"आपल्या सौरभचं लग्न ठरलंं बरं का, लव्ह मॅरेज आहे, त्याच्याच ऑफिसामधील आहे मुलगी, आपल्यापैकीच आहे, आम्ही जाऊन आलो दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडे, शर्वरी, जावईबापू पण आले होते. पुढच्या आठवड्यात ती मंडळी आपल्याकडे यायची आहेत पुढची बोलणी करायला" काकूने एका दमात फोनवरून सगळी बित्तम बातमी शुभदाला सांगून टाकली.
"खूप छान न्यूज दिलीस, अभिनंदन सौरभचे आणि होणाऱ्या सासूबाई तुमचेपण".
"मी काय म्हणते, एक दोन दिवसात चक्कर टाक घरी म्हणजे कसं करायचं, काय बनवायचं ठरवता येईल” काकू शुभदाला म्हणाली.
दोन दिवसांनी शुभदा वेळ काढून तिच्या काकूच्या घरी गेली.
“ती मंडळी ह्या रविवारी यायचं म्हणत आहेत. सकाळी दहा साडे दहा पर्यंत. तेव्हा काय करायचं.” काकूने शुभदाला विचारलं.
“जेवायला येणार का?”
“मी म्हटलं त्यांना तसं. पण नको म्हणाले. बरोबरच आहे त्यांचं. मुलीच्या सासरी अवघड वाटेल त्यांना. त्यात माझ्या होणाऱ्या सुनेच्या रितिकाच्या आईचा उपास, एकदशी आहे त्यांची. नुसत वेफर्स, फळं. चांगलं दिसणार नाही. विहिणबाईंसाठी खिचडी करावी लागेल. बाकीच्यांसाठी, इडली सांबार, गुलाबजाम.”
“हो चालेल. छान बेत आहे.” शुभदा म्हणाली.
*तुलाच येऊन करावं लागेल सगळं, मला काही पटकन सुधरत नाही हल्ली. सात आठ जण आहेत त्यांच्याकडील. रत्नाला मी मुद्दाम नाही बोलवणार त्या दिवशी. आत कामं करता करता तिचं सगळं लक्ष बाहेर राहील. सगळ्या बिल्डिंगमध्ये बोभाटा होईल.“
"शर्वरी येणार असेल ना. ती असेल ना माझ्या मदतीला” शुभदाने विचारले.
“नाही ग. एका दिवसासाठी कुठे तिला येवढ्या लांब बोलवू. त्यात तिचं बाळ लहान. तू असल्यावर काही टेन्शन नाही. ती म्हणत होती आई मी येते. तुला एकटीला जमणार नाही. पण मीच म्हटलं, शुभदा येईल. तू टेन्शन घेऊ नकोस. आठ साडे आठ पर्यंत ये. ती मंडळी यायच्या आत सगळं तयार हवं आपल. त्यांच्या समोर काही नको साधनाकाकू सुभदाला हक्काने म्हणाली.
ठरल्याप्रमाणे शुभदा रविवारी सकाळी साडे आठ पर्यंत काकूकडे गेली. तो पर्यंत फक्त काकूची अंघोळ, पूजा आटोपली होती. काका, सौरभचं बेडशीट बदल, इकडचं समान तिकडे कर चालू होतं. शुभदाला वाटलं काकूने खिचडी तरी करून ठेवली असेल. पण काकू कुठली साडी नेसू, काय दागिने घालू यातच ग्रुरफटली होती. शुभदाला आल्यावर चहा विचारायचं सुद्धा तिला लक्षात आलं नव्हतं.
काकूचं लवकर आटपायचं चिन्ह दिसेना तेव्हा शुभदानेच सगळ्यांसाठी चहा ठेवला. एकीकडे कुकरला सांबारसाठी डाळ लावली. चटणी वाटली. ‘‘नशीब कुट तरी करून ठेवलंय’ म्हणत खिचडी केली. मुलीकडील मंडळी आली तरी काकूची तिचं स्वतःच लग्न असल्यासारखी तयारीच चालू होती.
“साधना आटप तुझं लवकर, शुभा एकटीच सगळं करत आहे” काकांनी एक दोनदा काकूला हटकलं देखील पण काकूबाईंनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं.
लवमॅरेज असल्याकारणाने देणंघेणं, मानपान यावरून होणारे वादविवाद असं काहीचं या बैठकीत नव्हतं. घर बघावं, मुलीच्या सासरच्या माणसांशी ओळख व्हावी हाच हेतू होता. त्यामुळे सगळंकाही सांमज्यासाने चाललं होत. हास्य विनोद होत होते पण या सगळ्यात शुभदा कुठेच नव्हती. थोड्यावेळ बाहेर थांबून, ओळख परेड झाल्यावर ती परत कामाला लागली होती. गरमगरम इडल्या लाव, डिश भर, चहाकॉफी यातच ती गुंतली गेली होती. बाहेर काय चालू आहे याची तिला बिलकूल कल्पना नव्हती.
“सगळं तर शुभाने केलं, तुला थकायला काय झालं?” पाहुणेमंडळी गेल्यावर “दमले ग, थकले ग” म्हणत सगळा कामाचा डोंगर स्वतः उपसल्याचा आव आणलेल्या काकूला काका म्हणाले.
“आज केलं तिने, पण गेल्या चार दिवसांपासून साफसफाई करून जीव गेला माझा. रत्ना असली म्हणून काय झालं, कामवाल्यांच्या मागे लागून सगळं करून घ्यावं लागतं” काकूने तेवढ्याच तोऱ्यात उत्तर दिलं.
“बरं झालं आलीस बेटा काकांनी आग्रह करून शुभदाला इडली चटणी खायला लावलं” काकूला नसली तरी काकांना शुभदा नेहमी येऊन मदत करते याची जाण होती.
‘खरं तर ह्यांना बोलवायला हवं होत बैठकीसाठी. चुलत असला तरी मोठा जावई आहे’ शुभदाच्या सारखं मनात येत होत. पण नेहमी प्रमाणे बोलता मात्र येत नव्हत.
साखरपुड्याची तारीख ठरली की मी येतो निमंत्रण करायला, सांग पुष्कररावांना” शुभदाच्या हातात पेढ्याचा बॉक्स देत काकांनी सारवासारव केली.
‘सुहास काकाला वाटलं असेल जावयाला बोलवावं’ पण साधना काकूपुढे त्याच काहीच चालत नाही. शुभदाच्या मनात आलं.
“मी आत जाऊन पडते थोड्यावेळ” म्हणत जी काकू आत गेली ती शुभदा निघताना देखील बाहेर आली नाही.
घरातली सगळी कामे टाकून सकाळीसकाळी शुभदा इकडे आली होती. त्यात रविवार असल्याने नवरा, मुली सगळे घरी त्यामुळे शुभदा तिथून लगेच निघाली.
शुभदा सौरभ आणि शर्वरी हि तिघं चुलत भावंडं. शुभदा तिघात मोठी, एकुलती एक. तिचा ह्या दोघांवर जीव. सौरभवर तर जरा जास्तच आणि म्हणूनच लाडक्या भावाच लग्न ठरल्याच कळल्यापासून ती प्रचंड उत्साहात होती पण घडल्या प्रकारामुळे तिचा उत्साह पूर्णपणे मावळला. नाराज होऊन घरी परतली.
क्रमशः
काम होतं तेव्हा काकू शुभदाशी गोड गोड बोलली आणि काम झाल्यावर तिच्याकडे दुर्लक्ष करत गरज सरो आणि वैद्य मरो अशी तिची अवस्था केली. का वागली असेल काकू शुभदाशी अशी …? वाचूया पुढील भागात.
©®मृणाल महेश शिंपी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा