Login

2) गर्भनाद

Adhyamik
धरणी मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पोचते आणि मंदिरात प्रवेश करते.

अवघ्या दोन पावलं टाकताच मंदिरभर तुळशीमाळांचा एक शांत, पवित्र सुवास दरवळू लागतो.त्या गंधात हळूहळू मिसळत जातं एक ओळखीचं,आपुलकीचं अस्तित्व.

तिच्या आईच्या गळ्यात असायची, तशीच एक जुनी, सुकलेली पण अजूनही मंद सुगंधी तुळशीमाळ आता तिच्या गळ्यात विसावलेली होती.

तिच्याही नकळत ती माळ हलकेच तिच्या छातीजवळ स्पर्शून जाते, आणि त्या माळेच्या हलक्याशा स्पर्शात तिचं अंतर्मन पिळवटून जातं.

पण धरणी अजूनही डोळे मिटून उभी होती.

जेव्हा डोळे उघडते, तेव्हा समोर एक साधू ध्यानस्थ बसला होता.पांढऱ्या राखेने माखलेला देह, जटा वाळलेल्या सारख्या, डोक्यावर गुंडाळलेल्या, गळ्यात माळा आणि हातात एक त्रिशूळ.

समोर असणाऱ्या शिवलिंगावरून पाण्याचा, दूधाचा आणि भस्माचा स्त्राव वाहताना दिसतो.जणू रुद्राभिषेक चालूच होता, पण तो कोणाच्या हातानी नव्हे, तर ते पवित्र द्रव जणू आकाशातूनच झरत होतं.

ते दृश्य इतकं विलोभनीय होतं की, एक अनामिक ओढ तिच्या पावलांना पुढे नेत होती.

आणि तिच्याही नकळत धरणी हळूहळू शिवलिंगाचा दिशेनं चालू लागली.

अखेर केव्हातरी ती शिवलिंगाजवळ पोहोचली आणि दोन्ही हातांनी त्या काळ्याशार, गारगार शिवलिंगाला स्पर्श केला.त्या क्षणी शिवलिंगाचा थंडपणा तिच्या हातातून ओसंडून तिच्या पोटावर पसरतो, आणि त्या एका क्षणी तिच्या गर्भात हलकंसं स्पंदन जाणवतं

जणू त्या बाळाने हलकंसं लाथाडलं असावं... जणू तेही त्या शिवस्मरणात सामील झालं होतं.

धरणीचा श्वास अडखळतो डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.त्या क्षणी घंटेचा नाद इतका प्रखर घुमतो की, तिच्या शरीरात एक कंप उठतो,तशी आणि धरणी दचकते.

धरणी तडक जागी झाली.छातीत एक वेगळाच भुरभुर नांदत होता.झोपेतील शांतता आता दाट धसक्याने भरली होती. तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. तिच्या श्वासाचा वेग वाढला होता. ओठ थरथरत होते.

"स्वप्न होतं का? की खरंच काही घडलं होतं?" मनात गोंधळ तो वेगळाच...

तो घंटेचा नाद, तो कलश, त्या तुळशीमाळांचा सुगंध...
भस्माने माखलेला जटाधारी साधू, आणि त्या शिवलिंगाचा शांत, थंड, पण अंगात भिनणारा स्पर्श  जणू तिच्या मनाला पुन्हा पुन्हा छेडू लागला.

धरणीचं शरीर घामाने न्हालं होतं. ती थोडा वेळ तशीच बसून राहिली.

पावसाचा सरींचा हलकासा आवाज कानावर पडत होता झोपडीच्या फटीतून येणारा मंद उजेड आत झिरपत होता.त्या झिरझिरीत प्रकाशात तिच्या पायाला
कसला तरी स्पर्श झाल्यासारखं जाणवलं.

भानावर येतं बसल्या बसल्या धरणीने सर्वत्र नजर फिरवली.तर तिच्या पायाजवळ तुळशीचं पान पडलेलं दिसलं.धरणी ते तुळशीचं पान उचलते,आणि काही क्षणांत तो पानाचा स्पर्श तिच्या संपूर्ण शरीराला थरथरवून जातो.

तशीच धरणी पोटावर हात ठेवत झोपडीतून बाहेर येते. हवेत थोडा उबदार गारवा होता.

ती थोडं दूर पाहते... आणि तिच्या डोळ्यांना विश्वास बसत नाही.

नदीच्या पलीकडच्या मंदिराच्या दिशेने पाहताना तिच्या नजरेस तो दिसतो.

एक साधू तसाच, जसा तिला त्या स्वप्नात दिसला होता. पांढऱ्या राखेने माखलेला देह, जटा वाळलेल्या सारख्या डोक्यावर गुंडाळलेल्या, गळ्यात माळा, आणि हातात त्रिशूळ.

तो साधू काहीही बोलत नव्हता, फक्त शांतपणे तिच्याकडे पाहत होता.

दरम्यान नदी मात्र संथपणे वाहत होती.

तिच्याही नकळत तिच एक पाऊल पुढे पडलं आणि गर्भातल्या बाळाने पुन्हा एक उसळी मारली आणि तीने क्षणात पाऊल मागे घेतलं.

क्षणभर धरणीच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

"हे खरंच होतंय का?... हा तोच आहे का?... तो कोण आहे?... आणि असं शांतपणे माझ्याकडे का पाहतोय?"
धरणीच्या थरथरत्या ओठांवर हे प्रश्न नकळत उमटले.

तेवढ्यात नदीवर एक अचानक वाऱ्याची झुळूक उसळली,

त्या क्षणी दूर कुठेतरी शंखनाद घुमला.

धरणीने पुन्हा नजरा त्या साधूकडे वळवल्या.पण आता तो तिथे नव्हताच,एक क्षणात, जणू हवेत विरून गेला होता.

धरणी पुन्हा एकवार मागे वळली आणि झोपडीत शिरली.तिची पावलं जड झाली होती जणू शरीरातील सगळी शक्ती, सगळी ऊर्जा कुठेतरी विरून गेली होती. तिचे पाय हलत होते, पण त्यात कसला दम नव्हता. लटपट कापणाऱ्या त्या पावलांमध्ये एक असहायता होती.

ती झोपडीत शिरताच,तिचं थकलेलं शरीर आपोआपच जमिनीवर कोसळलं.

ती मातीवर झेपावली आणि डोळे आपसूकच मिटले.

बाहेर आभाळ पुन्हा एकवार काळसर भरून आलं होतं. विजांची हलकीशी चमकमक, आणि मेघांचा धीरगंभीर गडगडाट दूर कुठेतरी उमटत होता.

झोपडीत अंधार पसरला होता.गवताच्या छपरावर पावसाचे टपोरी थेंब हलक्या लयीने टप... टप... करत पडत होते.

तेवढ्यात, अचानक एकाएकी धरणीचे डोळे उघडले.

क्षणात तिची नजर झोपडीच्या एका कोपऱ्यात ठेवलेल्या फाटक्या पोतडीवर स्थिरावली.

त्या पोतडीच्या एका उघड्या कप्प्यातून एक रुद्राक्षाचा मणी क्षीण उजेडात क्षणभर चमकला.त्या चमकलेल्या क्षणा सोबतच धरणीच्या मनात कुठेतरी एक हलकीशी पळवाट उसळी मारून गेली.

अचानक ती एका झटक्याने उठून बसली आणि मन, शरीर, श्वास… सगळं त्या पोतडीकडे झेपावलं.

तिने पोतडी अलगद उघडली तर आत एक रुद्राक्षांची माळ ठेवलेली होती.ते पाहताच धरणीच्या मनात आठवणींचा ओलसर झरा वाहू लागला.

"हीच ती माळ... स्वप्नात पाहिली होती... हुबेहूब हीच..."धरणीच्या ओठांवर शब्द हळुवार पुटपुटले.

दुसऱ्या क्षणी तिच्या आठवणीत नकळत आईचं चित्र उभं राहिलं.

"संकटाच्या वेळी आई हीच माळ हातात घेऊन मंत्र म्हणायची..."

धरणीने थरथरत्या हाताने हळूच पोतडीत हात घातला.
पण त्या स्पर्शासोबतच तिच्या शरीरातून एक तप्त उष्णता उसळली.भयाने तिने झटकन हात मागे घेतला.
पण तिच्या वाढलेल्या नखांत ती माळ अडकली
आणि हात मागे घेताना ती माळ थेट बाहेर ओढली गेली.आणि ती माळ तुटली.

क्षणात तुटलेल्या मण्यांचे रुद्राक्ष झोपडीच्या जमिनीवर विखुरले गेले.

क्षणभर सगळं स्तब्ध...

पण त्या रुद्राक्षांभोवती हलकासा प्रकाश जमा व्हायला लागला.एक एक रुद्राक्ष मंद प्रकाशात चमकू लागला.
आणि क्षणभरात त्या साऱ्या विखुरलेल्या रुद्राक्षांभोवती प्रकाशाचं एक वलय तयार झालं.

धरणी त्या झोपडीतल्या अंधारात, त्या प्रकाश वेलीकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिली.

त्या रुद्राक्षांच्या भोवती निर्माण झालेलं तेज आता मंद निखाऱ्यासारखं फुलू लागलं होतं... न गरम, न थंड... पण अस्तित्वात असलेलं सतत तिचं लक्ष वेधून घेणारं.

अचानक त्या प्रकाश वर्तुळाच्या मध्यभागी एक रुद्राक्षांचा मणी हलकेच फिरू लागला.

धरणीचा श्वास थांबला.

हळूहळू तिने हात पुढे केला... पण तिचा हात त्या वलयाच्या थोडा आत जाताच, एक सौम्य पण थरारक स्पर्श तिच्या तळहातावर जाणवला.जणू कोणीतरी तिचा हात धरून थांबवलं होतं.

अंगात एक कंप पसरला.क्षणभर तिने डोळे मिटले.
त्या स्पर्शामध्ये आईचा ओलावा होता पण त्याच वेळी एक अनोळखी, शक्तिशाली थंडी सुद्धा, जणू मृत आणि जीवन यांच्यामधला एक क्षण जेथे काळ, शरीर, आणि आत्मा या तिघांनी एकमेकांना गाठलेलं होतं.

"आई...?" तिच्या तोंडून नकळत निघालं

"शिवकृपेचा संकेत असतो... रुद्रस्पर्श."एक ठसठशीत, घनगंभीर आवाज झोपडीच्या कोपऱ्यातून ऐकू आला.

तो आवाज कुठून आला हे धरणीला समजलं नाही.
पण त्या क्षणीच, झोपडी बाहेरची पावसाची रिपरिप अचानक थांबली.आणि अवतीभोवती एक अजब शांतता पसरली.

त्या खोल शांततेत धरणी समोर विखुरलेले रुद्राक्ष अचानक हालले आणि ते वळवळत, जणू एखाद्या अदृश्य शक्तीच्या इशाऱ्यावर, हळूहळू एकत्र गोळा झाले आणि क्षणात त्यांनी एक विशिष्ट आकृती धारण केली
अगदी त्रिशूळासारखी!

धरणीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.तिचं हृदय जोरात धडधडू लागलं.

ते रुद्राक्ष हळूहळू पुन्हा हलू लागले.आणि क्षणातच त्रिशूळाची आकृती हळूहळू विरघळली आणि
दुसऱ्या क्षणी त्याच रुद्राक्षांची एक माळ बनली.

आता ती माळ थेट धरणीच्या दिशेने सरकत येऊ लागली.

धरणीने थरथरत्या हातांनी ती माळ अलगद उचलली.
ती माळ आईच्या मिठीसारखी उबदार होती पण त्या उबेच्या आत अजून काही होतं.पण काय, हे मात्र स्पष्ट कळत नव्हतं, पण ते मनाला खोलवर भिडत होतं.

मनातले सारे विचार बाजूला सारून, धरणीने ती माळ कपाळाला लावली.

"ॐ नमः शिवाय..."तिच्या नकळत तिच्या ओठांवरून मंत्र जुळू लागतात.