गठबंधन भाग 14

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 14

©️®️शिल्पा सुतार

आरतीला भेटून मनालीला बर वाटलं. जिजाजी, आशिष तिच्या बाजूने होते. आता पुढे.

आरती कामात होती. मनाली, निधी तिच्या मदतीला गेल्या. जेवण झालं. थोड्या वेळ आराम करा. आशिष, निधी दुसर्‍या रूम मधे होते. आरती, मनाली दोघी रूम मधे आल्या. आधी मनाली खूप रडली. आरतीच्या डोळ्यात पाणी होतं. "पुरे ना मनु किती रडणार." आरतीने तिला जवळ घेतल.

"ताई माझ्या बाबतीत का अस झालं?"

"मनु शांत हो. अस दुःखी व्हायचं नाही. सगळं नीट होईल. सम्राट काय म्हणतात?"

"ताई ते माझ्यावर नाराज नाराज आहेत. बहुतेक त्यांना लग्न करायचं नसेल. माझ्याशी खूप चिडून बोलले. मी तिथे का रहाते तेच समजत नाही."

"कठिण आहे."

"हो ना, मला त्यांच्या कडून अपेक्षा होती तर ते सोडून घरचे बाकी चांगले आहेत. सम्राट आणि आजी ओरडतात. " मनाली काय काय झालं ते सांगत होती.

"तुम्ही दोघ बोलतात का? " आरतीने विचारल.

"अजिबात नाही. ते माझ्याकडे बघत ही नाहीत. एका रूम मधे आम्ही दोन अनोळखी लोक रहातो. "

"हे कधी नीट होईल?"

"माहिती नाही ताई. वेळ लागेल. किंवा नीट होणार ही नाही." मनाली हताश पणे म्हणाली.

"मनु काय अस बोलतेस?"

"ताई मी सत्य सांगते आहे. मी तिकडे कशी रहाते माझं मला माहिती. पंधरा दिवस झाले. अस वाटत खूप वर्ष झाले मी तिकडे आहे. एकटी आहे. तिकडे वेळ अजिबात जात नाही. करमत ही नाही. कोणाची वाट बघणार? कोणासाठी नीट रहाणार? ज्याच्यासाठी मी तिथे आहे तेच माझ्याशी बोलत नाही. घरचे सांभाळून घेतात."

आरती हे सगळं ऐकून काळजीत होती.
"आपले आई बाबा काय म्हणतात?"

"ते म्हणतात सम्राटला थोडा वेळ दे. पण मी काय करणार तिकडे राहून. ते त्यांचे त्यांचे बिझी असतात."

"थोड तर बघाव लागेल ना. तू परत एकदा त्यांच्याशी बोलून बघ ." आरती म्हणाली.

"नाही ताई, मला जमणार नाही. तुला माहिती नाही मला त्या दिवशी यांच्या समोर किती कसतरी वाटलं. मी दोन तीनदा त्यांना म्हणाली होती की आपण सोबत राहू, मैत्री करू. त्यांनी नकार दिला. ते मला किती बोलले. म्हणाले तू खूप उत्सुक आहेस. दुसर्‍याशी लग्न झालं असतं तर अस काय केल असतं. मी प्रयत्न केला, आता नाही. मी पण शाळा जॉईन करते आहे. बघू इलेक्शन झाल्यावर काय करतात." मनालीची परिस्थिती बघून आरती रडत होती.

"ताई तू का रडते. माझ्या नशिबात जस असेल तस होईल. शांत हो. "

"मनु हे नीट होणार नाही का? माझ्या एवढ्या गोड बहिणीला का असा त्रास? मी बोलू का सम्राटशी?"

"नको ताई ते म्हणतील मी सगळीकडे सांगते. आमच्यात अजून वाद होतील." मनालीच बरोबर होतं एकतर सम्राटने घरच्या गोष्टी कुठे सांगायच्या नाहीत अस सांगितलं होतं.

"जे करशील ते विचार करून कर. सगळ्यांशी बोलून मग ठरव. नाहीतर आपला दोष नसून घरचे आपल्याला बोलत रहातात." आरती म्हणाली.

"ताई मला तुला एक सांगायच आहे. काल मी सभेहुन परत येत होती. रस्त्यात एक मुलगा भेटला. त्याने कार्ड दिल तो म्हणतो तो सम्राट बद्दल काहीतरी सांगणार आहे. ते काय असेल. मी भेटू का त्याला? " मनाली म्हणाली तशी आरती काळजीत होती.

"अजिबात भेटू नकोस. सम्राटचा काहीही भूतकाळ असेना, अजिबात ऐकायला जावू नकोस. झाल ना लग्न. आता आहे ते स्विकार. अस काही ऐकायचं नाही मनु. तो ट्रॅप असेल. हे पॉलिटिक्स खूप डेंजर असतं. घरचे ओरडतील."

"हो मला ही तेच वाटत ताई. मी त्या मुलाला भेटणार नाही. पण यांच नक्की काहीतरी आहे. त्याशिवाय का यांना माझ्या सोबत रहायचा नाही. बहुतेक इलेक्शन नंतर मी कायमची माहेरी येईल." मनाली म्हणाली.

"मनु अस नको ना. " आरतीला वाईट वाटत होत. आशिष दादाच, माझ नीट आहे, मनु जी खरच खूप चांगली साधी मुलगी आहे, तिलाच त्रास आहे. तीच ही नीट व्हायला हवं.

"मग मी काय करू ताई? त्यांनी स्पष्ट सांगितल ना. काहीही झाल तरी त्यांना माझ्या सोबत नातं नको आहे."

"अग एखाद्या वेळी माणुस बोलतो रागाने. म्हणजे तेच धरून चालायचं का?" आरती म्हणाली.

"राग यायला काय झालं होत? आमची ओळख ही नाही. मला नेहमी अस वाटत ते माझ्या सोबत हवे, पण त्यांना मी त्यांच्या आयुष्यात हवी का? हे पण महत्वाचं आहे ना ताई. बळजबरी मी तिथे रहाते. त्यांच्या रूम मधे मला कसतरी वाटतं." मनाली म्हणाली ते आरतीला पटलं.

"आईकडे येवून तरी तू काय करणार? "

"काही नाही, त्यांची वाट बघेन. शाळा जॉईन करेन. माझी माझी राहील."

"अस दूर राहील तर तुमच्यातल नात कधी नीट होईल?" आरती म्हणाली. तिला वाटत होत मनाली, सम्राट सोबत राहिले तर नक्की हे नीट होईल.

"जिथे आपली गरज नाही तिथे रहाणं किती अवघड असतं ताई."

" हो मला समजत. पण तुझ चांगल होणार आहे मनु मला वाटत आहे."

"काय माहिती ताई." आरती, मनाली खूप बोलत होत्या . थोड्या वेळाने जिजाजी, आशिष, निधी आत आले. ते ही गप्पा मारत होते.

******

सम्राटने कंपनी मधला युनियनचा प्रॉब्लेम सोडवला. सगळे खुश होते. सम्राट दादा बरोबर काम करतात. त्यांना आमचे प्रश्न समजतात. कंपनी मधे काम सुरू झालं. तो घरी परत येत होता. रस्त्यात बरेच लोक भेटले. सम्राट त्यांच्याशी बोलत होता.

"सम्राट काय म्हणतो प्रचार?" त्याने बघितल नितीन होता. त्याने दुर्लक्ष केलं.

"मला ओळखत नाही का? मी तुझा जुना मित्र. आता काय तू मोठा माणूस. इलेक्शन सोबत घरी ही लक्ष असू दे. नाहीतर बायकोला काही समजायचं, ती माहेरी निघून जायची." तो हसत म्हणाला.

याला हेच हवं का? सम्राट चिडला. "नितीन काय मूर्खा सारखं बोलतो आहेस? तुला थोड तरी समजत का? कशाला माझ नाव घेतोस? मी तुझ्याशी बोलत ही नाही. तरी मधे मधे करतोस. आमच्या घरा पासून दूर रहायच. समजल."

"आता का घाबरला? लढ ना माझ्याशी. तू डॅशिंग आहेस ना. बाकी तुझी बायको खूप छान आहे. गोरी गोरी पान. सुंदर अगदी. मी तिला भेटणार आहे. सगळं सांगणार आहे."

नितीन... सम्राट एकदम पुढे झाला. दोन तीन कार्यकर्त्यांनी त्याला धरलं.

"सम्राट दादा सोडा त्याला. आजुबाजूला मीडिया आहे. तो मुद्दाम तुम्हाला चिडवतो आहे. इलेक्शन तोंडावर आहे. आपलं नुकसान होईल. नाहीतर त्याची वहिनींची कुठे भेट होणार आहे. चला इथून. "

सम्राट ऐकत नव्हता. तो नितीन जवळ गेला.
"नितीन तू काहीही कर. मी पण बघतो तू माझ किती वाकड करू शकतोस. पूर्वीच्या प्रकरणात तुझा हात होता. तेव्हा तुला सोडलं. पण आता नाही. माझ्या फॅमिली पासून दूर रहा." सम्राटने धमकी दिली. तो कार मधे बसला.

"काका हा नितीन मनालीला भेटला होता का? " त्याने ड्रायवरला विचारलं.

" हो सम्राट साहेब, म्हणजे भेटला असा नाही. त्या दिवशी आम्ही घरी येत होतो तर तो बोलायचा प्रयत्न करत होता. वहिनी साहेब त्याच्याशी बोलल्या नाहीत."

"सरिता सोबत होती का?"

" हो त्या ही सोबत होत्या. "

" नितीन मुद्दाम गैरसमज पसरवतो आहे. त्याला जरा बघावं लागेल." सम्राटने फोन बाहेर काढला एकाला मेसेज केला.

"बघतो दादा, तुम्ही काळजी करू नका. "

"इलेक्शनच्या वेळी मला गडबड नको. "

"हो त्याला दम देतो."

******

संध्याकाळी मनाली, आशिष, निधी निघाले.

" तिकडे गेली की फोन कर मनु, शांत रहा. अजिबात चिडू नकोस, उलट बोलू नकोस." आरतीने तिला जवळ घेतलं.

" हो ताई "

ते घरी आले. रात्री ती सुरेशरावां सोबत बोलत होती. आशाताई आजी ही सोबत होत्या. "मनाली तुझ्यासाठी या साड्या घेतल्या बघ."

"छान आहेत. आई, बाबा मी शाळा जॉईन करते आहे. " मनाली म्हणाली.

"अरे वाह."

"माझ तेवढच मन लागेल. पण आई, बाबा इलेक्शन नंतर मी तिकडे काय करेल? " तिने विचारलं.

"तिकडे तो पर्यंत सगळं नीट होईल बेटा." सुरेशराव म्हणाले.

"नक्की ना बाबा? "

"हो बेटा, नाहीतर मी तुझ्यासोबत आहे. बेटा मी त्या लोकांना शब्द दिला आहे. त्यांची ही वेळ काढून देवू."

"बाबा काय महत्वाच असत? आपल्या लोकांच सुख की आपण करत असलेलं काम? " मनालीने विचारल.

"दोघ बेटा, आपल्या लोकांसोबत रहाता रहाता काम ही जमलं पाहिजे. शेवटी जगण्यासाठी काहीतरी कराव लागत ना."

"बाबा तुम्ही शब्द दिला नसता तर?"

"तरी ही मी म्हटलं असत की थोडी वाट बघ. कारण कुठलीही गोष्ट लगेच होत नसते. मी जितके माणसं ओळखतो सम्राट राव चांगले आहेत."

"ठीक आहे बाबा, तुम्हाला सांगितल्या प्रमाणे मी तिकडे नीट राहील. तुम्ही काळजी करू नका. ते लोक चांगले आहेत. "

सुरेशरावांनी तिला जवळ घेतलं.

"आजी तुमच्या वेळी अस होत का? भांडण होत होते का? आजोबा तर किती प्रेमळ होते." मनालीने विचारल.

"यापेक्षा कठिण काळ होता. वर्षानुवर्षे आई बापाच तोंड दिसायचं नाही. कर्तव्य करत रहायचं. तोंडातून एक शब्द ही काढायचा नाही. अस होतं. " आजी म्हणाली.

"तुझं आणि आजोबांच नात कस होत?"

"खूप समजुतीच, थोड प्रेमाच होत. म्हणजे एकमेकांना समजून घ्यायचं. अरे ला कारे करायच नाही. समोरचा नमत घेत असेल तर आपण ही थोड समजून घ्यायचं. भांडण लावून धरायच नाही. " आजी बरच सांगत होती.

"आजी तू बरोबर म्हणत होतीस. स्त्रीयांसाठी अजून काळ विशेष बदलला नाही. थोड्या फार फरकाने अजून तसच सुरू आहे."

"सहनशीलता हवी बेटा तर नातं टिकतं. "

जेवण झालं .मनाली बॅग भरत होती. तिने सगळं सामान घेतल. आशा ताई आल्या. "बेटा आता मनात काही नाही ना?"

"नाही आई." ती रडत होती. आशाताई ही तिच्याकडे न बघता जड अंतःकरणाने तिच्या बॅग मधे साड्या ठेवत होत्या. "घरच्या लोकांना जप. तु जशी आहेस तशी रहा, सगळ्यांच व्यवस्थित कर. एक दिवस तुझा असेल. आशिष येईल तुझ्यासोबत. " नेहमी प्रमाणे त्या सूचना देत होत्या. मनाली ऐकत होती.

हे जरी माझ माहेर आहे तरी आईच सासर आहे. ती ही यातून गेली असेल का? आजी ही तिला बोलली असेल. बाबा भांडले असतिल. चिडले असतिल. तिने आमच्या साठी सगळं सहन केल असेल. तिने आईला मिठी मारली.

"आई मी मुलगा का नाहिये?"

"अस काय बोलायचं." आशा ताई म्हणाल्या.

" मी तुझ्या सोबत राहिली असती ना."

" मी पण असा विचार केला असता तर तुम्ही मुलं जन्माला आले नसते." आता दोघी हसत होत्या.

"बेटा ते घर कधी तुझ होईल तुला समजणार ही नाही. जनरीत आहे. सगळ्यांना सासरी जाव लागतं. सुखी रहा."

" हो आई. तू ही स्वतः ची काळजी घे." दोघी बराच वेळ बोलत होत्या.

******

मनाली आशिष सोबत घरी येईल का? की सम्राट तिला घ्यायला येईल. बघू पुढच्या भागात.

🎭 Series Post

View all