Login

गंधबावरे 58

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 58
अनु आणि श्रेयाने घरामध्ये प्रवेश केला तेव्हा मिहिर हॉलमध्येच बसला होता. त्याला पाहून अनु गालातच हसली. 'याची सवय अजूनही गेली नाही. माझ्यावर वाॅच ठेवण्यासाठी हा हॉलमध्ये बसायचा आणि अजूनही माझी वाट पाहत हा हॉलमध्येच बसलाय. याचा स्वभाव कधी बदलणार काय माहित.' अनु आणि श्रेयाला पाहून मिहिरच्या आईला खूप आनंद झाला. तसेच आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्या दोघींचे स्वागत करण्यासाठी बाहेर आल्या.

"अरेच्चा! तुम्ही तर खूपच मोठा आश्चर्याचा धक्का दिलात. आज येणार आहे हे तू मला सांगितले नाही अनु. मला जर माहित असते तर मी तुमच्यासाठी गोडधोडाचे काहीतरी बनवून ठेवले असते." मिहिरची आई म्हणाली.

"आई मला वाटलं तुम्हाला मिहिरने सांगितले असेल म्हणून मी काही सांगितले नाही. तसेही माझे पॅकिंग वगैरे होते त्यातून तुम्हाला फोन करायचे लक्षातच आले नाही. दोनच दिवसांसाठी गेले होते आता येणारच आहे तर तुम्हाला सरप्राईज देऊयात असा विचारही केला. म्हणूनच फोन न करता डायरेक्ट आले." अनु म्हणाली.

"बरं केलात. मला तर काहीच करमत नव्हते. तुझ्यविना या घराबद्दल सुनं सुनं वाटत होते. तुम्ही आलात हे बरं केलंत. चला आता मी गरम गरम चहा बनवते." असे म्हणून मिहिरची आई चहा बनवण्यासाठी आत गेली. अनुदेखील श्रेया आणि मिहीरला बोलता यावे म्हणून त्यांना तिथे बसवून ती देखील स्वयंपाक घरात गेली.

"अगं अनु, आलीस तू. मला तुझ्याशी बोलायचं होतं. मला सांग मिहिरमध्ये असा बदल कसा काय झाला?" मिहिरची आई म्हणाली.

"काय माहित आई, मला तर वाटतं त्याच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजत असणार त्याशिवाय हा असे वागणार नाही. मला भेटायला आला होता शिवाय माझ्यासोबत आता खूप छान बोलतोय." अशी त्या दोघींची खुसुर फुसुर सुरू होती इतक्यात मिहिर देखील तिथे आला.

"तुमच्या दोघींचे काय खुसूरपुसूर चालू आहे?" मिहीरच्या आशा बोलण्याने त्या दोघी चपापल्या.

"काय कुठे? आता आम्हा दोघींच्या बोलण्यावर देखील तुझी बंदी असणार आहे का?" मिहिरची आई म्हणाली.

"तसे नाही पण इतक्या हळू आवाजात बोलताय शिवाय तुमच्या बोलण्यामध्ये माझं नावही ऐकलं म्हणून मी बोलतोय." मिहिर म्हणाला.

"तू आमच्यावर वॉच ठेवून आहेस?" मिहिरची आई म्हणाली.

"अजिबात नाही. मी तर इथे पाणी पिण्यासाठी आलो होतो तेवढ्यात तुमचे कुजबूजने माझ्या कानावर पडले म्हणून म्हणालो." मिहिर म्हणाला.

"बरं. आता पाणी पी आणि बाहेर श्रेया बसली आहे तिच्यासोबत बोलायला जा. आम्ही चहा घेऊन येतो." असे अनु म्हणताच मिहीर एकटक तिच्याकडे पाहू लागला.

"मी तिच्यासोबत काय बोलणार आहे? मला तर तुझ्यासोबत बोलायचं आहे. तिच्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही. उगीच तू अट घातलीस म्हणून मी तिला इथे यायला परवानगी दिली आहे." हे शब्द ऐकून त्या दोघी मिहीरकडे आ वासून पाहू लागल्या.

"असे का पाहताय? इथे तुझ्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून मी प्रयत्न करतोय आणि तू मात्र तिकडे निवांत बसली आहेस. तुझ्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून मी तुला इकडे बोलावलं आहे शिवाय आमच्या इथे राहिलीस तर आई-बाबा देखील आनंदी राहतील आणि आईला देखील कंपनी मिळेल म्हणून मी इथे राहण्याची तुला परवानगी दिली आहे." मिहिरच्या अशा बोलण्याने अनुला थोडासा राग आला पण ती शांत बसली.

अनु सर्वांसाठी हॉलमध्ये चहा घेऊन गेली. सर्वजण हॉलमध्ये चहा पीत बसले. गप्पागोष्टी छान रंगल्या होत्या. श्रेया मात्र काहीच बोलत नव्हती. तिला थोडेसे अवघडल्यासारखे वाटत होते शिवाय मगाशी ती हॉलमध्ये बसली असताना देखील मिहिर तिच्याकडे लक्ष न देताच तो आत स्वयंपाक घरात निघून गेला त्याचे तिला वाईट वाटले. तिच्या सौंदर्यावर तो आकर्षित होईल असे तिला वाटले होते पण त्याने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नव्हते याचे तिला वाईट वाटले. ती तशीच शांत बसली होती हे अनुच्या लक्षात आले होते पण ती देखील श्रेयाशी बोलायला गेली नाही. सर्वांसोबत गप्पा मारताना तिच्याशी बोलायला जाणे हे तिला चुकीचे वाटले.

मिहिर अनुसोबत मनसोक्त गप्पा मारत होता. त्यामध्ये त्याची आई देखील सामील झाली होती. मिहिरला असे बदललेले पाहून त्या दोघींना खूप बरे वाटत होते. मिहिरची अनुसोबत छान गट्टी जमली होती. गप्पा मारता मारता बराच उशीर झाला होता. अनु आणि मिहिरच्या आई स्वयंपाक घरात स्वयंपाक करण्यासाठी गेल्या तेव्हा हॉलमध्ये मिहीर आणि श्रेया दोघेच बसले होते. आता तरी त्यांच्यामध्ये बोलणे होऊ दे असा विचार करत अनु स्वयंपाक घरात स्वयंपाक करत होती इतक्यात तिच्या शेजारी कोणीतरी आल्याचे तिला भास झाले म्हणून तिने वळून पाहिले तर मिहिर तिथे आला होता. 'याचे नक्की काय सुरू आहे? हा श्रेयाला सोडून माझ्या मागे मागे का येतोय? याला नक्की काय साध्य करायचे आहे? इतकी सुंदर मुलगी बाहेर बसली असताना देखील हा माझ्याशी येऊन बोलतोय याचा अर्थ काय? कदाचित मी त्याच्याशी बोलले, त्याची कामे करून दिली आहे, त्याची देखभाल केली आहे, औषध पाणी वगैरे केली आहे म्हणून त्याला असे वाटत असेल? नक्कीच त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल दुसरे काही नसेल पण हा श्रेयाशी का बोलत नाहीये? तिच्याशी मैत्री करायला काय हरकत आहे? हा जर श्रेयाशी बोलला तर तिलाही बरे वाटेल. श्रेया बोलायला लागली की हा तिथून उठून दुसरीकडे जातो याचा अर्थ काय? याला नक्की मुलींची एलर्जी आहे की कुणाशी बोलायला हा घाबरत आहे काहीच समजायला वाव नाही.' असा विचार करत अनु स्वयंपाक करत होती.

"पुन्हा मनामध्ये विचार सुरू झाले आहेत का? आता खरंच मी असे कोणते तरी मशीन बनवायचा विचार करतोय की बायकांच्या मनातले मला ऐकू येईल." असे हळूच मिहिर अनुच्या कानात कुजबुजला आणि अनु गालातच हसली. तिला मिहिरमध्ये बराच बदल झालेला जाणवत होता पण तो श्रेयाशी बोलत नव्हता ही गोष्ट मात्र तिला खटकत होती.

संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवायला बसले. मिहिरचे बाबा देखील रात्री अनुचे खूप कौतुक करत होते ते पाहून श्रेयाला कसेतरीच वाटू लागले. अनुने इथे येऊन सर्वांची मने जिंकून घेतली आहेत त्यामुळे आता मिहिर माझ्याकडे जरी आकर्षित झाला तरी त्याच्या आई-बाबांच्या मनामध्ये मी तसेच स्थान मिळू शकेन की नाही माहित नाही. मिहिरच्या बाबांना जेवायला वाढून आपण त्यांच्यावर इम्प्रेशन पाडवेत काय असा मनात विचार करून श्रेया भाजीची वाटी घेऊन त्यांना वाढण्यास पुढे सरसावली तेव्हा मिहिरच्या आई म्हणाल्या,

"त्यांना भाजी वगैरे काही चालत नाही. पथ्य आहे तेव्हा तू राहू दे. पाहुणी आहेस तू, काही कामे वगैरे करू नकोस." तेव्हा त्यांचे बोलणे श्रेयाच्या जिव्हारी लागले. तिने एक कटाक्ष अनुकडे टाकला आणि ती जागेवर जाऊन बसली. तिला प्रचंड राग आला होता. तिथून जाण्याची तिची इच्छा होती पण 'सर्वांसमोर निघून गेले तर वाईट इम्प्रेशन पडेल शिवाय त्यांच्या मनातून पहिल्याच दिवशी मी उतरेन.' असा विचार करून श्रेया तिथेच बसून राहिली.

स्वयंपाक घरातील सगळे आवरून झाल्यावर सगळेजण झोपण्यास निघून गेले. श्रेया अनुच्या रूममध्ये झोपण्यास गेली. अनु मात्र गच्चीवर शतपावली घालण्यासाठी गेली होती इतक्यात तिला कोणाच्यातरी पावलांचा आवाज आला म्हणून तिने तिकडे पाहिले तर तो मिहीर होता. 'मिहिर आता इथे माझ्यासोबत वरती आला आहे! त्याला तर असे सोबत असायला हवे होते. मी जो काही विचार करतेय त्याच्याबरोबर उलट होत आहे असे का? मिहिरला खरंच श्रेया आठवत नसेल की तो मुद्दामून करत असेल? श्रेया त्याच्याकडे आकर्षित व्हावी म्हणून तो माझ्यासोबत बोलण्यास येत असेल का? म्हणजे तिला जलस फिल होऊन ती मिहिरशी बोलायला जावी असे त्याला वाटत असेल. त्याच्या मनात नक्की काय शिजत आहे काय माहित?" असा विचार अनु करत असतानाच मिहिर तिथे येऊन उभा राहिला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all