Login

गैरसमज.. (भाग-१)

बाहेरच्या लोकांचे ऐकून गैरसमजाने नाते तुटता तुटता राहत हे सांगणारी कथा

शीर्षक:- गैरसमज

भाग:-१

"आत्यू, तू कधी येणार आहेस? " छोटा राज त्याची आत्या शर्मिलाला फोनवर म्हणाला.

त्याची आई नम्रता त्याला डोळे मोठे करून दटावत कशाला बोलवतोस असे म्हणत होती. तरीही तो शर्मिलाला बोलत होता.

"बघा आत्या, मम्मी मला रागवत आहे. तुला कशाला ये.." तो पुढे काही बोलणार तोच नम्रताने एका हाताने त्याचे तोंड झाकले व दुसऱ्या हाताने त्याच्याजवळील फोन जवळ जवळ हिसकावून घेत बळेच हसत म्हणाली,"ताई, त्याच काही ऐकू नका. तो काहीही बोलत असतो. मी त्याला अभ्यास कर म्हणत होते. कशा आहात तुम्ही?"

"मी ठीक आहे, वहिनी. तुम्ही आणि दादा कसे आहात? " शर्मिला पलिकडून म्हणाली.

"आम्ही पण बरे आहोत. थोडी तंगी चालू आहे. तर तुमच्या दादांची थोडी चिडचिड होते. तुम्ही पुढच्या आठवड्यात येणार आहात ना, ताई?" नम्रताने थोडे तुटकपणे विचारले.

"नक्की नाही, वहिनी. येणार असेल तर सांगेन आधीच." शर्मिलाला तिच्या विचारण्याचा रोख कळला तशी ती म्हणाली.

"बरं, ठेऊ का फोन? मला घर आवरायचं आहे." ती येत नाही म्हणल्यावर नम्रता सुटकेचा निःश्वास सोडत म्हणाली.

"बरं. ठेवा." असे म्हणून शर्मिलाने फोन कट केला.

"नेहमी तर मी येणार म्हटल्यावर वहिनी किती खूश असते. किती भरभरून बोलत असते. मग आज अशी का विचारत होती? खरंच तंगी चालू आहे का ? विचारू का दादाला? मी काही मदत करू शकते का ते विचारते." मनातच विचार करत तिने तिचा भाऊ शशिकांतला फोन लावला.

तो ऑफिसमधून नुकताच घरी निघाला होता. त्याच्या फोनची रिंग वाजली. त्यावर शर्मिलाचे नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरले. फोन उचलून कानाला लावत तो हसत म्हणाला,"हॅलो, छोटी कशी आहेस?"

"मी ठीक आहे रे, दादा. तू कसा आहेस? सगळं ठीक आहे रे? काही अडचण असेल तर सांग." ती भरभर एका वर एक प्रश्न करत काळजीने म्हणाली.

"अगं, हो हो.. थोडं दम खा, छोटी! किती प्रश्न करशील? मी मजेत आहे. कसलीही अडचण नाही. आणि असली तर सर्वांत आधी तुलाच सांगतो ना, वेडे." तो हसत म्हणाला.

"हो दादा, ते खरं आहे. पण तू खरंच सांगतोस ना. मी टेंशन घेईन म्हणून लपवत तर नाहीस ना." तरी तिने शहानिशा करण्यासाठी विचारले.

"नाही गं, वेडू. अगदी खरं सांगतोय मी. टेन्शनमध्ये असतो तर एवढ्या रिलॅक्स हसत बोललो असतो का मी?" तो पुन्हा हसत तिला म्हणाला.

"हो, दादा." तिची चिंता कमी झाली म्हणून ती हसत म्हणाली.

"हम्म, पण तू अचानक असे का विचारलेस?" त्याला आता शंका आली.

"काही नाही रे, एक वाईट स्वप्न पडले होते." ती नम्रताबद्दल कसे सांगायचे म्हणून तिने स्वप्न पडल्याचे खोटे सांगितले.

"अच्छा, स्वप्न काहीही पडत असतात. बरं ते जाऊ दे. राज तुझी आठवण काढत होता. कधी येणार आहेस तू?" तो तिला म्हणाला.

"बघू यांना विचारून सांगते." असे बोलून तिने फोन ठेवला.

"नम्रता, काय गं काय करतेस?" शेजारीच तिची चुलत नणंद पावनी राहत होती. ती नम्रताच्या घरात येतं म्हणाली.

"काय नाही, ओ ताई. रोजचीच कामे, अजून काय! " नम्रता घर आवरत तिला म्हणाली.

"अगं, दार का उघडे ठेवलेस तू? आता एक मी आले म्हणून ठीक आहे. दुसरे कोणी घरात घुसले म्हणजे?" ती तिला दटावत म्हणाली.

"अहो, आत्ताच उघडले होते. राज बाहेर खेळतोय ना म्हणून." नम्रता खेळणाऱ्या राजकडे बोट करत म्हणाली.

"अग्गं बाई ! मी पाहिलेच नाही बघ त्याला. थोडं साखर देतेस का जरा? आणले की देते परत." पदराखाली लपवलेली वाटी काढून तिच्या समोर धरत म्हणाली.

"हो देते ना. आणि काय हो वाटीभर साखर परत करण्याची गोष्ट कशाला करता? असू द्या." नम्रता वाटीत साखर देत हसत म्हणाली.

"असं कसं बरं? घेतलेले परत करावे बाई मग भलेही ती वाटीभर असो वा पोतभर! तुझी सख्खी नणंद शर्मिला नाही बाई मी. जे की एखादी गोष्ट घेतली की ती परत न द्यायला." ती मुद्दाम शर्मिलाच नाव घेत खवचटपणे ओठ तिरपे करत म्हणाली.

"हो ना, ताई. नेहमी काही ना नेत असतात त्या. मागच्या वर्षी त्यांनी पैसे नेले होते. जे अजूनही परत केले नाहीत. येतानाही राजलाच थोडं फार आणतात." शर्मिला काही दिवसांपूर्वी पैसे नेल्याचे नम्रताला आठवले तशी ती तिची री ओढत म्हणाली.

"हो गं, माहिती आहे‌ मला ती काय आणते ते? हलकं कमी किमतीचे खेळणे ! हं.. आता जर ती आली ना अजिबात तिला टेकू देऊ नकोस. शशिलापण सांग जरा. बास, कर म्हणावं बहिणीच घर भरणं." पुन्हा पावनी तिला सल्ला दिल्यागत म्हणाली.

"हो ताई, नाहीच त्यांना आता ठेकू देणार. सकाळीच आला होता त्यांचा फोन. मी सरळ तंगी चाललंय असे सांगितले." नम्रताही तिच्या म्हणण्याला दुजोरा देत म्हणाली.

"बरं केलेस बघ. माझ्याकडे आली की ती म्हणायची गं, ताई वहिनी मला लय काम सांगते. मी येथे जरा विश्रांती मिळावी म्हणून येते तर इथेही राबावं लागते." पावनी शर्मिलाची चुगली करत म्हणाली.

"हा का, ताई? मला तुम्ही अगोदर पण हे सांगितले आहे की. आता येऊ द्या बघतेच तिला." नम्रता मोठे डोळे करत ओठ दाबत शर्मिलाला आठवत म्हणाली.

आता ह्यांच नातं विस्कळीत होणार म्हणून पावनी मनोमन खूश होऊन निघून गेली.

क्रमशः

कोण आहे ही पावनी? ती त्यांचे नाते विस्कळीत करण्यात यशस्वी होईल का? शर्मिलाला कळेल का नम्रताचे तुटक वागणे?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0

🎭 Series Post

View all