Login

गणपती.. आपला की आमचा?

कथा घराघराची
गणपती.. आपला की आमचा?


"दादा, यावेळेस गणपतीसाठी तू काय करणार आहेस?" विहानने शशांकला विचारले.

"काय म्हणजे?"

"म्हणजे, एखादा सोन्याचा दागिना किंवा अजून काही?"

"हो ना.. आम्हाला बाई नाही जमणार काही करायला. बघा ना.. गणपतीचा खर्चच काही कमी असतो का? आलंगेलं बघायचं.. त्यांचं खाणंपिणं सांभाळायचे, काही कमी का व्याप असतात? फुलांचे, फळांचे आणि सगळ्याचे भाव तर नुसते गगनाला भिडत असतात. आजकाल ना हे सणसुद्धा परवडत नाही." विहानची बायको श्रद्धा मध्येच बोलली. ते बघून शशांकच्या बायकोने अनघाने शशांककडे चमकून बघितले. त्याने तिला गप्प बसण्याची खूण केली. श्रद्धा मात्र पुढे बोलतच होती.

"त्यात ही मुले डेकोरेशनसाठी मागे लागतात. त्याचे तर काही विचारूच नका. साधेच प्लॅस्टिकचे.. पण भाव?? बापरे बाप.." श्रद्धा बोलतच होती. आता मात्र न राहवून अनघा बोललीच.

"अगं पण दरवर्षी तेल, उदबत्तीपासून पूजेचं सर्व सामान आम्हीच आणतो ना? डेकोरेशन सुद्धा नील आणि जान्हवीच बघतात. मूर्तीही शशांक बुक करतो. अजून काय करायचे आम्ही?" अनघा दुखावली गेली होती.

"मी कधी म्हटलं का, तुम्ही काही करत नाही? मी आपलं सहजच म्हणाले. आणि तसेही बाकीच्या सामानाचे पण भाव वाढले आहेतच की." श्रद्धा सावरून घेत म्हणाली.

"विहान, अजून काही करायचे असेल तर सांग. मी बघतो. निघतो आम्ही." पुढे कोणालाच काहीच न बोलू देता शशांक उठला. त्याचं बघून अनघाही उठली. दोघे बाहेर पडताच श्रद्धा कुरबुरली.

"एवढं काय बाई मी राग येण्यासारखं बोलले? दरवर्षी पाचसहा दिवस एकत्र स्वयंपाक असतो. आपलं दहा दिवसांचं रेशन चार दिवसांत संपतं. आता तो खर्च आपण काढतो का?"

"अगं पण दादा, वहिनी मदत करतातच की." विहानने बोलायचा प्रयत्न केला.

"मदत?? सकाळी नऊ वाजता येतात. मी सगळी तयारी करून ठेवायची. मग या फक्त भाज्यांना फोडण्या घालणार. भाऊजी पूजेला बसणार. तू बसणार तसाच. फक्त हे दे, ते दे करत."

"सगळा खर्च तो करतो. मग एक दिवस करू दिली पूजा तर काय बिघडतं?" विहान म्हणाला. त्याचे बोलणे न पटून श्रद्धा आत निघून गेली.

इथे गाडीत अनघाही शशांकचे डोके खाऊ लागली.

"आता मी ना महिन्याचा पगार हिच्या हातात देते गणपतीत. तेवढेच बाकी आहे. समजतच नाही मोठी जाव कोण आहे ते. ही की मी?"

"सोडून दे ना विषय. सणासुदीला कटकट नको. आपल्याला जेवढं जमतं तेवढं आपण करू." शशांक अनघाची समजूत काढत म्हणाला.

अनघाची समजूत पटेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all