Login

गंधबावरे 55

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 55
अनु आणि श्रेया बराच वेळ मिहिरची वाट पाहत होत्या इतक्यात त्यांना मिहिर दिसला. मिहिरला पाहून त्या दोघींनाही खूप आनंद झाला. दोघींच्याही चेहऱ्यावर एक हलकीशी इस्माईल आली आणि दोघी एकटक त्याच्याकडे पाहत होत्या. मिहिर देखील त्याच्याच तालात चालत त्या दोघींकडे येत होता. अनु मिहिरला पाहताच तिला खूपच आनंद झाला कारण तिने दिलेला शर्ट त्याने घातला होता. तो शर्ट पाहून तिला खूपच आनंद झाला कारण आज पहिल्यांदाच तिने कोणती तरी वस्तू दिलेली त्याने परिधान केले होते. याचा अर्थ त्याच्या मनामध्ये अनुविषयी काहीतरी फिलिंग असतील असे तिला वाटत होते आणि त्या विचारातच ती तेथे बसली होती. मिहिर इकडे कधी येईल आणि आपण त्याच्याशी कधी बोलू असे तिला होत होते. मिहिर जवळ येण्याची ती वाट पाहत होती. इतक्यात तिला काही समजायच्या आतच श्रेया तेथून उठली आणि ती मिहिरला जाऊन बिलगली.

श्रेयाला मिहिरच्या मिठीत पाहून अनुला खूप वाईट वाटले. तिचे मन भरून आले. पुढे कसे रिऍक्ट व्हावे हे तिचे तिला समजेना. ती तशीच स्तब्ध बसली. इकडे मिहिरला देखील काय रिऍक्ट व्हावे ते समजेना. तो देखील बिथरून गेला होता. त्याच्या तर ध्यानीमनी सुद्धा नव्हते असे कोणी येऊन त्याच्या मिठीत शिरेल. तो तसाच स्तब्ध उभा होता.

'आता सगळे संपले. श्रेया मिहिरला जाऊन बिलगली याचा अर्थ मिहिरला आता तीच पसंत पडणार. तसेही ती दिसायला सुंदर आहे मी अशी सावळी. श्रेयासमोर त्याला मी दिसणार देखील नाही. आता बोलायचे तर दूर तो साधे माझ्याकडे पाहणारही नाही. आपण कशाला त्या दोघांमध्ये कबाब मे हड्डी बनवून राहायचे त्यापेक्षा आपण पुन्हा आपल्या घरी जाऊया. आपण जे ठरवले आहे ते पुन्हा सुरुवात करू. तसेही हा रस्ता आपला नव्हेच. आपल्याला वेगळ्या मार्गाने जायचे आहे त्यामुळे याचाच पुन्हा पुन्हा विचार करून कशाला मनाला त्रास द्यायचा त्यापेक्षा आता आपण फक्त करिअरमध्येच लक्ष द्यायचे. असे मिहिरमध्ये गुंतून आपल्याला काहीच मिळणार नाही. तसेही त्याला श्रेया मिळाली आहे त्यामुळे त्याच्या आयुष्यातील आपली जागा शून्य आहे ते ओळखूनच आपण वेळेतच बाहेर पडलेले बरे नाही तर नंतर खूप त्रास होईल. आता आपला मार्ग वेगळा.' असे म्हणून जड पावलांनी ती तेथून निघाली. तिच्या डोळ्यावाटे आसवे गाळत होती. ते हळूच पुसत ती जात होती पण काही केल्या मिहिरला न भेटता जाणे तिच्या जीवावर आले होते. तिला भेटण्यासाठी तर तो इतक्या आतुरतेने आला होता. कधी नव्हे ते त्याने तिच्याशी भेटण्यास होकार दिला होता. तो तिच्याशी गप्पा मारून मैत्री वाढवत होता पण आता ते नाते काहीसे थांबले आहे असे तिला वाटू लागले. आता जगच काही क्षणासाठी थांबले की काय असे तिला वाटत होते.

अनु जड पावलांनी तिथून जात होती त्यासाठी दुसरीकडून वाट नव्हती म्हणून ती मिहिर आणि श्रेयाच्या जवळून जात होती पण श्रेया मिहिरच्या मिठीत असल्यामुळे मिहिरला तिच्याकडे पाहता आले नाही. त्या दोघांकडे पहायचे तिचे धाडसही झाले नाही त्यामुळे ती तशीच खाली मान घालून डोळ्यातील आसवे गाळत बाहेर जाऊ लागली इतक्यात तिचा हात कोणीतरी पकडला ते पाहून ती दचकली. 'कोण असेल हा कुणी माझा हात पकडला असेल? आई बाबा तर इथे आले नसतील ना की भाऊ आला असेल? घरचे कोणी आले असतील का की कोणी मला पहिले असेल? श्रेयाने तर मला थांबवले नसेल ना की मिहिर?' असे म्हणताच ती पटकन वळली तर खरंच तो मिहिर होता. मिहिरने तिचा हात पकडला होता त्यामुळे ती स्तब्ध झाली. त्याने हात का पकडला असेल? त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचे असेल का? की त्याला पाठीमागे जे काही घडलं ते विचारायचे असेल की श्रेयाबद्दल काहीतरी विचारायचे असेल? जर त्याने श्रेयाबद्दल विचारले तर मी काय उत्तर देऊ? अशा मनःस्थितीत ती हात सोडवून घेत होती पण मिहिरने इतका घट्ट हात पकडला होता की तिला ते सोडवणे मुश्किल झाले होते.

अनु बराच वेळ तशीच स्तब्ध होती. मिहिरला श्रेया येऊन बिलवली होती तर त्याने अनुचा हात पकडून ठेवला होता. इकडे आड आणि इकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण मिहिरच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे हे कुणालाच समजेना. बराच वेळ झाल्यानंतर श्रेया मिहिरपासून दूर झाली. मात्र अनुचा हात तसाच पकडून ठेवला होता.

"मिहिर तू कसा आहेस? बरा आहेस ना? खूप दिवसांनी तुला पाहते म्हणून मी स्वतःला रोखू शकले नाही. सॉरी." असे म्हणून श्रेया लाजू लागली.

श्रेयाला लाजताना पाहून अनुला कसेतरीच वाटले. ती मिहिरच्या हातातून हात सोडू लागली पण मिहिरने तिचा हात सोडला नाही. त्याच्या मनात नक्की काय सुरू होते हे तिला समजू शकले नाही.
"हॅलो मॅडम, तुम्ही कोण आहात आणि असे परपुरूषाला मिठी मारणे तुम्हाला शोभते का? मी इथे फक्त अनुला भेटण्यासाठी आलो आहे पण तुम्ही कोण हे मला समजले नाही. मी तुम्हाला याआधी कधी भेटलोय का? की तुमची आणि माझी ओळख आहे का?" मिहिर प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. मिहिर असे बोलत असताना त्या दोघीही त्याच्याकडे नजर रोखून पाहत होत्या. दोघींनाही समजेना की हा असे का बोलतोय. त्यानंतर अनुला लगेच समजले की बहुतेक याला माझ्यासोबतच श्रेया देखील आठवत नसावी म्हणूनच हा असा बोलतोय. अनुने खुणेनेच श्रेयाला शांत होण्यास सांगितले तेव्हा श्रेया शांत झाली. त्यानंतर बराच वेळ तिथे शांतता होती. ते तिघेही एकमेकांच्या नजरेत नजर मिसळून शांत राहिले होते. कोणी काही बोलावे की नको असा प्रश्न प्रत्येकाला पडत होता. मिहिरला काही आठवत नाही हे मात्र श्रेया आणि अनुला समजले होते त्यामुळे आता श्रेयाने काहीच न बोलायचे ठरवले. ती फक्त त्याला सॉरी म्हणाली.

"अरे मिहिर, तू इतका का उशीर केलास? लवकर येणार होतास ना? मी कधीपासून तुझी वाट पाहतेय आणि ही माझी मैत्रीण श्रेया आहे. खास तुला भेटण्यासाठीच हिला घेऊन आले होते पण तुला पाहिल्यावर हिला काय आठवले काय माहिती, ती येऊन तुला बिलगली. बाय द वे आपण तिथे खुर्चीत बसून बोलूयात का?" असे म्हणून अनुने त्या सगळ्या प्रश्नांवर सारवासारव केली आणि मिहिरला घेऊन तिथे टेबलजवळ जाऊन बसली. मिहिर मात्र एकटाच त्या दोघींकडे पाहत होता.

टेबलजवळ जाऊन बसल्यावर अनुने श्रेयाची ओळख करून दिली. "अरे मिहिर, ही श्रेया माझी मैत्रीण कम बहीण. आम्ही दोघी लहानपणीपासून एकत्रच असायचो, अजूनही एकत्रच आहोत. हिचीच तुझ्याशी ओळख करून द्यायची होती. हिला तुला पाहायचे होते म्हणून इथे घेऊन आले. तुला मी सांगितले होते ना की माझ्यासोबत माझी मैत्रीण देखील असणार आहे ती हीच." असे अनुने ओळख करून दिल्यावर मिहिरने "हॅलो" म्हटले तेव्हा श्रेयाला त्याच्या नजरेत अनोळखीपणा दिसून आला आणि तिला खूप वाईट वाटले. आपल्या हातचे सारे काही निसटून जात आहे असे तिला वाटू लागले.

'मिहिरचा एक्सीडेंट झाला नसता तर आज आमच्या दोघांचे लग्न झाले असते. बरोबर एक वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर आम्ही दोघेही लग्न करणार होतो पण आता मात्र त्याच्या काहीच लक्षात नाही. मिहिर माझा होता आणि तो माझाच राहणार आहे. त्याला माझ्यापासून कोणीही वेगळे करू शकणार नाही. मिहिरला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. त्याला काहीही करून आधीचे सगळे आठवायलाच हवे यासाठी काहीही करावे लागले तरी ते मी करणार.' असा निर्धार श्रेया मनात करत होती.

"हे काय अनु, तू मला न सांगताच इथे आली आहेस. तुझ्याविना ते घर खूप सुनं सुनं झालंय. आई तर रोज तुझी आठवण काढतेय आणि मलाही तिथे करमत नाहीये. तू आता माझ्यासोबत चल. मला तू त्या घरात हवी आहेस. अशी न सांगता इथे आलीस एक कल्पना तर द्यायची ना. चल पटकन. मी तुला घेऊन जायला आलोय." मिहिर म्हणाला.

"अरे मिहिर, तुला माहित आहे ना मला अजून दोन दिवस सुट्टी आहे. शिवाय बाबा पुढील शिक्षण इथेच कर म्हणत आहेत. त्यामुळे मला बहुतेक जमणार नाही." अनु कशीबशी बोलली.

"का नाही जमणार? मला कोणतेही कारण नको आहे. तू तिथे यायला हवी आहेस. कोणत्याही परिस्थितीत. ही माझी जबरदस्ती आहे असे समज." मिहिर म्हणाला.

"ठिक आहे. पण माझी एक अट आहे." अनु म्हणाली.

"कसली अट?" मिहिर म्हणाला.

काय असेल अनुची अट? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all