Login

गंधबावरे 63

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 63
"अनु, तू जाब विचारलास का त्याला? सगळे काही सांगणार होतीस काय झाले? तू विचारलीस का अनु? बोल ना अशी शांत का आहेस? तू विचारले नाहीस हो ना. मला वाटलंच होतं. कितीही केलं तरी तुला ते विचारायचं नसेलच कारण आता तुमची मैत्री छान झाली आहे आणि तुम्हाला आता मी मध्ये नको असेन. मिहिरला तर लक्षातच नाही पण तुझ्या तरी लक्षात आहे ना आपण कॉन्ट्रॅक्ट केला होता. तुला तरी समजत होतं की नाही. आता या नात्यांमध्ये तुम्ही अडकून गेलात ना? तुम्हा दोघांना हेच तर हवे होते. मिहिरला नसेल पण तुला मात्र हे झाले होते. तू मिहिरच्या आधीपासून प्रेमात होतीस त्यामुळे त्याला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत होतीस. शेवटी तो तुझ्या जाळ्यात अडकलाच. मी कुठली गं. मैत्रीण मैत्रीण म्हणून लहानपणापासून बहीण म्हणून आपण एकमेक राहत होतो पण तुझ्या मनात असले असेल असे मला वाटले नव्हते. तू त्याला विचारू शकणार नाहीस मला नक्की खात्री आहे आणि विचारलेही नसशील. हो ना अनु. कोणालाही स्वतःचा स्वार्थच हवा असतो कोण कशाला निःस्वार्थी भावनेने दुसऱ्याचे भले करायला जाईल. जशी तुमची इच्छा. तुम्ही रहा इथे निवांत, सुखाने. मी निघून जाते." असे म्हणून श्रेया तिच्या रूममध्ये गेली.

अनुनेही तिला जाऊ दिलं कारण इथे हॉलमध्येच उगीच तमाशा नको. त्यात आई-बाबांनी आधीच खूप काही सहन केलं आहे त्यांना आणखी त्रास नको. त्यांच्यासाठी, या घरासाठी मला हा तमाशा नको होता. घरामध्ये नोकर चाकर होते. पुन्हा चर्चेला वाव कशाला त्यापेक्षा जे काही असेल ते रूममध्येच बोललेलं बरं असे म्हणून तिने श्रेयाला रूममध्ये जाऊ दिलं आणि ती तिच्या पाठीमागून हळूहळू रूममध्ये जाऊ लागली. रूममध्ये श्रेया बॅग घेऊन तिचे कपडे भरत होती इतक्यात अनुने तिच्यासमोर मोबाईल धरला. त्या मोबाईल मधील फोटो पाहून श्रेयाला धडकीच भरली. ती एकदम बावरली, घाबरली. कसे रिऍक्ट व्हावे हे तिला समजत नव्हते. अनुने मात्र तिचा तो चेहरा हेरला होता. तिच्या मनामध्ये काय सुरू आहे हे तिला जाणवत होते. तिची चलबिचलता ती जाणून होती. इतक्या वर्षांचा सहवास त्यामध्ये तिला जे काही वाटत होते ते समजत होतं. ती तशीच श्रेयाला निरखत उभी होती.

"हे काय अनु, हा कसला फोटो माझ्यासमोर धरला आहेस आणि हे काय आहे?" श्रेया रागाचा आव आणत म्हणाली.

"तुला माहित नाही का हा फोटो कसला आणि कसा आहे ते?" अनु म्हणाली.

"मला कसे माहीत असणार? मला तर हे काहीच माहित नाहीये." श्रेया म्हणाली.

"श्रेया, तू साफ खोटं बोलत आहेस. या फोटोमध्ये तू स्वतः आहेस. हे बघ आणि तुझा चेहरा सांगतोय की तू खोटं बोलत आहेस. श्रेया मला सत्य जाणून घ्यायचे आहे. बोल लवकर, हे काय प्रकरण आहे आणि प्रत्येक गोष्ट तू माझ्याशी शेअर करणारी आता का माझ्याशी बोलत नाहीयेस? या गोष्टी माझ्यापासून का लपवलं आहेस?" अनु रागाचा आव आणून म्हणाली.

"मी लपवलंय! मग तू काय केलंस? तू सुद्धा वर्षभरात काही घडलेल्या घटना मला सांगितल्या नाहीस शिवाय प्रत्येक वेळी फोनवर अपडेट देतो म्हणाली होतीस पण ते सुद्धा तू दिले नाहीस." श्रेया म्हणाली.

"श्रेया, तू तुझा नंबर बदलला होतास आणि तो नंबर आमच्याकडे कोणाकडेही नव्हता. आठवते का तुला? आणि तिकडे करिअर करायला जाते असे म्हणालीस आणि करिअरच्या नावाखाली असले धंदे चालू आहेत." अनु म्हणाली.

"एक मिनिट, हे धंदे वगैरे काही नाहीत. करिअर घडवायचं असेल तर असं थोडं फार ॲडजस्टमेंट करावी लागते." श्रेया शांतपणे म्हणाली.

"व्हाॅट? नॉन सेन्स श्रेया. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. माझी सहज, सरळ आणि शांत स्वभावाची श्रेया आज असा विचार करतेय. शी! मला तुझ्या विचारांची किव येते. तुझे असले थर्ड क्लास विचार असतील असे वाटत नाही. आपण दोघींनी काय ठरवलं होतं. स्वतःच्या बळावर काहीतरी करून दाखवायचं असं ठरवलं होतं ना. मी सुद्धा तुझ्यासोबत होते पण मिहिरच्या बाबांना अचानक बरे नसल्याने हे नाटक करावे लागले. हे सुद्धा मी तुझ्यासाठीच केले. श्रेया, पण तू आमचा विश्वासघात केलास. माझं सोड ग, मी नेहमीच तुझ्या सोबत असेन पण मिहिर! त्याचाही तू विश्वासघात केला आहेस." अनु म्हणाली.

"म्हणजे? हे सगळं मिहिरला!" श्रेया आश्चर्याने म्हणाली.

"हो. हे सगळं त्याला माहित आहे. त्यानेच तर हा फोटो मला पाठवला आहे. हा फोटो त्याने स्वतःने काढलेला आहे. तो तुला भेटायला तिथे आला होता पण तुझे हे सगळे सुरू असताना तो तिथून निघून आला. श्रेया, तू जर व्यवस्थित राहिली असतीस तर आज मिहीर तुझा असता पण तुझ्या मनात तर काही वेगळेच होते. मिहिरसारखा मुलगा तुझ्या प्रेमात असताना तू हे सगळे करायला नको होतीस. तू अशी इतरांच्या प्रेमात आंधळे व्हायला नको होतीस. इतकी चांगली तू माझी मैत्रीण आणि आता असे काही करत आहेस याच्यावर माझा देखील विश्वास बसत नाहीये. पण हे फोटो काही वेगळे सांगत आहेत आणि तू आता काही वेगळं बोलत आहेस शिवाय घटना काही वेगळीच घडली असेल. पण मला इतकच सांगायचं आहे की, असा अविश्वास दाखवून तुम्ही मिहिरच्या आयुष्यात पुन्हा पदार्पण करणार असशील तरी मिहीर मात्र तुला त्याच्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही." अनु बोलत होती.

"मला वाटलंच होतं, हा सगळा तुमच्या दोघांचा प्लॅन आहे. मिहिर साधा भोळा असेल असे मला वाटले होते पण तोही तुझ्या जाळ्यात अडकला. शेवटी तुम्ही तुम्हाला जे हवे तेच केलात. मी माझ्या नावलौकिकासाठी या सगळ्याच्या आहारी गेले. मी चुकले, मी मान्य करते पण तुम्हीही चुकलाच आहात. तुम्ही माझी फसवणूक केला आहात. तुम्हाला कोण माफ करणार? एक वर्षाचे खोटे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायचे असे तुम्ही ठरवले होते आणि वर्ष होऊन गेले तरी सुद्धा तुम्ही या लग्न बंधनात अजूनही अडकून आहात मग माझ्या मनाची आग कुणाला समजणार आहे? मिहिर देखील मला भेटायला आला होता तर मग तो मला न भेटताच का निघून गेला? त्यावेळी त्याने मला विचारायला हवे होते की, तू हे असे का केलेस म्हणून? पण तो न विचारताच इकडे निघून आला. त्याने विचारले असते तर त्याचवेळेस मी ते सगळे सोडून त्याच्यासोबत हसत आले असते." श्रेया रागाच्या भरात बरळत होती.

"श्रेया, तू त्यावेळेस काही सांगण्याच्या मनःस्थितीत होतीस? मी त्यावेळेस तुला विचारण्यासाठी येणार होतो. मी तुझ्यासाठी इतके दिवस थांबलो होतो तू का थांबली नाहीस असा जाब तुला विचारणार होतो. पण माझ्या कानावर तुमचे संभाषण ऐकू येत होते आणि त्यामुळे मी पुरता हादरून गेलो. त्यामुळे पुढे येऊन तुला जाब विचारायचे माझ्याने झाले नाही. तिथे सगळ्या लोकांच्यात तू कांगावा केलीस तर माझ्या अब्रुचे धिंदवडे उठतील म्हणून मी तिथे आलो नाही. पण तू जे काही केले आहेस ते चुकीचे होते. मला हे अजिबात आवडले नाही. मला तू अविश्वास दाखवला आहेस पुन्हा माझ्या आयुष्यात तुला कोणतेच स्थान नाही." असे मिहिरचे बोलणे ऐकून श्रेया थबकली. ती दोन मिनिटं विचार करत होती.

"हा सगळा तुमचा डाव दिसतोय. मी चुकले हे मी मान्य करते. पण चुकीला माफी असते ना? प्लीज मला माफ कर मिहिर." श्रेया म्हणाली.

"चुकीला माफी नक्कीच असते पण विश्वासघात केल्यावरही माफ करायला मी काही देव नाही. तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस. मला पुन्हा तुझ्यावर विश्वास ठेवायचा नाही. मला तुझे तोंडही पहायचे नाही. अगं, मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करत होतो. ही बिचारी अनु तुझ्यासाठी माझ्याशी एक वर्ष कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करायला तयार झाली. तिचे आयुष्य अख्खे पडले असताना ती फक्त तुझ्यासाठी हे करायला तयार झाली. पण तू काय केलेस? विश्वासघात!" मिहिर रागातच बोलत होता.

"अच्छा, तर आज मला टार्गेट केलंय तर. मला माफ करणारच नाही ना? तर मी इथे राहण्यात काय अर्थ आहे?" असे म्हणून श्रेया तिची बॅग भरू लागली.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all