पुकारलं गेलं. मी माझा घागरा सांभाळत नाच करायला स्टेजवर गेले. गाणं सुरू झालं आणि मी ताल धरला. टिंगलटवाळी करणारी मुलंसुद्धा शांतपणे माझा डान्स बघू लागली. मी ठेका धरून गोल फिरत होती तेवढ्यात माझं लक्ष समोर गेलं. प्रमुख अथितींमध्ये तो बसला होता. त्याला पाहून मी स्तब्ध झाले. काही क्षण माझा ठेका चुकला, मी त्याच्याकडे बघतच राहिले..समोरच्या गर्दीत कुजबुज सुरू झाली..सौरभने ते पाहिलं आणि मला डान्स सुरू ठेवण्याचा इशारा केला. मी भानावर आले आणि माझा परफॉर्मन्स पूर्ण केला. माझं कुठेच चित्त लागत नव्हतं. आमच्याच ग्रुपमध्ये एकाला विचारलं तेव्हा तो समजलं की प्रमुख पाहुण्यांचा मुलगाही कार्यक्रमाला आलेला आहे. तोच हा सौरभ.

त्याचे वडील एक निष्णात शास्त्रज्ञ होते, आई एका सरकारी खात्यात उच्चपदावर कामाला होती. सुशिक्षित आणि प्रसिद्ध असं ते कुटुंब होतं. सौरभ त्यांचा एकुलता एक मुलगा, त्याने मात्र बिझनेस करण्याची वेगळी वाट निवडली होती. त्याची अनेक शहरात हॉटेल्स होती, कॅफे होते..सोबतच एक पॅकेजिंग फॅक्टरी सुद्धा तो सांभाळत होता. थोडक्यात राजकुमार होता तो.

त्याच्याबद्दल हे समजल्यावर मला तर गुदगुल्याच होऊ लागल्या, पण मला हे समजलं नाही की तो बसमधून का प्रवास करत होता आणि मला मदत का केलेली? या विचारात असतानाच मागून एक हाक आली..

"हॅलो.."

मी मागे वळून पाहिले आणि मी थरथरू लागले, हृदयाचे ठोके वाढू लागले...

"माझे पैसे परत करताय ना?"

"ह...हो..हो.."

असं म्हणत मी इकडेतिकडे पाहू लागले, कार्यक्रमाच्या ठिकाणी पर्स थोडीच जवळ होती, ती तर वर्गात ठेवलेली..मला काही सुचेनासे झाले, मई सैरभैर झाले,

मला असं बघून तो हसू लागला..

"अहो गंमत केली मी..."

मी कपाळावरचा घाम पुसला...

तो समोरून निघून गेला पण मनातून काही जाईना...

त्याला पुन्हा पहायची ईच्छा व्हायची पण कुठे भेटणार तो? एके दिवशी बसमध्ये पुन्हा भेटला. नेमकं यावेळी माझ्या शेजारची सीट रिकामी होती आणि तो चक्क येऊन बसला. दोघांची नजरानजर झाली आणि एकमेकांना आम्ही स्मितहास्य दिलं. मी न राहवून विचारलं,

"तुमच्याकडे स्वतःची गाडी असतांना असं बसमधून?"

"त्या दिवशी माझी गाडी बंद पडलेली त्यामुळे बसने प्रवास केला होता.."

"आणि आज ?"

"आज...माझं ह्रदय..."

ती चमकलीच..

"हं??"

तो हसतच राहिला..त्याचं उतरण्याचं ठिकाण जवळ आलं तसं त्याने पटकन माझ्या हातात एक चिठ्ठी दिली आणि तो निघून गेला..

मला धीर धरवेना, बसमधेच ते पत्र उघडलं आणि वाचू लागले,

"प्रिय गार्गी,.."

एवढं वाचल्यावर पुढे काय असेल याची कल्पना मला आली. चक्क प्रेमपत्र होतं ते..मी लाजले, आजूबाजूला पाहिलं आणि पुन्हा लपवून ते वाचू लागले.

"तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू सैरभैर झालेलीस, कंडक्टरला पैसे द्यायला पर्स घरी विसरलेलीस हे मला समजलं, मी पैसे पुढे केले. नकळतपणे तुझ्याकडे आकर्षित झालो. तुला पुन्हा भेटायची ईच्छा होत होती. एकदा समजलं की बाबा नाईक कॉलेजच्या कार्यक्रमाला जाताय, मग लक्षात आलं की तुझा युनिफॉर्म त्याच कॉलेजचा होता..तू त्याच कॉलेजला असणार, मग मीही आलो...खास तुझ्यासाठी. जास्त न ताणत मी स्पष्ट सांगतो, मला तू खूप आवडतेस, खाली माझा लँडलाईन नंबर आहे त्यावर कॉल कर, माझ्याशी बोलू वाटलं तर..."

एवढं वाचून मी पत्र पटापट फोल्ड केलं आणि बॅगेत ठेवलं. खिडकीबाहेर बघत बसले पण काहीच समजत नव्हतं, मी माझ्यात राहिलेच नव्हते. बघतेय ते खरं की स्वप्न? विश्वासच बसेना. त्या दिवशी दिवसभर कॉलेजमध्ये लक्ष लागेना. घरी आल्यावर गपचूपपणे पत्र पुन्हा पुन्हा वाचत बसले. एकेदिवशी pco वरून लँडलाईन वर कॉल केला, तिकडून आवाज आला की मी ठेऊन देई. एके दिवशी त्यानेच ओळखलं आणि म्हणाला,

"गार्गी, किती दिवस अशी घाबरशील? आज दुपारी चार वाजता साई गार्डनमध्ये येऊन भेट.."

आमच्या भेटीगाठी सुरू झाल्या, प्रेम झालं...मग काय, सगळी सिनेमासारखी स्टोरी, आमच्या प्रेमकथेत व्हिलन आले आणि सगळंच बिघडलं..

गार्गी सांगत होती आणि श्रीधर मन लावून ऐकत होता. क्षणभर त्याला वाटलेलं की या प्रेमकथेचा गोड शेवट व्हायला हवा होता, पण त्यातली हिरोईन आपलीच बायको आहे हे लक्षात येताच तो स्वतःशीच हसू लागला...

"तर अशी होती माझी स्टोरी.."

"छान हो...मस्त..काय करतो तो सध्या?"

"मोठा माणूस झालाय, मोठमोठ्या कंपन्या सांभाळतो.."

"उगाच माझ्याशी लग्न झालं तुझं.."

"नशीब शेवटी...काय करता.."

दोघेही हसू लागले.

गार्गी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिली, श्रीधर म्हणाला,

"काय बघतेय?"

"काही नाही, खुप दिवसांनी आपल्या जवळच्या मित्रापाशी मन मोकळं करतोय असं वाटलं...खूप मोकळं झाल्यासारखं वाटतंय.."

"आपण नवरा बायको आहोत पण एकमेकांचे मित्र बनायला काय हरकत आहे..?"

"विचार करा, नवीन नवीन लग्न झाल्यावर तुम्हाला मी हे सांगितलं असतं तर किती आकांडतांडव केला असता तुम्ही.."

"खरं आहे, तेव्हा तो काळच वेगळा असतो..कदाचित समोरचा आपल्यात पूर्णपणे गुंतलेला नाही याची खात्री नसते म्हणून असेल किंवा ते possessiveness म्हणतात ना ते असेल.."

"मग आज ते सगळं का नाही?"

"कारण आज संसार पेलून नेलाय आपण, एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलो..आता साक्षात ब्रह्मदेवाने जरी आपली गाठ सोडायचं म्हटलं तरी तो सोडू शकणार नाही याची खात्री झालीये. संसारात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, आजच्या या शांत जीवनासाठीच मेहनत केली, आणि आज जेव्हा ते मिळालंय तेव्हा वाटतंय की आता आपल्या आत थोडं डोकावून पहावं, मनातली जळमटे दूर करावी.."

"तेच तर म्हणतेय मी, एकमेकांचे मित्र बनण्याचा हाच तो काळ.."

"मी काय म्हणतो, एकदा भेट ना त्या सौरभला."