मागच्या भागात आपण पाहिलं गौरीला code शोधायचाय.... तर code आहे १४. कारण १ = १
२ = ५ ,( २+२+१) वरचा प्रश्नाचा १ मिळवला आहे.
३ = ८, (३+३+२) तसेच ५ = १४ (५+५+४).
गौरी जसं १४ code टाकते संदुक उघडते. चिंगी आणि गौरी त्यातला हिरा काढून घेतात. हे सगळं होई पर्यंत आता सूर्योदय झाला असतो, दोघी हवेली मधून बाहेर येतात आणि सूर्य प्रकाशात हिरा धरतात. हिऱ्यातून तेजस्वी किरणे निघायला लागतात; हिरा राज्याच्या दिशेने करून दोघी मिळून पूर्ण राज्यावर किरणे फिरवतात आणि परत मोतीपूर ला यायला निघतात.
परत एक दिवसाचा प्रवास करून दोघी मोतीपुरात पोहोचतात. जादूची कांडी फिरवल्या सारखं सगळं बदललेलं असत. आता सगळे एकमेकांची मदत करून, काळजी घेत नीट वागत असतात. सगळा स्वार्थीपणा दूर झालेला असतो. चिंगी गौरीला म्हणते; "मी तुला आता राजा कडे घेऊन जाते! राजाला या शापाबद्दल आठवण करून देऊन हा हिरा सुपूर्त करू, मग तू नकाशाचा तुकडा मागून घे." गौरी आणि चिंगी राजवाड्यात जातात. चिंगी राजाला सगळ्या कथेची आठवण करून देते आणि गौरीने केलेल्या सहकार्यची माहिती सांगते. गौरी राजाला हिरा देते. राजा खुश होतो! इतक्यात राज्याचा महामंत्री तिथे येतो आणि बाजूच्या राज्यांना मोतीपुरशी सलोखा करायचा असल्याचं सांगतो. आता तर राजाचा आनंद गगनात मावत नसतो. एकटे पडलेले मोतीपुर आता बहरू लागले आहे आणि हे केवळ गौरीच्या सहाय्यामुळे..... राजा गौरीचे आभार मानतो आणि स्वतःहून नकाशाचा तुकडा गौरीला देऊ करतो. राजाचे आणि चिंगीचे आभार मानून गौरी मोतीपुर सोडते. आता गौरीकडे एकूण ३ तुकडे झालेत! अजून एक तुकडा मिळाला की नकाशा पूर्ण होणार.
गौरीचा पुढचा टप्पा असतो भोलापूर.... नावाप्रमाणेच इथले सगळेच स्वभावाने भोळे असतात. याचाच अनेकांनी गैरफायदा घेतलेला असतो. राज्याने बरेच काही या भोळेपणाच्या नादात गमावलेलं असतं. गौरी भोलापूर ला पोहोचते. पुर्ण एक दिवस ती राज्याची पाहणी करण्यात घालवते. तिथले लोक खूप मनमिळाऊ आणि चांगले असतात. गौरी राजाला भेटण्यासाठी राजमहालात जाते! राजाला नकाशाच्या तुकड्या बद्दल विचारते. राजा म्हणतो; "हो! आहे माझ्याकडे पण मी सध्या संकटात आहे. मला तू मदत करू शकलीस तर नक्की मी भेट म्हणून तो तुकडा आनंदाने देईन." गौरी समस्ये बद्दल विचारते. राजा म्हणतो; "काल बाजूच्या धुर्तनगर राज्याच्या राजाने युद्धाची धमकी पाठवली आहे दोन दिवसांनी रात्री हे युद्ध सुरू होईल आणि त्यांचे सैन्य बळ आमच्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. आधीच आम्ही आमचे जवळ जवळ सर्व गमावले आहे! मला आता माझ्या प्रजेला जास्त त्रास होऊ द्यायचा नाहीये.... जर धुर्तनगर या युद्धात जिंकले तर मात्र आमच्या राज्याला अतीव वेदना सहन कराव्या लागतील." गौरीला एकंदरीत आता सगळ्या परिस्थितीची जाणीव होते. राजाचं प्रजेबद्दल स्नेह, वाटणारी काळजी, आपुलकी सर्वच यातून दिसत असते. या धुर्तनगर ला बळाने नाही तर बुद्धीने हरवावे लागणार हे गौरीच्या लक्षात येते आणि गौरी राजाला एक योजना सांगते. "तुम्ही राज्यात परवा मोठा मेळा आयोजित करा. मेळ्यात खूप प्रकाश आणि मशाली असतील त्याचा उजेड दूर पर्यंत जाईल आणि शत्रू सैन्याला वाटेल आपले सैन्य त्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे; यांच्याशी काही आपण युद्ध जिंकू शकत नाही! हे बघून शत्रू सैन्य माघारी फिरेल आणि राज्य हरण्याच्या भीतीने परत युद्ध पुकारणार नाही. या साठी आपल्याला राज्यातल्याच प्रजेची न कळत मदत होईल आणि युद्ध न करताच आपण यात विजयी होऊ."
काय कसं वाटलं गौरीचं चातुर्य?..... तुम्हाला काय वाटतंय गौरीची ही युक्ती कामी येईल? ..... तुमचं मत comment करून नक्की सांगा....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा