गठबंधन भाग 2

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 2

©️®️शिल्पा सुतार

सभा संपली. फार्म हाऊसवर सगळे बसले होते. "दोन दिवसांनी सम्राटच लग्न आहे. होतील तितके आमंत्रण द्या. बरेच लोक नवरदेव नवरीला आशीर्वाद द्यायला यायला हवे. या लग्नाचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. आपला जनसंपर्क वाढला पाहिजे." आबासाहेब म्हणाले.

सम्राटला आठवलं आज मेहेंदी आहे वाटत. त्याने फोन बघितला. आशिषने मनालीचे फोटो पाठवले होते. त्याने इकडे तिकडे बघितलं. तिचे फोटो बघितले.

ती खूप खुश दिसत होती. हसताना तिच्या गालावरची खळी स्पष्ट दिसत होती. स्लीवलेस ड्रेस मधून तिचे गोरे हात. सुंदर गळा छान दिसत होता. त्याने भराभर फोटो पुढे घेतले. तो मीटिंग मधे येवून बसला.

******

मेहंदीचा प्रोग्राम झाला. मैत्रिणी घरी गेल्या. आलेले पाहुणे आराम करत होते. मनाली तिच्या रूममध्ये बसलेली होती. थोड्या वेळापूर्वी झालेली सभा टीव्हीवर दाखवत होते. त्यात सम्राटच भाषण तिने ऐकलं. घरचे सगळे कौतुक करत होते. ती आता त्याला नीट बघत होती. टीव्ही बघतांना एक प्रकारची लाज तिच्या चेहऱ्यावर होती.

माझा होणारा नवरा रुबाबदार आहे. तिच्या मनाने मान्य केला. किती काॅन्फीडन्ट. एवढी सभा गाजवली. पिक्चरचा हीरो जसा. तिला एकदम धडधड झाली. दोन दिवसांनी लग्न करून यांच्या घरी जायचं आहे. ती हाताकडे बघत होती. त्यांच्यासाठी मेहेंदी लावली. ही तयारी केली. बापरे त्यांनी मला जवळ घेतल तर? मी सांगेन आपली ओळख नाही. आधी मैत्री करू. ती विचार करून लाजली होती. सम्राट माझा आहे विचार करून तिला अभिमान वाटला.

पण हे माझ्याशी बोलत का नाहीत? बहुतेक असेच बिझी असतील. जागोजागी सभा, हजारो लोक सोबत असतिल. कधी बोलतील?

मेंहेंदी लावल्याने तिचे हात अकडले होते. "आई मी जरा वेळ पडते."
तिला तो प्रसंग आठवत होता जेव्हा हे सगळे तिला बघायला आले होते.

घरात खूप तयारी सुरू होती. साफसफाई झाली, सामान आणल जात होत. आजी हे नाही ते नाही सांगत होती. आरती ही घाईने आली होती. ती मनालीला तयार करत होती.

"ताई ते लोक मला प्रश्न विचारतील का? " मनाली विचारत होती.

"हो नाव वगैरे विचारतील."

"त्यांना माझ नाव माहिती नाही का? "

"अशी पद्धत असते मनु." आरती म्हणाली.

"मला ते आवडले नाही तर? "

आरतीचा चेहरा पडला. तुला चॉईस नाही मनु. तुझी निवड या गठबंधन साठी झाली आहे. तू हो म्हण कींवा नाही तुझ लग्न होणार. तुला सासरी जाव लागेल. मोठ्या घरचे लग्न अश्यासाठी होतात. त्यातून ही फायदा बघितला जातो. आरती गप्प होती तिने निरागस मनुला काही सांगितल नाही. तयारी झाली मनाली अतिशय सुंदर दिसत होती. आई आजी समाधानी होत्या.

"त्या लोकांच्या पाया पड. जास्त हसू नकोस." आजी म्हणाली.

"आजी तुझे विचार जूने आहेत." मनाली म्हणाली. बाकीचे हसत होते.

"अग असच असत बाई. अजूनही बाईसाठी काळ बदलला नाही."

"हो आजी." मनालीने विषय थांबवला. उगीच आजी जुन्या गोष्टी सांगत बसेल.

गाड्यांचे ताफे बाहेर उभे राहिले. सुरेशराव, आशिष स्वागताला पुढे गेले होते. इतके लोक आले होते की कोणाच कोणाशी काय नातं आहे ते समजत नव्हतं. ति चहा कॉफी घेऊन बाहेर गेली. सुरेशराव ओळख करून देत होते. ती आबा आक्कांशी बोलली. सुदर्शन दादा, वंदना वहिनी होत्या. त्यांचा छोटा अमित खेळत होता.

एवढ्या सगळ्या गर्दीत सम्राट कुठे बसला होता तिला दिसला ही नाही.

जरा वेळाने सुरेशरावांनी तिला एका खोलीत पाठवलं. तिथे सम्राट बसलेला होता. ती जाऊन उभी राहिली. त्याने इशारा केल्यावर बाजूच्या खुर्चीत बसली. तिला त्याच्याकडून अपेक्षा होती की तो पुढे पुढे करेल. तिच्याशी प्रेमाने बोलेल. पण ती उत्सुकता त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. तो खूपच घाईत असल्यासारखा वाटत होता .एक काम उरकल्या सारखं त्याने दोन-तीन प्रश्न विचारले. तिने उत्तर दिले. तिला ही त्याला प्रश्न विचारायचे होते. खूप बोलायच होतं. पण त्याचा फोन आला. तो बिझी होता. त्याने बाहेर येऊन पसंती दिली.

सगळीकडे आनंदी आनंद झाला. सुरेशराव आबासाहेब भेटले. तिला मुलगा पसंत आहे का कोणी विचारल नाही. सम्राट अलिप्त होता. तिला हवा तसा नवरा नव्हता. तिला बोलावसं वाटत होत. वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न होता.

लग्न जमल्या नंतर सम्राट तिला भेटला नाही. त्याने फोन केला नाही. तिच्याजवळ त्याचा नंबरही नव्हता. नंतर आशिष दादांने दिला. कपडे घ्यायच्या वेळी तो भेटणार होता. पण वेळेवर कुठेतरी निघून गेला. सुदर्शन दादा, वहिनी भेटले. ते दोघं खूप चांगले होते.

ताई म्हणते तसं ते नंतर माझ्याशी चांगलं वागतील का? माझं मन सांगत आहे काहीतरी गडबड आहे. की ते खूप बिझी आहे. तस माझ्याकडे काही ऑप्शन ही नाही. बाबा सांगतात ते ऐकायच. तिने विचार करणं बंद केलं. ती झोपली.

******

सम्राट घरी आला. आबासाहेब आक्कां सोबत बोलत होते. त्या दोघांना जेवायला वाढत होत्या. किती जरी लोक कामाला असले तरी आबासाहेबांना आक्का डोळ्यासमोर हव्या असायच्या.

सुदर्शन दादा, वंदना वहिनी बाहेरून फिरून आले. अमित पळत आला... आबा .
"अरे माझा गोडू. तू झोपला नाहीस?"

"मी फिरायला गेलो होतो. तुम्हाला टीव्ही वर बघितल काकाला ही."

"सम्राट भाऊजी उद्या कुठे ही जायच नाही ह. हळद आहे. तुमची काहीही तयारी झाली नाही. उद्या मी तुमच फेशीअल करून देईल. बॅग ही भरायची आहे." वंदना वहिनी म्हणाली.

"ठीक आहे. उद्याच्या सभेत मी सुदर्शनला घेवून जाईल." आबासाहेब म्हणाले.

" हा नसला की मी आठवतो हो ना आबा. मी दुसरी चॉईस आहे. " सुदर्शन म्हणाला.

"अस नाही रे सुदर्शन. कंपनी बोर्ड मीटिंग साठी मी सम्राट ऐवजी तुलाच नेतो. तस इलेक्शन साठी सम्राट. तू त्या कामात हुशार आहेस. हा या कामात बस इतकच. बापाला सगळे मुलं सारखे असतात. "

सम्राट अमित सोबत खेळत होता. वंदना आली. "चला खूप रात्र झाली झोपा आता. भाऊजी मनालीचे फोटो बघितले का? ती किती सुंदर दिसते आहे. तिच्या हातावर मेहेंदी खुलली आहे. मी फोन केला होता हं. तुमच नाव ऐकुन ती लाजली होती. " वंदना खूप बोलत होती. सम्राट काही म्हणाला नाही. वंदना अमितला घेवून गेली.

सम्राट रूम मधे आला. तो लॅपटॉप वर काम करत होता. यावेळी किती मतदान होईल. आकडे काय? आपली लोकप्रियता यावर तो एक रीपोर्ट तयार करत होता. उद्याच्या सभेत तो यावर बोलणार होता. तो आबांच्या रूम मधे आला. त्याने तो रीपोर्ट आबासाहेबांना दाखवला.

"आबा मी उद्या सभेला येणार."

आबासाहेब खुश होते.

"आणि लग्नाची तयारी?" आक्कांनी विचारल.

"त्यात काय तयारी करण्या सारखं?" तो म्हणाला.

सम्राट, आबा बोलत होते. आक्का काळजीत होत्या. हा जुन्या गोष्टी अजून विसरला नाही का. त्या नवीन मुलीवर अन्याय नको व्हायला. कोण सांगेल. हे लोक ऐकत नाहीत. सत्ता महत्वाची.

******

दुसऱ्या दिवशी मनालीच्या हातावरची मेहंदी खूप रंगली होती. ती हाताकडे बघत होती.

"बघ किती काळजी करतेस मेहंदी तर किती छान रंगली. म्हणजे सम्राटच तुझ्यावर खूप प्रेम आहे. " आरती म्हणाली

"ताई खरच अस असत का ग?"

"हो. मेहेंदी जितकी जास्त रंगेल तितक नवर्‍याच प्रेम जास्त असत."

"अस न बोलता कस प्रेम वाढलं? आमची तर ओळख ही नाही." मनाली म्हणाली.

"अग भविष्यात तुमच नात खूप छान असेल."आरती तिची समजूत काढत होती.

"नक्की ना ताई? "

" हो, माझ्या एवढ्या गोड साध्या बहिणी पासून ते जास्त दिवस दूर रहातील का?" आरती हसत होती. खरच अल्लड आहे मनाली. तिला काय सांगणार आता. आरतीला तिच्या नवर्‍याची आठवण आली. चला हे उठले असतिल. त्यांच आवरल का बघते.

मला ही लग्नानंतर सम्राटच अस काम कराव लागेल? ते ही सारखी मला हाक मारतील. जिजाजी तर नुसते आरती, आरती करत असतात. तिला आत बोलवतात.

ती फोनकडे बघत होती. ना मेसेज ना फोन. काय करू हे लग्न करू की नको?

नाश्ता झाला. ती बसलेली होती .

"आरती अग हिला तयार कर." आशा ताई म्हणाल्या. ती आत साडी नेसत होती.

"ताई लग्नानंतर खूप काम असत ना?"

" हो घरच करायच. कोणी सांगेल याची वाट बघायची नाही. आपल समजून रहायच." आरती म्हणाली.

"ताई मला लग्न नाही करायच." मनाली हळूच म्हणाली.

"काय झालं आता? मूर्खासारख काहीही बोलू नकोस." आरती घाबरली.

"मला सारख अस वाटत की मी एकटी आहे."

" गप्प बस. दादा इकडे ये." आशिष आला. ते तिघे एका रूम मध्ये बसले होते. आरती त्याला मनु काय म्हणते ते सांगत होती.

"उद्या लग्न आहे. मी माझ्या होणार्‍या नवर्‍याला ओळखत नाही. त्यांच्या बाजूने बोलायचा काही प्रयत्न नाही. मला लग्न करायच नाही." मनु म्हणाली.

"मनु अग सम्राट म्हणजे काही साधा मुलगा आहे का? किती बिझी. हजारो लोक त्यांच्या मागे आहेत. त्या पार्टीचा मेन लीडर आहे. मूर्खपणा सोड. नशीब चांगल की तुला असा नवरा मिळतो आहे. जरा आनंदी रहा .डोक्यातून वेडे वाकडे विचार काढ." आशिष म्हणाला.

"ते कोणी का मोठा मनुष्य असे ना. माझ्यासाठी तर एक पती म्हणून त्यांची काही कर्तव्य आहेत की नाही? " मनु म्हणाली.

"करतील ना मग त्यांचे कर्तव्य. लग्न तर होऊ दे. इलेक्शन किती तोंडावर आलं आहे. बिझी आहेत ते." आशिष म्हणाला.

" दादा तू त्यांचीच बाजू घेतो."

" सत्य परिस्थिती मला माहिती आहे म्हणून म्हणतो आहे. " आशिषला फोन येत होता. तो उठून गेला.

मनाली रडत होती.

" मनु रडू नकोस तुझं एकदम चांगलं होणार आहे. मला माहिती आहे. तू आता किती जरी विरोध केला तरी त्या गोष्टीचा काही फायदा नाही. दादा आणि बाबा तुला समजून घेणार नाही. तू नकार देते आहे असं समजलं तर अर्ध्या रात्री तुझं लग्न लागेल. आपला आयुष्य हे या लोकांसाठीच आहे. त्यांच्या पार्टीचं गठबंधन आहे मनु. सत्तेसाठी ते काहीही करायला तयार असतात. तुझी सोयरीक त्यासाठी झालेली आहे. तुझ्या मनाचा विचार कोणी करणार नाही. तुलाच खंबीर व्हावे लागेल. " आरती म्हणाली.

"असं का आहे ताई?"

"माहिती नाही मनु. आईचं असं आयुष्य होतं. आपल्या दोघांचेही तसच आहे." आरतीचही लग्न असच एका मोठ्या नेत्याच्या मुलाशी झालं होतं. तिला सगळी परिस्थिती बरोबर माहिती होती.

"ताई जिजाजी प्रेमळ तरी आहेत. तुझ्याबरोबर त्यांचं चांगलं आहे होते आहे. सम्राट माझ्याशी काही बोलले नाहीत मला काही समजत नाही हे काय आहे?"

"होईल बरोबर तू आता काळजी करू नको. चेहरा नीट कर आणि चल बाहेर."

मनालीला कोणी समजून घेईल का? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all