गंधबावरे 61
"मला सांग काय सत्य आहे? जे सत्य आहे ते मला समजायलाच हवे. तू जर खोटं बोललास तर मला ते चालणार नाही. मग तुझी माझ्याशी गाठ आहे. जे असेल ते खरं खरं सांग. सत्य पचवण्याची माझ्यात ताकत आहे." अनु मिहिरची कॉलर पकडत त्याला म्हणाली.
"मला सांग काय सत्य आहे? जे सत्य आहे ते मला समजायलाच हवे. तू जर खोटं बोललास तर मला ते चालणार नाही. मग तुझी माझ्याशी गाठ आहे. जे असेल ते खरं खरं सांग. सत्य पचवण्याची माझ्यात ताकत आहे." अनु मिहिरची कॉलर पकडत त्याला म्हणाली.
"मी तुला नक्की सांगेन पण त्याआधी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर मला दे." मिहिर म्हणाला.
"कोणता प्रश्न" अनु म्हणाली.
"तू आजपर्यंत जे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी केलेस, वर्षभर आमची दवाखाने सुरू असताना तू आम्हाला खूप मोठी मदत केलीस. मला आठवत नाही हे समजत असूनही तू इथे माझ्या आईच्या सोबतीला थांबलीस. शिवाय मी सुरळीत झालो, तुझ्यावर ओरडलो, रागावलो तरी देखील फक्त माझ्यासाठी तू इथे यायला तयार झालीस. हे सगळे तू का केलेस?" मिहिर म्हणाला.
"तू उगीच कोणता तरी प्रश्न विचारून माझे मन विचलित करू नकोस. मला सत्य हे जाणून घ्यायचे आहे." अनु रागातच म्हणाली.
"मी तुला सत्य हे सांगणारच आहे पण त्याआधी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दे." मिहिर शांतपणे म्हणाला.
"उत्तर देण्यास मी बांधील नाही." अनु म्हणाली.
"मग मी सुद्धा तुला सत्य सांगण्यास बांधील नाही. आधी तू माझे प्रश्नाचे उत्तर दे मग मी तुला सत्य सांगेन." मिहिर सहजपणे म्हणाला.
"मला त्यावेळी जे वाटले ते मी केले. तुझा एक्सीडेंट झाला त्याला जबाबदार कुठेतरी मीपण होते आणि त्यानंतर आईंना सोडून मला जावेसे वाटले नाही आणि आताही मी इथे तुझ्यासाठी नाही तर श्रेयासाठी आले आहे. तू जे काही समजतो आहेस ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी तुझ्यासाठी असे काहीच केले नाही आणि उपकाराची परतफेड तर तू अजिबात करू नकोस." असे अनु म्हणताच मिहीर मिष्कीलपणे हसला.
"तू सफाईदारपणे खोटं बोलत आहेस. सत्य तर तुझ्या चेहऱ्यावर मला दिसत आहे." मिहिर हसतच म्हणाला.
"मला खोटे बोलून काय मिळणार आहे? मी कशाला खोटं बोलू? मी खरंच बोलत आहे आणि जे सत्य आहे तेच मी बोलते." अनु नजर चोरत म्हणाली.
"चूक.. पूर्णपणे चूक. सत्य काय आहे ते मला माहित आहे." मिहिर ठामपणे म्हणाला.
"तुला काय माहित आहे? स्पष्टपणे बोल. असे आढेवेढे करून बोलू नकोस." अनु घाबरतच म्हणाली.
"सत्य हे आहे की, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तू त्या प्रेमासाठीच इतके सारे करण्यास तयार झालीस कारण तुला माहित आहे की मी तुझा कधीच होणार नाही पण तरीही तू हे सगळे केलेस कारण तुझे फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम आहे. मी या पूर्ण वर्षात तुला इतकं तर ओळखलेलंच आहे." मिहिर ठामपणे म्हणाला.
"छे, छे! मी तुझ्यावर कशाला प्रेम करू? श्रेयाचे तुझ्यावर प्रेम होते आणि तुझेही श्रेयावर प्रेम होते." अनु पटकन म्हणाली.
"आमचे एकमेकांवर प्रेम होते पण तुझे माझ्यावर अजूनही प्रेम आहे." मिहिर गंभीरपणे म्हणाला.
"एक मिनिट, एक मिनिट.. म्हणजे तुला सगळं आठवतंय? म्हणजे तू आतापर्यंत नाटक करत होतास? तुला कधीपासून आठवायला सुरुवात झाली आहे! मग तू माझ्याशी चॅटिंग करत होतास, माझ्याशी गोड बोलत होतास ते सगळं नाटक होतं? मी तर तुझी आणि माझी मैत्री झाली असं समजत होते पण इथे तर वेगळेच घडत आहे. मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत मिहिर बोल पटकन." असे म्हणून अनु मिहिरच्या अंगावर धावून गेली.
"अगं थांब, थांब. तुला सगळे सत्य हे सांगणारच आहे पण त्याआधी मी जे बोललोय ते खरं आहे की नाही इतकच मला सांग." मिहिर म्हणाला.
"काय?" अनु वैतागत म्हणाली.
"तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही." असे मिहिर म्हणताच अनुला खूप भरून आले. तिला काही बोलताच येईना. तिच्या डोळ्यांमध्ये फक्त अश्रुधारा येऊ लागल्या आणि ती तशीच स्तब्ध उभी राहिली. ते पाहून मिहिर जे समजायचं ते समजून गेला.
"तुझ्या या अबोल्यानेच मला माझे उत्तर दिले. आता तुला काहीच बोलायची गरज नाही." असे म्हणत मिहिरने अनुचे ओघळणारे अश्रू पुसले तेव्हा अनु त्याच्या मिठीत विसावली.
"अगं वेडाबाई, मला तर हे सगळे माहीत होते. मी निरखून पारखून तुला ओळखले आहे. खरंतर मला तू जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेली होतीस. आपण दोघे चेकिंगसाठी गेलो होतो. त्याच दिवसापासून सगळे काही आठवण्यास सुरुवात झाली होती. डॉक्टरांशी मी याबद्दल बोललो देखील होतो पण त्यापुढे मला हे नाटक वाढवावे लागले कारण मला तू हे सगळे का करत आहेस आणि यामागे तुझा उद्देश काय आहे शिवाय श्रेयाचे कसे सुरू आहे? हे दोन्ही पहायचे होते. आणि एका दृष्टीने मी हे नाटक केले ते बरेच झाले. मला सगळे सत्य समजले." मिहिर शांतपणे म्हणाला.
"म्हणजे? तू हे सगळे नाटक करत होतास! आणि मला हे आता सांगतोयस. माझ्या जीवात जीव नव्हता. मी किती घाबरले होते! आणि तू मात्र याचा आनंद घेत होतास?" असे म्हणून अनु मिहिरला मारू लागली. मिहिर मात्र इकडे तिकडे पळत होता आणि त्याच्या पाठोपाठ अनु पळत होती. रूम भर नुसता दोघांचा धिंगाणा सुरू होता. मग मिहीर एका ठिकाणी शांत बसला. "अगं मला का मारतेस?" मिहिर हसतच म्हणाला.
"का म्हणजे? तुझ्या डोक्यामध्ये इतके सगळे चालू होते आणि तू एका गोष्टीने हे मला सांगितलं नाहीस? मला तुझी किती काळजी वाटत होती आणि तू मात्र इकडे मजा घेत होतास." अनु रागातच म्हणाली.
"अगं, मी असे केलो नसतो तर मला सत्य काय ते समजलेच नसते ना?" मिहिर म्हणाला.
"मग तू हे नाटक केलेस तर तुला माझ्याबद्दल काय समजले?" अनु म्हणाली.
"ते तर मी मगाशीच सांगितले ना? तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे आणि अगदी मनापासून प्रेम आहे ते." मिहिर म्हणाला.
"मग श्रेया बद्दल काय सत्य समजले? तिचे तर तुझ्यावर आधीपासूनच प्रेम होते आणि तुझेही तिच्यावर होते मग ते प्रेम द्विगुणीत झाले आहे की काय?" अनु म्हणाली.
"तेवढे आमचे नशीब कुठले? आमच्या नशिबात तर खरे प्रेम जे आहे ते होतेच पण आम्हाला मात्र ते नको होते. नियतीच्या मनात काही वेगळेच असल्याने जे काही सत्य आहे ते उशिरा का होईना मला समजले. नियतीला तर ते आधीपासूनच मान्य होते." मिहिर म्हणाला.
"तू मला समजेल अशा भाषेत बोलशील का? असे कोड्यात बोललेले मला अजिबात समजत नाही." अनु रागावतच म्हणाली.
"अरेच्चा! आता तुझ्यापासून मी काहीही लपवणार नाही आणि कोणतीच गोष्ट तुला विचारल्याशिवाय करणार नाही. तसेही नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा असतो. ज्या नात्यांमध्ये विश्वास असतो तेच नाते खऱ्या अर्थाने टिकते." मिहिर म्हणाला.
"तू काय बोलतो आहेस जरा स्पष्ट बोलशील का? मला कशाचाच अर्थ लागत नाहीये." अनु म्हणाली.
"हे बघ." असे म्हणून मिहिरने मोबाईल मधील फोटो अनुला दाखवला. ती तो फोटो आश्चर्याने पाहू लागली. तिला कशाचाच संदर्भ लागत नव्हता. "हे कसे शक्य आहे?" असे म्हणून तिने पुढे आणखीन फोटो पाहिले आणि ती आश्चर्यचकित झाली. "नाही हे सगळे खोटे आहे. माझा यावर विश्वास नाही." असे ती म्हणाली.
"हे फोटो मी स्वतः काढले आहेत. अगदी सगळी शहानिशा करून मी आता या निर्णयावर येऊन थांबलो आहे. हवे तर तू पुढे आणखीन फोटो आहेत ते पाहू शकतेस." असे मिहिर म्हणताच अनु सगळे फोटो पाहू लागली. आणि ती आश्चर्याने मटकन खालीच बसली.
ते फोटो कुणाचे होते? त्याचा अनुशी काय संबंध आहे? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की पहा..
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा