गठबंधन भाग 16

दोघांच नात हे प्रेमाच आहे का की फक्त एक राजकिय गठबंधन आहे
गठबंधन भाग 16

©️®️शिल्पा सुतार

सम्राट घ्यायला आल्यामुळे मनालीला हे सगळं नीट होईल अशी आशा होती. सम्राट नीट वागेल का? की त्यांच्या मनात काही असेल?

आता पुढे.

दुपारी सम्राट थोडा वेळ आराम करत होता. तो उठला. मनाली पण पटकन उठली. तो फ्रेश होऊन आला. "आपल्याला एक दोन ठिकाणी जायचं आहे. आटोप." तो म्हणाला.

दोघांना चहापाणी साठी आमंत्रण आलं होतं. सम्राट बाहेर येवून बसला. मनाली तयार झाली.

"मोठे मोठे लोक आहेत. तिकडे जावून या. माझे जुने साथीदार आहेत. ओळखीचे आहेत." सुरेश राव म्हणाले.

"बाबा तुम्ही चला." मनाली म्हणाली.

" हो मामा तुम्ही ही चला."

ते बाहेर निघणार. तेवढ्यात मनालीच्या मैत्रिणी तिला भेटायला आल्या.

"अरे वाह जिजाजी आले. मनु तू सांगितल ही नाही. कसे आहात जिजाजी?" सगळ्या सम्राटला घेरून उभ्या होत्या.

"कस असणार? माझी बायको इकडे मी तिकडे." तो हसत म्हणाला.

"ओह मनुची आठवण येत होती का?" मुली त्याला चिडवत होत्या. मनालीचे तर डोळे मोठे झाले होते. हे तर असे सांगतात जस माझ्यावर खूपच प्रेमं आहे.

"तुम्हाला तुमची बायको भेटली ना. चला आता पार्टी द्या जिजू." सीमा म्हणाली.

"काहीही. माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्हीच पार्टी द्या. "

"आम्ही कसली?"

"तुमच कोणाच लग्न जमलं नाही का?" सम्राटने विचारलं.

"आम्हाला कोणी पसंत करत नाही ना. तुमच्या किती ओळखी आहेत जिजू जरा बघा काहीतरी. त्याआधी आज पार्टी द्या. तुम्ही त्या दिवशी म्हटले होते. " मुली ऐकायला तयार नव्हत्या.

"जमणार नाही. मला काम आहेत. आणि जरा बाजूला सरकून उभ रहा. माझ्या बायकोला राग येईल." सम्राट मुद्दाम म्हणाला.

"अरे असे कसे काम आहेत? चालणार नाही. त्या दिवसा नंतर आज भेटता आहात. पार्टी द्या. नाहीतर आम्ही मनुला सासरी पाठवणार नाही." मुली सम्राटला त्रास देत होत्या.

"तुम्ही काहीही केलं तरी मी तुमच्या मनुला इथून घेवून जाईल. " तो मनाली कडे बघत म्हणाला. ती लाजली. बाकीच्या मुली हसत होत्या. ती आजी जवळ बसली.

"जावई बापूंना त्रास देवू नका पोरींनो. " आजी ओरडल्या.

"ऐका मुलींनो. " सम्राट आजींकडे बघत होता.

"आजी तुम्ही थांबा ना. आमचा हक्क आहे. पार्टी द्या. नाहीतर शॉपिंग साठी पैसे द्या." सीमा म्हणाली.

"त्या दिवशी बूट लपवले होते तर पैसे दिले होते ना. "

नाही...

" काय खोटरड्या मुली आहेत. बर आम्हाला काम आहे. आम्ही जावून येतो तोपर्यंत तुम्ही स्वयंपाक करून ठेवा. आपण सोबत जेवू. " सम्राटने ऑप्शन दिलं.

" नाही, किती बोर पार्टी आहे. "

" मग काय तुम्हाला स्पेशल सोय हवी का? " सम्राट हसत होता.

"चालेल ना. "

"आजकालच्या मुली फॉरवर्ड झाल्या. "

सगळया खूप हसत होत्या. मनाली ही हसत होती. तो तिच्याकडे बघत होता. तिच्या गालावरची खळी जवळून अजून छान दिसत होती.

"मनु तू सांग तुझ ऐकतील." सगळ्या तिला आग्रह करत होत्या. ती त्याच्याकडे बघत होती. तो ही तिच्याकडे बघत होता की ही नक्की काय बोलते. बोलू की नको? यांनी ऐकलं नाही तर मैत्रिणीं समोर पोपट होईल. तिने हिम्मत केली

"अहो माझ्या फ्रेंड्सला पार्टी द्या." ती हळूच म्हणाली.

"बर चालेल. " तो एका सेकंदात म्हणाला. सगळया मुली तिला चिडवत होत्या. एवढ्या हळू आवाजात बोलते. आमच्या वर किती जोरात ओरडत होती. आता का आवाज कमी झाला?

"इथे कोणत चांगल हॉटेल आहे आशिष?" सम्राटने विचारल.

"आपण घरी जेवण मागवू. इथे मस्त जेवू. घरी मजा येईल बाहेर गेल तर सम्राटरावांना लोक सोडणार नाही. उगीच तिथेच सभा सुरू होईल." आशिष म्हणाला.

"वाह जिजू फूल फेमस." मुली म्हणत होत्या. मनालीला ही छान वाटलं.

"चालेल आम्हाला थोड काम आहे आम्ही आम्ही आठ वाजेपर्यंत येतो." सम्राट म्हणाला.

मुली ही घरी सांगायला गेल्या. दोघ सुरेशरावां सोबत दोन तीन ठिकाणी जावून आले. सम्राटला खूप मान होता. सगळे कौतुक करत होते. मनालीला खूप साड्या मिळाल्या. ते घरी आले.

मुलींनी मेनू बघून ठेवला होता. लगेच ऑर्डर केलं.

"मामा, मामी, आजी तुम्ही काय घेणार?" सम्राट विचारत होता

"काहीही घ्या. आजी रात्री जास्त जेवत नाहीत. त्यांच्या साठी सूप घ्या." आशाताई म्हणाल्या.

"साड्या बदला. किती बोर दिसता आहात." सीमा म्हणाली.

"काय घालू?" मनाली विचारत होती.

" जीन्स घाल. तुम्ही ही निधी वहिनी, काकू, आजी. "

"आता मला काय पँट आहे का? " आजी म्हणाल्या. सगळे हसत होते. मनाली कपडे बदलून आली. सम्राट बघत होता ही जीन्स वर कमाल दिसते.

" चला अंताक्षरी खेळू. " खूप मजा आली. मैत्रिणी कॉलेजच्या गमतीजमती सांगत होत्या. सम्राटला समजलं मनाली किती बोल्ड आहे. हिचा फायदा होईल. तिला प्राचारासाठी वापरता येईल. कॉलेज मधे ही तिने खूप काम केल होत. त्यांचा रणरागिणी ग्रुप होता.

मनाली विचार करत होती. ह्या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. तेव्हा मी किती डॅशिंग होती. बर्‍याच लोकांना सरळ केलं होतं. पण आता मलाच त्या रणरागिणी ग्रुपच्या मदतीची गरज आहे. पण सम्राट चांगले वागता आहेत. ते सगळ्यांसमोर असेच व्यवस्थित असतात. मला एकटीला त्रास देतात.

जेवायला भरपूर पदार्थ होते. आजी आणि आशा ताई मुलींमधे रमल्या होत्या. सम्राट, मनाली ही एकमेकांसोबत बरेच कंफर्टेबल झाले होते.

जेवण झालं. आशिष, निधी सगळ्यांना सोडायला गेले. घरचे सगळे बोलत बसले.

रात्री दोघं रूम मधे आले. झोपणार कस. सोफ्यावर पाठ दुखते. घरच्यांना गादी मागता येणार नाही. मनाली विचार करत होती. ती कपडे बदलून आली.

सम्राट सोफ्यावर बसला होता. नेहमी प्रमाणे काम सुरू होत. ती उभी होती. त्याने तिच्याकडे बघितलं.

"तुम्ही कॉटवर बसा म्हणजे मला सोफ्यावर झोपता येईल." ती हळूच म्हणाली.

"तु झोप तिकडे मी इकडे झोपतो." तो म्हणाला.

"नाही सोफा लहान आहे तुम्ही तिकडे झोपा."

तो उठला. कॉटवर बसला. ती सोफ्यावर झोपायचा प्रयत्न करत होती. जमत नव्हतं.

"तुला वाटल तर इकडे झोप." शेवटी तो म्हणाला. ती त्या बाजूला येवून झोपली. तिने मधे उशी ठेवली. तो बघत होता. काही म्हणाला नाही. मनाली झोपली. त्याचं काम झालं. तो तिच्याकडे बघत होता. ती झोपलेली शांत दिसत होती. चेहर्‍यावर गोडवा होता.

प्रेम हे एकदा होतं अस म्हणतात. पण काळानुसार त्यात बदल ही होतो. पूर्वी मला कोणी अस सांगितल असतं तर पटलं नसतं. मला माझ लग्न झाल आहे हे मान्य करायला किती दिवस लागले. त्याच गडबडीत मनाली माझ्यापासून दूर गेली. तिला मी आधी सगळं सांगायला हवं होतं का?

काय करावं? जुन्या गोष्टी सोडाव्या का? नविन सुरवात करणं मला जमेल का? माझ्या बाबतीत जे झालं त्यात मनालीची काय चूक? फक्त तिने माझ्याशी लग्न केल म्हणून तिला का याची शिक्षा? घरचे म्हणतात म्हणून ती हे नात निभावते. माझ्या सोबत रहाते. हिला सांभाळायला हव. झालं गेल सोडून द्यायला हवं. जुन्या आठवणी कुरवाळत बसण्यात काही अर्थ नाही.

जे गेलं ते माझ कधीच नव्हतं. ही समोर आहे ती माझी आहे. मी आता हिच्या सोबत नवीन सुरुवात करणार. त्या आधी हिची माफी मागावी लागेल. तो तिच्याकडे बघत होता. तीच सुंदर रूप त्याला मोहित करत होतं. त्याने हात पुढे केला तिच्या गालाला हात लावणार तसा तो मागे झाला. नाही अजूनही मी तिच्यावर हक्क दाखवू शकत नाही. तिच्याशी नीट बोलून तिने होकार दिल्यावर मी तिच्या सोबत राहू शकतो. त्याने लाइट बंद केला. तो तिकडे तोंड करून झोपला.

सकाळी मनाली रूम मधे नव्हती. सम्राट आंघोळ करून आला. ती आत आली. त्याचे कपडे कॉटवर पडले होते. ती घडी करत होती.

"असू दे मी ठेवतो." त्याने बॅग भरली.

ती तोपर्यंत दुसर आवरत होती. नाश्ता करून सम्राट मीटिंग साठी निघाला.

"मामी दुपारी एवढे पदार्थ करू नका. फक्त भाजी पोळी हवी. आम्ही निघणार आहोत." सम्राट मनाली कडे बघत म्हणाला. म्हणजे तयारी करून ठेव तिला समजल.

मनाली किचन मधे होती. आशाताई चिवडा, लाडू पॅक करत होत्या.

"आई हा फराळ का देतेस?"

"अशी पद्धत असते. तिकडे हे खा हं. " आशाताई म्हणाल्या.

" हो आई तू बेसनचे लाडू छान करतेस."

"आशिषला फोन लाव. थोडी मिठाई ही मागवून घे." आजी म्हणाल्या.

"पुरे किती देणार." मनाली म्हणाली. निधी फोन वर बोलत होती.

सम्राट आल्यामुळे मनाली कालपासून खुश होती. तिचा चेहरा चांगला वाटत होता. आशाताईंना समाधान वाटत होत. त्या किचन मधे गेल्या. त्यांनी वरण, भात, भाजी, पोळी, कोशिंबीर करायला सांगितली.

"आई यांनी फक्त भाजी पोळी करायला सांगितली आहे. " मनाली मधेच म्हणाली.

" हो सांगितल म्हणून काय झालं? नुसती भाजी पोळी कशी समोर ठेवणार?"

" बापरे पुढच्या जन्मी मला कोणाचा तरी जावई म्हणून जन्म घ्यायचा आहे. किती ती मजा. नुसत हे करू की ते करू. अस जर वातावरण. इतक प्रेम इतकी ठेप प्रत्येक मुलीला सासरी मिळाली असती तर पृथ्वीवर स्वर्ग झाला असता. हो ना आजी. " मनाली म्हणाली.

"आजी हसत होत्या. या ही जन्मात तू लकी आहेस की सुरेश सारखा बाबा मिळाला. सम्राटरावां सारखा पती. "

हो बरोबर आहे. ती विचार करत होती. माझ्या सासरी तसा काही प्रॉब्लेम नाही. हे पण चांगले वागत आहेत.

******

दुपारी जेवण झाल्यावर ते घरी निघाले. सगळे बाहेर उभे होते. मनालीच मन भरून आलं होत. "वहिनी येते ग."

"नीट रहा मनु. आता तर काही प्रश्न नाही. काय होत ते सांगत रहा." निधी तिला चिडवत होती.

"काहीही काय वहिनी." ती तिच्यावर मुद्दाम रागावली.

सुरेशराव, आशाताई गप्प होते. "आई, बाबा, आजी मी येते. तुम्ही तिघांनी तब्येत सांभाळा."

"जावई तुला घ्यायला आले. ते किती चांगले आहेत. त्यांच्याशी नीट वाग. भांडू नकोस." आजी म्हणाली.

"चांगल आहे. म्हणजे ते नुसते घ्यायला काय आले तरी ते चांगले का आजी? आणि मी वाईट." बाकीचे हसत होते. सम्राट समोरून आला. ते गप्प बसले.

तो आजी, सुरेशराव, आशाताईंच्या पाया पडल्या. आशाताई त्याच्याकडे बघत होत्या.

"काळजी करू नका मामी, मी आहे. यापुढे तुमच्याकडे कोणतीच तक्रार येणार नाही. "

त्यांना समजायचं ते समजलं. त्या आता निश्चिंत होत्या.

मनाली कार मधे बसली. तीच मन भरून आलं होतं. दूर जाई पर्यंत ती मागे बघत होती. एक दोनदा तिने हळूच डोळे ही पुसले. सम्राट बघत होता. काय बोलू अस त्याला झालं होतं. त्याने तिला पाण्याची बाटली दिली.

🎭 Series Post

View all