Login

गंधबावरे 56

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 56
"हे काय अनु, तू मला न सांगताच इथे आलीस. मला सांगायला हवी होतीस ना? आईकडून समजले की तू तुझ्या आई-बाबांकडे आली आहेस ते. जर आधी समजले असते तर तुला मी पाठवूनच दिले नसते." मिहिर म्हणाला.

"का बरं, माझ्या आई-बाबांकडे यायला कोणी बंदी घातली का? माझ्या आई-बाबांकडे मी कधीही येऊ शकते मला कोणीही अडवू शकत नाही." अनु म्हणाली.

"बरं बाई, तुला कोणीही अडवू शकत नाही पण आता झाले ना दोन दिवस आता पुन्हा तू आमच्या घरी चल. तिथे तुझ्याविना कुणालाच करमत नाही. तू आई बाबांना सांगून माझ्यासोबत चल." मिहिर म्हणाला.

"मी तिथे असले तर तू माझ्यासोबत नेहमी भांडत असतोस आणि आता तुला मी हवी आहे. कशाला? भांडण्यासाठी." अनु म्हणाली.

"तसे नाही गं, तुझे कॉलेज असेल ना? पुढे तुला शिकायचे नाही का? तुझ्या कॉलेजमध्ये तुझा अभ्यासक्रम पाठीमागे राहील म्हणून तुला बोलवत आहे." मिहिर म्हणाला.

"अच्छा. म्हणजे माझी काळजी तुम्हाला आहे. पण कॉलेजला तर अजून पंधरा दिवस सुट्टी आहेत आणि म्हणूनच तर मी आई-बाबांकडे आले आहे. मग तुम्ही एवढ्या लवकर का बोलावत आहात?" अनु म्हणाली.

"अरेच्या! तू मलाच प्रश्नांवर प्रश्न विचारत आहेस. तू येणार आहेस की नाही इतकेच सांग." मिहिर वैतागून म्हणाला.

"जर मी नाही म्हटले तर.." अनु म्हणाली.

"तर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही. तू नंतर जरी तिथे आलीस तरी मी तुझ्याशी बोलणार नाही आणि आत्ता लगेच इथून निघतो." असे म्हणून मिहिर जायला उठला तेव्हा मात्र श्रेयाने अनुकडे पाहिले.

"मी येईन पण माझी एक अट आहे." असे अनु म्हणताच मिहिर आणि श्रेया दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.

"तुझी अट? कोणती अट आहे?" मिहिरने आश्चर्याने अनुला विचारले.

"बघ हा तुला जर पटत असेल तरच तू हा म्हण नाहीतर नाही म्हटलेस तरी चालेल. माझी कोणतीच जबरदस्ती नाही." अनु म्हणाली.

"मला जमणार नाही असे या जगात काहीच नाही. तू फक्त तुझी अट सांग. ती कशी पूर्ण करायची हे मी पाहतो." मिहिर म्हणाला.

"अच्छा. बघ हा नंतर नाही वगैरे म्हणायचे नाही." अनु खात्री करत म्हणाली.

"तू बोल तर आधी." मिहिर म्हणाला.

"मी तिकडे यायला तयार आहे पण माझी अट अशी आहे की माझ्यासोबत श्रेया देखील तिथे राहायला येईल. हे जर तुला मान्य असेल तर मी तुझ्यासोबत यायला तयार आहे." असे अनु म्हणताच मिहिर आणि श्रेयाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दोघांनाही खूप आनंद झाला.

'वाव! अनु तर खूपच ग्रेट आहे. खरंच ती निस्वार्थी होऊन माझ्यासाठी सगळे काही करत आहे आणि मी मात्र तिच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते. खरंच अनु माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तिला माझी काळजी आहे आणि माझ्यासाठीच तर ती हे सगळे करत आहे. आता मिहिरच्या घरी गेले की माझे काम आणखी सोपे होईल. मला त्याच्याशी रोज बोलता येईल आणि त्याला पाहता येईल. जरी तो मला ओळखत नसला तरी हळूहळू सहवासाने तो नक्कीच माझ्या प्रेमात पडेल. त्याला कसे वळवायचे हे मला नक्कीच माहित आहे.' असा विचार करत श्रेया देखील लगेच तयार झाली.

'अरे वा! एकावर दोघी फ्री. आता तर मज्जा येईल.' असे म्हणून मिहिर मिष्कीलपणे हसला. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होते असे भासत होते.

"चालेल. चला कॉफी घेऊया. मला एक हॉट ब्लॅक कॉफी." मिहिरने त्याची ऑर्डर दिली.

"तुम्ही दोघी काय घेणार?" मिहिर म्हणाला.

"मला एक ब्लॅक कॉफी." श्रेया लगेच म्हणाली.

"मलाही एक ब्लॅक कॉफी." अनु उत्तरली.

ते तिघेही आता गप्पा मारू लागले. मिहिरची श्रेयाशी आता मैत्री झाली होती त्यामुळे तिच्याशी बोलण्यास त्याला संकोच वाटत नव्हता. पण तो श्रेयापेक्षा जास्त अनुशीच बोलत होता. अजून थोडे दिवस जायला हवेत आत्ताच नवीन ओळख झाली आहे त्यामुळे तो माझ्याशी जास्त बोलणार नाही असे श्रेयाला वाटले आणि तो जितके बोलेल तितकेच ती बोलत होती. कॉफी घेऊन झाल्यावर थोडा वेळ ते गप्पा मारत बसले होते.

"चला निघूया." मिहिर म्हणाला. तसे त्या दोघींनीही त्याला होकार दिला आणि ते सगळेजण कॉफी शॉपमधून बाहेर पडले. मिहिर गाडी घेऊन आला आणि त्या दोघींना गाडीत बसण्यास सांगितले.

"अरे आमच्या आम्ही जातो. तुला उगीच त्रास कशाला." अनु म्हणाली.

"अरेच्या! आपण तिघेही एकाच मार्गाने, एकाच घरात जाणार आहोत तर त्या त्रास कसा झालाय." मिहिर म्हणाला.

"एकाच मार्गाने म्हणजे? एकाच घरात म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?" अनु म्हणाली.

"इतक्यात विसरलीस. आपले मगाशी काय ठरलंय? मी तुला माझ्या घरी यायला सांगितलं होतं तेव्हा तू काय म्हणालीस आम्ही दोघी सुद्धा येऊ. मग आता येत आहात तर चला ना? कशाला उशीर करायचा. मुहूर्त शोधणार आहेस का?" मिहिर उतावीळ होऊन म्हणाला.

"अरे, मी माझ्या आई-बाबांजवळ राहते. त्यांना सांगितल्याशिवाय मी कशी येऊ? डायरेक्ट आले तर ते मला ओरडतील शिवाय केया येणार आहे हे देखील घरी सांगायला हवे ना? सामानाची पॅकिंग करायला हवे. कपडे बॅगा भरायला हव्यात. काही एक असतं का? तू जा पुढे मी उद्या नक्की येईन सोबत श्रेया देखील येईल." अनु म्हणाली.

"नक्की ना? बघ नाहीतर ऐनवेळी पंचाईत करशील." मिहिर म्हणाला.

"नक्की येईन म्हणजे येईन. त्यात काहीही बदल होणार नाही." अनुने मिहिरला प्राॅमिस केले. तेव्हा मिहिर तेथून निघून गेला.

अनु आणि श्रेया दोघीही घरी जायला निघाल्या. 'अरे बापरे! मी हे काय बोलून गेले. माझ्यासोबत श्रेयाला देखील येण्यास सांगितले पण तिथे गेल्यानंतर सोबत राहून मिहिर श्रेयाच्या प्रेमात तर पडणार नाही ना? जर पडला तर पुढे माझे कसे होईल? आई-बाबांना मी काय सांगू? शिवाय त्याच्या आई-बाबांनाही सांगावे लागणारच आहे ना? पण श्रेयाला पाहून मिहिरला आधीचे सगळे कसे आठवले नसेल? ती तर त्याच्या अगदी जवळची होती पण ती देखील त्याच्या लक्षात राहू नये! मला तर खूप आश्चर्य वाटत आहे आणि तो माझ्याशी इतकं मनमोकळेपणाने कसे बोलू लागला? नक्कीच त्याच्या मनात काहीतरी शिजत असणार. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्यावर संशय घेणारा मिहिर आज माझ्याशी इतकं चांगलं कसं काय वागतोय? यामागे काही काळबेर तर नसेल ना?' असा विचार अनुच्या मनात येत होता.

दुसऱ्या दिवशी मिहिर सकाळपासून त्या दोघींची वाट पाहत होता पण त्या काही घरी आल्या नाहीत. त्याने अनुला फोन केला पण तिने फोनही उचलला नाही. त्या दोघी नक्की येतील ना? की त्यांनी मला फसवलं आहे? असा विचार मिहिरच्या मनात येऊन गेला. संध्याकाळ झाली तरीही अनु आणि श्रेया काही आल्या नाहीत.

त्या दोघी नक्की येतील ना? पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
0

🎭 Series Post

View all