Login

गंधबावरे 67

एक नवी मराठी प्रेम कथा
गंधबावरे 67
"श्रेया, तू अनुशी आणि मिहीरशी असे खोटे का वागलीस? त्यांच्याशी असे खोटे का बोललीस? हे सगळे करून तुला काय मिळाले? मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे आहे. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत." मयूर म्हणाला.

"मी काही कोणाशी खोटं बोलले नाहीये. मला त्यावेळेस जे वाटले तेच मी केले आहे. तसेही खोटे बोलून किंवा मागून मला काय मिळणार आहे? माझ्या हाती तर साधे धुपाटणेच राहिले आहे." श्रेया म्हणाली.

"मग तू हे सगळे नाटक का आणि कशासाठी केलीस? मला तर तुझे काहीच समजत नाहीये." मयूर म्हणाला.

"हे सगळे मी फक्त त्या दोघांसाठीच केले आहे. ते दोघे एकत्र यावेत आणि त्यांना आनंद मिळावा यासाठीच मी हे केले आहे; यामध्ये माझ्या स्वतःचा कोणताच स्वार्थ नव्हता." श्रेया म्हणाली.

"म्हणजे? मी काहीच समजलो नाही. तुला जे काही सांगायचे आहे ते स्पष्ट बोल." मयूर प्रश्नार्थक नजरेने म्हणाला.

"अरे, तुला जे काही सांगायचं आहे ते मी आता स्पष्ट सांगते. तुझ्यापासून काय लपवून ठेवायचे. खरंतर या सगळ्यांमध्ये तूच मला साथ दिली होतीस आणि तुझ्यापासूनच मी लपून कसे ठेवणार? हे बघ, अनुने सुरुवातीपासून आमच्यासाठी खूप काही केले आहे. महत्त्वाचे म्हणजे ती आमच्यासाठी, या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टसाठी तयार झाली. अरे, कोण कुठे असे तयार होईल सांग बघू? कितीही जिव्हाळ्याचे असेल तरीसुद्धा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी कुणीच तयार होत नाही; कारण प्रत्येक जण पहिल्यांदा स्वतःचा विचार करतात; पण अनुने स्वतःचा काहीच विचार केला नाही. ती फक्त आणि फक्त आमच्यासाठी तयार झाली." श्रेया म्हणाली.

"त्यातही तिचा स्वार्थ होताच ना? तिला मिहीर आवडत होताच; त्यामुळे त्याच्यासाठी ती तयार झाली होती." मयूर म्हणाला.

"एखादी व्यक्ती आपल्याला कितीही आवडत असली तरीही आपण सुरुवातीला स्वतःच्या भविष्याचा विचार करत असतो; पण तिने तसे काही केले नाही. बरं ठीक आहे, तिला मिहिर आवडत होता असे आपण मान्य करू; पण त्यानंतरही त्याच्या मनातून तिचे स्थान, तिचे अस्तित्व सगळे पुसले गेले होते तरीही तिने फक्त मिहिरच्या कुटुंबाचाच विचार केला. त्याच्या कुटुंबासाठी तिने किती त्याग केला हे तुला मी सांगून काही समजणार नाही; कारण ते मी स्वतः पाहिले आहे." श्रेया म्हणाली.

"तू तर इथे नव्हतीस; मग तू हे कसे पाहिलेस?" मयूर म्हणाला.

"जेव्हा मिहीरचा आणि अनुचा एक्सीडेंट झाला ती बातमी मला माझ्या भावाने सांगितली तेव्हाच मी तडक इथे हॉस्पिटलमध्ये त्या दोघांना भेटण्यासाठी आले होते; पण अनु व्यवस्थित होती आणि मिहीरची मेमरी लॉस झाली होती. त्याला आधीचे काहीच आठवत नव्हते हे जेव्हा मला समजले तेव्हा मी आल्या पावली माघारी फिरले. तसेही इथे राहून काहीच फायदा नाही हे मला जाणवले होते आणि मी तशीच निघून गेले; पण अनु मात्र तशी नव्हती. मिहीरला काहीच आठवत नाही या गोष्टीचा फायदा घेऊन ती इथून जाऊ शकली असती पण तिने तिचे कर्तव्य पूर्णपणे निभावले. तिने मिहीरला अगदी शेवटपर्यंत साथ दिली. याचा अर्थ माझ्यापेक्षाही तिचे प्रेम खरे निघाले. जेव्हा मला समजले की मिहीरला आधीचे सगळे आठवत आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. वाटलं लगेच निघून यावं आणि त्याच्या मिठीत शिरावं." श्रेया म्हणाली.

"म्हणजे? मिहीरला आधीचे सगळे आठवत होते हे तुला माहीत होते! ते कसे काय आणि तरीही तू अशी वागलीस!" मयूर आश्चर्याने म्हणाला.

"मिहीर ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता तिथले डॉक्टर माझ्या ऑफिस मधील मैत्रिणीचे काका होते; त्यामुळे तिथली सगळी माहिती मला आपसूकच समजत होती. तशी मी मैत्रीणीकडून सेटिंग करून घेतली होती. जेव्हा मिहीरला आधीचे सारे काही आठवत आहे हे मिहिरने डॉक्टरांना सांगितले, बाकी कुणालाच ही गोष्ट माहीत नव्हती; पण ती गोष्ट मला देखील त्याचवेळी समजली होती आणि तेव्हाच मला जाणवले की, मिहीर मला नक्की भेटायला येईल. कारण तो माझ्याशिवाय अनुकडे ओढला जाणार नाही ही गोष्ट मला माहित होती. अनुने मिहिरसाठी इतके काही केले पण त्याला त्याचे काहीच नव्हते. त्याला तर फक्त माझी ओढ होती हे मला माहित होते आणि म्हणूनच मी एक प्लॅन करायचा ठरवले." श्रेया म्हणाली.

"प्लॅन? कसला प्लॅन?" मयूर म्हणाला.

"अरे, मी एका कामानिमित्त माझ्या ऑफिसमधील कलीगसोबत ऑफिसच्या बाहेरील गार्डनमध्ये उभी होते आणि तेव्हाच मला तिकडून मिहीरची गाडी येताना दिसली. आता मिहिरसोबत मी बोलायला गेले तर मी त्याच्यामध्ये गुंतून जाईन आणि कुठेतरी हे थांबायला हवे असे मला वाटत होते. अनुने केलेला त्याग, तिने केलेली मदत, तिने त्या कुटुंबासाठी वाहिलेलं सर्वस्व हे सगळे काही त्याला ज्ञात नव्हते. तो मात्र माझ्या ओढीने इकडे आला होता आणि मग तेव्हाच मी त्याच्याकडे लक्ष नसल्याची एक्टिंग करू लागले आणि त्यातच तो एका झाडापाठीमागून माझ्याकडेच येत असल्याचे मला दिसले; म्हणून मी नकळत पडल्याची एक्टिंग केली आणि माझा पाय घसरला. त्यातच मी माझ्या कलीगच्या अंगावर जाऊन पडले; तेव्हा मिहीर तिथेच थांबला. माझे सगळे लक्ष त्याच्याकडे होते त्यामुळे इथे काय घडत आहे हे मला जाणवलेच नाही. इतक्यात तो कोणाशी तरी बोलत असल्याचे मला जाणवले आणि तेव्हाच मी सावध झाले. मिहिर बोलत असलेला मुलगा तुझा मित्र होता हे जेव्हा मला समजले तेव्हा मी उठून उभी राहिले आणि पुन्हा त्याच्याशी बोलू लागले. तेव्हाच मिहीरचा गैरसमज झाला. खरंतर हा गैरसमज घडवून आणला होता. या सगळ्या मागे मीच होते." श्रेया बोलत होती.

"हो. म्हणजे मिहीर गेल्यानंतर तू माझ्या मित्राशी येऊन बोललीस आणि तू त्याला विचारलेस की, त्याने तुला काय सांगितले आहे? तुझे इथे नक्की काय प्रकरण चालू आहे हे चोरून चोरून मला फोटो पाठवायचे असे त्याने सांगितले होते आणि तेव्हाच तू त्याला घेऊन माझ्याकडे आली होतीस. मग हा बाकीचा प्लॅन तयार झाला; पण मला एक सांग. तू मिहिरच्या सोबत असे वागून तुला काय मिळाले? त्याच्या नजरेतून तू इतकी उतरली आहेस की पुन्हा तुझ्याकडे ठुंकूनही पाहणार नाही; मग तू हे सगळे असे का केलेस?" मयूर म्हणाला.

"अनु माझी लहानपणापासूनची मैत्रीण तसेच बहीण देखील होती. आम्ही दोघी कोणतीही गोष्ट करायला गेलो की एकत्रच करणार. अगदी अभ्यासापासून ते जेवणापर्यंत सर्व काही आम्ही दोघी एकत्रच करणार. शाळा, क्लास, कॉलेज या सगळ्या गोष्टी एकत्रच होत होत्या. आमच्या दोघींमध्ये सिक्रेट असे काहीच राहत नव्हते; पण त्या लग्नामध्ये जेव्हा मिहिरला आम्ही दोघीजणी भेटलो तेव्हा आम्हा दोघींनाही तो आवडला होता. पण मिहिरला मीच पाहता क्षणी आवडले त्यामुळे आमच्या दोघांच्या एक सूर जुळले गेले. अनुच्या मनामध्ये देखील मिहीर होता हे तिने मला कधीच सांगितले नाही. प्रत्येकवेळी आम्ही त्याला भेटायला जात होतो तेव्हा मला तिच्या डोळ्यांमध्ये त्याच्याविषयीचे प्रेम दिसत होते. लहानपणापासून आम्ही कुठेही गेलो की अनु सावळी असल्यामुळे तिला दुय्यम दर्जाचे स्थान मिळत होते आणि मी अशी गोरी असल्यामुळे नेहमी सगळे मलाच विचारत होते. कोणत्याही कार्यक्रमात गेले तरी लोक पहिला माझ्याकडे पाहत नंतर अनुकडे. यातून तिच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला होता. निदान मिहीर तरी तिला समजून घेईल अशी तिची आशा होती. मिहीरचे बाबा आणि अनुचे बाबा दोघे आधीपासूनचे मित्र असल्यामुळे त्यांनी या मैत्रीचे रूपांतर नातेसंबंधांमध्ये निर्माण करावे असे ठरवले पण मिहीरला ती मुलगी मीच आहे असे वाटले आणि मोठा गैरसमज झाला. अनुचा स्वभाव मला माहीत होता. ती माझ्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणार हे मला माहीत होते आणि तसेच झाले. तिने मला तिच्या प्रेमाची कबुली कधीच केली नाही; पण मी देखील खूप जिद्दी होते. तिच्या तोंडून हे वदवून घेतल्याशिवाय मी इतके टोकाचे पाऊल घेऊ शकणार नव्हते. कदाचित तिच्या मनामध्ये तसे काही नसेल तर? अशी मला भीती वाटत होती म्हणून एका संध्याकाळी मी तिच्याशी बोलण्याचे मुद्दाम ठरवले आणि तेव्हाच तिच्या मनातील राग मला समजून आला. तेव्हाच मी ठरवले की आता आपला नंबर आहे. आपल्या बहिणीसाठी आपण इतकेही करू शकणार नाही का? असे मी तेव्हाच ठरवले आणि हे सगळे केले. माझ्या बहिणीसाठी इतके करू शकले हे खूप आहे यासाठी मी मिहिरच्या नजरेतून आयुष्यभर उतरायला तयार आहे." श्रेया म्हणाली.

"यार, तुमच्या दोघींचे काहीच कळत नाही. तू तिच्यासाठी आणि ती तुझ्यासाठी इतके काही करत आहात की खरंच तुझ्या दोघींमध्ये किती चांगले बाँडिंग असेल हे समजून येते." मयूर म्हणाला.

"आहोतच आम्ही तशा; कोणालाही न समजणाऱ्या." श्रेया हसतच म्हणाली.

"श्रेया, तुझ्याशी एक बोलायचं आहे." मयूर दबकतच म्हणाला.

"बोल ना." श्रेया म्हणाली.

"श्रेया, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील." मयूर म्हणाला.

पुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all