Login

गंधबावरे 64

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 64
"तुम्ही आता जे काही बोलत आहे ते सगळे प्लॅन केलेले आहे. खरंतर तुम्हा दोघांना एकत्र राहायचे आहे आणि तुम्ही मला टार्गेट केलेले आहात. मी चुकले मला मान्य आहे पण माझी चूक सुधारण्याची मला एक तरी संधी द्या असे मला वाटते. पण तुम्ही तर संधी सुद्धा द्यायला तयार नाही याचा अर्थ हे अगदी नियोजित केलेले आहे. ठीक आहे. तुम्ही रहा एकत्र, मी माझी खंबीर आहे माझे संगोपन करण्यासाठी." असे म्हणून श्रेया तिची बॅग भरू लागली.

"अगं श्रेया, तू चुकीचं समजत आहेस. तू समजतेस तसे अजिबात नाही. फक्त तू असे करायला नको होतीस. यामध्ये चूक तुझी आहे. इथे मिहिर तुझ्या प्रेमात असताना, तू ही त्याच्या प्रेमात असताना त्याला सोडून असा दुसऱ्याचा विचारही तू करायला नको होतीस. पण तुझ्या हातून खूप मोठा चूक घडली आहे आणि तू कितीही सुधारण्याचा प्रयत्न करते असे म्हटलीस तरी एकदा विश्वासघात झाला तर पुन्हा ती व्यक्ती मनामध्ये बसू शकत नाही त्यामुळे तू त्याच्या जागी राहून विचार कर ना." अनु समजावणीच्या सुरात म्हणाली.

"मी पूर्णपणे विचार करूनच बोलत आहे. एक वेळ संधी द्यायला याचे काय बिघडते. एकदा विश्वासघात झाला म्हणून प्रत्येक वेळेस असेच होईल हे कशावरून? एकदा पाऊल घसरले तर पुढच्या वेळेस माणूस व्यवस्थित चालते ना? ठेच लागली म्हणून प्रत्येक वेळेला माणूस तेच करेलच हे कशावरून? पुढच्या वेळेस तो सावधगिरीने चालेलच ना? तुमचा माझ्यावर अजिबात विश्वास नाही. मी चूक केली मान्य करते ना पण यापुढे तसे होणार नाही असेही सांगत आहे पण तुम्हाला माझे म्हणणे पटतच नाही. मला काही तुमच्या आधाराची गरज नाही. माझी मी स्वतंत्र आहे. मी माझे स्वतःचे करण्यास समर्थ आहे. तुमचे तुम्ही हवे ते करा." श्रेया जवळपास ओरडतच म्हणाली.

"श्रेया, तोंड भाजलं म्हणून ताकही फुंकून पितात. माझं इतकंच सांगणं आहे की एकदा विश्वासघात केला की माणूस पण ना त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तुझ्या जागी जर मी असतो आणि मी असे काही केले असते तर तू सहन केले असतेस का? त्याचा किती कांगावा केली असतीस. सर्व लोकांना बोलावून योग्य ती शहानिशा केली असतीस पण मी तसे काहीच केले नाही. उलट तुझे रक्षण केले आहे हे बघ ना. तू माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहेस त्यामुळे तुझे स्थान माझ्या मनामध्ये कधीच नसणार. तुला जे समजायचं ते समज पण माझ्या आयुष्यात तुझ्यासाठी कोणतेच स्थान नाही." मिहिर म्हणाला.

"म्हणूनच तर मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून चालले आहे. आता तुम्हाला तुमचा रस्ता रिकामा झाला आहे." श्रेया म्हणाली.

"श्रेया, असे बोलू नकोस ना. प्लीज, तू जाऊ नकोस ना. थांब. आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात. तू असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस." अनु पुन्हा समजावणीच्या सुरात म्हणाली.

"अनु, मी तुझ्यासारखी अशी भोळी अजिबात नाही. एखादी व्यक्ती आपल्याला स्वीकारायला तयार नाही तर पुन्हा पुन्हा त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची माझी इच्छा देखील नाही. अनु, माझा स्वाभिमान मोडून मी इथे राहण्यात काहीच अर्थ नाही. मला तुझ्यासारखे अजिबात जमत नाही. ही माझी स्वतः मोकळी आहे, स्वतंत्र आहे. मला माझा निर्णय घेण्यास कोणीही अडवू शकत नाही. आतापर्यंत मी तसेच केले आहे आणि इथूनही तसेच करणार आहे. मला जे हवे तेच मी करणार." श्रेया ठामपणे बोलत होती.

"श्रेया, तू प्लीज माझ्यासाठी तरी थांब. असे करू नकोस. तुझे मिहीरवर प्रेम होते ना? मग आपण त्यातून काहीतरी मार्ग नक्की काढू. मिहिरला आपण समजूत घालू पण तू असा राग डोक्यात घालून जाऊ नकोस." अनु म्हणाली.

"अनु, मला तुझ्यासारखं देवी व्हायचं नाही. मी तुझ्यासारखी अजिबात नाही. तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. माझ्यासाठी स्वतःची कुर्बानी द्यायला तू पुढे मागे पाहिलं नाहीस. तू माझ्यासाठी इतका मोठा निर्णय घेतलास. तुझ्या आयुष्यातले एक वर्ष माझ्यासाठी दिलेस. मिहीरच्या वडिलांना बरे नव्हते तेव्हा एक वर्षभर तू त्यांची मदत केलीस. खरंच तुला देवी व्हायचं होतं मला तसे व्हायचे नाही. मी माणूस आहे आणि चुका या माणसाच्या हातूनच होतात. त्याप्रमाणे मी माझे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते. तुझ्यासारखे देवी मला बनायचे नाही त्यामुळे तूच रहा. मी माझा मार्ग निवडायला मोकळी आहे. तुझ्या जागी मी असते तर मी असे काहीतरी करायला तयार झाले नसते. एक तर समोरची व्यक्ती आपली किंमतही ठेवत नाही आणि त्याच्यासाठी इतकं करायचं म्हणजे खरंच तुझं मन खूप मोठं आहे. तू मिहिरसाठी, माझ्यासाठी इतकं काही करायला तयार झालीस. मी किमान तुझी लहानपणापासूनची मैत्रीण, बहीण तरी आहे पण हा तुझा कोण होता? साधं बोलतही नव्हता तरीही तू याच्यासाठी एक वर्ष थांबायला तयार झालीस! याचा तुझ्या आयुष्यावर, तुझ्या पुढील जीवनावर परिणाम होईल याचाही तू विचार केला नाहीस. खरंच, तू ग्रेट आहेस. हॅट्स ऑफ यु. तू तुझ्या पद्धतीने आयुष्य जग, मी माझ्या पद्धतीने आयुष्य जगते. उगीच माझी अडवणूक करू नकोस." असे म्हणून श्रेया तिची बॅग भरत होती.

श्रेया बॅग भरत असताना मिहीर आणि अनु दोघेही तिथेच थांबले होते. श्रेया एक एक कपडे बॅगेत भरत होती पण इथून गेल्यावर पुढे काय याचा विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता. कारण जे होईल ते होईल अशा विचाराची ती होती. ती स्वतःची बॅग भरून पुन्हा तिच्या घरी जाणार होती आणि पुढे जिकडे रस्ता जाईल तिकडे ती जाणार होती. तिची खूप मोठी मोठी स्वप्नं होती आणि ते साकार करण्यासाठी ती प्रयत्न करणार होती. या सगळ्या बंधनात तिला सध्या तरी अडकून पडायचे नव्हते. तिला तिचे स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण करायचे होते आणि त्या वाटचालीवर ती होती. तिला पंख पसरून उंच आकाशात झेप घ्यायची होती. ती तसा प्रयत्न करत होती त्यामुळे तिने हा मार्ग सहजतेने सोडून दिला आणि तिची बॅग घेऊन ती रूममधून बाहेर पडली. श्रेया बाहेर जात असतानाच तिच्या पाठोपाठ अनुदेखील जाऊ लागली.

"श्रेया, थांब ना अशी तू तडकाफडकी जाऊ नकोस. माझे ऐकून तरी घे. अगं, तू असा रागात निर्णय घेऊ नकोस आपण बसून बोलू. अगं, असे करू नकोस ग. तुझ्या मनाचा काहीतरी गैरसमज होतोय. तू जे काही असेल ते स्पष्ट बोल म्हणजे मिहीरला तुझे म्हणणे पटेल." असे म्हणत अनु तिच्या पाठीमागे जाऊ लागली.

अनु श्रेयाच्या पाठीमागे जात असतानाच मिहिरने तिचा हात पकडला आणि तिला श्रेयाच्या पाठीमागे जाऊ दिले नाही. श्रेया मात्र तशीच पुढे तोंड करून रूममधून बाहेर पडली. तिने एकदाही मागे वळून पाहिले नाही तेव्हा अनुला खूप वाईट वाटले.

"अरे मिहिर, तू असे काय करतोस? इतकी चांगली मुलगी आहे ती. श्रेया माझ्यासोबत लहानपणीपासून आहे. ती असे कधीच करणार नाही. माझे स्वतःपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास आहे. तू कितीही तिच्याबद्दल वाईट सांगितलेस तरीही माझे मन काही केल्या ते ऐकणार नाही. मिहिर तू माझा हात सोड. मी जाऊन श्रेयाला थांबवते. मी थांबवल्यावर ती नक्की माझे ऐकेल. तू सोड ना माझा हात." अनु काकुळतीला येऊन मिहिरला विनवत होती.

"अनु, तिला जाऊ दे. तिला अजिबात अडवू नकोस. तसेही ती माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहे. आता कितीही जबरदस्तीने तिला इथे राहायला सांगितलेस तरीही ती पुन्हा माझ्या मनात बसणार नाही. तू ते सर्व काही सोडून दे आणि मी इकडे काय म्हणतोय त्यावर लक्ष फोकस कर." मिहिर म्हणाला.
मिहिर अनुला नक्की काय सांगणार आहे? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

🎭 Series Post

View all