Login

गंधबावरे 60

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 60
उद्या मिहिरला नक्कीच विचारते असं श्रेयाला आश्वासन तर दिलं आहे पण मिहिरला नक्की काय विचारायचे? त्याला श्रेयामध्ये इंटरेस्ट नाही की तो पूर्णपणे श्रेयाला विसरला आहे? आधीचे सगळे सांगितले तर त्याच्या जीवाला धोका आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे आणि आता तिच्याशी बोल म्हटले तरी हा बोलायला तयार नाही मधल्या मध्ये माझीच पंचायत होत आहे. काय करावे नि कसे करावे हेच समजेना. जाऊ दे त्यापेक्षा त्याला नक्की जाबच विचारूया त्याशिवाय तो खरं खरं बोलणार नाही असा विचार करत अनु झोपी गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अनु लवकरच उठली. तिचे सगळे आवरून ती मिहिरच्या आईला मदत करण्यासाठी आली. तिथे ती पाहते तर काय तिच्या आधीच श्रेया तिथे येऊन पोहोचली होती. ती मिहिरच्या आईशी गप्पा मारत होती आणि बोलता बोलता ती त्यांना मदत देखील करत होती. म्हणजेच ती स्वतःला सिद्ध करत होती. मिहीरच्या आईच्या मनात जर तिने स्थान मिळवले तर त्या घरात तिला स्थान मिळणार होते हे तिने जाणले होते. मिहिरच्या आई देखील श्रेयाशी गोड बोलत, गप्पा मारत काम करत होत्या. त्यांची सकाळी थोडीफार धावपळ होत असायची. सकाळी सर्वांना नाश्ता लागत होता. नाश्त्यामध्ये रोज वेगवेगळे प्रकार केले जायचे. कधी उपमा तर कधी पोहे, कधी मोठ्या रव्याचा सांजा तर कधी शिरा हे प्रकार सोडूनही त्या अधेमध्ये दक्षिणात्य पदार्थ देखील बनवायच्या. इडली, डोसा, उत्तप्पा हे पदार्थ बनवण्यात त्यांचा जणू हातखंडच होता. तळलेले पदार्थ त्या फारशा करत नव्हता कारण मिहीरच्या वडिलांना त्याचे पथ्य असल्याने त्या कधी बनवत नव्हत्या. नाश्ता झाला की चहा, चहा झाले की मिहिरच्या बाबांना रोज ताक लागत असल्याने त्या रवीने ताक घुसाळ्याच्या कारण ब्लेंडरने फिरवलेले ताक त्यांना आवडत नव्हते त्यामुळे त्या नेहमीच रवीने ताक घुसळून घ्यायच्या. सकाळच्या जेवणात कंपल्सरी ताकच असायचे. त्यानंतर स्वयंपाकाची तयारी. पोळ्या लाटायला नंतर बाई यायची त्यामुळे बाकी स्वयंपाक त्या उरकून घ्यायच्या. एकदा स्वयंपाक घरातून बाहेर आले की पुन्हा जेवण्यासाठीच फिरकायचे असा त्यांचा नियम होता. त्यातच त्यातच रुतून बसलेले त्यांना आवडत नव्हते त्यामुळे त्यांचीच सवय अनुला लागली होती. ती देखील पटकन आवरून बाहेर येऊन बसायची.

अनुला पाहून मिहीरच्या आई लगेच अनुला म्हणाल्या, "अनु, तू आलीस. हे बघ श्रेया नको नको म्हणताना मला मदत करण्यासाठी आली आहे. ही तुझ्यासारखीच गोड आहे गं. ही पण लगेच मन जिंकून घेते. अशा मुली मला फार आवडतात. तुम्हा दोघींना पाहिलं ना की मलाही एक मुलगी असायला हवी होती असा विचार मनात येऊन जातो, पण तुमच्याकडे पाहिलं की तुम्हीच माझ्या मुली आहात तुमचेच लाड पुरवायचे असे मी ठरवते." मिहिरच्या आई बोलत असताना अनु फक्त हसली आणि तसेच उभा राहिली.

"अगं अनु, अशी का उभी आहेस? ये ना. हे बघ पोह्याची सगळी तयारी झाली आहे. मी पोहे भिजवून ठेवले आहेत. श्रेयाने कांदा चिरून दिला आहे शिवाय मिरची, कोथिंबीर आहे. पोहे भिजवून त्यामध्ये मीठ, पूड वगैरे सगळे साहित्य घातले आहे. आता फक्त फोडणी द्यायची तेवढी बाकी आहे. तू पोह्याला फोडणी दे आणि मी तोपर्यंत खोबरे खोवून घेते मग सगळेजण एकत्रच नाष्टा करायला बसुयात." असे मिहिरची आई म्हणताच अनु पुढे सरसावली इतक्यात "आई, मी करू का पोहे?" श्रेया म्हणाली तेव्हा अनुला थोडेसे वाईट वाटले पण तिने स्वतःला सावरले.

"अगं नको बाळा, अनुच्या हातचे पोहे ना आम्हा सर्वांना खूप आवडतात म्हणूनच तिला बनवायला सांगितले. उगीच तुझ्या हातचे बिघडायला नकोत. अगदीच मिहीरचे मन सांभाळून घेईपर्यंत नाकीनऊ होतात त्यात आणखी काही नको बिघडायला." मिहीरची आई म्हणाली

"हो पण माझ्या हातचे खाऊन तरी बघा." श्रेया पुन्हा म्हणाली.

"नको आज अनु बनवू दे. पुढच्या वेळेस पाहू." असे मिहिरची आई म्हणताच श्रेयाने एक कटाक्ष अनुकडे टाकला आणि ती शांत झाली.

अनुने सर्वांसाठी पोहे बनवले आणि डायनिंग टेबलवर ती घेऊन गेली. तिथे ऑलरेडी सगळेजण येऊन बसले होते. सर्वांना डिशमध्ये पोहे देऊन ती चहा बनवण्यासाठी आत गेली. चहा बनवून आणल्यावर सर्वांनी मिळून पोहे आणि चहा घेतला. नाश्ता करून प्रत्येक जण आपापल्या कामाला गेले. मिहीरदेखील नाष्टा करून लगेच ऑफिसला निघून गेला. तो एक शब्दही अनुशी बोलला नव्हता ना त्याने श्रेयाकडे पाहिले. त्या दोघीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होत्या. अनुला त्याच्याशी बोलायचे होते पण तो काहीच न बोलता ऑफिसला निघून गेल्याने तिला बोलताच आले नाही. आता संध्याकाळपर्यंत त्याची वाट पहावी लागणार असा विचार करून ती तिच्या कामाला गेली.

बघता बघता संध्याकाळ होत आली. श्रेयाला मात्र दिवसभर अजिबात करमले नाही. ती फक्त मोबाईल घेऊन बसली होती. अनु मात्र थोडा वेळ मिहिरच्या आई बाबांशी गप्पा मारून पुस्तक वाचायला गेली. त्यानंतर जेवण बनवण्यासाठी मिहिरच्या आईला मदत करत होती. तिचा दिवस कसा गेला आहे तिला समजले नव्हते. आता संध्याकाळ होत आली होती. अनु मिहीर येण्याची वाट पाहत होती. संध्याकाळ होऊन गेली तरी मिहिर काही आला नव्हता. बहुतेक ऑफिसमध्ये काम असेल म्हणून ती शांत झाली पण आता संध्याकाळ होऊन रात्र होत आली होती. काय करावे हे तिला सुचत नव्हते. ती मिहिरची वाट पाहत हॉलमध्येच बसली होती. श्रेया देखील तिथेच बसली होती कारण अनु त्याला जाब विचारणार होती त्यामुळे त्याच्यापुढे काय होतंय हे तिला पहायचे होते. बऱ्याच वेळानंतर मिहीर आला तेव्हा त्या दोघी त्याला पाहून खाड्कन उभ्या राहिल्या ते पाहून मिहिरला हसू आले. तो गालातच हसला आणि रूममध्ये निघून गेला. त्याच्या पाठोपाठ अनुदेखील त्याच्या रूममध्ये गेली.

"तू स्वतःला काय समजतोस? तुला कळतंय का?" अनु मिहिरच्या समोर जात तावातावाने म्हणाली. मिहीर रूममध्ये अजून पोहोचला नाही तोच अनु पाठीमागून येऊन असे बोलताना पाहून त्याला आपण काय चुकलो हे समजेना. तो तसाच तिच्याकडे पाहत उभा राहिला.

"बोल ना? आता का शांत बसला आहेस?" अनु म्हणाली.

"पण काय बोलू? माझं काय चुकलं? मी काही केले का? माझा मी ऑफिसमधून आल्यानंतर रूममध्ये आलो तर तुला काही अडचण आहे का?" मिहिर निरागसपणे म्हणाला.

"तू श्रेयासोबत असे का वागत आहेस?" अनु म्हणाली.

"आता इथे तिचा काय संबंध? मी तिच्याशी कुठे काय वागलोय? मी तर व्यवस्थित वागत आहे. माझे काही चुकले नाही. उगीच नाही तो आरोप माझ्यावर करू नकोस." मिहिर जवळपास ओरडतच म्हणाला.

"मी काही आरोप वगैरे करत नाही. तू जे वागतो आहेस तेच मी तुला सांगत आहे." अनु म्हणाली.

"अरे, पण माझं काय चुकलंय ते तरी मला कळू दे?" मिहिर वैतागून म्हणाला.

"काय चुकलं नाही ते विचार" अनु म्हणाली.

"बरं बाई, माझं काय चुकलं नाही ते तरी सांग." मिहिर पुन्हा वैतागत म्हणाला.

"तू श्रेयाशी बोलत नाहीस, तिला समजून घेत नाहीस, तिच्याशी गप्पा मारत नाहीस, तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीस." अनुने पाढा सुरू केला.

"हो पाहत नाही कारण तिची आणि माझी अशी ओळख काय आहे? मी जास्त मुलींची बोलायला जात नाही. माझा एटीट्यूड समज नाहीतर इगो समज. पण मी त्या मुलीशी अजिबात बोलणार नाही." मिहिर म्हणाला.

"पण का? तिची ओळख करून घ्यायला तुला काय अडचण आहे?" अनु म्हणाली.

"माझी मर्जी. मी घेईन नाहीतर नाही. तू मला जबरदस्ती करायची नाहीस." मिहिर म्हणाला.

"पण ती याआधी तुला खूप आवडायची तेव्हा याचा विचार केला नव्हतास." अनु बोलण्याच्या ओघात बोलून गेली.

"तेव्हा तिच्याविषयी मला काही माहीत नव्हते पण आता सत्य समजले आहे." असे मिहिर बोलता बोलता बोलून गेला तेव्हा अनु आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली.

"म्हणजे?" अनु म्हणाली.

"कुठे काय?" असे म्हणून मिहिरने तोंड वळवले तेव्हा मात्र अनुला त्याचा संशय येऊ लागला. ती त्याच्या मागे मागे जाऊ लागली. तेव्हा मिहिर काही सांगत नव्हता हे पाहून तिने थेट त्याची कॉलर पकडली.

"तुला नक्की काय माहित आहे ते बोल. खोटं अजिबात बोलायचं नाही. जे खरं आहे ते स्पष्ट सांग." अनु मिहिरचा काॅलर पकडत म्हणाली.

काय असेल सत्य हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः
0

🎭 Series Post

View all