Login

गंधबावरे 57

मराठी प्रेम कथा
गंधबावरे 57
अनु आणि श्रेया मिहिरला भेटून घरी निघाल्या. मिहिरला वाटले होते की, त्या त्याच्यासोबत घरी जातील पण तसे झाले नाही. अनुने घरी जाऊन आई बाबांना विचारून मगच येणार असे सांगितले म्हणून तो शांत बसला. त्या दोघी घरी निघाल्या. घरी जाताना अनुच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. 'आता मिहिरकडे गेल्यानंतर श्रेया त्याच्या नजरेसमोर दिसेल आणि आपसूकच ती त्याच्या मनात भरेल. मी हे काय बोलून गेले. मला असे बोलायला नको होते. मिहीर श्रेयाला ओळखला नव्हता तर तसेच होऊ द्यायला हवे होते. जे नियतीच्या मनात असेल ते घडले असते. पण मी इतकी स्वार्थी होऊ शकणार नाही ना की माझ्या स्वतःसाठी इतरांच्या आनंदावर जणू विरजणच पडेल. त्यापेक्षा त्या दोघांना कसे एकत्रित आणता येईल याचा विचार मला करायला हवा आणि त्यानुसारच त्या दोघांना एक करावे लागणार आहे. मला अलगतच त्यांच्या नात्यातून बाहेर पडायला हवे. किती दिवस मी त्यांच्या मध्ये येणार आहे.' असा विचार करत अनु आणि श्रेया रिक्षाने घरी जात होत्या.

'अनु फक्त माझाच विचार करत आहे. माझ्या सुखासाठी ती काहीही करायला तयार आहे. ती जे काही करत आहे ते फक्त आणि फक्त माझ्या प्रेमापोटी करतेय. कधी कधी ती माझ्यावर चिडते, मला रागावते, माझ्याशी अबोला धरते पण अनु ही वाईट नाही. ती खरंच खूप चांगली आहे आणि म्हणूनच ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. तसे असते तर एक वर्षाच्या कालावधीमध्ये तिने मिहिरला आपलंस केलं असतं आणि आता तर त्याचा एक्सीडेंट झाला आहे, तो मलाही ओळखत नाहीये तरीही तिने फक्त आणि फक्त माझ्यासाठीच मिहिरच्या घरी मला घेऊन जायला तयार झाली आहे. जर ती स्वार्थी असती तर तिने मला तिकडे नेले नसते शिवाय ती स्वतः तिथे जाऊन त्या गोष्टीचा गैरफायदा घेतली असती पण अनु खरंच खूप चांगली आहे.' असा विचार श्रेयाच्या मनात येत होता. दोघीही विचारात मग्न होऊन घरी पोहोचल्या. कॉफी शॉपपासून घरापर्यंत जाईपर्यंत दोघीही एकही शब्द बोलल्या नाहीत. त्या फक्त स्वतःच्या विचारातच मग्न होत्या. जेव्हा घर आले तेव्हा त्या दोघी भानावर आल्या आणि रिक्षातून उतरून त्या आपापल्या रूममध्ये गेल्या.

अनु श्रेयाशी काहीही बोलली नाही. ती तिच्या तंद्रितच रूममध्ये गेली. ती गोष्ट श्रेयाला खूप खटकली. 'खरंच अनु हे सारे काही करतेय ते मनापासूनच करते ना? ती माझ्यासाठी इतके काही करते पण जर तिच्या मनात मिहिर असेल तर मलाही तिच्यासाठी काहीतरी करायला हवे. मी फक्त माझा स्वार्थ पाहू शकत नाही. तिच्यासाठीही मला कोणतीतरी स्टेप उचलावी लागणारच आहे. जर खरंच तिला मिहिर मनापासून आवडत असेल तर मला त्या दोघांपासून दूर जावे लागणार आहे आणि हे सगळे अनुसाठीच करणार आहे. पण खरंच तिच्या मनामध्ये नक्की मिहिर आहे का? त्याच्याबद्दल तिच्या मनात काही फिलिंग आहेत का? हे मला कसे समजेल? ती स्पष्ट काही बोलत देखील नाही मग मी विचारायला गेले तर माझ्यावरच चिडेल म्हणून मी शांत राहते पण मला नक्की कसे समजेल? आणि हे समजून घेतल्याशिवाय मी शांत राहणार नाही.' अशी श्रेया स्वगत म्हणाली.

अनु खोलीत एकटीच बसली असताना तिची आई तिच्याजवळ गेली आणि अनुच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली, "अनु, काय झाले बाळा? अशी शांत का बसली आहेस? काही टेन्शन आहे का? मिहिर काही बोलले का? की तुला त्याची आठवण येत आहे?"

"आई, तसे काही नाही पण ते आता उद्या मला तिकडे ये असे म्हणत आहेत त्यामुळे लगेच जावे लागणार म्हणून मी नाराज झाले आहे. बाकी काही नाही." अनु नाराजीच्या सुरात म्हणाली.

"अगं बाळा, ते ये म्हणत आहेत तर तू जा. मुलगी लग्नानंतर माहेरी पाहुण्यासारखीच असते. पण आम्ही तुला तसे काहीही होऊ दिले नाही. तू इथे हवे तितके दिवस राहू शकतेस पण जर तुझ्या सासरच्यांना तुझी आठवण येत असेल तर मात्र तुला तिकडे जावे लागणार आहे. नवऱ्यापासून आणि सासरच्या लोकांपासून खूप दिवस दूर राहणे हे बरे नव्हे. इतक्या दिवसांनी मिहिरची तब्येत चांगली झाली आहे. आता ते पूर्ववत होत आहेत तर अशावेळी तुला तिथे असणे गरजेचे आहे. तू पुन्हा काही दिवसांनी चांगले महिनाभर सुट्टीला ये पण आता जर त्यांना तुझी गरज असेल तर तू जा बाळा. आमचे काहीच म्हणणे नाही." अनुची आई अनुला समजावत म्हणाली.

"हे काय ग आई, काल परवा तर आले आहे आणि लगेच जायचं म्हणजे? मला तर त्याचा खूप राग येतोय. अजून आले नाही तोपर्यंत लगेच असे कोणी बोलावतात का? मला चांगले आठ दिवस तरी राहू द्यायचे ना? तसेही मी वर्षानंतर आता आले आहे. मध्ये एक दिवस चक्कर टाकून देखील जाता आले नाही. त्याचा एक्सीडेंट झाला होता तेव्हा मी पूर्णपणे तिथेच होते. इकडे यायचे देखील माझ्या लक्षात नव्हते आणि आता इथे आले आहे तर लगेच बोलावून घेतोय म्हणून मला खूप राग आलाय." अनु थोडीशी चिडक्या सुरात म्हणाली.

"चिडू नको बाळा, प्रत्येक मुलीला हे ऍडजेस्ट करावेच लागते. कितीही मनात आले तरी गरजेच्या वेळी आपल्या माणसांजवळ असणे हेच तिचे मुख्य कर्तव्य असते त्यामुळे मला असं वाटतं की सध्या तरी तू तिकडे जायला हवेस. पुढच्यावेळी येशील तेव्हा मी तुला असे अजिबात पाठवणार नाही." अनुची आई समजुतीच्या सुरात म्हणाली.

"बरं ठीक आहे आई, पण मी उद्या जाताना माझ्यासोबत श्रेयाला देखील घेऊन जाईन. मला तिकडे सगळ्यांची खूप आठवण येते. श्रेया माझ्यासोबत असेल तर मला तुम्ही सगळे तिथे आहात असे वाटेल आणि माझे मनही तिथे रमेल त्यामुळे ती माझ्यासोबत येऊ दे ना. प्लीज आई." अनु आईला समजावत म्हणाली.

"इतकेच ना. येऊ दे ना मग, मी कुठे नको म्हणते. तसेही खूप दिवस झाले तुम्ही दोघी एकमेकींपासून दूर राहात आणि आल्यापासून मी पाहतेय तुम्ही दोघी एक शब्दही बोलत नाहीये. किमान तिथे गेला तर तुम्ही काही दिवस सोबत राहू शकाल आणि त्यासोबतच तुमचे मनमोकळेपणांनी बोलणे देखील होईल. मिहिर ऑफिसला गेल्यानंतर तू घरीच असतेस तेव्हा श्रेयाची तुला सोबत होईल. तिला देखील थोडी जागा बदलल्यासारखे होईल. तू श्रेयाला घेऊन जा माझे काहीच म्हणणे नाही." असे आई म्हणताच अनुला बरे वाटले.

अनु आणि श्रेयाची नुसतीच धावपळ सुरू होती. त्या दोघी मिहिरच्या घरी जाणार होत्या म्हणून त्यांच्या बॅगा भरून घेत होत्या. अनुनेही तिचे काही सामान काढले नव्हते त्यामुळे तशाच बॅगा तिच्या भरलेले होत्या. तिची फारशी काही धांदल उडाली नाही पण श्रेयाची मात्र खूपच धांदल उडाली होती. तिला मिहिरच्या घरी घालण्यासाठी सुंदर ड्रेस घ्यायचे होते शिवाय तिचे मेकअपचे सामान. ती तिथून पुन्हा कधी इकडे येईल हे सांगता येणार नव्हते त्यामुळे खूप दिवस राहण्याकरिता तिला कपडे घेऊन जायचे होते. त्याप्रमाणे ती तिच्या बॅगा भरत होती. तिने तिच्या आई-वडिलांना देखील ही गोष्ट सांगितली होती आणि त्यांनी यासाठी संमती दिली होती.

अनु आणि श्रेयाची पूर्ण तयारी झाल्यानंतर त्या दोघी खूप सारे स्वप्नं उराशी बाळगून रात्री झोपी गेल्या. सकाळी लवकर उठून त्यांनी त्यांचे सगळे आवरले आणि घरातील सर्वांना त्या तिथून जाणार आहेत हे सांगितले. सर्वांना खूप वाईट वाटले. इतक्या दिवसांनी दोघीही आल्या होत्या. श्रेया देखील तिच्या कामाच्या निमित्ताने दुसरीकडे गेली होती आणि अनु मिहिरच्या घरी होती. त्या दोघीही जाणारा म्हटल्यावर घर पुन्हा सुनं सुनं होणार. पुन्हा कोणाला करमणार नाही म्हणून सगळेजणच शांत झाले. त्या दोघी त्यांचे सगळे आवरून घेऊन सर्वांना नमस्कार करून मिहिरच्या घरी जायला निघाल्या. त्या कितीही लवकर जायला निघाल्या तरी रस्त्यात खूप ट्रॅफिक असल्याने त्यांना पोहोचण्यास आपसूकच उशीर झाला. त्या दोघी घरात गेल्या तेव्हा मिहिर हॉलमध्येच होता ते पाहून अनु गालातच हसली आणि मिहिरच्या आईला सुखद आश्चर्याचा धक्का बसला. अनु आत गेल्यानंतर मिहिर अनुच्या मागेपुढे करत होता ते पाहून त्या दोघींनाही खूप आश्चर्य वाटले.
क्रमशः

0

🎭 Series Post

View all