Login

गठबंधन भाग 15

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 15

©️®️शिल्पा सुतार

मनाली तयारीत होती. उद्या सासरी जायचं. नेहमीप्रमाणे आयुष्य सुरु होईल. मी तिकडे काय करणार आहे काय माहिती. लगेच शाळा जॉईन करते. बॅग भरली होती. तिने थोडे पुस्तक सोबत घेतले. तिची डायरी घेतली. ती बघत होती अजून काय घेवू? तिकडे करमत नाही. टाईमपास साठी काही हव. माझ काय होणार आहे. ही परिस्थिती कधी बदलेल. मला यांचा जरी राग येतो तरी मला ते माझ्या सोबत हवे आहेत. विचार करत ती झोपली.

आता पुढे.

वंदना अमितला घेवून बसली होती. त्यांच जेवण झालं होतं. सुदर्शन, सम्राट, आबासाहेब कंपनी बद्दल बोलत होते.

"आपण नियम थोडे कडक करून घेवू. मधेच संप करणार्‍या कामगारांना थोडे दिवस विश्रांती द्यावी लागेल." सम्राट सांगत होता.

"पण त्यांच घर आपल्यावर चालत." आबासाहेब म्हणाले.

"हे त्या कामगारांना समजत ना? मग का बंड करतात? उगीच कोणीतरी भडकवत आणि ते ऐकतात. मला समजल आहे हे काम कोणाच आहे. इलेक्शनच्या वेळी कंपनी मधे प्रॉब्लेम करायचा. म्हणजे आपल लक्ष तिकडे राहील." सम्राट म्हणाला ते आबासाहेबांना पटलं होतं. पण जूने लोक. त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत होती.

"हे तर आहेच. तू बघ आता काय करता येईल. मी यापासून दूर बरा." आबासाहेब म्हणाले.

"सम्राट बरोबर बोलतो आहे आबा. बाहेरचे लोक संप घडवतात. एक दोघांना दणका दिला की बाकीचे आपोआप नीट होतील." सुदर्शन म्हणाला.

"जे कराल ते विचार करून करा. "

हो.

"अमित झोपला का? वंदना चल आपण फिरून येवू." सुदर्शन म्हणाला.

आजी, आक्का बसल्या होत्या. अमितला आक्कां जवळ झोपवून वंदना, सुदर्शन वॉक साठी गेले. आजी ही रूम मधे गेल्या.

सम्राट आक्कां जवळ बसला. "आई मी उद्या त्या बाजूला जातो आहे."

"कुठल्या बाजूला?"

"मनालीच्या गावाला. तिकडे कार्यकर्ते बोलवत आहेत. प्रचार कसा सुरू आहे ते ही बघतो. येतांना तिला घेवून येतो. "

"चालेल ." त्या हसत होत्या.

सम्राट रूम मधे आला. त्याने आशिषला फोन केला. "मी उद्या मनालीला घ्यायला येतो. त्या बाजूचे काम करून टाकू. संध्याकाळी एखादी मीटिंग ठेवता आली तर बघा. "

"चालेल ना सम्राट राव तुम्ही या. मनालीशी बोलणं झालं का? "

"नाही झोपली असेल." त्याने फोन ठेवला. लगेच बॅग भरली.

******

सकाळी मनाली उठली तिने आवरल. आता थोड्या वेळाने निघू. तिने गुलाबी साडी नेसली. केस धुतले होते म्हणून मोकळे होते. ती नाश्ताला आली.

" सम्राटराव आले." आशिष सांगायला आला .

सुरेशराव, आशाताई पुढे गेले. मनालीला आश्चर्य वाटल. "आजी कोण आलं? "

"सम्राट राव. चला देव पावला बाई." त्यांनी देवाला हात जोडले.

मनालीला काही सुचत नव्हतं. बापरे काय करू? मी पण पुढे जावू का? की नको? "आजी काय करू?"

" जा त्यांना भेट ."

"नको." ती खूप खुश होती. हे माझ्यासाठी आले का? की त्यांच्या पार्टीसाठी. जावू दे कशासाठी जरी आले तरी आई, बाबा टेंशन फ्री होतील. जावई लेकीला घ्यायला आला त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आजीने काल काय सांगितलं होतं. समोरचा चांगल वागतं असेल तर आपण वाकड्यात शिरायचं नाही. नक्की आक्कांनी पाठवलं असेल.

"मनाली पाणी दे." निधी म्हणाली.

"तू दे ना वहिनी."

"अरे तुझा नवरा आहे. जा भेट. तू माहेरी आली तर ते लगेच मागे मागे घ्यायला आले." निधी हसून तिच्याकडे बघत होती.

"वहिनी प्लीज." तिने ट्रे मधे ग्लास दिला. मनालीचे हात थरथरत होते. ती पुढे गेली. सम्राट बाबांशी बोलत होता. तिने पाणी दिलं. त्याने तिच्याकडे बघितलं. ती पण बाबांजवळ बसली. आशाताई ही सोबत होत्या. सम्राट त्यांच्याशी ही बोलत होता.

ति बघत होती यांनी नेहमी प्रमाणे कुर्ता घातलेला नाही. आज फॉर्मल ड्रेस होता. व्हाइट शर्ट, ब्लॅक पँट. ओह माय गॉड. आज तर हे कमाल दिसता आहेत. खूपच भारी. यांच्याकडे नको बघायला त्यांना समजलं तर. हे इतक्या सकाळी इथे म्हणजे पहाटे निघाले असतिल. सगळ्यांशी किती व्यवस्थित शांत पणे बोलता आहेत. जसे फारच चांगले आहेत. खरे रंग फक्त मला दाखवले का? तिला थोड हसू आलं.

"चला नाश्ता करून घ्या." सुरेश राव म्हणाले. आशाताई घाईने किचन कडे गेल्या. अजून इडली लावा चला पटकन त्यांनी तिकडे सांगितलं.

"मी फ्रेश होतो." सम्राट म्हणाला.

"मनाली यांना आत ने."

ती पुढे गेली. तो मागे आला. ते रूम मधे आले. तो थोड हसला. ती पण थोडीशी हसली. तिने टॉवेल दिला. तो इकडे तिकडे बघत होता. तिने बाथरूम दाखवलं. तो थोड्या वेळाने बाहेर आला. ती कॉट आवरत होती. तिचे मोकळे केस पाठीवर रुळत होते. गुलाबी साडी तिच्यावर छान दिसत होती. नेहमीप्रमाणे काहीच तयारी केली नव्हती. फक्त टिकली लावली होती. त्यात ही ती खूपच गोड दिसत होती.

तो आरशातुन तिला बघत होता. आज तर ही खूपच सुंदर दिसते आहे. माझ्याशी थोडी हसली ही. तिची बॅग रेडी होती. चला म्हणजे ही माझ्यासोबत येईल.

दोघांना छान वाटत होत. तरी सुध्दा ते बोलत नव्हते.

त्याने खुर्चीवर टॉवेल ठेवला. तो बघत होता तिची रूम खूप छान आहे. माझी रूम कशी माझी वाटते तशी हिची रूम अगदी हिच्या सारखी आहे. गुलाबी. तिने त्याच्याकडे बघितल. "जायचं?" तिने विचारल.

दोघ बाहेर आले. ती नाश्ता वाढत होती.

" मनाली तू ही बस बेटा." सुरेशराव म्हणाले.

" मी नंतर बसते." ती हळूच म्हणाली.

आशिष, सम्राट खूप बोलत होते. या बाजूचा प्रचार, वोट बँक, काय करता येईल हेच विषय होते. चहा झाला. ते दोघ पुढे ऑफिस मधे गेले.

"बेटा खुश ना?" सुरेशराव तिला विचारत होते.

"बाबा हे कसे काय आले. " मनालीने विचारल.

"तुला घ्यायला आले. हे ठीक होईल बेटा." ती त्यांना भेटली. सुरेशराव ही बाहेर गेले. आशाताई आजीं सोबत स्वयंपाकाच ठरवत होत्या. निधी त्यांच्या जवळ उभी होती.

"मनाली सम्राट रावांना काय आवडत?" निधीने विचारल.

"मला काय माहिती." ती सहज म्हणाली.

"कठिण आहे. रोज तू त्यांना जेवायला वाढते ना? " निधी म्हणाली.

"हो ते सगळं खातात. असे ही आमच्या लग्नाला फक्त पंधरा दिवस झाले. त्यातले दहा दिवस ते उशिरा घरी आले. मला कस माहिती असेल." मनाली म्हणाली.

"कठिण आहे हीच." आशाताई हसत आत गेल्या.

आजी तिच्याकडे बघत होत्या." मनु नवर्‍याला काय आवडत माहिती नाही. जरा घरात लक्ष देत जा. "

"हो आजी. यापुढे बघेल." मनाली म्हणाली. मी लाख बघेल पण यांना ते आवडत नाही तर काय करू? त्यांनी सांगितल होत माझ्या मागे मागे करायच नाही, मला चहा पाणी द्यायचं नाही. आरती ताई म्हणते तसं बहुतेक हे रागाने म्हणाले असतिल. काय माहिती यांचे ही मूड वेळोवेळी बदलतात.

निधी तिच्याकडे बघत होती. "काय मग आता खुश ना मॅडम?"

"मला त्रास देवू नको वहिनी मी आधीच सांगते. अग ते त्यांच्या कामा निम्मित्त आले असतिल. इकडे प्रचार सभा असेल." मनाली म्हणाली.

"सम्राट रावांकडे बघून अस वाटत नाही. ते आल्या पासून सारखे तुझ्याकडे बघत आहेत. छान आहे. आता जा हनीमून साठी." निधी हसत म्हणाली

" काहीही काय वहिनी. " मनालीच्या अंगावर काटा आला. अस शक्य नाही. इतका बदल फक्त चित्रपटात होतो.

"अग खरच. त्यात तू आज खूपच छान दिसते आहेस. घाबरतेस काय?" निधी तिला चिडवत होती.

मनाली पटकन रूम मधे आली. हे माझ्याकडे बघत होते का? हो वाटत. तेव्हा ही आरशातून बघत होते. नक्की काय आहे? त्यांनी माघार घेतली? त्यांच्या सोबत रहावं लागेल का? तिला धडधड झाली.

तुला तेच हव होत ना? दुसर मन म्हणाल.
ते मी नातं नीट करायला म्हणाली होती. तिने पाणी पिलं.

तिने आरतीला मेसेज केला. "ताई हे मला घ्यायला आले आहेत."

"काय?"

"हो ताई."

"बघ मी म्हटलं ना नीट होईल." आरतीचा रीप्लाय आला.

"अजूनही काही सांगता येत नाही ताई. ते सभेसाठी आले असतिल." मनालीने उत्तर दिलं.

"ते काही का असू दे ते आले ना. आता तू ही बोल त्यांच्याशी मागे फिरू नकोस. त्यांची काळजी घे. तुला रहायच ना त्यांच्या सोबत? "

"हो ताई. " ती म्हणाली.

"मग प्रयत्न कर. हा चान्स सोडू नकोस." आरती खुश होती तिने लगेच तिच्या मिस्टरांना ही बातमी दिली. त्यांना ही आनंद झाला होता.

मनाली किचन मधे आली. "आई काही करायच का?" त्यांनी तिला कामं सांगितल.

दुपारी पुरण पोळीच जेवण होत. मनाली बघत होती काय काय केलं. "बापरे आई काय गरज होती इतक्या पदार्थांची?"

"तू गप्प बस."

"एवढी फाईव्ह स्टार ट्रीटमेंट?"

"हो असू दे ते जावई आहेत."

आशिष, सम्राट बाहेर गेले होते. त्यांच काम झालं खूप लोक भेटले. ते घरी आले. मनाली ताट वाढत होती. ते जेवायला बसले.

"स्वयंपाक खूप छान झाला आहे मामी. " सम्राट म्हणाला.

जेवताना ही खूप गप्पा सुरू होत्या. सम्राट त्याच्या कामा बाबतीत किती हुशार आहे समजत होतं. त्यांचं जेवण झालं .

"थोड्या वेळ आराम करा. मग संध्याकाळी आपण बाहेर जावू." सुरेश राव म्हणाले.

"म्हणजे हे आज इथे राहणार?" मनाली विचार करत होती.

तो तिच्या रूम मधे गेला. दुसरीकडे वेगळं वाटत. मनालीला आमच्या घरी अस वाटत असेल. म्हणून ती माझा आधार शोधत होती वाटत. मी काय केल? तिला किती तिखट शब्दात दूर केल. बापरे खूप चूक झाली. आता ती मला हो म्हणणार नाही. यापुढे तिला दुखवायचं नाही. बघू तिच्या कलाने घेवू.

समोरच्या भिंतीवर फोटो फ्रेम होत्या. त्यात मनालीचे खूप फोटो होते. जीन्सवर ती छान दिसत होती. कॉलेजमधे ही इतकी भारी दिसत होती. आता साडीत त्यापेक्षा छान दिसते. त्यांच्या ग्रुपचे फोटो होते. शाळेचे फोटो होते. वाह.

एका बाजूला कपाट होत. काॅट थोडा लहान होता. तो मोबाईल मधे बघत बसला. जरा वेळ पडला.

मनालीच जेवण झालं. ती निधीला मदत करत होती.

"असू दे मनु तू जा. ते वाट बघत असतिल." निधी म्हणाली.

"मी करते." मनाली आवरत होती. तिला माहिती होत ते वाट बघत नसतील. थोड्या वेळाने ती आत आली. सम्राट झोपला होता. ती सोफ्यावर बसुन होती. तिला ही झोप येत होती. ती तिथे झोपली.

******

मनाली, सम्राट यांच एकमेकांशी पटेल का? काय होईलं पुढे?

🎭 Series Post

View all