Login

गंधबावरे 66

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 66
घरी गेल्यावर श्रेयाला काही केल्या करमत नव्हते. राहून राहून मिहीर आणि अनुचाच विचार तिच्या मनात घोळत होता. त्या विचारातून मुक्तता मिळण्यासाठी तिने मयूरला भेटण्याचे ठरवले होते; शिवाय तिला काही गोष्टी त्याच्याशी बोलायच्या होत्या. श्रेयाने मिहिरला हॉटेलचा पत्ता मेसेज करून पाठवला. अनुने मेसेज पाठवल्या बरोबर तिकडून मयूरने लगेच ओके म्हणून रिप्लाय दिला आणि तेव्हाच तिच्या गालावर गोड हसू पसरले. ती तिचे आवरण्यासाठी गेली. कधी एकदा मयूरला भेटतोय असे तिला वाटत होते. मनात साठवून ठेवलेल्या भावनांना मोकळी वाट देण्यासाठी ती कोणाचातरी आधार शोधत होती. आता अनु आणि मिहिर नाहीत म्हटल्यावर कोणासमोर मन मोकळे करावे असे तिला झाले होते; पण तिला अचानकच मयूरची आठवण झाली आणि तिने त्याला बोलावून घेतले.

श्रेया आवरायला गेली; पण आज ती नेहमीसारखी अगदी साधेच आवरली होती. केसांची पोनी बांधली होती; शिवाय चेहऱ्यावर कोणतीही क्रीम क्रीम वगैरे न लावता फक्त पावडर लावली होती. कपाळावर छोटीशी टिकली आणि कानात अगदी छोटे कानातले तिने अडकवले होते. हातामध्ये मनगटी घड्याळ घालून, अगदी साधा पंजाबी ड्रेस तिने घातला होता. हातामध्ये अगदी छोटीशी पर्स आणि मोबाईल घेऊन पायात सॅंडल अडकून ती घरातून बाहेर पडली. तिने रिक्षा पकडली आणि ती स्वागत हॉटेलकडे जाऊ लागली. रिक्षातून जाताना असंख्य विचार आणि तिच्या डोक्यामध्ये थैमान घातले होते. मिहिर आणि अनुला तिने तिच्या नात्यातून मोकळे केले असले तरीही आता पुढे कसे करायचे हा प्रश्न तिला सतावत होता. मयूरशी बोलून ती सविस्तर चर्चा करणार होती; शिवाय तिचे मन मोकळे करणार होती. तिच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या होत्या त्याला साक्षीदार हा मयूर होता; त्यामुळे त्याच्याशी बोलताना तिला काहीच वाटणार नव्हते. ती विचारांच्या गर्तेत कधी हॉटेल समोर जाऊन पोहोचली हे तिचे तिला समजले नाही. श्रेया रिक्षातून उतरून आतमध्ये गेली तर मयूर तिच्या आधीच येऊन तिथे बसला होता. त्याच्याकडे पाहून तिने एक लहानशी स्माईल दिली आणि त्याच्या समोरील खुर्चीत जाऊन बसली.

"हे श्रेया कशी आहेस? सर्व काही तुझ्या प्लॅनिंगनुसार सुरू आहे ना?" मयुरने भेटल्यावर पहिला प्रश्न टाकला.

"हो. सगळे काही प्लॅनिंग नुसार झाले आहे. आता कुणालाच काही शंका येणार नाही; पण आता पुढे काय करायचे हा प्रश्न मला सतावत आहे. ते बोलण्यासाठीच मी इथे आले आहे." श्रेया म्हणाली.

"पुढे काय म्हणजे? मस्तपैकी तुझे करिअर करायचे, त्यानंतर एखादा चांगला मुलगा बघायचा आणि त्याच्याशी लग्न करून मोकळे व्हायचे." मयूर सहजतेने म्हणाला.

"इतकं सोपं असतं का? मला तर आता करिअरवरच फोकस करायचे आहे. लग्नाचा विचार तर मी कधीच सोडून दिला." श्रेया म्हणाली.

"असे का बरे? कधी ना कधी आपल्याला आयुष्यात जोडीदाराची गरज ही असतेच. आता नाही काही वर्षांनी तुला तो एकटेपणा जाणवेल; त्यापेक्षा तू सध्या तरी करिअरवर फोकस कर आणि त्यानंतर कोणीतरी तुझ्या आयुष्यात नक्की येईलच ना तेव्हा मग तुझा निर्णय ठरव." मयूर श्रेयाला समजावत म्हणाला.

"तुझे म्हणणे बरोबर आहे. मी उद्याच पुण्याला जायचं म्हणत आहे. तिथे काहीतरी करिअरच्या संधी येतीलच; शिवाय आधी मी एक वर्ष तिथे होते तेव्हा तो वर्षाचा एक्सपिरीयन्सही आहे त्यामुळे मला चांगली नोकरी मिळेल आणि माझी करिअर मार्गी लागेल. त्याचा काहीच विषय नाही. पण पुढे जाऊन जर त्या दोघांना सत्य समजले तर काय होईल याचा विचार माझ्या मनात सुरू होता. आता सध्या तरी मी मिहिरच्या मनातून पूर्णपणे उतरले आहे; पण अनु सहजासहजी माझा पिच्छा सोडणार नाही. तिला सत्य हे समजेलच तेव्हा काय करायचे हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे." श्रेयाने तिच्या मनातील भाव बोलून दाखवले.

"अगं, तसे काही नाही होणार. ते दोघे एकमेकांना समजून घेईपर्यंतच आणखी दोन वर्षे जातील, मग पुढच्या प्रवासाला त्यांची सुरुवात होईल. तू तसे काही मनावर घेऊ नको. तू तुझा पुढचा प्रवास सुरू कर; त्याशिवाय तुझ्या मनातील हे सगळे विचार बंद होणार नाहीत. हे सगळे विचार झटकून टाक आणि नव्या उमेदीने तू तुझ्या करिअरकडे लक्ष दे; शिवाय तुझ्यासोबत मी आहेच ना. तू जोपर्यंत म्हणतेस तोपर्यंत मी तुझ्यासोबत असेन. तू आता सगळा विचार काढून टाक आणि खायला काय ऑर्डर करू ते सांग." मयूर म्हणाला

"ठीक आहे. मला एक मस्तपैकी चीज सँडविच ऑर्डर कर." श्रेया म्हणाली.

"हे काय? आपण डिनर करणार होतो ना? मग तू सँडविच का मागवत आहेस? ते काही नाही हं. आपण डिनर करून झाल्यावर आईस्क्रीम खाऊन मग जायचे आहे. आपलं तसं ठरलं होतं ना?" मयूर म्हणाला.

"अरे हो, पण मी आता उद्याच निघणार आहे म्हटल्यावर मला जाऊन पॅकिंग वगैरे करावी लागणार ना? शिवाय मी घरी अजून सांगितले नाही; मग आजच्या दिवस आईच्या हातचे जेवून घेते ना. पुन्हा कधी मिळेल काय माहित म्हणून म्हटले. बाकी आपण पुण्यात गेल्यावर जाऊ ना बाहेर हवे तितके खायला." श्रेया मयूरला समजावत म्हणाली.

"बरं ठीक आहे." असे म्हणून मयूरने दोन चीज सँडविच ऑर्डर केली.

"हे काय? तुला सँडविच तर आवडत नाही मग तू तुझ्यासाठी सँडविच ऑर्डर केलास!" श्रेयाने आश्चर्याने विचारले.

"आज तुझ्यासोबत तुझ्या आवडीचे खाऊन पाहूया म्हणून मी ऑर्डर केले आहे. बरं मला सांग तू आईस्क्रीम कोणत्या फ्लेवरचं घेणार? आईस्क्रीम तरी खाऊयात का? का तेही पुण्याला गेल्यानंतर खायचं?" मयूर चिडक्या सुरात म्हणाला.

"अरे, इतकं चिडतोस कशाला? थोडं समजून घे ना, प्लीज." श्रेया म्हणाली.

"मी कुठे चिडतोय? मी तर समजूनच घेतोय ना? समजून घेतच मी तुला विचारत आहे." मयूर तोंड वाकडे करत म्हणाला.

"बरं ठीक आहे. मला वॅनिला फ्लेवरचा आईस्क्रीम हवा आहे. तू कोणता घेणार?" श्रेया हसतच म्हणाली.

"मला तर चॉकलेट फ्लेवरचा हवा आहे. कायम मला हार्ड आईस्क्रीम खूप आवडतं. आईस्क्रीम घेण्याअगोदर पहिल्यांदा सँडविच तरी संपवूया; मग इथेच नाक्यावर टकाटक आईस्क्रीम पार्लरमध्ये जाऊन आपण आईस्क्रीम खाऊया. तिथे एक नंबर आईस्क्रीम मिळतं. तुला नक्की आवडेल." मयूर म्हणाला.

"मला एक गोष्ट सांग. तू तर इथे राहत नाहीस; मग इथल्या सगळ्या गोष्टी तुला कशा माहित? की तुझी गर्लफ्रेंड वगैरे इथे राहते." श्रेया मयूरची चेष्टा करत म्हणाली.

"अजून तरी कोणी नाही; पण एकटी मनात बसली आहे. तिला विचारायचं म्हणतोय; पण ती काय म्हणेल काय माहित?" मयूर म्हणाला.

"तुझ्यासारखा मुलगा मिळायला खरंच नशीब लागतं. ती का नाही म्हणणार? नक्कीच ती तुला होकार देईल. तू पहिल्यांदा तिला विचारून तर पहा. ती जर नाही म्हटली तर मला सांग. मी तिच्याकडून कसे वदवून घ्यायचे हे पाहीन." श्रेया म्हणाली. इतक्यात सँडविच आले.

"श्रेया, अगं ती मुलगी.." असे म्हणून मयूर पुढे बोलत होता.

"अरे, आधी सँडविच खाऊन घे, नंतर बोलू; शिवाय पुण्याला गेल्यानंतर आपल्याला बोलायला भरपूर वेळ असणार आहे. मला घरी जाऊन अजून पॅकिंग करायची आहे. पहिला खाऊन घे; मग आईस्क्रीम खात आपण उरलेले बोलू." श्रेया म्हणाली.

"ठिक आहे." असे म्हणून मयूर सँडविच खाऊ लागला.

"श्रेया, साॅरी पण एक विचारू." मयूर म्हणाला.

"अरे, साॅरी काय त्यात? विचार ना?" श्रेया म्हणाली.

"तू त्या दोघांसमोर असे नाटक का केलेस? तुझे काही अफेअर वगैरे नसताना तू तसे का भासवलेस? मिहिर तर तुझ्या प्रेमात होता; मग काय अडचण होती?" मयूर म्हणाला.

श्रेयाने असे का केले असेल? हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all