Login

३) गर्भनाद

Adhyamik
त्या क्षणी तिचा श्वास गहिवरला आणि तिच्या पोटातलं बाळ पुन्हा एकवार उसळलं.

पण ह्या वेळेस त्या हालचालींमध्ये भीती नव्हती एक अनोखं सामर्थ्य होतं जणू भविष्य अनिश्चित असलं तरी त्या क्षणी तिच्यावर शिवस्मरणाची कृपा विलीन झाली होती.

झोपडीत आता विचित्र शांतता पसरली होती. पावसाने ही क्षणभर विश्रांती घेतली होती.

धरणीने अजूनही माळ हातात धरून ती कपाळाशी टेकवलेली होती.

ॐ नमः शिवाय हा मंत्र अजूनही तिच्या ओठांवर होता.

त्या रुद्राक्षांमधून निघणाऱ्या ऊर्जेचा लहरत जाणारा स्पर्श तिच्या शरीरात कुठेतरी खोल रुजत चालला होता.
तेवढ्यात, तिच्या अंगावर सावली पडल्यासारखी वाटली.

ती हळूच वर पाहते.

झोपडीच्या उघड्या दारात तो उभा होता शिडशिडीत देह, अंगावर भस्माचे थर, डोक्यावर वाळलेल्या जटा, कपाळावर त्रिपुंड... हातात त्रिशूळ... आणि अंगावरून निथळणारी राख.

"हा तोच साधू... जो त्या मंदिराबाहेर दिसला होता. आणि स्वप्नातही...

"पण तो इथे कसा? खरंच आला आहे का? की हा फक्त माझा भास...?" धरणी हळुहळू पुटपुटते.

क्षणभर तिचा श्वास थांबतो.डोळ्यांतला प्रकाश फसवतोय का असं वाटतं... पण तो साधू तिथेच तिच्याकडे पाहत उभा होता.

“कोण आहेस तू...? का आलास...?” तिचा आवाज क्षीण होता,पण थेट.

तो काही न बोलता हळूहळू पुढे सरकतो.उंबरठा पार करतो.पावसामुळे ओली झालेली जमीन सुद्धा त्याच्या पायांना थांबवू शकत नाही.जणू तो चालत नव्हता तो वाहतच येत होता.

धरणी मनातून हादरते.ती मागे सरकते.पण मागे केवळ गवताची भिंत असल्याने तिची धडपड थांबली आणि श्वास गडप झाला.

दुसऱ्या क्षणी तिचं लक्ष साधूच्या हातात असणाऱ्या त्रिशूळाकडे गेलं. त्याच्या टोकावर एक क्षीण, लालसर ओलावा झळकत होता रक्तासारखा.

"हे... स्वप्न आहे का?" ती मनात विचारते.

तेवढ्यात तो साधू थेट तिच्यासमोर येतो आणि काही क्षण फक्त तिला पाहत राहतो.आणि मग, तो एक गंभीर, पण स्थिर स्वरात बोलतो.

"त्या नदीचं पाणी आज थांबलेलं आहे..." त्याचा आवाज खोल, पण संथ.

"जेव्हा असं होतं... तेव्हा पलीकडचं दार उघडतं.
पण सगळ्यांना ते दिसत नाही."

धरणी काहीच समजून न पावलेली, त्याच्याकडे एकटक पाहत राहते.

तो पुन्हा म्हणतो"तुझं उत्तर तिथंच आहे... जिथं पाय जात नाहीत, फक्त मन जातं."

त्याच्या शब्दांचा अर्थ समजण्या आधीच तिच्या अंगात एक उष्ण स्पर्श पसरतो तो साधू एक क्षण तिच्या डोळ्यांत बघतो.आणि मग शांतपणे वळतो.

"मंदिर थांबत नाही... जे हरवतं, तेच उघडतं."दारातून बाहेर जाताना तो शेवटचं वाक्य पुटपुटतो.

धरणीला काहीच उमजत नाही तिचं डोकं गरगरतं… छाती धडधडते.

तेवढ्यात, एका क्षणात तो साधू नाहीसा होतो.उरते ती फक्त जमिनीवर पडलेली राख...

धरणी सावरते ना सावरते, तोवर त्या राखेत काही रेखाटलं जातं.

एक त्रिशूळ, त्याच्या मध्यातून वाहणारी बारीक नदी,
आणि तिच्या पलीकडं उठून दिसणारं एक दगडी जुने मंदिर.

धरणी थक्क होते. तोंडून शब्द फुटत नाहीत जणू तिचा मेंदू बधिर झाला होता.

त्या क्षणी तिचे थरथरते हात राखेवर रेखाटलेल्या त्या चिन्हांना स्पर्श करतात.आणि ती चिन्हं एकाएकी जणू तापलेली असावीत, तशी तिच्या हाताला उष्ण भासतात
आणि धरणी झटका बसावा तशी भानावर येते आणि हात मागे ओढते.

त्याच क्षणी तिच्या दुसऱ्या हातातील रुद्राक्षमाळ हलू लागते.

हळूहळू ती माळ तिच्या हातांपासून अर्धा हात अंतरावर हवेत तरंगू लागते.आणि क्षणभरातच ती हवेत स्थिर राहते.

मग... अदृश्य हातांनी जप सुरू केल्यासारखी, माळेतील रुद्राक्ष एकामागोमाग एक ओव्या सरकवू लागतात.

> ॐ नमः शिवाय... ॐ नमः शिवाय... ॐ नमः शिवाय...क्षणात तो जप झोपडीत घुमू लागतो मृदू,पण प्रभावी, आणि अंतःकरणात खोलवर उतरणाऱ्या कंपनांनी भरलेला.

त्या जपाच्या लयीबरोबरच झोपडीतल्या हवेत एक सूक्ष्म, पण स्पष्ट जाणवणारा बदल होतो.

हळूहळू, एक सौम्य, अस्पष्ट पण शांत करणारी वाऱ्याची झुळूक आत प्रवेश करते.त्या झुळुकीबरोबर तुळशीच्या पवित्र सुवासाचा दरवळ संपूर्ण झोपडीत पसरतो.आणि मग कोपऱ्यात ठेवलेला तेलाविना दिवा अचानक पेटतो.
त्याची ज्वाळा सामान्य नसून निळसर तेजाळ होती.

धरणी स्तब्ध होते तिचा श्वास क्षणभर थांबतो. डोळे विस्फारले जातात.

रुद्राक्षमाळ अजूनही हवेत तरंगत होती.

ॐ नमः शिवाय... ॐ नमः शिवाय... ॐ नमः शिवाय...
जपाचा स्वर आता अधिक स्पष्ट, थेट अंतरात्म्याला भिडणारा होतो.

आणि अचानक तिच्या सभोवती निळसर प्रकाशाचं वलय तयार होतं.

तेवढ्यात झोपडीच्या गवताच्या भिंतींवर सावल्यांचा नृत्यशील खेळ सुरू होतो.त्या सावल्यांतून क्षणभरासाठी शिवलिंग, गंगा, त्रिशूल, नंदी या सर्व देवमूर्ती जणू झलक देतात.

"काळजी करू नकोस... तुझं रक्षण माझ्या चरणांखाली आहे...

"त्या दिव्य क्षणात, झोपडीत घुमतो एक शांत, स्वच्छ, पण अंतर्मनाला भिडणारा आवाज.

क्षणातच झोपडीत घंटानाद घुमतो आणि मंत्रजप थांबतो.सावल्यांचा खेळ मंदावतो त्या क्षणी एकेक देवमूर्ती त्या गवताच्या भिंतीत हळूहळू विरून जातात आणि मग हवेत तरंगणारी रुद्राक्षमाळ हळूच खाली उतरते,आणि थेट धरणीचा हातात परत येते.

त्या क्षणी राखेवर रेखाटलेली ती चिन्हं अचानक नाहीशी होतात.

"पलीकडच्या मंदिरात तुझं पहिलं उत्तर आहे."दुसऱ्या क्षणी, त्या राखेवर एक अदृश्य बोट झरझर लिहून जातं आणि धरणीचा श्वास खोलवर जातो.जणू छातीतले सर्व वायुरंध्र त्या क्षणी स्तब्ध होतात.

"पलीकडच्या मंदिरात तुझं पहिलं उत्तर आहे."ती राखेवरचं अक्षर डोळ्यांनी घट्ट पकडून ठेवू पाहते.
मात्र त्या आधीच, झोपडी बाहेरचा वारा अचानक एक वेगळी दिशा घेतो.आणि त्या झपाटलेल्या वाऱ्याचा झोत झोपडीत घुसतो.तसा गवताच्या भिंतींचा कडाडणारा, थरथरवणारा आवाज येतो.

तेव्हा ती राख हलते… आणि त्या अक्षरांच्या भोवती गरगर फिरणं सुरू होतं.आणि अचानक त्या अदृश्य अक्षरांभोवती एक निळसर, हलकंसं…, जणू दिव्य.प्रकाशमंडल तयार करते.

धरणी त्या प्रकाशमंडलाकडे डोळे विस्फारून बघते त्या प्रकाशात ती अक्षरं जणू जीवंत होतात.हळूहळू ती हवेत उडतात,आणि हवेमध्ये घड्याळाच्या काट्यासारखी फिरत फिरत दूर आकाशात विलीन होतात.

त्या क्षणी झोपडीत एक असह्य शांतता उतरते.एवढी शांतता की, धरणीला आपल्या धडधडणाऱ्या हृदयाचा ठोका सुद्धा बाहेर ऐकू येतो.

ती हळूच मागे वळते.

रुद्राक्षमाळ आता शांतपणे तिच्या हातात विसावलेली आहे.तेलाविना तेवणारा दिवा अजूनही निळसर तेज देत आहे.त्या निळ्या उजेडात, तिचं संपूर्ण अंगण अंधुक प्रकाशाने उजळलेलं आहे,आणि त्या उजेडात तिचा भान विसरलेला चेहरा काहीतरी अपरिचित पण ओळखीचं अनुभवत होता.

तेवढ्यात ती झोपडी जणू हलते.भिंतींवरून राखेचे तुकडे उडून हवेत नाचतात.त्या राखेच्या बारीक कणांमध्ये, क्षणभर एक तेजस्वी वलय चमकतं,आणि त्या वलयाच्या मध्यभागी एका शंभूमूर्तीची झलक क्षणमात्र प्रकट होते आणि ती क्षणात अदृश्य होते.

पण त्या एका क्षणात धरणीचा मनात उचल मारते ती हवेत तरंगणारी रुद्राक्षाची माळ, राखेवर रेखाटलेल्या चिन्हांची हाताला जाणवलेली उष्णता, ॐ नमः शिवाय चा घुमणारा जप “हे खरंच घडलं… की स्वप्न होतं?” ती स्वतःलाच अलगद विचारते.

हळूहळू ती उठते पण तिच्या  पावलांना जडपणा होता  जणू तिचा देह अजून त्या दिव्य अनुभूतीतून बाहेर पडलेला नव्हता.तरीही स्वतः ला सावरत ती झोपडीचा दालना जवळ येते आणि गवताचा तो दरवाजा मागे सरकवते आणि बाहेर पाऊल टाकते तर समोर अंधुक अशा संध्याकाळच्या आकाशाखाली,नदीच्या पलीकडे असणाऱ्या मंदिरावर धरणीची नजर स्थिरावते.

आणि तिच्या नजरेत एक नवाच निश्चय असतो.
“माझं पहिलं उत्तर तिथं आहे

आता रात्र गडद उतरली होती. आभाळ काळवंडलं होतं, आणि पावसाने जोर धरला होता. झोपडीच्या छपरावर थेंबांचा आवाज नगाऱ्यांसारखा घुमू लागला होता. त्या गडगडाटात ढगांचे आवाज खोल जंगलात हरवलेल्या नादासारखे भासत होते.

धरणी मातीच्या झोपडीत पहुडली होती.ती सतत कूस बदलत होती झोपायचा प्रयत्न करत, पण तिचे डोळे काही मिटायला तयार नव्हते.

माळेचं हवेत तरंगणं, मंत्रांचे गुंजणारे स्वर, निळसर प्रकाश, आणि सावल्यांचं नर्तन... दिवसभराची विलक्षण घटना तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होत्या.