गठबंधन भाग 7

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 7

©️®️शिल्पा सुतार

सम्राटने नाकारल्यावर मनालीने माहेरी जायचा निर्णय घेतला. बघू पुढे काय होतय ते.

"वंदना, मनाली कुठे आहे. आज सकाळपासून खाली आली नाही. चहा सुद्धा घेतला नाही." आक्का म्हणाल्या.

"मी बघून येते आक्का." वंदना वरती आली. मनाली झोपलेली होती.

"काय झालं ग? अशी काय दिसते आहेस? तू रडते आहे का? तुला बर वाटत नाही का?" ती वंदनाला भेटली. खूपच रडत होती.

"काय झालं? भाऊजी काही म्हटले का? घरच्यांची आठवण येते का? मोकळ सांग मनाली. भाऊजी कुठे आहेत? "

"ताई मला घरी जायचं आहे. " मनाली म्हणाली.

वंदना बघत होती बॅग भरली होती. "खाली चल आक्का वाट बघत आहेत."

"नाही मला कोणाशीच बोलायचं नाही. मला घरी जायचं आहे. तुम्ही माझ्या आईला फोन लावा ना. मला बोलता येणार नाही. रडू येत आहे." मनाली म्हणाली.

वंदना खाली आली. ती आक्कांना सगळं सांगत होती. त्याचवेळी आबा आणि सम्राट बाहेरून घरी आले. ते पण ऐकत होते.

"सम्राट काय झालं? मनाली का नाराज आहे? " आक्का विचारत होत्या.

"काही विशेष नाही." सम्राट म्हणाला.

"ती माहेरी जायच म्हणते आहे." आक्कांनी सांगितल.

"घरच्यांची आठवण येत असेल. मनालीला खाली बोलवा. मी बोलतो तिच्याशी." आबासाहेब म्हणाले.

ते हॉलमध्ये बसलेले होते. आक्का काळजीत होत्या. त्या सम्राट कडे बघत होत्या. नक्की दोघांमधे काहीतरी झालं आहे. शेवटी वाटत होत तेच झालं. इथे सगळे हट्टी आहेत. आधी आबासाहेबांनी सम्राट बाबतीत अस केल नसत तर आजचा दिवस आलाच नसता. सम्राट ही ऐकत नाही. पण यात मनालीचा काय दोष? ती उगीच भरडली गेली.

मनाली खाली आली एका बाजूला उभी राहिली. आबासाहेब, आक्का बघत होते. ती शांत होती. सम्राट तिच्याकडे बघत होता.

"काय प्रॉब्लेम आहे बेटा?" आबासाहेबांनी विचारल.

ती सम्राटकडे बघत होती. सांगू की नको विचार करत होती. परत यांना राग यायचा. घरचे बाजूला होतील. हे मलाच ओरडतील. हे काल म्हणाले होते रूम मधल्या गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत. मला कस काल धमकावल होत. तिला भीती वाटत होती. रात्री शेवटी रूम मधे जाव लागेल. यांनी रागात काही केल तर?

"घाबरू नको जे आहे ते मोकळ सांग." आबासाहेब म्हणाले.

"हो बेटा तू सांगितल नाही तर त्यावर उपाय कसा निघेल?" आक्का म्हणाल्या.

"मला माझ्या घरी सोडून द्या." मनाली हळूच म्हणाली.

"काय झालं? आई बाबांची आठवण येते का? होत असं. सम्राट बिझी असतो ना. एकदा इलेक्शन झाल की तुम्ही फिरून या. जा बेटा चहा पाणी घे. रूम मधे जा." आबासाहेब म्हणाले.

ती गेली नाही. "मला आईकडे जायच."

"काय झालं काही प्रॉब्लेम आहे का? सम्राट तू काही म्हणाला का? " आक्का म्हणाल्या.

"काय झालं मनाली. मोकळ सांग कोणाला घाबरू नकोस." आबासाहेब म्हणाले.

"तुम्ही यांनाच विचारा. ते माझ्याशी बोलत नाही. मग मी का इथे राहू? त्यांना पत्नी म्हणून मी नको आहे. मला माहेरी सोडून द्या." मनाली म्हणाली.

सगळे आता सम्राटकडे बघत होते.

"मनाली रूममध्ये जा. काहीही बोलू नको." सम्राट मोठ्याने म्हणाला.

"नक्की काय म्हणाला हा?" आक्का विचारत होत्या.

"तुम्ही काल मला जसे बोलले तसे सगळ्यांसमोर सांगा." मनाली सम्राटला म्हणाली. तो चिडला होता.

"उगीच आपल काहीही बोलायचं. छोटे मोठे बघायचं नाही. मनाली तुला चांगल सांगून समजत ना. रूम मधे जा. " तो म्हणाला.

आता ती घाबरली होती. सगळे बघत होते. ती रूम मधे जात होती.

"थांब बेटा. विषय काय आहे? सम्राट काही म्हणाला का? बोल तो काही करणार नाही. सांग." आबासाहेब म्हणाले.

"यांच्या आयुष्यात मला जागा नाही. यांना हे लग्न पसंत नाही. मी इथे राहू शकत नाही. मला घरी जायचं आहे." तिने सांगितल.

"काय चाललय हे मनाली, सम्राट? किती दिवस झाले तुमच्या लग्नाला? एवढ्यात भांडताय?" आक्का ओरडल्या.

"हे बघ बेटा आता लग्न झालं आहे. तुला माहेरी जाता येणार नाही. जरा समजुतीने घ्या. लोकं काय म्हणतील? विरोधक या गोष्टीचा फायदा घेतील. सगळीकडेच छी थू होईल. आम्ही इलेक्शन हारू. "आबासाहेब म्हणाले.

"माझ काय आबा? तुम्ही सगळे फक्त इलेक्शनच्या दृष्टीने विचार करत आहात. यामुळे मी सुखी असल्याचे नाटक नाही करू शकत ना? " मनाली म्हणाली.

सम्राट जागेवरून उठला. त्याने तिचा हात धरला. तो तिला वरती घेवून जात होता.

"सम्राट सोड तिला. बोलू दे. इथे घरचे सगळे आहेत." आबासाहेब ओरडले. मनाली पटकन आक्कां जवळ येवून उभी राहिली .तिचे हात पाय थरथरत होते.

"मनाली बेटा हे नात तुमच्या दोघांसाठी नवीन आहे. दोघांनी एकमेकांना समजून घ्या. अस बोलायचं नाही. तुला इथे रहाव लागेल. हे नातं निभावच लागेल. तुझ्याकडे याशिवाय दुसरा पर्याय नाही." आबासाहेब म्हणाले.

"मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केले. यांचा नकार आहे. आमच लग्नाचा एक भागच कमकुवत आहे. त्यांनाच माझ्या सोबत रहायचं नाही. माझा फक्त वापर करून घ्यायचा आहे. मला माझ्या घरी जायचं आहे. मी माझ्या वडिलांना फोन करणार आहे." ती म्हणाली.

"आपण तुझ्या वडिलांशी बोलू. मी सम्राटला समजावतो. काळजी करायची नाही." आबा म्हणाले.

एवढा गोंधळ ऐकुन आजी बाहेर आल्या. "काय सुरू आहे. मनाली? किती मोठ्याने बोलते आहेस? काय ग आक्का? सुनेवर वचक नाही का?" त्या मनालीकडे रागाने बघत होत्या. ती काही म्हणाली नाही.

"काय ग पोरी तुला समजत नाही का कस वागायचं? नवर्‍याच मन जपता येत नाही का? त्याच्या बद्दल काहीही सांगते आहेस. तो गप्प बस म्हणतो तरी सासर्‍या समोर मोठ्याने बोलते. तुला काय पहिल्या दिवसापासून सत्ता हातात हवी आहे का? " आजी ओरडल्या. मनाली आक्कांकडे बघत होती. ती नाही अशी मान हलवत होती.

"आई तू आत जा हे वेगळं आहे. " आबासाहेब म्हणाले.

"काय वेगळं आहे. मी आतून सगळं ऐकलं. आजकालच्या मुलींना जरा धीर नाही. काही ऐकुन घ्यायची तयारी नाही. तुला काय वाटतं तुझ्या नवऱ्याने तुझी तोल तोल करावी? त्याला सांभाळून तुला रहाता येत नाही का? तुमच्या खोली मधल्या गोष्टी बाहेर आल्या कशा? का रे सम्राट काय सुरू आहे? चल आत मध्ये जा मनाली . यापुढे बोलवल्याशिवाय खाली यायचं नाही. आंघोळ कर, साडी नेसून घरात रहात जा. आली खाली अशीच ड्रेसवर. ओढणी नाही काही नाही. माहेरी जायचं नाव घ्यायचं नाही. नाहीतर माझ्याहुन कोणी वाईट नाही. या पोरींना पहिल्या दिवसापासून धाकात ठेवायला पाहिजे." आजी म्हणाल्या.

मनाली घाबरली होती. आजी बायकांना विरोध करतात. घरातल्या पुरुषांना सपोर्ट करतात. कोणाच चुकलं आहे ते बघत नाही. मनाली विचार करत होती. वंदना तिच्या बाजूला उभी होती.

"वंदना हिला आत घेवून जा. आणि चार समजुतीच्या गोष्टी सांग." आजी अजूनही रागवत होत्या.

"बेटा जा." आक्का म्हणाल्या.

वंदनाने तिला रूममध्ये नेलं. आता मनाली खूप रडत होती.

"गप्प हो मनाली. "

"वंदना ताई माझ्या बाबतीत अस का झाल? मी चांगली नाही का? "

"अस काही नाही मनाली. होईल ठीक. "

"नाही होणार ताई. यांनी स्पष्ट सांगितल आपला काही संबध नाही. मला एक सांगा ताई यांना मी का आवडत नसेल?" मनाली विचारत होती.

वंदना गप्प होती. "शांत हो मनाली किती त्रास करून घेणार?"

सुदर्शन बोलवत होता. वंदना खाली गेली.

"काय सुरू आहे? "

"भाऊजी आणि मनालीच काहीतरी झालं. ते तिला काही बोलले असतिल." वंदना म्हणाली.

"कठिण आहे. या सम्राटने लग्न का केल? मला उशीर होतो आहे. मी निघतो. आज खूप मीटिंग आहे. " सुदर्शन म्हणाला.

तिने सुदर्शनला डबा दिला.

सम्राट रूम मधे आला. तो मनालीकडे बघत होता. मनाली नीट बसली. थोडी घाबरली. तिला वाटल तो ओरडेल. खाली का सांगितल अस म्हणेल. तो काही म्हणाला नाही. त्याची फाइल घेवून निघून गेला.

यांना खरंच माझ्याशी काहीही घेणं नाही.

तिने आंघोळ केली. दुपारी ती आक्काच्या रूम मधे बसली होती. तिने आता साडी नेसली होती. त्या तिला समजावत होत्या. "बेटा थोडा धीर धर ठीक होईल. "

"आक्का हे का अस करतात?" तिने विचारलं. आक्का गप्प होत्या.

"का करतात? कश्याला करतात? काय तेच तेच बोलते आहेस. नीट रहाता येत नाही का? जेवण कर आणि तुझ्या खोलीत जा समजल ना मनाली. नवर्‍या पुढे जास्त बोलू नये." आजी ओरडल्या. त्यांच्या समोर कोणाची बोलायची हिम्मत नव्हती.

वंदना ताट करत होती. मनाली थोड जेवली. ती रूम मधे आली. जरा वेळ झोपली. वंदना तिला उठवत होती. "चल तुझे आई बाबा आले आहेत."

ती पटकन खाली गेली. आईला बघून तिला रडू आलं.

"काय आहे बेटा? तू अजून मनात तेच धरून ठेवलं आहे का? बेटा असं करून चालतं का? सासर आहे. थोडं सांभाळून घ्यायच. आरामात बोलायचं." आशा ताई म्हणाल्या.

"आई तुला माहिती नाही यांना माझ्यासोबत रहायचं नाही." तिने घाईत सांगितलं.

"असं बोलायचं नाही. थोड सहन कर. होईल ठीक. आपण एक बोललो की नवरा मुद्दामून उलट बोलतो. त्यांच्या मनात काही नसेल. तू वाद वाढवु नकोस. "

"आई अस नाहिये. "

"गप्प एकदम गप्प ते जस वागतील तस ठीक. अजिबात उलट बोलायच नाही. मी तुला अस शिकवलं का सांग." त्या ओरडल्या.

"आई यात शिकवायचा काय संबंध. माझी काही चूक नाही यांची आहे. तेच मला खूप बोलत आहेत." मनाली म्हणाली.

"आज बोललीस या पुढे हे अस कोणासमोर बोलू नकोस."

"का आई? हे पुरुष आहेत म्हणून त्यांना सात खून माफ. मी स्त्री आहे म्हणून नाही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला का? "मनाली म्हणाली.

"असच असत बाई. "

"कोणी केल हे? आपल्या सारख्या स्त्रियांनीच ना. आजी बघ माझी बाजू घेवून यांना ओरडत नाही. तू ही मलाच गप्प करते. हेच तुम्ही मला सपोर्ट केला तर?"

"तुझा संसार तुटेल." आशा ताई म्हणाल्या.

"आता काय बाकी आहे? समोरचा स्पष्ट सांगतो आहे की त्यांना मी नको आहे. "मनाली हताश पणे म्हणाली.

******

मनालीला कोणी समजून घेईल का? काय होईल पुढे? बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all