गंधबावरे 69
"तुम्हाला श्रेयाबद्दल काही माहिती आहे का? तुमचा तिच्याशी काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला आहे का? ती तुम्हाला भेटली आहे का किंवा तिचा नंबर तरी तुमच्याकडे आहे का?" अनुने मयूरवर प्रश्नांचा भडीमार केला.
"तुम्हाला श्रेयाबद्दल काही माहिती आहे का? तुमचा तिच्याशी काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला आहे का? ती तुम्हाला भेटली आहे का किंवा तिचा नंबर तरी तुमच्याकडे आहे का?" अनुने मयूरवर प्रश्नांचा भडीमार केला.
"हॅलो हॅलो, इतक्या सगळ्या प्रश्नांचा भडीमार! बापरे! काय सुरू आहे हे? एका एका प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला देईन. ठीक आहे." मयूर म्हणाला.
"सॉरी सॉरी, ठीक आहे तुम्ही बोला." अनु म्हणाली.
"श्रेयाचा माझ्याकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे; पण गेली दोन महिने मी त्याच्यावर फोन करण्याचा प्रयत्न करतोय पण तिने एकदाही माझा फोन उचलला नाही. शिवाय ती मला दोन महिन्यापूर्वी भेटली होती. तसे आम्ही आधी सारखे भेटायचो. दोन महिन्यापासून काय झाले आहे काय माहित? ती माझ्याशी एक अक्षरही बोलली नाही." मयूर म्हणाला.
"तिचा नंबर मला द्याल का? मी तिच्याशी फोनवर बोलेन." अनु म्हणाली.
"तिचा नंबर मी कुणालाही देणार नाही अशा प्रॉमिसवर मी तिचा नंबर घेतला होता. आता मी तुम्हाला जर नंबर दिला तर ते प्रॉमिस मोडेल. नंतर ती माझ्याशी कधीच बोलणार नाही त्यापेक्षा मी तुम्हाला नंबर न दिलेले बरं." मयूर म्हणाला.
"ठीक आहे. मग तुम्ही माझ्यासमोर एकदा फोन करून बघा. कदाचित आज ती तुमचा फोन घेईल किंवा घेणार नाही; पण मनाची समजूत तरी निघेल." असे म्हणताच मयूरने श्रेयाला फोन लावला आणि दोन रिंग झाल्यावर श्रेयाने लगेच फोन उचलला. मयूरला देखील खूप आश्चर्य वाटले.
"हॅलो मयूर, अरे मी माझ्या घरी चालले आहे. तू कुठे आहेस? मी तुला फोन करत होते पण तुझा फोन लागलाच नाही." श्रेया आनंदाच्या भरात बोलत होती.
"काय तू इकडे येतेस! कधी? कसे?" मयूर आश्चर्यचकित होऊन विचारत होता.
"इकडे म्हणजे? तू कुठे आहेस?" श्रेयाने प्रतिप्रश्न केला.
"मी डायमंड कॅफेमध्ये आहे. तू दोन महिने झाले माझा फोन उचलला नाहीस म्हणून तुझ्या आठवणीने मी इकडे आलो तर इथे मला अनु भेटली आणि तिच्याशीच मी बोलत बसलो होतो. तू सांग. तू इथे कधीपर्यंत येते आहेस?" मयूर म्हणाला.
"हे काय, फक्त पाच मिनिटात मी तिथे येईन. तू आमच्या घरी येतोस का आणि अनुलादेखील यायला सांग. तिला भेटून दोन वर्षे झाली रे." श्रेया म्हणाली.
"काय! पाच मिनिटात! हो हो. आम्ही घरी पोहोचतोच." असे म्हणून मयूरने फोन ठेवला आणि अनुसोबत तो त्यांच्या घरी जाऊ लागला. अनुनेही जातानाच मिहिरला फोन करून सगळी घटना सांगितली होती आणि मिहिरदेखील तिकडे यायला निघाला होता.
श्रेया जेव्हा घरी आली तेव्हा तिला दारातच मयूर, अनु आणि मिहीर तिघेही दिसले; पण अनुच्या गळ्यात तिला मंगळसूत्र दिसले नाही त्यामुळे तिला थोडे आश्चर्य वाटले. ती तशीच आत आली. सर्वांनी तिचे खूप कौतुक केले, काहीजण तिच्यावर चिडले, तिला रागावले, अशी न सांगताच निघून गेली होती म्हणून तिला ओरडू लागले.
"अरे, थांबा थांबा. किती दंगा आणि कलकल सुरू केला आहे? मला एक न्यूज द्यायची आहे. खरंतर माझं जे स्वप्नं होतं ते स्वप्नं आज पूर्ण झालेलं आहे. माझ्या क्षेत्रामध्ये उत्तम अशी कामगिरी केली आहे आणि मला खूप चांगले पॅकेज मिळत आहे. खरंतर मला जे मिळवायचे आहे ते मी या दोन वर्षांमध्ये पूर्णपणे मिळवले आहे. त्यामुळे आज मी खरंच खूप खूश आहे." श्रेया भरभरून बोलत होती.
"तू खुश आहेस ना बाळा, तर आम्ही सुद्धा तुझ्या आनंदात खूप आनंदी आहोत." असे म्हणून श्रेयाच्या बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा थोड्यावेळासाठी सर्वजण भावूक झाले होते.
"श्रेया, तू मला अगदी खरं खरं सांग तुझ्या आणि मयूरमध्ये कोणते नाते आहे? तू खरंच त्याच्या प्रेमात आहेस का? तू त्याच्याशी लग्न केले नाहीस मग आम्हाला जे फोटो दिसले ते फोटो कोणते होते? आणि त्याचा तुझ्याशी काय संबंध? मी कितीदा मिहीरला सांगितले की, ते फोटो खरे नाहीत पण याने माझ्यावर विश्वास ठेवला नाही." अनु श्रेयाला म्हणाली. खरंतर अनुने श्रेया गेल्यावर आधी झालेल्या सर्व घटना सांगितल्या होत्या. त्यामुळे सर्वांना सर्वकाही माहित होते.
"अनु, खरंतर हे मी मुद्दामून केले होते. तुझा त्या घरासाठी केलेला त्याग, समर्पण, आमच्यावरील प्रेम हे सारे काही दिसून आले होते. मी स्वार्थीपणाने जर त्या घरात गेले असते तर आज मिहिरची पत्नी म्हणून त्या घरात असते पण मला माझा स्वार्थभाव दाखवायचा नव्हता. तुझा त्याग माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होता त्यामुळे तुझ्या हक्काचे तुला मिळायलाच पाहिजे असे म्हणून मी हे पूर्णपणे नाटक केले होते." असे श्रेयाच्या तोंडून वाक्य ऐकताच मिहीर पश्चातापाने युक्त झाला. तो काही बोलायला जाणार इतक्यात श्रेया पुन्हा बोलू लागली, "मला तुम्हा सर्वांना काहीतरी सांगायचं आहे."
"बोल ना बेटा, तुला काय बोलायचं आहे?" श्रेयाचे बाबा म्हणाले.
"एक तर माझी मुलगी इतक्या दिवसांनी घरी आली आहे आणि तुमचं सगळं काय सुरू आहे? तिला थोडी विश्रांती तरी घेऊ द्या." श्रेयाची आई ओरडत तिच्या जवळ आली.
"आई, एक मिनिटं मला बोलू दे, प्लीज." असे म्हणून श्रेयाने बोलण्यास सुरुवात केली. "खरंतर अनुला तिच्या हक्काचे तिला द्यायचे म्हणून जेव्हा मी ठरवले आणि मयूरकडे मदत मागण्यासाठी गेले तेव्हा कसलाही विचार न करता त्यानेही मला मदत केली. पुढे त्याची बदनामी होईल हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. फक्त मैत्रीच्या नात्याने त्याने हे सगळे केले; पण हे नाटक करता करता कधी तो माझ्या प्रेमात पडला हे त्याचे त्याला देखील समजले नव्हते. मागच्या वेळेस जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा त्याने कबुली दिली होती; पण मीच करिअरच्या नावाने त्याला नकार दिला. आज मला एवढे मोठे यश मिळाले आहे तरीही मी कुठेतरी अधुरी आहे, अपुरी आहे ही भावना मला जाणवू लागली आणि तेव्हाच या निर्णयावर मी येऊन थांबले आहे." श्रेया बोलता बोलता थांबली.
"तू कोणता निर्णय घेतला आहेस? जे काही घेतले आहेस ते स्पष्ट शब्दात सांग. आम्हाला त्यात आनंदच आहे." अनु म्हणाली.
"मयूर, तू मला आजपर्यंत साथ दिलास तशीच यापुढे देखील मला साथ देशील का? मला तू, तुझा स्वभावखूप आवडला. मयूर, जीवनसाथीच्या रूपाने माझ्या आयुष्यात येशील का? माझ्याशी लग्न करशील का?" असे म्हणून श्रेयाने त्याच्या समोर हात केला. मयूरला तर काहीच सुचत नव्हते. त्याच्या मनात ही इच्छा गेली दोन वर्षे दबून राहिली होती; पण आता श्रेयाने त्याला वाचा फोडली होती. त्यामुळे त्यानेही लगेच होकार देऊन तिच्या हातात हात दिला. त्यानंतर मिहिरने देखील अनुला लगेच मागणी घातली.
"अनु, तू आमच्या कुटुंबासाठी जो काही त्याग केलास, जे काही समर्पण दिलेस ते खरंच कोणत्याही शब्दात मोजता येणार नाही. ते सर्व काही मी पाहिले आहे. मला जाणवले आहे; पण तुझ्या उपकाराची परतफेड म्हणून मी तुला मागणी घालत आहे असे तो समजू नकोस. मी जे काही बोलतोय ते अगदी मनापासून बोलतोय आणि मी तुझा रंग, रूप हे काहीच पाहून निर्णय घेत नाही. मी फक्त तुझ्याकडे पाहून हा निर्णय घेतला आहे. अनु, तू मला आतापर्यंत खूप साथ दिलेस. अशीच आयुष्यभर साथ देशील का? अनु, पुन्हा एकदा माझ्याशी लग्नगाठ बांधून माझ्या घरातील तुझी जागा फुलवशील का?" मिहिर असे म्हणताच अनुच्या डोळ्यावाटे अश्रू ओघळू लागले. या दोघांच्या निर्णयाने घरात आनंदाचे वातावरण पसरले. सर्वांनी चौघांना भरभरून आशीर्वाद दिले.
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा