Login

गंधबावरे 62

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 62
"मिहिर तू जे काही दाखवत आहेस त्याच्यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही. म्हणजे तू वाईट वाटून घेऊ नकोस. माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे पण या फोटोवर माझा विश्वासच बसत नाहीये. मी काय करू म्हणजे माझा यावर विश्वास बसेल. अरे, श्रेया तशी मुलगी नाहीये. मी तिला अगदी लहानपणापासून ओळखतेय. ती खूप चांगली, गोड आणि समंजस मुलगी आहे." अनु म्हणाली.

"मी काय करू म्हणजे तुझा या फोटो वर विश्वास बसेल? तुला आठवतं, आपण दोघे डॉक्टरकडे गेलो होतो तेव्हा मी तुला बाहेर बसायला सांगितलं होतं आणि आत डॉक्टरांना भेटून आलो होतो तेव्हा डॉक्टरांना मी या सर्व गोष्टींची कल्पना दिली होती आणि डॉक्टर देखील माझ्या बोलण्यावर शांत बसले होते. त्यांनी तुला काहीही सांगितले नव्हते. त्यानंतर तू ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग होती म्हणून गेली होतीस. तुला रात्री यायला उशीर झाला होता. त्याच दिवशी मी श्रेयाला भेटायला गेलो होतो. मला माहित होतं ती नक्की कुठे जाणार होती ते. म्हणूनच तिच्या ओढीने मी तिच्याकडे जायला निघालो." मिहिर म्हणाला.

"म्हणजे आधीपासून तुझे तिच्यावर प्रेम होतेच ना! मग आता का नाकारत आहेस?" अनु म्हणाली.

"माझे तिच्यावर खूप प्रेम होते म्हणूनच तर तिच्या ओढीने मी तिच्याकडे जायला निघालो होतो. अगदी पाय दुखत असतानाही मी ड्रायव्हरला सोबत न घेता एकटाच गेलो होतो आणि आईला तुला काहीच सांगायचे नाही असे बजावून ठेवलो होतो त्यामुळे आईने देखील तुला काही सांगितले नाही. मी तिथे गेलो पण मला जे दिसू नये तेच दिसले. श्रेया एका व्यक्तीसोबत तिथे उभी होती. मला वाटले की तिचा मित्र असेल म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले पण नंतर तिने त्याला अलिंगन दिले. मी बराच वेळ तिथे आडोशाला उभा होतो. त्यांचे बोलणे वागणे एखाद्या मित्र-मैत्रिणीसारखे मुळीच नव्हते. ते तर प्रियकर आणि प्रेयसीसारखे होते. मी कोणावर तरी प्रेम केलेलं आहे त्यामुळे मित्र-मैत्रिणींचे वागणे आणि प्रियकराचे वागणे यातला फरक नक्कीच मला माहीत होता. शिवाय प्रूफ म्हणून मी आडोशाला उभा राहून हे सगळे फोटोज काढून घेतले आहेत." मिहिर अनुला समजावून सांगत होता.

"अरे, तू वेडा आहेस का? एकटा कशाला जायचं? मी तुझ्यासोबत आले असते ना? तुझी किती काळजी वाटली असती आईंना! त्यांना तरी खरे सांगितलं होतंस की नाही." असे अनु म्हणताच मिहिरने मान खाली घातली.

"अनु, तुला खरं सांगू. श्रेयावरील प्रेमामुळे मी इतका आंधळा झालो होतो की तुझ्याकडे साधं पहायलाही मला वेळ नव्हता कारण मी तर बाह्य सौंदर्यावर प्रेम केलं, अंतर्मन पहायचं विसरून गेलो." मिहिर पश्चातापाने म्हणाला.

"मिहिर, तू इतका ठाम कसा काय बोलू शकतोस?" अनु म्हणाली.

"हे बघ अनु, मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून मी बोलतोय. दुसरे कोणीही सांगितले असते तरी माझा त्यावर विश्वास बसला नसता." मिहिर स्पष्टपणे म्हणाला.

"अरे, तिकडे गेली असेल. चुकली असेल ती वाट पण आपल्या प्रेमाला माफ करणं हे आपलं कर्तव्य असतं ना?" अनु समजावणीच्या सुरात म्हणाली.

"हे तू बोलत आहे अनु? मी तर तिला माफ कधीच केले पण आता तिच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आणि तिच्यासोबत मला आयुष्य काढायचे हे नाही. अनु, तुला सांगू; नातं हे विश्वासावरच उभा राहते. ज्या नात्यांमध्ये विश्वास असतो तेच नातं शेवटपर्यंत जातं आणि श्रेयाने माझा विश्वासघात केला आहे. एका नोकरीसाठी, नावं मिळवण्यासाठी ती इतक्या खालच्या दर्जाला जाऊ शकते तर ती उद्या नातं काय टिकवणार आहे?" मिहिर आश्चर्याने म्हणाला.

"मिहिर, खरंतर तू सुद्धा चुकलाच आहेस की. तिलाच नावं ठेवून उपयोग नाही. तुझी सुद्धा चूक आहेच की. तुझ्या चुकीवर पांघरून घालून उपयोग नाही. एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट तू करायला नको होतास आणि मी सुद्धा तुझ्या प्रेमात इतकी वाहत गेले की काय चूक आणि काय बरोबर हे माझं मला समजलेच नाही." अनु स्पष्टपणे बोलली.

"मी चुकलो. मला मान्य आहे पण माझी चूक सुधारण्यासारखी आहे. म्हणजे श्रेयाच्या चुकीला अजिबात माफी नाही." मिहिर म्हणाला.

"असं का बरं! तुझी चूक सुधारण्यासारखी कशी आहे? तू तुझी चूक कशी सुधारणार आहेस? स्वतःची चूक सुधारता येणार आणि श्रेयाची चूक म्हणजे चूक! याला काय अर्थ आहे?" अनु म्हणाला.

"अगं, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ तसा नाही. ती आता त्या मुलासोबत होती आणि नंतर त्याने तिला धोका दिला म्हणून आता पुन्हा ती माझ्याकडे आली आहे. पण तसे मी अजिबात करणार नाही." मिहिर म्हणाला.

"काय? म्हणजे श्रेयाला कुणीतरी धोका दिला आहे आणि हे तुला कसे समजले? तू मला कधी बोलला नाहीस आणि श्रेयाही बोलली नाही!" अनु म्हणाली.

"श्रेया जिथे होती तिथेच माझा एक मित्र मला भेटला होता. मी त्याला सगळी हकीकत सांगितली आणि श्रेयासोबत प्रत्येक बारीक सारी घडणाऱ्या गोष्टी मला कळवत जा असे मी त्याला सांगितले होते. त्यानुसार तो मला श्रेयाच्या प्रत्येक गोष्टी सांगत होता तेव्हा मला समजले की, ती व्यक्ती श्रेयाला तिच्या कामात मदत करणार होती शिवाय तिला खूप मोठे काम देणार होते आणि तिचे मोठे नाव होण्यासाठी मदत करणार होते, मोठ्या लोकांच्या ओळखी करून देणार होते. थोड्या दिवसात आपण फेमस होऊ अशा विचाराने श्रेया त्याच्या मागे लागली पण त्याने हिचा गैरफायदा घेतला. मला असे म्हणायचे आहे की, खोट्या यशासाठी आपण असे का वागायचे? आज या यशासाठी ही त्याच्याकडे गेली, उद्या दुसरा कोणी आला तर त्याच्याकडे जायला मागे पुढे बघणार नाही अशा अविश्वासी मुलीवर मी विश्वास कसा ठेऊ?" मिहिर अनुला म्हणाला.

"तुला प्रूफ हवा आहे का? थांब एक मिनिट. मी त्या मित्राला फोन लावतो. तू सारं काही ऐक." असे म्हणून मिहिरनेही त्या मित्राला फोन लावला आणि फोन स्पीकरवर ठेवला. मिहिरने मुद्दामून तो विषय काढला आणि विषय काढल्यावर त्या मित्रांने सारे काही सत्य फोनवरून सांगितले ते ऐकून अनुचे डोके दुखू लागले. ती आश्चर्याने सगळे ऐकत होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता. तरिही तिचे मन तयार होत नव्हते.

"तो फोटो तू माझ्याकडे दे. मी श्रेयाला याबद्दल जाब विचारते. सत्य काय आहे त्याची शहानिशा केल्याशिवाय मी काही विश्वास ठेवू शकणार नाही." अनु म्हणाली.

"ठीक आहे. जे सत्य आहे त्याची तू शहानिशा कर पण मी मात्र माझा निर्णय हा कायमच ठेवलेला आहे. मी घेतलेला निर्णय कधीच बदलणार नाही." मिहिर म्हणाला.

"तू कोणता निर्णय घेतला आहेस? आणि मगाशी पण म्हणालास की, तुझी चूक सुधारता येते पण श्रेयाची चूक सुधारता येणार नाही असे कोणते निर्णय तू घेतला आहेस?" अनु प्रश्नार्थक नजरेने मिहिरला म्हणाली.

"तो निर्णय तुला लवकरच समजेल पण सध्या तू या विषयावर लक्ष केंद्रित कर. श्रेयाला हे फोटो दाखव आणि तिच्याकडून सत्य समजून घे." असे म्हणत ते फोटो मिहिरने अनुकडे पाठवले. अनु ते सगळे फोटो घेऊन श्रेयाकडे गेली. ती योग्य संधीची वाट पाहत होती मात्र अनुला पाहून श्रेया अनुकडे आनंदाने आली.

"काय झालं अनु? तू मिहिरला मनवलेस ना? त्याच्याकडून योग्य तो निर्णय घेतलास ना? मिहीर माझ्याशी बोलायला तयार झाला आहे का? त्याला माझ्याबद्दल काय वाटतंय? तू योग्य ती शहानिशा करणार होतीस त्याचे काय झाले? बोल ना अनु. तू अशी शांत का आहेस? मिहीर काय म्हणाला सांग ना लवकर अनु." श्रेयाने बरोबर विषयाला हात घातला होता तेव्हाच अनुने मोबाईल काढून त्यातील फोटो श्रेयाच्या समोर धरला.
क्रमशः

🎭 Series Post

View all