गठबंधन भाग 3

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 3

©️®️शिल्पा सुतार

सुरेशराव रूम बाहेर उभे होते. ती त्यांना भेटली. "काय झालं बेटा? काही टेंशन?"

"बाबा लग्न का करतात? " तिने विचारल.

"बेटा हे आयुष्यभराचे बंधन नसतं. नुसते तुम्ही दोघंच नाही तर या निमित्ताने दोन कुटुंब एकत्र येतात. चांगली गोष्ट आहे. " सुरेशराव म्हणाले.

"बाबा पण मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही."

" पूर्ण राज्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे आणि तुला माहिती कशी नाही? " ते म्हणाले.

"तसं नाही बाबा, एक पती म्हणून मला त्यांच्याबद्दल काही माहिती नाही."

"माहिती होईल बेटा. काळजी करायची नाही."

"मी हे लग्न करून योग्य करते आहे ना?"

"बेटा माझ्यावर विश्वास ठेव. तू खूप सुखी होशील. सम्राट खूप चांगला मुलगा आहे. त्याच्या घरच्यांना तो किती सपोर्ट करतो. त्यांच किती करतोय. यावरून तुझ्यासाठी किती करेल. "

"असं होईल ना बाबा? "

"हो बेटा काळजी करायची नाही. मी आहे ना. अर्ध्या रात्री काही लागलं तर सांग."

"हो बाबा."

******

सम्राटने सभा गाजवली. तो दुपार नंतर घरी आला. आक्का वहिनी सगळे रागवत होते. आता कुठे जायचं नाही. लगेच त्याला हळद लागली.

नवरदेवा कडची उष्टी हळद आली. मनालीला हळद लागली. मोठा प्रोग्राम होता. खूप लोक येत होते. खूप मजा येत होती. तिच्या मैत्रिणी खूप नाचत होत्या. मोठा डीजे होता. जेवणाच्या पंगती उठत होत्या.

आशा ताई, सुरेशरावांजवळ बसल्या होत्या." अहो पोरगी नाराज आहे."

"काही प्रॉब्लेम नाही मी बोललो तिच्याशी. तिचा नवरा काही साधा माणुस नाही. तो सामान्य मुलाप्रमाणे हिच्या मागे मागे करणार नाही बिझी असेल. थोड्या दिवसात होईल समंजस. काळजी करू नकोस. तिची समजूत काढ. सम्राट हीरा आहे हिरा."

आशा ताई काळजीत होत्या. समोर मनाली, आरती बसलेल्या होत्या. त्या त्यांच्याकडे बघत होत्या.

लग्नाचा दिवसही असाच धावपळीत उगवला. खूप मोठे मोठे लोक लग्नाला येत होते. कोणी लग्नासाठी थांबणार होतं. तर कोणी नुसतं नवरदेव, नवरीला भेटून जाणार होत.

"बॅग भरून झाल्या का? आटपा." आक्का घाई करत होत्या. सम्राटकडे गडबड सुरू होती. वंदना वहिनी सगळं सांभाळून होती. सम्राटला भेटायला लोक आले होते.

"चल आता निघायच आहे. तुमचे काम नंतर करा. लग्नाच्या दिवशी ही उसंत नाही." आक्का ओरडल्या.

ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरले होते. तिथेच लग्न होत. सम्राट तयार झाला. पांढरी शेरवानी त्यावर लाल दुपट्टा तसा फेटा. मोत्याची माळ घातलेली. तो रूबाबदार दिसत होता. सुदर्शन राव आले त्यांनी सोन्याची चेन आणि अंगठी दिली. मिरवणूक नव्हती. एवढे लोक कंट्रोल करता येणार नाही.

किती तरी लोक भेटायला येत होते. भेटणार्यांचा रांगा लागल्या. तो खाली आला.

"नवरी कुठे आहे बोलवा. " कोणीतरी म्हणाले.

मनाली सुंदर तयार झाली होती. लाल रंगाचा शालू, भरपूर दागिने, हातावर मेहंदी हिरवा चुडा शोभत होता. लाल टिकली, केसांची वेणी त्यावर गजरे, हळदीने खुललेला रंग, ती आरशात बघत होती.

"थोडं हसं तरी बेटा." आशा ताई आल्या. तिची नजर काढली .पायाला काळ लावलं.

"चल बाहेर बाबा घाई करत आहेत." आरती घाईने सांगायला आली.

"अजून तर लग्नाला वेळ आहे ना?" मनाली म्हणाली.

"हो पण बरेच मोठे मोठे लोक येत आहेत. सत्कार सोहळा होणार आहे. सगळे तुझी वाट बघत आहेत." आरती म्हणाली.

स्टेजवर आधीच गोंधळ सुरू होता. खूप कार्यकर्ते वरती होते. माइक वर सारखं सांगत होते की बाकीच्या लोकांनी स्टेज खाली समोरच्या खुर्च्यांवर बसा. कोणीही ऐकत नव्हतं.

बाहेर जोरात बँड वाजत होता. त्यावर काही उत्साही कार्यकर्ते नाचत होते. कोण कोणाकडंच आहे काहीच कळत नव्हतं. पैसा पाण्यासारखा खर्च केला होता. जेवणासाठी वेगळा मंडप होता. घरच्या लोकांसाठी वेगळी व्यवस्था होती.

ती स्टेजवर गेली. सम्राट आधीच तिथे उभा होता. तो लोकांशी बोलत होता. तिने त्याच्याकडे बघीतलं. वाह आज हे खूपच रूबाबदार दिसत आहेत. ती थोडी लाजली.

त्याने तिच्याकडे बघितल. तिची नजर खाली होती. ती त्याच्या शेजारी जाऊन उभी राहिली. मोठमोठे नेते मंडळी येत होते. दोघं मिळून त्यांच्या पाया पडत होते. सत्कार झाल्यानंतर ते परत जात होते. काही समोर बसले होते. खूप गिफ्ट, फुलांचे गुच्छ येत होते.

थोड्या वेळाने स्टेजवर थोडी ढकला ढकली झाली. सम्राटने मनालीला सावरल. तिचा हात धरून बाजूला घेतल. ती त्याच्या जवळ होती. तिला छान वाटलं.

"थँक्यु." ती हळूच म्हणाली. त्याने उत्तर दिलं नाही.

त्याच्या एका कृतीमुळे ती खूपच खुश होती. खरच ताई म्हणते तस यांना माझी काळजी आहे. हळूहळू ठीक होईल. तिला थोड बर वाटलं.

बाकीच्या लोकांना बळजबरी स्टेजवरून उतरवलं. स्टेजवर नवरदेव नवरी आणि घरचेच लवकर राहतील असं सांगितलं. तिथे एक दोन सिक्युरिटी उभे होते.

मुहूर्तावर लग्न लागणार होतं. मंगलाष्टके सुरू झाली. अंतरपाट दूर झाला. मनालीने मनापासुन देवाचा नमस्कार केला. तिने पुढे होऊन त्याच्या गळ्यात हार घातला. त्यांनेही तिच्या गळ्यात हार घातला. दोघं खुर्चीवर बसले. बराच वेळ स्वागताचे नाव घेत होते.

देवा आम्हाला दोघांना आशीर्वाद दे. आमच्यातलं प्रेम खूप वाढू दे. आता लग्न झाल आहे. हे जसे आहेत तस त्यांना स्विकारल आहे. मला विश्वास आहे की आमच नात खूप टिकेल. ते दोघ पूजेसाठी येवून बसले.

बाहेर जेवणाच्या पंगती उठत होत्या. सगळीकडे स्क्रीन वर लग्न सोहळा दिसत होता.

दोघीकडचे वडील स्वागतासाठी बिझी होते. आक्का, आशा ताई सोबत होत्या. वंदना वहिनी, आरती नवरदेव नवरी सोबत होती. अमित मधे मधे करत होता.

त्याने तिला कुंकू लावून मंगळसूत्र घातलं. जोडवे घातले. मनाली त्याच्याकडे बघत होती. तिने मनापासून त्याला आपल समजल होत. सात फेरे घेताना त्याने तिचा हात हातात घेतला. तिला एकदम छान वाटलं. हे चांगले आहेत. मी बरोबर करेन. लग्नाच एकूण एक वचन मी पाळेल. काही संकट आल तर मी पुढे होईल. ती त्याच्यात गुंतत चालली होती. तो अतिशय प्रॅक्टिकल होता. फक्त त्याच्या लोकांशी बोलत होता. बाजूला नवीन लग्न झालेली बायको आहे त्याला काही घेण नव्हतं. तिला ते जाणवलं.

ताई... तिने आरतीकडे बघितल.

"काय झालं?"

"काही नाही." जावु दे. आता मी आहे माझ नशीब. मनाशी मन जुळले नाही तर पुढे कसं होईल? तसे ते शांत वाटता आहेत. सध्या तरी दोघांमध्ये अजिबात संवाद नव्हता.

पूजा झाल्यावर तो बाजूला बसलेला होता. त्याने उपरण तिच्याकडे दिल. वंदना वहिनी खूप मजा करत होती. "भाऊजी अस चालणार नाही आता एकट कुठे ही जायचं नाही. जोडीने फिरायचं."

मनालीच्या मैत्रिणी सम्राटला घेरून उभ्या होता. त्यांना केव्हाचे बूट लपवायचे होते. पण चान्स मिळत नव्हता.

"काय झालं मुलींनो हरल्या का तुम्ही?" सम्राट मुद्दाम म्हणाला.

"आम्ही हरत नसतो."

"मग मिळाले का बूट?"

"नाही ना जिजू."

" माझे कार्यकर्ते असे आहेत ना तुमच्या हाती काही लागणार नाही. तुम्ही शांत पणे जेवून घ्या." तो म्हणाला.

"अस का." तेवढ्यात बूट मिळाले. मुली खुश होत्या. आनंदाने नाचत होत्या.

"आता जिजाजी?"

" तुम्ही मुली आहात इतक्या सुंदर. कार्यकर्ते फितूर झाले. बघतो एकेकाकडे."

सगळया हसत होत्या.

जेवणाची पंगत बसली.

"नाव घ्या जिजाजी. "

" नाव काय घ्यायचं. "

"तुम्हाला माहिती नाही का तुमच्या बायकोच नाव. नाहीतर आम्हाला पैसे द्या."

"कसले पैसे. शूज माझ्या पायात आहेत. "

"आम्ही दिले ते. जिजाजींना उचला. शूज काढून घेवू."

"वहिनी मदत करा."

वंदना वहिनी मधे पडली." ही चिटींग आहे."

"नाही वहिनी, आम्ही जिजाजींना सोडणार नाही. "

"वॉव. सोडू नका. " तो हसत होता. खूप गम्मत सुरू होती.

सम्राटने मुलींना पार्टी द्यायच कबूल केल. पैसे दिले तेव्हा त्या मागे झाल्या.

" चला भाऊजी मनालीला घास भरवा. ती वाट बघते आहे." वंदना म्हणाली.

"वहिनी."

"आटपा. सगळं काही मीच सांगायच का? नंतर ही मला विचारणार का? " वंदना हसत होती.

बरीच चिडवा चिडवी सुरू होती. दोघांनी एकमेकाला घास भरवले. जेवण झालं.

बाहेर पत्रकारांचा गोंधळ सुरू होता. सम्राट मनाली बाहेर गेले. त्याने हात जोडले. खूप फोटो निघत होते.

"जेवल्याशिवाय जायच नाही." सम्राट सगळ्यांना सांगत होता.

"सम्राट सर एक फोटो, वहिनी थोड सरांजवळ सरका." त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. खूप फोटो निघत होते.

"पुरे आता," त्याचे बॉडी गार्ड त्यांना घेराव घातला. सम्राट पुढे चालत होता ती मागे होती. तो थांबला ती आली.

निघण्याची तयारी सुरू होती. सम्राट सदाशिवराव आशिष सोबत बोलत होता.

"सांभाळा मनालीला अगदी साधी मुलगी आहे. अल्लड. तिला अजून काही समजत नाही. रुसून बसते. "

"तुम्ही काळजी करू नका मामा." तो कसतरी म्हणाला. त्याला हे वचन पळता येईल की नाही हे माहिती नव्हत.

"आम्हाला उशीर होत आहे. खूप काम खोळंबली."

"आटपा. मनु झालं का?" आशिष हाक मारत होता.

बाजूच्या गावातच तिच सासर होतं. बाकीचे लोक कार मधे सामान ठेवत होते.

निघताना मनाली खूप रडत होती." ताई येते ग."

आरती तिला सांभाळत होती. "काळजी घे मनु. नीट रहा."

आशाताई ही खूप रडत होत्या. ती आजीला भेटली.

"नीट रहा. वेळेवर खाऊन घेत जा. तिथे काही कोणी तुला आग्रह करणार नाही. तुझी काळजी तुला घ्यायची आहे."

" हो आजी."

मनाली सजवलेल्या गाडीत बसली. सम्राट फोनवर बोलत होता. त्याच्या घरचे मागच्या पुढच्या गाड्यांमध्ये होते. गाड्या वेगाने निघाल्या. तिची मावशी सोबत होती पण ती दुसऱ्या गाडीत होती. या गाडी तिच्यासोबत वहिनी होती त्या दोघी बोलत होत्या. अमित ही होता तर छान वाटत होत. सम्राट बिझी होता.

ठिकठिकाणी लोक भेटत होते. गाडी थांबत होती. नवरदेव, नवरीला आशीर्वाद देत होते.

ते घरी आले. मनाली सगळीकडे बघत होती. मोठी आलीशान हवेली होती. खूप गाड्या पार्किंगला होत्या. फटाक्यांची आतिश बाजी होत होती. बाहेर जोरात बँड वाजत होता. त्याच्यावर काही जण नाचत होते.

काही जण कार जवळ आले. त्यांनी सम्राटला बाहेर घेतलं. सम्राट आता एकाच्या खांद्यावर बसलेला होता आणि ते सगळे नाचत होते. घोषणा सुरू होत्या. मनाली कार मधूनच सगळं बघत होती. वंदना पटकन उतरून स्वागताची तयारी करायला आत गेली .

मावशी आली. "चल मनु उतर." ती उतरून बाजूला उभी राहिली. "मावशी अगं किती गोंधळ आहे इथे."

"इलेक्शन झाल्यावर बघ काय होईल." मावशी म्हणाली.

मनाली सासरी रूळेल का? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all