Login

गरज सरो वैद्य मरो भाग २

गरज सरो वैद्य मरो
मागील भागात आपण पाहिले लाडक्या भावाच सौरभच लग्न ठरलं या आनंदात शुभदा तिच्या काकूच्या घरी गेली पण काकूने आपल्या वागणुकीने तिच्या उत्साहावर पाणी फिरवले आता पुढे…

हिरमुसली होऊन शुभदा घरी आली तरी तिला सारखं सगळं तेच आठवत होतं. तिचं कशातच लक्ष लागत नव्हतं. यंत्रवत कामं चालली होती तिची. वास्तविक हे सगळं तिच्यासाठी नवीन नव्हतं. दरवेळी गोड गोड बोलून काकू तिच्याकडून कामं करून घ्यायची. गरज सरल्यावर तिला झटकून टाकायची.

साधनाकाकू शुभादाच्या आईशी सुद्धा अशीच वागायची. शुभदाच्या आईला बरेचदा सगळे म्हणायचे सुद्धा “अनिता तू मोठी जाऊ असून सतत काम करत असतेस आणि साधना लहान असून ऑर्डर सोडत असते.”

“सगळ्यांनीच हात झटकून कसं चालेल, आपल्याच माणसांसाठी करते मी. थोडीच परक्यांसाठी राबते. नवीन आहे घेईल नंतर ती जवाबदारी.”

पण ना कधी साधनाकाकूने जवाबदारी घेतली ना शुभदाच्या आईने कधी तिला त्याची जाणीव करून दिली. वहिनी करतात तर त्यांनाच करू दे, आपण कशाला करा असचं तिचं नेहमी वागणं असायचं. गोड गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्यायचं साधनाला चागलं जमायचं.

“काय झालं? आल्यापासून गप्पगप्प आहेस, काय ठरलं बैठकीत?” शुभदाचा हिरमुसलेला चेहरा पाहून न राहून पुष्करने तिला विचारलंच.

“कुठे काय? सारखपुड्याची तारीख ठरली की काका येतील बोलावणं करायला” तिने मोघम उत्तर देत बोलणं टाळलं.

‘नेहमीप्रमाणे काकूंनी आपल्या भोळ्या भाबड्या बायकोला कामाला जुंपले असणार’ शुभादाचा चेहरा बघून तिकडे काय घडलं असणार याचा पुष्करला अंदाज आला.

“तरी मी सांगत होतो नको जाऊस, पण नवऱ्याच ऐकेल कोण.”

“लांब रहात असतो तर गोष्ट वेगळी होती पण एकाच गावात अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर राहून नसते गेले तर चांगलं दिसलं नसतं” ती नवऱ्याला समजावत म्हणाली.

“मग जा आणि घे स्वतःला त्रास करून. गोष्टी जेव्हाच्या तेव्हा बोलायच्या असतात. मागून बोलण्याला काहीच अर्थ नसतो.”

पुष्करचं म्हणणं तिला पटत होत पण पटकन तोडून टाकता येत नव्हत. स्वभाव आडवा येत होता.

तशी कामाला शुभदा वाघ होती. कामं करायला तिची कधीच ना नव्हती. फक्त आपण करतो याची जाण असावी. कधीतरी पाठीवर कौतुकाची थाप पडावी असं मात्र तिला नेहमी वाटे.

“अहो उगच शब्दाने शब्द वाढणार, वाद होणार, आपलेच आपल्याला दुखावणार. लग्नकार्यांत चर्चेला उधाण येणार. इतके दिवस गप्प राहिले अजून काही दिवस…’ लाडक्या सौरभसाठी एवढं करावचं लागेल” शुभदाने पुष्करला समजावलं, लग्न होईपर्यंत गप्प बसायचं ठरवलं.

“ठीक आहे” यापुढे तिच्या माहेरच्या भानगडीत आपण पडायचं नाही पुष्करने मनात पक्कं केलं.

साखरपुड्यातही मानाची, लाडाची करवली म्हणून शर्वरी मिरवली आणि कामाच्या वेळी मात्र सगळ्यांना शुभदा आठवली.

साड्या खरेदी देखील शुभदाला थांगपत्ता लागू ना देता शर्वरी, तिच्या सासूबाई, काकू आणि तिच्या मैत्रिणींनी गुपचूप उरकली. तिला खरेदी दाखवली नाहीच पण लग्नाचा मेनू, सुनेला काय दागिने केले, तिच्या माहेरचे काय घालणार आहेत याबद्दल सुद्धा साधनाकाकू चकार शब्द बोलली नाही. पण मुहूर्ताच्यावेळी पापड, सांडगे, घवले मात्र शुभदाकडून हक्काने करून घेतले.

“मी आले असते खरेदीला” शुभदा ह्यावेळी जरा रागातच होती.

“अग मुंबईत केली असती खरेदी तर नक्की नेलं असते पण आम्ही येवल्याला गेलो होतो. मला वाटलं तुला जमेल की नाही, जावई पाठवतील की नाही” काकूने आपली बाजू सेफ केली.

“हे कशाला नाही म्हणतील, विचारायचं तरी होत.”

‘इथे देखील मला गृहीत धरलं गेलं. खेरेदीच्या वेळी शर्वरीचं बाळ लहान नव्हतं, कामाच्या वेळी फक्त बाळ लहान. नुसत्या सबबी…’ पण आता बोलून काय उपयोग खरेदी ऑलरेडी झाली होती. शुभदाच्या मनात आलं.

शुभदा रागावली आहे हे साधनाकाकूच्या नजरेतून सुटलं नाही. काही दिवसांनी राहिलेल्या, देण्याघेण्याच्या, एक्स्ट्राच्या साड्या घ्यायला तिला घेऊन गेली. ऐन लग्नसराईत शुभदा रागावली तर परवडणार नाही चाणाक्ष काकू ओळखून होती.

पण तिकडे गेल्यावर काकूने लेकीला फोन लावून तिची पसंती विचारली. तिच्या आवडीनुसार साड्या घेतल्या. सगळं काही शर्वरीला विचारून करायचं होत तर मला कशाला बोलावलं…पिशव्या उचलायला…शुभदा मनातल्या मनात चरफडली.

काका स्वतः व्याहिभोजनाच निमंत्रण करायला स्वतः आले त्यांना नाही म्हणणं शुभदाला जमलं नाही. सौरभने सुद्धा “ताई, जिजाई तुम्हाला यावचं लागेल चार चार वेळा बोलला” त्यामुळे त्यांच्या आग्रहाखातर इतकं सगळं होऊनही शुभदा व्याही भोजनाला गेली. व्याहीभोजनात मुख्य वाढपी ही भूमिका देखील बजावली.

क्रमशः

नेहमी हे असचं होत रहाणार की शुभदा स्पष्टपणे बोलणार, काही ठोस निर्णय घेणार की आणखी काही होणार पाहूया पुढील भागात …