गठबंधन भाग 6

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 6

©️®️शिल्पा सुतार

मनालीचे प्रयत्न सुरू होते. बघू सम्राट कितपत साथ देतो. आता पुढे.

ती रूम मध्ये आली. तो सोफ्यावर बसलेला होता. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. "काय काम चालले आहे?" तिने विचारलं.

त्याने तिच्याकडे बघितलं. "उद्या सभा आहे. त्याचं प्रेझेंटेशन चाललं आहे."

"तुम्ही दमले नाही का? आराम करा ना. " ती कपडे बदलायला आत गेली. गुलाबी नाईटी वरती ती छान दिसत होती. ती परत त्याच्या बाजूला येऊन बसली. त्याचा हात हातात घेतला. त्यांने हात काढून घेतला. तिने त्याच्या खांद्यावर डोक टेकवलं.

"अहो. आपण सोबत राहू या का? " तिने हिम्मत करून विचारल. तिला कसतरी वाटत होतं. पण ती तयार आहे हेच तिला सांगायच होत.

"तू जाऊन झोप मला थोड कामं आहे." तो म्हणाला.

"हे काम नंतर होणार नाही का?"

"प्लीज मला डिस्टर्ब करू नको." तो लॅपटॉप घेऊन बाल्कनीत गेला. ती कितीतरी वेळ सोफ्यावर बसली होती. शेवटी ती उठली आणि कॉटवर झोपली.

आता ती रडत होती. यांना मी आवडत नाही. मी चांगली नाहिये का? काय करू म्हणजे हे माझ्याशी बोलतील, नीट वागतील. ताईने सांगितल्या प्रमाणे मी त्यांच्या पुढे पुढे तर करते आहे. साडी नेसत जावू का? पार्लरला जावून येवू का? किती हि नटले तरी मनाशी मनाच नात जुळायला हवं. जोपर्यंत हे मनापासुन मला स्विकारणार नाहीत तो पर्यंत प्रयत्न करून उपयोग नाही. मी एकतर्फी प्रेमाने वागते आहे.

खर तर एका मुलीसाठी हे अस वागण किती अवघड असत. मी स्वतः यांना म्हणते आहे की आपण सोबत राहू तरी हे नकार देत आहेत. मला ही मनातून भीती वाटते आहे. पण केवळ हे नात टिकण्यासाठी मी पुढाकार घेते आहे. बाकीच्यांचे नवरे त्यांच्या किती मागे मागे करतात. माझ्या बाबतीत का अस झाल? माझा नवरा लांब रहातो. विचार करत ती झोपली.

तो सकाळी उठला. ती रूम मध्ये होती. तिला बघून तो गडबडला. या वेळी ही खाली असते किचन मधे. तिने त्याचे कपडे शोधून ठेवले होते. त्याने ते न बोलता घेतले. आंघोळ करून आला. ती त्याच्याकडेच बघत होती. होईल तेवढं ती करत होती. खरं तर तिला सुद्धा कसं तरीच वाटत होतं. पण कोणीतरी पुढाकार पाहिजे.

दोघं नाश्त्याला खाली आले. ते सोबत होते म्हणून आक्का खुश होत्या. तो आईला सांगून बाहेर निघून गेला.

आज रात्री तो मुद्दामच उशिरा आला त्याला माहिती होतं की ती वाट बघत असते. स्विमिंग पूल जवळच बसून तो त्याचं काम करत होता. रूम मध्ये गेला नाही.

रात्रीचा एक वाजला आक्का बाहेर आल्या. "सम्राट बेटा तू इथे काय करतो आहेस? मनाली वाट बघत असेल." तो उठला रूममध्ये गेला. ती झोपलेली होती. त्याला बरं वाटलं. सकाळीही तो लवकर उठून खाली गेला.

हे घरी आलेच नाहीत का? ती आवरून खाली गेली. तो नाश्ता करत होता. तिने पटकन त्याला चहा दिला. ती त्याच्यापुढे मागे होती. तिला त्याच्या वागण्याचा कंटाळा आला होता. रडावसं वाटत होत. पण काय करणार?

दोन तीन दिवस झाले असच सुरू होत. ती खूप प्रयत्न करत होती. तो अलिप्त होता. रूम मधे येत नव्हता. तिचा धीर सुटला. आज रात्री मी यांच्याशी बोलणार आहे. काय आहे ते स्पष्ट सांगा मी इथे रहायचं की नाही? रोज रोज तेच. आपण यांच्या मागे मागे करा. त्यांना फरक पडत नाही.

तिने संध्याकाळी त्याला फोन केला. "कुठे आहात? घरी या मला थोडं बोलायचं आहे."

तो रात्री आला. जेवण करून वरती आला. ती पुस्तक वाचत बसली होती. तो आत आल्यानंतर तिने दरवाजा लावून घेतला. त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारली. तो दचकला. तिला बाजूला केल. ती ऐकत नव्हती. ती परत त्याच्या जवळ गेली.

" काय अस? " तो म्हणाला.

"मला तुमच्या सोबत रहायचं आहे. मला इथे घरी खूप एकटं वाटतं. तुम्ही असे उशिरा का येतात?" ती हळू आवाजात म्हणाली.

त्याने तिला बाजूला केलं. तो बाथरूम मध्ये गेला. तो परत आला ती त्याच्याजवळ येत होती.

"मनाली झोप." तो दुरून म्हणाला.

"नाही, मी झोपणार नाही."

तो बाहेर जात होता. तिने त्याचा हात धरला.

"मनाली प्लीज. माझा हात सोड." तो रागाने म्हणाला.

"काय झालं? तुम्ही मला लाजता का? मी तुमची बायको आहे ना." ती म्हणाली.

"मला थोड काम आहे."

"मला नाही वाटत. तुम्हाला माझ्या सोबत रहायच नाही. आधी सांगा तुम्ही असे का करत आहात? हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झाले आहे का? तुम्हाला मी आवडत नाही का?" तिने विचारल.

"हळू बोल. रात्र झाली."

"मला आज या प्रश्नाच उत्तर हवं आहे?" तिने ठरवल होत आज मी कारण काय आहे ते ऐकेलच.

"असं काही नाही, मी बिझी आहे. " त्याने तेच सांगितल.

"एवढे बिझी आहात की बायकोशी दोन शब्द सुद्धा बोलायला वेळ नाही. बाकीच्या लोकांशी कसे तुम्ही व्यवस्थित वागतात आणि बोलतात. माझा काय प्रॉब्लेम आहे? हे लग्न तुम्ही का केलं? माझा काही विचार केला नाही का?"

" हे बघ मी खूप थकलो आहे. माझ डोक फिरवू नकोस." तो बाजूला होत म्हणाला.

"मोठ्याने बोलून बायकोला गप्प करायच. बरोबर ना. ती घाबरेल काही बोलणार नाही. पण मी तशी मुलगी नाही. "

"मग कशी मुलगी आहेस? काय कटकट आहे. तुला ऐकायचं आहे का मी अस का करतो? माझ्यासाठी हे लग्न फक्त एक राजकीय गटबंधन आहे. समजल. माझ्याजवळ यायचं नाही. माझ्या कुठल्या सामानाला हात लावायचं नाही. चहा, पाणी देणं, माझ्यापुढे मागे करायचं नाही. "तो चिडला होता.

ती दोन मिनिट गप्प उभी राहिली. काय म्हणाले हे? त्यांना माझ्याशी काहीही संबंध नको आहेत. मग लग्न का केलं? आधी का नाही सांगितल? सगळे स्वार्थी आहेत. ती त्याच्या समोर जावून उभी राहिली.

" काय कारण आहे? आपलं लग्न झालं आहे ना. तेव्हा तुम्हाला माझा विचार आला नाही का? की नंतर हीच काय होईल? "तिने विचारल.

"या गोष्टी बोलायला माझ्याकडे वेळ नाही." तो कोरडे पणाने म्हणाला.

"बायको साठी वेळ नाही? तर मग लग्न कशाला केलं? तुम्ही स्वतःच्या पक्षासाठी, पार्टीसाठी हे करत आहात ना? तुम्हाला मी नको आहे. माझ्या वडिलांचा सपोर्ट हवा आहे."

"नुसत मला नाही तुझ्या ही वडलांना माझा सपोर्ट हवा आहे. तुझ्या घरी जावून विचार. त्यांनी मला लग्नासाठी विचारल. इथे मोठ्याने बोलायच नाही."तो म्हणाला.

तिला त्याच कोरड वागण सहन होत नव्हतं. "तुम्ही हो म्हणाले ना? की तुम्हाला कोणी पळवून आणलं होतं?"

"बरोबर आहे जगाला दाखवायला हे लग्न आहे. तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात जागा नाही. " तो तोडून म्हणाला

तिच्या डोळ्यात पाणी होतं.

"मी असं माझं आयुष्य वय जाऊ देणार नाही. मी इथे राहणार नाही. मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही माझ्याशी कसे वागता आहात. नुसत घरात नाही तर बाहेरच्या लोकांना ही सांगेल." ती चिडून म्हणाली.

तो तिच्याजवळ येत होता. ती मागे सरकली. त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढल. तिचे गाल चिमटीत पकडले. "परत बोल. हिम्मत असेल तर सांग आता काय म्हणालीस? या रूम मधल्या गोष्टी जर बाहेर गेल्या तर मग तू आहे आणि मी आहे. मी काही बोलत नाही म्हणून तू काहीही बोलते आहेस. "

" मी काय चुकीचं बोलले. तुम्हाला माझ्यासोबत राहायचं नाही म्हणून मी माहेरी जाते आहे? कोणी विचारल तर मी हे सांगेल अस म्हणाले मी. तुम्ही माझ आयुष्य खराब केल?" ती कशी बशी म्हणाली.

"तुझ दुसर्‍याशी लग्न झाल असत तर एवढं काय केल असत ग तू. " त्याने तिला अजून जवळ घेतलं. तो तिच्या डोळ्यात बघत होता. ती घाबरली. त्याच्या इतक्या जवळ येण्याने तिला काही सुचत नव्हतं. तो तिला कॉटवर नेत होता." पती पत्नीच नातं हव ना तुला. "

तिने त्याला झटका मारला. ती रूम बाहेर जात होती. तो मागे आला दोन पावलात तिला पकडलं. ती सुटण्याची धडपड करत होती. त्याने तिला उचलून घेतल. कॉटवर नेवून खाली गादीवर दाबल. तो तिच्याकडे बघत होता.

"तुला काय हवं आहे बोल. आता देतो. तू खूपच उत्सुक आहेस."

ती त्याच्याकडे बघत होती. तो तिचे घाबरलेले डोळे बघत होता. त्याचा श्वास तिच्या चेहर्‍यावर लागत होता. त्याने तिचे दोघी हात त्याच्या एका हातात धरले होते. त्याने घट्ट धरल्याने तिचे हात दुखत होते. तिने हात सोडवायचा प्रयत्न केला. त्याची पकड घट्ट होती.

"आता काय झाल? बोल काय हव? तुला माझ्या जवळ रहायच ना. मी तुझा नवरा आहे. आता का घाबरतेस."

तिच्या डोळ्यात पाणी होत. "मला जावू द्या." ती म्हणाली. त्याने तिला सोडल. ती बाजूला सरकून बसली. आता ती रडत होती. तो खिडकीत उभा होता.

"तुम्हाला माझं मन समजत नाही का? मला हे नात हव आहे. मानसिक, शारीरिक दृष्ट्या तुम्ही हवे आहात. मी उत्सुक आहे म्हणून नाही. तर आधार, प्रेम म्हणून हव आहे. सगळ्या गोष्टी शरीरापर्यंत नसतात. काही मनाच्याही गोष्टी असतात. झाल आहे ना लग्न आता नीट राहू ना. प्लीज समजून घ्या ना. मला सपोर्ट करा. आपण मैत्री करू. ऐका ना. माझ्यासाठी ही हे अस बोलणं, वागणं कठिण आहे. मी फक्त तुमच्यासाठी असं मोकळ बोलते." ती म्हणाली.

"ते जमणार नाही."

"बर माझ चुकलं. राग सोडा. मी यापुढे अस विचारणार नाही. तुम्हाला त्रास देणार नाही." एवढ झाल तरी तिने समजुतीने घेतल होतं.

"एकदा सांगितल ना ते फायनल आहे. तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात जागा नाही. तू माझी बायको जगासाठी असेल माझ्यासाठी कोणी नाही. " तो दरवाजा उघडून बाहेर निघून गेला.

ती कितीतरी वेळ रडत होती. संपल सगळं. पंधरा दिवसाच लग्न. लग्न काय एक डील आहे ही. बाबा आणि सम्राट साठी. त्यांना एकमेकांचा सपोर्ट हवा आहे. माझ काय? काहीही होवू दे. माझ आयुष्य असच जाईल का? एकटं.

रडत रडत ती झोपली. रात्री केव्हा तरी तो परत आला. ती झोपलेली होती. सकाळी तो रूम मधे नव्हता. ती नाश्त्याला खाली गेली नाही. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. नक्की काहीतरी कारण आहे. यांना मी आवडत नाही. मी इथे राहू शकत नाही. मी माझ्या माहेरी जाईल. ती बॅग भरत होती.

******

मनाली ते घर सोडून जाईल का? घरचे जावू देतील का? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all