गौरी आणि खजिना (भाग-६)

Marathi blog, marathi katha, gauri and treasure, treasure hunt

      गौरी आता मोतीपुरात पोहोचते. आधी ऐकल्या प्रमाणे खरंच तिथला राजा स्वार्थी आणि कोणालाही कधीही मदत न करणारच असतो! राज्यातल्या प्रजेलाही राजाचा गुण लागलेला असतो; प्रजा ही तशीच! तिथे ना भाऊ भावाला मदत करत असतो ना मुलगा आपल्या पालकांना.... सगळे स्वार्थीच! मात्र चिंगी या सगळ्याला अपवाद असते! कोणालाही कधीही मदत करणारी, निस्वार्थी मनाने सगळी कामं करणारी चिंगी! गौरीच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही. चिंगी ची आपल्याला नक्की मदत होईल म्हणून गौरी तिला नकाशाच्या तुकड्या बद्दल विचारते. चिंग सांगते हो मला माहित आहे मी तुला नक्कीच सांगीन पण कृपया तू माझं एक काम करशील?

         गौरीने होकार देताच चिंगी बोलू लागते; "मोतीपुर खरंतर एक असं राज्य होतं जे सगळ्यांची मदत करायचं! कधीही या राज्याने इतरांची दुःख नुसती बघून घेतली नाहीत, सगळ्यांची जमेल तशी मदत केली. पण, काही वर्षांपूर्वी इथे एक वाईट चेटकीण आली.... तिचे वाईट हेतू जाणून राजाने मदत करायचं टाळलं. हे तिला सहन झालं नाही आणि ती शाप देऊन निघून गेली इथला प्रत्येक व्यक्ती स्वार्थी असेल आणि स्वार्थीच जन्माला येईल; कोणीही या राज्याशी मैत्री करणार नाही, सगळे तुम्हाला शत्रूच मानतील. पण नशिबाने मी आणि माझं कुटुंब तेव्हा इथे नव्हतो, तेव्हा माझा नुकताच जन्म झाला होता. जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा इथला जाच सहन न होऊन माझे आई बाबा मला सोडून गेले आणि मी एकटीचं राहिले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मला आता हे राज्य शापमुक्त करायचंय...."

          गौरीची आश्वासक थाप तिच्या पाठीवर पडताच चिंगी स्वतःला सावरते आणि पुढे बोलू लागते; "मागे गावात एक साधू आले होते त्यांना मी उपाय विचारलाय.... त्यांनी सांगितलंय कि गावाबाहेर जी जुनी हवेली आहे तेथे एका बंद संदुकीत एक हिरा आहे.... तो सूर्यप्रकाशात चमकवून त्यातून निघणारी किरणे राज्यभर पसरवायची मगच राज्य शापमुक्त होऊ शकत. मी तिथे दोनवेळा जाण्याचा प्रयत्न केला होता पण दोन्ही वेळेस अपयशी ठरले. त्या हवेलीचं दार उघडायला सुद्धा मला जमलं नव्हतं! आता तुझ्यारूपाने मला एक आशेचा किरण दिसतोय...... आपण उद्या सकाळीच तिथे जायला निघूया म्हणजे परवा पहाटे पर्यंत तिथे पोहचू आणि सूर्य उगवला कि आपलं काम पण लगेच होईल...." गौरी ती रात्र चिंगीच्या घरीच थांबते आणि दुसऱ्या दिवशी सूर्य उगवायच्या आतच दोघी हवेली कडे जायला निघतात. गप्पा मारत मारत कधी त्यांचा अर्धा रस्ता चालून संपतो हे कळतही नाही. आता रात्र होऊ लागलेली असते आणि चिंगी म्हणते बहुतेक आपण ठरवलेल्या वेळेपेक्षा आधीच तिथे पोहचू... इथून आता जास्त लांब नाहीये हवेली.... एका अर्थी बरंय आपल्याला जरा वेळ मिळेल हिरा शोधायला.

        अश्याच गप्पा गोष्टी करत त्या दोघी हवेली समोर येऊन थांबतात. गौरी हवेलीच्या दाराजवळ जाते, मागून चिंगी पण जाते. इथे दार उघडायला त्यांना एक कोडे सोडवावे लागणार आहे आणि तयार होणारे आकडे code म्हणून टाकावे लागणार. दाराच्या बाजूच्या पाटीवर लिहिलेलं असतं; "दर वर्षी माझा वाढदिवस येत नाही असं कसं होऊ शकत?" गौरीला लगेच कळतं.... हे लीप वर्ष आहे म्हणजे २९ फेब्रुवारी.... म्हणजे इथे code तयार होतोय २९०२! गौरी जसं code टाकते हवेलीच दार उघडतं.... गौरी आणि चिंगी दोघी आत जातात. सगळी कडे अंधार असतो. चिंगी मशाल पेटवते. मशालीच्या उजेडात दोघी संदुक शोधू लागतात. एका कोपऱ्यात चिंगीला संदुक दिसते. दोघी संदुकीकडे जातात. संदुक पण बंद असते. संदुक उघडायला सुद्धा एक code टाकावा लागणार आहे, संदुकीवर लिहिलेलं असं लिहिलेलं आहे; 

१ = १

२ = ५

३ = ८ 

४ = ११

५ = ? ?

या प्रश्नचिन्हाच्या जागी जो आकडा येईल तो code आहे. 

       

         काय असेल हा code.... हे आपण पुढच्या भागात पाहूया...  तुम्हाला काय वाटतंय....?? Comment करून नक्की सांगा... काय असेल याचं उत्तर....

🎭 Series Post

View all