काय मग कालच्या प्रश्नाचं उत्तर आलं का?...
आपल्या गौरीने लगेच उत्तर दिलं; मेणबत्ती. गौरीची हुशारी आणि सद्सदविवेक बुद्धी पाहून म्हातारी राक्षसाचा बिमोड करायला तयार होते. म्हातारी गौरीला सांगते; "मी आता तुला दोन गोष्टी देते त्या तुला राक्षसाला संपवायला कामी येतील,ही शाल! हि पांघरल्यावर तू कोणाला दिसणार नाहीस त्यामुळे त्या राक्षसाच्या गुहेत तुला सहज जाता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हि जादुई झाडाची बी! हि बी तुला बरोबर राक्षसाच्या भुवयांच्या मध्यभागी ठेवावी लागेल, तिथे बी ठेवल्यावर तो राक्षस आपोआप संपेल. इथून उत्तरेला असलेल्या गुहेत तो राक्षस राहतो. पूर्ण दिवसभर राक्षस गाढ झोपेतच असतो त्यामुळे तुझं काम सोपं होईल. बरोबर दोन दिवस लागतील तुला तिथे पोहोचायला; पण सावध राहा रात्री त्या गुहेच्या इथे जाऊ नको, त्यावेळी माझी शाल आणि बी काही काम करणार नाही कारण त्यावेळी राक्षस अधिक शक्तिशाली असतो." गौरी म्हातारीच सगळं बोलणं नीट ऐकून उत्तरेला जायला निघते.
रस्त्यात चालताना ती सगळं गणित मांडते; म्हातारीला भेटण्यासाठी एक दिवस गेलाय, आता राक्षसाच्या गुहेत जायला दोन दिवस! म्हणजे तीन दिवस संपले! म्हणजे चौथ्या दिवशी रात्री राक्षस राज्यात जायच्या आधी त्याला मला संपवलं पाहिजे. सगळा विचार करत करत जाताना आत्ता पर्यंत संध्याकाळ झाली होती. तिचा प्रवास जंगलातून सुरु होता, थोड्याच वेळात अंधार होईल म्हणून गौरी आसरा शोधू लागली. गौरीने फांद्या व पाने गोळा करून रात्रीच्या आसऱ्याची सोय केली! तिथल्याच झाडांची फळे आणि नदीचं पाणी गोळा करून रात्र काढली.
दुसरा दिवस सुरु झाला... आणि गौरीचा प्रवास सुद्धा.... आता आजचा दिवस प्रवास केला की गौरी गुफेच्या इथे पोहोचणारच होती. जंगलातून जाताना आजू-बाजूच्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करत गौरी जात होती. दुपार उलटून गेली होती, पुढे चालता चालता तिला एक जखमी ससा दिसतो; शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकून त्याला पायाला जखम झालेली असते. ती लगेच त्याच्या मदतीला जाते. जंगलातूनच औषधी वनस्पती गोळा करून त्याचा लेप करून ती सश्याला लावते. सश्याला आराम पडतो. पण या सगळ्यात गौरीला पुढे जायला उशीर झालेला असतो. आज रात्री न थांबता चालत राहून गेलेला वेळ भरून काढायचा असं मनाशी ठरवून गौरी चालू लागते. पण रात्रीच्या अंधारात सगळे रस्ते सारखेच वाटत होते. इतक्यात गौरीने मदत केलेला ससा तिथे येतो आणि चक्क तो माणसासारखा बोलत असतो!
गौरीला आश्चर्य वाटतं. ससा म्हणतो हे जंगल अंशतः जादूचं आहे, रात्री आम्ही प्राणी बोलू शकतो! मगाशी तू माझी मदत केलीस आता मी माझ्या परीने तुला जी मदत करता येईल ती नक्की करीन. गौरी सश्याचे आभार मानते आणि राक्षसाच्या गुहेपर्यंत घेऊन जा अशी सश्याला विनंती करते. ससा तयार होतो आणि दोघं गुहेकडे जायला निघतात. सकाळपर्यंत गुहा येते आणि ससा निघून जातो. गौरी समोर आता तीन गुहा असतात ती आधी म्हातारीने दिलेली शाल अंगावर घेते जेणेकरून राक्षसाला काही संशय येऊ नये. गौरी गुहा नीट बघू लागते! पहिली गुहा तर फारच लहान असते आणि राज्यातल्या लोकांच्या मते तो अवाढव्य राक्षस काही त्यात नसणारच. दुसऱ्या गुहे बाहेर प्राण्यांचे आत गेलेले आणि बाहेर आलेले पायांचे ठसे असतात म्हणजे इथेही तो राक्षस नसणार नाहीतर प्राणी बाहेर आलेच नसते! राक्षसानेच ते फस्त केले असते. गौरी जाते तिसऱ्या गुहेत तिथे राक्षस म्हातारीने सांगितल्या प्रमाणे गाढ झोपेत असतो. ती हळूच दबक्या पावलांनी तिथे जाते आणि म्हातारीने दिलेले बी राक्षसाच्या भुवयांच्या मध्य भागी ठेवते; त्या बरोबर एक तीव्र उजेड येतो आणि एका मोठ्या किंकाळी सह राक्षसाचा अंत होतो.
गौरी समोर आता राक्षसाच्या ऐवजी एक परी प्रकट झालेली असते. परी गौरीला म्हणते, "मला मिळालेल्या शापामुळे मी राक्षस झाले होते. तू मला यातून मुक्त केलेस! तुला कधीही मदतीची गरज लागली तर माझी आठवण काढ मी नक्की तुझ्या मदतीला येईन." एवढं बोलून परी लुप्त होते. गौरी परत शौर्यपूर ला जाण्यासाठी निघते.
काय कसा वाटला आत्ता पर्यंतचा गौरीचा प्रवास? Comment करून नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतंय आता पुढचा गौरीचा प्रवास कसा होणार आहे? राजा तिला जादुई नदीचा रस्ता सांगेल?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा