मागील भागात आपण पाहिले साधना काकूचा दुपटीपणा सुभदाच्या हळूहळू लक्षात यायला लागला होता. पण ऐन लग्नसराईत वादविवाद नकोत म्हणून ती गप्प रहायचं ठरवते आता पुढे ..…
सगळा रुसवाफुगवा, रागलोभ बाजूला सारून शुभदाने लग्न छान एन्जॉय केलं. पार्लर, मेकअप सगळं साग्रसंगीत करून स्वतःची, मुलींची हौस भागवून घेतली. घरातलं शेवटचं कार्य असल्याने मेहेंदी, संगीत यात उत्साहाने भाग घेतला. मुली, नवरा देखील तिच्या आनंदात सामील झाले. गृहप्रवेशाची जय्यत तयारी करत तिने नव्या नवरीचे जल्लोषात स्वागत केले.
लग्नाच्या आधीचे आणि नंतरचे चार पाच दिवस शुभदाचं सतत काकूकडे येणंजाणं होतं पण आता ‘लग्न झालं जवाबदारी संपली’ म्हणत तिने ते कमी
केलं.
केलं.
रक्षाबंधन, भाऊबीज बरेचसे सणवार शुभदाच्या घरीच साजरे व्हायचे. “तुझं घर मोठं, आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम” म्हणत काकू शुभदालाच सगळं काही करायला लावायची. तिच्याकडे गेलं की ना आधी आवरायला लागतं ना मागचं, ना पैसा खर्च होतो ना कष्ट पडतात. आयतं ताटावर बसायला जायचं हीच काकू आणि शर्वरीची भूमिका असायची. शुभदा भाजी, वाणसमानापासून सगळं स्वतः घेवून यायची. काही कार्यक्रम असला की सकाळपासून तिची तयारी सुरू व्हायची. मला तरी कोण आहे त्यांच्याशिवाय माहेरचं म्हणत शुभदा आनंदाने राबायची.
“आज तुझ्या आवडीची पावभाजी बनवत आहे” इकडेच ये जेवायला” बऱ्याचदा शुभदा काही स्पेशल केलं की सौरभला जेवायला बोलवायची. तर कधी त्याच्या बरोबर डबा पाठवायची.
पण हल्ली नेहमी मीच का सगळं करायचं, त्यांनी मला देखील कधीतरी बोलवावं, आपल्यालाही आयतं ताट हातात यावं असं शुभदाला वाटू लागलं होत. ‘सौरभच लग्न होईपर्यंत मी केलं सगळं आता त्याची बायको आली आहे, तिने करावं, आम्हाला बोलवावं‘ शुभदाच्या मनात येत होत.
पण काकूची सून तिच्या वरचढ होती. तिला काहीच करायचं नव्हतं. सख्खी नणंद शर्वरी पर्यंत ठीक आहे. चुलत नणंदेचं मी कशाला करू तिचं असं म्हणणं असायचं. तिला सौरभचं शुभदाताईला मान देणं, तिच्याकडे जास्त ओढा असणं मान्य नव्हतं. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच सौरभचे वागणं देखील बदललं होतं. ह्यामुळे शुभपदा चांगलीच दुखावली गेली.
“आई शर्वरी मावशी नेहमी आपल्याकडे रहायला येते, आपल्याला मात्र कधीच बोलवत नाही तिच्याकडे. पार्थच्या पहिल्या वाढदिवसाला पण नाही बोलवलं” शुभदाची मोठी लेक अनन्या रागावली होती. मुली मोठ्या होत होत्या, त्यांना पण बऱ्याच गोष्टी खटकत होत्या.
‘मागे एकदा गेलो होतो शर्वरीकडे, त्यावेळी आर्याने शोकेस मधील मण्यांचा हत्ती कोणाला न विचारता बाहेर काढला होता, किती रागाने पाहिलं होतं शर्वरीच्या सासूबाईंनी. अगदी कानकोंड झाल्यासारखं झालं होत मला. तेव्हाच ठरवलं शर्वरीकडे जाणं नको की तिचं ते आदरतिथ्य नको. तिचा मुलगा इकडे येऊन सगळं उलथापालथ करतो पण मी काही बोलत नाही.’ शुभदाला पटकन सगळं आठवलं.
“बोलवायला हवं होतं, नाही बोलवलं. स्वभाव एकेकाचा. मी मात्र वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस इतकंच काय सौरभच्या लग्नाच्या केळवण केलं तेव्हा तिच्या सासू सासऱ्यांना देखील बोलवलं. रीतसर आहेर केला.“
“सगळ्या रीतीभाती आपल्याला त्यांना नाही” पुष्कर काहीशा रागाने म्हणाला.
“भेटल्यावर म्हणेल ताई, आम्ही घरातल्या घरात केला. फोटो, स्टेटस वरून कळलं किती घरतल्या घरात केला ते” शुभदा चिडून बोलली.
“म्हणूनच म्हणतो शुभा, बास कर आता सगळं. नात दोन्ही बाजूंनी निभावलं गेलं पाहिजे. एकतर्फी कुठल्याच गोष्टीला अर्थ नाही. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दोघांनाही वाटायला हवी. इथे फक्त कामापुरती, गरज असली की तुझी आठवण येते. गरजेनुसार तुझा फक्त वापर करून घेतला जातो. कधी कळणार तुला? अति होतंय सगळं आता.”
“उशिरा का होईना, माझ्या लक्षात येऊ लागलं आहे सगळं. म्हणूनच तर मी पण हल्ली जाणंयेणं कमी करून टाकलं आहे” पुष्करला समजावत शुभदा म्हणाली.
त्यानंतर साधारण महिन्याभराने “काय ग थर्टी फर्स्टचा काय प्लॅन? शर्वरी पण येत आहे जोडून सुट्ट्या आहेत ह्यावेळी. करूया का काहीतरी स्पेशल, मागच्यावर्षी सारखं” साधनाकाकूचा फोन आला.
“हो करूया की, आम्हीच येतो ह्यावेळी तुमच्याकडे. दरवेळी सगळं मीच करते, ठरवते असं नको व्हायला. तुझ्या सुनेला रीतिकाला, शर्वरीला ठरवू दे काय करायचं ते. हे ऑफीसमधून आले की, आठपर्यंत आम्ही सगळे येतो तिकडे.”
शुभदाने काकूची बाजी तिच्यावरच पलटवली. साधनाकाकू फोन करणार याचा अंदाज होताच तिला. मुद्दामून मी आठपर्यंत येते म्हणाली, मी काही करणार नाही सुचवायचं होत तिला. नवऱ्याने, मुलींनी पट्टी पठवून ठेवली होती. त्याप्रमाणे ती बोलली.
शुभदाचं बोलणं ऐकून साधनाकाकू मात्र चांगलीच गांगरली. प्रत्येकवेळी ती काकूच्या हो ला हो करायची. इतक्या स्पष्ट शब्दात नकार देईल ही अपेक्षाच काकूने केली नव्हती. मायलेकींचा शुभदाकडे जाऊन नवीन वर्षाच्या स्वागताला प्लॅन फसला होता. शुभदाने तो त्यांच्यावरच उलटवला होता.
“बघते, कळवते तुला” म्हणत काकूने फोन ठेवला. तो परत केलाच नाही. शुभदा काय समजायचं ते बरोबर समजली.
साधना काकूला तिची चूक कधी कळेल, तिचं वागणं कधी सुधारेल हे देवच जाणो. पण सतत अॅवेलेबल असलं की किंमत कमी होते, गृहीत धरलं जातं हे शुभदाला मात्र कळून चुकलं होत. म्हणूनच यापुढे कोणी गरजेपुरता आपला वापर करू नये, गरज सरो आणि वैद्य मरो अशी वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी दक्ष रहायचं, काहीसं जशास तसं वागायचं तिने ठरवलं.
समाप्त..
©® मृणाल महेश शिंपी.
28.01.2024.
28.01.2024.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा