Login

खेळ सावल्यांचा... भाग ९ (अंतिम)

"ह्यात घराचे आणि बिझनेसचे कागदपत्र आहेत. आमचं कोणी नाही. आता हे सगळं तुझं आहे. तुला हवं ते कर ह्याच्या सोबत बँकेच्या डिटेल्स आहेत. त्यात अस्मिताचे काही दागिने आणि खात्यात पैसे आहेत ते तुम्ही वाटून घ्या." अजित बोलला.
खेळ सावल्यांचा… भाग ९ अंतिम ( रहस्यकथा)



मागील भागात आपण बघितले ….


"चला आता तुमच्या मुक्तीची वेळ झाली आहे." साधू महाराज बोलले.

"महाराज एक मिनिट फक्त. आमच्यासोबत आत या. अजित बोलला.


आता पुढे …


अजितने अस्मिताकडे बघितले, तिने देखील मान डोलावली.

अजित आणि अस्मिता आत गेले त्यांच्या मागोमाग साधू, मंगेश, मनोहर, कुसुम आत गेले.


बैठकीच्या बाजूने वर जाणाऱ्या जिन्यावर अजित गेला. तिथे एक फोटो लावलेला होता, तो त्याने बाजूला केला. त्याच्या मागे एक छोटा चोर कप्पा होता म्हणजे अल्मारी होती त्याला डिजिटल लॉक होते.


"मंगेश इथे ये. हे लॉक उघड. \"माया\" नाव टाक पासवर्डसाठी." अजितच्या बोलण्यावर मंगेशने ते लॉक उघडले.


"ह्यात घराचे आणि बिझनेसचे कागदपत्र आहेत. आमचं कोणी नाही. आता हे सगळं तुझं आहे. तुला हवं ते कर ह्याच्या सोबत बँकेच्या डिटेल्स आहेत. त्यात अस्मिताचे काही दागिने आणि खात्यात पैसे आहेत ते तुम्ही वाटून घ्या." अजित बोलला.


मंगेशने सगळे दस्तावेज बाहेर काढले. मागे थोडी रोख रक्कम होती, जी अजितने सुजितला द्यायला काढली होती. तिथे एका पिशवीत त्याने सगळे भरले.


"तुम्ही खूप मदत केली आमची. खूप आभारी आहोत तुमचे." अस्मिता मनोहर, मंगेश आणि कुसुमला बोलली.


"चला जातो आम्ही." अस्मिता आणि अजित पिहूला जवळ घेत बोलले.


साधू महाराज त्यांना अंगणात घेऊन आले. प्रभा देखील होती. महाराजांनी मंत्र उच्चार सुरु केला आणि काही क्षणातच त्यांचे आत्मे वर जाताना दिसले. ते समाधानाने जात होते. आता मनात काही सल नव्हती, सूड नव्हता.
"ह्याला पोलिसांच्या हवाली करा." म्हणत साधू महाराज निघून गेले.


सकाळचे चार वाजत आले होते. सावल्यांचा खेळ संपला होता. थरारक रात्र संपली होती. आता वातावरण शुद्ध होते. हवेत गारवा होता. मंगेशने पोलिसांना फोन केला. पोलिस येईपर्यंत मंगेश ते दस्तावेज बघत होता. त्यातील एक कागद बघून मंगेश हादरला. एकदम चिडला.


"किती तू स्वार्थी निघालास सुजित तुझा भाऊ तुझ्यासाठी काय विचार करत होता आणि तू त्याच्यासोबत काय केलं बघ. हे बघ हे बिझनेसचे कागद त्यात त्याने तुला पार्टनर करण्यासाठी कागदपत्र तयार करून ठेवले होते आणि हे बघ हे पाकीट ह्यावर तुझं नाव आहे. ही रक्कम त्याने तुझ्यासाठी ठेवली होती आणि तू सगळं मातीत घालवलं." मंगेश डोळ्यात पाणी आणून बोलला.


ते बघून सुजितच्या डोळ्यात आता पश्चाताप होता. तितक्यात पोलीस आले. सुजितने स्वतः सगळे पोलिसांना सांगितले.


"त्यांचे शरीर कुठे ठिकाणी लावले?" पोलिसांनी विचारले.

वरांड्यातील त्या तीन दगडांकडे सुजितने बोटं दाखवले. कामगार बोलावून जमीन खोदून तिघांचे सापळे बाहेर काढले गेले. प्रभाचा सापळा कपाटातून काढला गेला.


"इतकं सगळं झालं, तरी कोणाला काहीच कसे समजले नाही?" पोलिसांनी विचारले.


"त्या रात्री नंतर पुढील काही दिवस मी इथेच राहिलो. सगळ्यांना माहीत होतं की, मी अजितचा भाऊ आहे, त्यामुळे माझ्यावर शंका घेण्याचे काही कारण नव्हते.
त्या रात्री ह्यांना मारल्यावर दुसऱ्या दिवशी मी कामगार बोलावले आणि काम सुरु केले. शेजाऱ्यांनी विचारले तर त्यांना सांगितले की, घराचे जरा काम सुरु केले आहे, पण वहिनीच्या आईची तब्येत अचानक खराब झाली, म्हणून त्यांना बोलावले होते. तर ते रात्रीच गावी गेले. म्हणून मी थांबलो आहे. त्यासाठी रात्री मी त्यांचे सामान एका गाडीत ठेऊन त्यात एक कुटुंब बसवून पाठवले होते. ज्यामुळे कोणी बघितले असेल तर त्यावर विश्वास बसेल सगळ्यांचा.
मग इथे त्यांना पुरले. इथे हे तीन दगड बसवले. आणि दोन दिवसांनी सगळीकडे सांगितले की, गावाहून परत येताना त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि तिघे जागीच गेले. ती तिचं गाडी होती, ज्यात एक गरीब रस्त्यावरील कुटुंब मी बसवले होते. तो अपघात मीच घडवला. दोन दिवसांनी त्या कुटुंबावर अजित अस्मिता आणि पिहू सांगून त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. तेरवी केली आणि मग निघून गेलो. दरम्यान कागदपत्र शोधले पण सापडले नाही.
मग काही दिवसांनी लोकांना त्यांचे भास होऊ लागले तेव्हा समजले की ते अजून इथेच आहेत आणि मग मी माझा खेळ सुरु केला." सुजितने त्याचे सगळे गुन्हे कबूल केले.


"पण तुला कसं समजलं की त्यांच्यासोबत घरात काही झाले आहे." सुजितने मंगेशला विचारले.


"सुजित माझ्या आधीच्या ऑफिस मध्ये होता तेव्हापासून आमची मैत्री. आम्ही खूप गोष्टी एकमेकांना सांगायचो. त्या दिवशी तेरवीला मी देखील होतो. पण तुझी भेट झाली नाही तेव्हा, कारण मी ह्या माझ्या बाजूच्या घरातून सगळं बघत होतो. मी आलो तेव्हा आधी हे तीन दगड बघतले. रक्षाबंधनच्या दोन दिवस आधीच अजित भेटला होता तेव्हा घराचे काही काम आहे ह्याबद्दल बोलला नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वहिनींची आई सहा महिन्यांपूर्वीच वारली त्यामुळे आता हे शक्य नव्हते. त्यात मला ह्या आत्म्याचा वास कळतो म्हणून शंका आली. मग आम्ही पण पुढील डाव खेळलो आणि सत्य बाहेर आले." मंगेश बोलला


सुजितला अटक झाली. नंतर आजन्म कारावासाची शिक्षा झाली.

मंगेश ने माया बंगल्यात एक अनाथ आश्रम सुरु केले. स्वतः च्या नोकरीसोबत अजितचा बिझनेस सांभाळतो. त्यातून येणाऱ्या पैशांमधून अनाथ आश्रमाचा खर्च चालतो. अजितने ठेवलेले पैसे आश्रमाच्या कामी वापरले जातात. आणि अस्मिताचे दागिने त्याने अनाथ मुलींना त्यांच्या पायावर उभे राहण्यास आर्थिक सहाय्य म्हणून दिले. कुसुम आणि मनोहर ते आश्रम सांभाळतात. त्यांचे स्वतः चे कोणी नाही त्यामुळे तिथल्या लहान मुलांमध्ये ते रमतात.
आता माया बंगल्याच्या गेट वर कोणतीही पाटी नाही.


तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा.

धन्यवाद