तिचा श्वास खोल, जड होत चालला होता... आणि त्या क्षणी तिचे डोळे अलगद मिटले.
पावसाने विश्रांती घेतली होती. हवा पूर्णपणे स्तब्ध होती.
क्षणभरात धरणीला कुणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. ती चपळतेने उठली आणि शांत, सावध पावलांनी झोपडीबाहेर आली.
समोर नदी वाहत होती.त्या रात्रीच्या अंधारात तिचं पात्र काहीसं वेगळंच भासत होतं... जणू कुठल्यातरी अनामिक सादेची चाहूल येत होती.
तिचे पाय नकळत नदीकडे वळले.पाण्यात पाऊल टाकताच ती क्षणभर थरथरली.सुरुवातीला पाण्याचा स्पर्श उबदार वाटला, पण जसजशी ती पुढे सरकू लागली, तसतसं पाणी थंड, सखोल होत गेलं.
तेव्हाच त्या नदीच्या खोल पात्रात तिला एक प्राचीन, दगडी, काळसर शेकडो वर्षांच्या मौनाने झाकलेलं मंदिर तरंगताना दिसलं.आणि मनात आत खोल कुठेतरी त्या मंदिराशी तिचं अतूट नातं असल्यासारखं तिला क्षणभर जाणवलं.
तिची नजर त्या पाण्यावर तरंगणाऱ्या मंदिरावर अजूनही तशीच खिळून होती.
पण मग काही कळण्या आधीच तिची पावलं पाण्यावरून चालू लागली जणू काही ते मंदिरच तिला बोलावलं होतं.
क्षणातच ती... थेट त्या मंदिराच्या गाभाऱ्यात केव्हा पोहोचली, हे तिलाही कळलं नाही.
गाभाऱ्याच्या मध्यभागी काळ्या पाषाणात कोरलेलं एक भव्य शिवलिंग होतं. त्यावरून निळसर-निळसर जलप्रवाह वाहत होता.
त्याचबरोबर त्या शिवलिंगा भोवती "ॐ... ॐ... ॐ..." असा एक लयबद्ध नाद घुमत होता.
धरणीने दोन्ही हातांची ओंजळ करत शिवलिंगा वरून वाहणाऱ्या निळसर जलप्रवाहाखाली नेली मग पाण्याने भरलेली तीच ओंजळ कपाळावर लावली.
त्या ओंजळभर पाण्याचा स्पर्श तिच्या कपाळाला होताच, काही क्षणांतच तिच्या आजूबाजूला एक दिव्य प्रकाश वलय तयार झालं. बराच वेळ तो तेजोमय प्रकाश धरणीच्या भोवती प्रदक्षिणा घालाव्यासारखा फिरत होता.आणि मग अचानक, त्या प्रकाशातून एक सावली अलगद बाहेर पडली...!
...आणि ती सावली थेट धरणीच्या पाठीमागे येऊन उभी राहिली.
धरणीचा देह नकळत थरथरला.
"परतीचा रस्ता आता मागे नाही..." एक सौम्य, पण स्पष्ट आवाज तिच्या कानात घुमला.
त्या शब्दांसोबत धरणीचा श्वास क्षणभर थांबला.
तिने दचकून मागे पाहिलं, पण तिथं कुणीच नव्हतं.
तिने दचकून मागे पाहिलं, पण तिथं कुणीच नव्हतं.
मात्र नदीच्या पात्रातून अजूनही मंद "ॐ... ॐ..." असा नाद घुमत होता.
तीच लक्ष पुन्हा समोर असणाऱ्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर गेलं आणि अचानक, गाभाऱ्यातील शिवलिंग लहान-लहान होताना दिसला.
आश्चर्यचकित धरणी एकटक त्या शिवलिंगाकडे बघतच राहिली.
आणि अचानक केव्हातरी तिच्या डोळ्यादेखत आकाराने लहान होत जाणारा तो शिवलिंग नाहीसा झाला.
दुसऱ्या क्षणी, तिच्या पायांखालचं पाणीही नाहीसं झालं होतं.
ती आता एका विशाल दगडी पटांगणात उभी होती.
आजूबाजूचा परिसर ओसाड, गडद आणि अनोळखी होता. हवेत गारवा होता, पण त्यात भीती नव्हती... होती केवळ एक शांतता.
आजूबाजूचा परिसर ओसाड, गडद आणि अनोळखी होता. हवेत गारवा होता, पण त्यात भीती नव्हती... होती केवळ एक शांतता.
धरणीने क्षणभर एक नजर सर्वत्र फिरवली.
"हे मी कुठे आलेय?" तिने स्वतःशी अडखळत विचारलं.
तेवढ्यात तिच्यासमोरून एक वृद्ध स्त्री आली.तिच्या चालीत एक ठामपणा होता.तिचे केस विस्कटलेले होते, डोळ्यांत खोल नजर, चेहऱ्यावर अनुभवांच्या रेषा, आणि हातात एक तांब्या.
“तू उशीर केला आहेस...” तिचा आवाज वाऱ्यावर तरंगत धरणीच्या कानावर आदळला.
धरणी गोंधळली. "मी? कुठे?" ती पुन्हा पुटपुटली.
“परतीचा रस्ता मागे नाही, असं सांगितलं होतं ना?” त्या वृद्ध स्त्रीने थोडं हसून विचारलं.
धरणीने पुन्हा एकदा एकदम मागे वळून पाहिलं. पण तिथं आता काहीच नव्हतं.
ना ती नदी, ना ते मंदिर, ना तो गाभारा...ना ते शिवलिंग... फक्त एक दरवाजा होता आणि त्या दारामागे एक खोल अंधार...
धरणी काही क्षण तशीच त्या दरवाजाच्या दिशेनं बघत स्थिर उभी राहिली.
आणि मग, हळूच त्या दारातून आत पाऊल टाकणारच होती की...
तिने डोळे उघडले आणि अश्रूचा एक थेंब अलगद तिच्या गालावरून ओघळला.
तिचा श्वास अजूनही खोल होता ओठांना कोरड पडली होती.कपाळावर आधीच घामाच्या बारीक, थरथरत्या धारांच जाळं पसरलं होतं.त्या घामाच्या ओलसर वाटेवर, तो डोळ्यातून ओघळणारा अश्रूही आता मिसळला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा