गणपती.. आपला की आमचा? भाग २
मागील भागात आपण पाहिले की शशांक आणि श्रेयस या दोन भावांमध्ये गणपतीची चर्चा सुरू आहे. बघू आता पुढे काय होते ते.
"सोडून दे?? कसा सोडून देऊ हा विषय? दरवर्षी तेच पुराण. खर्च सगळा आपण करायचा आणि आव मात्र हे आणणार सगळं केल्याचा. तुला तर किती वेळा सांगितलं एक वर्ष गणपती आपल्याकडे, तर एक वर्ष त्यांच्याकडे बसवू.. पण तुला काहीच बोलता येत नाही."
"आता मी काय केले? खरंतर आईबाबांची इच्छा होती की निदान सणसमारंभ तरी त्या एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने साजरे करावेत. म्हणून तर.."
"ते आपल्याकडे गणपतीला आले तर एकत्र होणार नाही का? पण नाही.. धाकट्यावर जीव ना तुझ्या आईबाबांचा. म्हणून सगळं दिलं त्याला. आणि तुला काढलं घराबाहेर." अनघा चिडली होती. शशांक यावर नेहमीप्रमाणे गप्प बसला. या एकाच विषयावर तो अनघाशी वाद घालू शकत नव्हता.
त्याचे आणि अनघाचे आंतरजातीय लग्न त्याच्या आईबाबांना पसंत नव्हते. त्यामुळे त्यांनी तिला नेहमी दूरदूरच ठेवले. त्यानंतर आलेली श्रद्धा ही नात्यातलीच म्हणून आईच्या जास्त जवळची. आईचे आणि अनघाचे होणारे वाद टाळण्यासाठी शशांक घराबाहेर पडला आणि कायमचा घराला दुरावला. आईने सगळे कुलाचार श्रद्धाकडे सोपवले. सगळं हौसेने करायची तयारी असली तरी आपल्याकडून मोठ्या सुनेचा मान हिरावून घेतलेला अनघाला सहन झाला नाही. तरी फक्त आणि फक्त शशांकच्या आग्रहाने ती सगळे सण साजरे करायला यायची. तीन वर्षांपूर्वी आई गेली त्यापाठोपाठ बाबाही.
आईबाबा असेपर्यंत श्रद्धा काही जास्त बोलायची नाही. पण सगळ्या घरात तिचा वरचष्मा असलेला जाणवत रहायचा. ते असतानाही शशांक बराचसा खर्च उचलायचा. पण तेव्हाही स्वतःच्याच घरात परकं झाल्यासारखे वाटत रहायचे. एकदादोनदा त्याने आईबाबा एकटेच असताना गणपती एक वर्ष इथे, एक वर्ष तिथे असं बसवायचं का म्हणून विचारले होते. पण त्यावर आई खूप चिडली होती. 'आम्ही राहतो ना सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे? मग आता देवालाही नाचवणार का? तसेही देवाच्या जागेतच देव शोभून दिसतात. त्याजागी ते बसले नाहीत तर मलाच चुकल्याचुकल्यासारखे वाटेल.' आईचे हे म्हणणे त्याला पटले असो वा नसो, ही गोष्ट अनघाला सांगायची त्याची हिंमत नव्हती. पण आईबाबा गेल्यापासून श्रद्धा आणि विहानचे वागणे बदललेले त्याला जाणवत होते. इतर वेळेस नाही पण गणपतीत मुलांनी एकत्र रहावे असा आईबाबांचा हट्ट असे. घर लहान पडायचे म्हणून मग शशांक आणि अनघा सकाळी येऊन रात्री आपल्या घरी परत जायचे. घर जरी जवळच असले तरीही घरातलं, मुलांचे आवरून जायला अनघाला उशीर व्हायचाच. ती तिथे गेली की श्रद्धा लगेच बाहेर जायची. पाहुण्यांना काही हवे नको ते बघायला. अनघा मात्र आतमध्ये बसून फराळाच्या बश्या भरणे, भांडी हातासरशी धुवून घेणं ही कामे करायची. ते करताना श्रद्धाची बोलणी ऐकू यायचीच. प्रत्येक वेळेस आमचा गणपती, आमचं घर हे ऐकू यायचं. मुलांनाही मग त्यांच्या मित्रमैत्रिणींना बोलवायचं जीवावर यायचं. पण त्याचवेळेस विहानच्या मुलाचे पार्थचे सगळे मित्र त्यांच्या आईवडिलांसोबत आलेले असायचे. एकेक गोष्टी अनघा आणि शशांकला नव्याने समजत होत्या. हक्क असूनही शशांकने घरावरील हक्क सोडून दिला होता. पण याची जाणीव मात्र विहान आणि श्रद्धाला नव्हती.
होईल का जाणीव त्या दोघांना? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा