Login

गंधबावरे 52

एक वेगळी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 52
"अनु, अनु तुझ्या मनात इतके काही भरले होते. तुझ्या मनामध्ये इतक्या जखमा झाल्या होत्या याची मला कल्पनाच नव्हती ग. तू असा काही विचार करत असशील असं मला कधी वाटलेच नाही. तू माझी मैत्रीण, जीवाभावाची मैत्रीण. तुझ्या मनातील सारे काही मला सांगणारी असेच मी समजत होते पण तुझ्या मनातील ही दुसरी बाजू तू मला कधीच सांगितले नाहीस याचा अर्थ तू मला मनापासून आपले मानलेच नाहीस. मी मात्र वेडी आशेने तुझ्याकडे पाहत बसले आहे. खरंच अनु, माझं काही चुकलं का? तू तुझ्या मनातील या भावना मला कधी का बोलून दाखवलं नाहीस? बोल ना. तुला हे बोलण्याची कधी गरज वाटली नाही का? मला सांगावेसे वाटले नाही का? आणि गॅदरिंग वगैरे म्हणतेस तर तुला हे सगळे शाळेत असल्यापासूनच वाटत असणार ना? मग इतक्या वर्षात एकदाही मला बोलली नाहीस याचा अर्थ तू मला आपलं मानलं नाहीस. मला खरंच खूप वाईट वाटतेय. मी कुठेतरी कमी पडले की काय असे वाटते. तू माझ्यासोबत होतीस पण माझ्याबरोबर नव्हतीस याचे मला वाईट वाटते. खरंच तुझे मन समजून घ्यायला तुला समजून घ्यायला मी खूप कमी पडले. हवं तर मला माफ कर पण अजून तुझ्या मनामध्ये काही असेल तर आत्ताच बोलून मोकळी हो. उगीच गढूळ पाण्यात डुबकी मारण्यात काय अर्थ आहे? मन नेहमी निर्मळ ठेवावं, वाहत्या पाण्याद्वारे मळ निघून जातो आणि मन निर्मळ बनते त्याप्रमाणे असावे. मी नेहमीच तुझ्यासोबत असेन तुला जे काही बोलायचे आहे ते तू स्पष्ट शब्दात बोलून मोकळी हो. मला तुला समजून घ्यायचे आहे. माझं खरंच चुकलं. अनु, मला माफ कर." श्रेया म्हणाली. श्रेयाला खरंच या गोष्टीचा खूप पश्चाताप झाला होता.

'एखाद्याला समजून घ्यायचे असेल तर किती कठीण असते ना? आपण प्रत्येकाला आपलं मानतो पण तीच व्यक्ती आपली कधीच नसते हे आपल्याला समजतच नाही आणि आपण मात्र त्या व्यक्तीला आपले म्हणत असतो. खरंच समोरची व्यक्ती आपली आहे की नाही हे आपण पडताळून पाहू शकत नाही ना? ती व्यक्ती आपल्यासोबत असते पण आपल्याबरोबर नसते. आपला फक्त तो भास असतो. खरंच एखाद्याला समजून घेणे आणि आपलं मानणे किती कठीण असते ना? आपण मात्र प्रत्येक नाती जपत राहतो. आपला आपला म्हणून समोरच्याला गोंजारतो पण ती व्यक्ती मात्र मनात खूप काही साठवून असते हे आपल्याला कधीच समजत नाही पण जेव्हा समजते तेव्हा उशीर झालेला असतो. अशावेळी नक्की काय करावे हे समजत नाही. अनुने असे का केले असेल? तिच्या मनातील भावना तिने मला का बोलून दाखवले नसतील? मी मात्र प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेअर करत आले पण तिने एवढी मोठी गोष्ट माझ्याशी एकदाही बोलू नये असे का घडले असेल?' तिच्या मनामध्ये नक्की काय सुरू असेल असा विचार करत श्रेया बराच वेळ उभी होती. तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अनुने देखील दिली नव्हती. ती देखील विचार करत उभी होती. काही क्षण तिथे शांतता पसरली होती.

"तू कशाला माफी मागत आहेस? खरंतर यामध्ये तुझी काही चूक नाही. चूक आहे ती माझ्या नशिबाची. तू मला प्रत्येक वेळी सांभाळून घेतलेस, आपलेपणाची भावना दिलीस. तुझ्या जागी दुसरी कोणीतरी असती तर मला सोबत घेऊन न जाता ती एकटी पुढे गेली असती पण तू तसे केले नाहीस. तुला माझी गरज आहे हे मला समजत होते. तुझ्यातून आपलेपणाची भावना मला समजत होती त्यामुळेच मी तुला कधी सांगितले नाही. जर त्यावेळेस मी मनातले बोलून मोकळी झाले असते तर आपली मैत्री इथंपर्यंत आलीच नसती. तू मला समजून घेतलेस म्हणून माझ्या मनातील भाव तुला बोलून दाखवले नाही कारण त्या गोष्टीचे तुला खूप वाईट वाटले असते आणि तुला वाईट वाटले असते तर माझे मन स्थिर झाले नसते. माझे मन तुझ्यात अडकले होते. आपली इतक्या वर्षांची मैत्री होती, आपण एकमेकींना समजून घेतले, आपण एक होतो पण आयुष्यात एकदा तरी असा टप्पा येतोच ना की यातून बाहेर पडायला हवे असे वाटते. सध्या माझे तसेच होत आहे. या नात्यांमध्ये गुंतून पडण्यात काही अर्थ नाही खरं मतर यामध्ये स्वतःचेच नुकसान आहे हे मला जाणवले आहे म्हणून मी आता हे सगळे बोलून दाखवत आहे. हवं तर तू मला स्वार्थी समज किंवा काहीही समज मला काहीच फरक पडणार नाही पण सध्या मला फक्त माझाच विचार करायचा आहे. दुसर्‍याची मने सांभाळत बसले की स्वतःचेच नुकसान होते आणि मला माझे नुकसान करून घ्यायचे नाही." अनु बोलताना श्रेया फक्त तिच्याकडेच पाहत होती.

"अनु, खरंच तुझ्या मनामध्ये खूप काही साचले आहे. आता तू जे काही बोललीस हे खरंच माझ्या डोक्यावरून जाण्यासारखे आहे. तुझ्या मनामध्ये इतके काही असूनही तू आज खरे काय ते बोलत आहेस. मला तर हे सगळे ऐकून खरंच वाटत नाही. तू खरंच माझी अनु आहेस का असा प्रश्न मला पडत आहे. माझी अनु इतकी निरागस आणि निखळ मनाची होती आज मात्र तिला नक्की काय झाले आहे हे मला समजू शकत नाही. खरंच अनु, तू खूप बदलली आहेस." श्रेया म्हणाली.

"किती सत्य आहे ना! लोक जेव्हा इतरांचा विचार करतात तेव्हा ती जगासाठी चांगली असतात पण जेव्हा स्वतःचा विचार करू लागतात तेव्हा जगाला ती वाईट वाटू लागतात. आत्ता मी माझा स्वतःचा विचार करत आहे तर तुला तुझी अनु दिसत नाहीये पण आजपर्यंत फक्त आणि फक्त तुझा आणि तुमच्या सगळ्यांचा विचार करत होते तेव्हा मात्र मी तुम्हा सर्वांची अनु होते पण तुमच्या सर्वांचा विचार करता करता मला दुःख होत होते, माझे मन दुखत होते याचा मात्र कोणीच विचार करत नव्हते. आता मी स्वतःचा विचार करत आहे, स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करत आहे तर मात्र तुम्हाला अनु बदलली असे वाटत आहे. किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? माझ्या नशीबावर माझे मलाच हसू येत आहे." अनु म्हणाली.

"अनु असे म्हणू नकोस ना ग. तू खरंच माझ्या जवळची आहेस. मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की तुझ्या मनात इतके साचले असूनही तू इतकी प्रेमाने, मायेने माझ्यासाठी इतकं काही केलेस खरंच त्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत. मला आता सांग यापुढे तू काय ठरवले आहेस? तू माझ्यासाठी आणि मिहिरसाठी एक वर्ष त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून तिथे एक वर्षभर राहिलीस. आता वर्ष संपले आहे म्हणून इथे आली आहे. तुझा पुढचा विचार काय आहे? प्लीज मला सांगशील का? आणि मिहिरला आधीचे काहीच आठवत नाही असे तू म्हणालीस तर मग त्यासाठी काय करावे लागेल? तू जसे म्हणशील तसे सगळे होईल, तुझ्या मनानुसार होईल, तुला काही वेगळे वाटत असेल तर ते सुद्धा तू सांगू शकतेस मला काहीच अडचण नाही. तुला जसे हवे असेल तसे होईल." असे श्रेया म्हणताच अनु छद्मी हसली.

"काय झाले अनु? तू अशी का हसतेस? खरंच तुझ्या मनाचा अंत मला समजतच नाहीये बोल ना अनु." श्रेया म्हणाली.

"मी इतकी पण स्वार्थी नाहीये की इतरांचे सुख हिरावून घेईन. जे माझ्या हक्काचे आहे ते मी नक्कीच भांडण करून घेईन पण माझ्या हक्काचे जे नाही ते मी कधीच घेणार नाही. माझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते घडेलच पण जर का माझ्या मनासारखे होत असेल तर त्यामध्ये कुणी आले तर ते मला अजिबात आवडणार नाही. श्रेया जेव्हा मी हे एक वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट करून त्या घरामध्ये गेले तेव्हाची आणि आता ते घर सोडतानाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. त्यावेळेस जसे होते तसे आता नाही. मिहिरसुद्धा पूर्ण बदलला आहे. त्याचा एक्सीडेंट झाल्यापासून त्याच्यामध्ये बराच फरक पडला आहे. तो तुला ओळखेल की नाही हे मला माहीत नाही पण मला मनापासून असे वाटते की तुला पाहिल्यावर त्याला आधीचे सगळे आठवेल. जरी आठवले नाही तरी तुला पाहून तो तुझ्या नक्कीच प्रेमात पडेल त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. जे काही होईल ते तुझ्या मनासारखेच होईल त्यामुळे तू निवांत रहा." असे अनु म्हणताच श्रेयाने तिला मिठी मारली.
अनु मनातून खूप दुःखी झाली होती. तिला मिहिरची आणि त्याच्या घरची खूप आठवण येत होती. ती श्रेयाला भेटली होती. तिच्याशी बोलून तिचे मन मोकळे झाले होते, पण तिच्या मनात एक अनामिक भीती वाटत होती. हातातील सगळे निसटून जातात आहे असे तिला वाटत होते. ती शांत होती. लवकरच मिहिरशी बोलून याविषयी ठोस निर्णय ठरवावा असे तिने ठरवले.

अनु नक्की काय ठरवेल? श्रेयाला पाहून मिहिरला सगळे आठवेल का? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
0

🎭 Series Post

View all