गावाकडची होळी आणि शिमगा
प्रसन्न पहाट उगवली होती. गावातील प्रत्येक दारासमोर सडासारवनाने सुबक व मनमोहक रांगोळ्या काढल्या होत्या.लहान मुलांची आदल्या दिवसापासून सोंगांची तयारी सुरु होती. वाघ,बैल,राक्षस अशी चित्र रंगवून त्यांनी ठेवली होती.अंगात उलटा शर्ट, कागदी पुठ्याची कु-हाड व त्याला रंगवलेली काठी, गळ्यात बैलांचे चाळ आणि घुंगरांचा आवाज शिमग्या दिवशी सकाळच्या प्रहरी असे लहान मुलांचे तांडे गावात प्रत्येक घरासमोर येवून उभे राहतात. दारासमोर येताच ' वाघाला पैसा दे भगवान , वाघाला नको मला दे ..! असे लांलचक गाणे म्हणून शेवटी तांदूळ पैसा घेतल्याशिवाय जाणार नाही ' अशी जोरात आरोळी ठोकली जाते. घरातून मग पाच-दहा रुपये हातावर ठेवले जातात. पिशवीत तांदूळ घातले जातात. होळीसाठी पाच शेणी दान म्हणून दिल्या जातात. मग हा मुलांचा तंडा पुढील दाराकडे जातो. तोपर्यंत दुसरा तंडा येतो. असे हे होळी व शिमग्याच्या दिवशी गावात वातावरण असते. मुलांचा हा जल्लोष सणांला नवे ताजेपणा देत असतो.
मोठी माणसे आपल्या दैनंदिन कामात असतात. महिलावर्ग संध्याकाळच्या सणाची तयारी करत असतात. मुले सकाळचा सोंगांचा कार्यक्रम आटोपून दुपारच्या विविध खेळांच्या कार्यक्रमांतून आपली उपस्थिती दाखवत असतात. स्पिकरचा आवाज गावात घुमत असतो. अनेक खेळासाठी सर्वांनी चावडीच्या पटांगणात जमावे यासाठी आवाहन करण्यात येते. मुलांची व अबालवृद्धांची गर्दी जमलेली असते. संगीत खुर्ची, धावणे, तळ्यात मळ्यात,डोळे बांधून मडके फोडणे, सायकलवरून तोंडाने बिस्किट खाणे आशा भरगच्च खेळाचे आयोजन गावात केले जाते.मुलांची ही सारी करामत मोठी माणसे भर उन्हात पहात असतात. मुलांचा गोंधळ , नाचणे, बागडणे , आरडाओरडा यामुळे होळी व शिमग्यादिवशी उत्साहाचे वातावरण असते. विजयी मुलांना बक्षीसे दिली जातात.मुले आनंदाने या सणांचा आस्वाद घेत असतात.
दिवस सरत जातो तशी कांहीतरी नवीन करण्याची धमक तरुणाईत होते.शोभिवंत पताका, विद्युत रोषणाई यांनी बैलगाडी सजवली जाते. बैलांना झुल व चाळ बांधून गाडीला जुंपलं जाते. ईकडे तरुण पोरातील मुले नवरा - नवरी नटूनथटून गाडीत बसून वरात काढण्यासाठी सज्ज असतात. नवरा नवरी यांना बघण्यास धुंब्बड उडलेली असते.नवरा - नवरी कोण हे अंदाज लावले जातात. वरात सुरु होते. ढोल ताशे वाजत असतात. गावातील प्रत्येक घरामोर बैलगाडी उभी केली जाते. नवरा नवरीला साखरपाणी दिले जाते. यावर तरुण पोरं थांबत नाहीत प्रत्येकाकडून हक्काने शंभर ,दोनशे, पाचशे रुपये मागून घेतात. गावात वाजत- गाजत वरात प्रत्येक गल्लीत जात असते. वाद्यांचा गजर, पोरांचा डान्स, नवरा - नवरी घेत असलेली आधुनिक नावं यामुळे सर्वांच्या चेह-यावर हास्य फुलले असते. मुलांनी काढलेल्या सोंगामुळे गावात हर्षउल्हासाचे वातावरण निर्माण होते.
दिवसभर महिलामंडळ सणाच्या तयारीत असतात. पुरणपोळीचा स्वयंपाक मपासून करत असतात. संध्याकाळी चावडीसमोरील व्हळीदेवाला नैव्यद्य आणण्यासाठी दंवंडी दिली जाते. चावडीसमोर दोन तीन गोल दगड असतात तिथे वाळव्याच्या झाडाची मोठी फांदी रोवली जाते.त्याला पाच नारळाचे तोरण बांधले जाते. सोबत सर्व गावकरी याला पाच फेरे घालतात. अबालवृद्धांची प्रचंड गर्दी जमलेली असते. सुपातून आणलेले नैव्यद्य समोर ठेवले जातात. हात जोडून सर्वजन उभारले असतात.मोठमोठ्यांनी व्हळीदेवाला गा-हाणे घातले जाते. सर्वांनी आणलेला नैव्यद्य एकत्र केला जातो. तो सर्व मिसळून त्यातील थोडा प्रसाद घराकडे दिला जातो. ईकडे मुलांच्या जोरजोराने टिमक्या वाजत असतात. सकाळी मुलांना दाण केलेल्या शेणी मोठी होळी केली जाते. अग्नीतून मोठ्या ज्वाला बाहेर पडत असतात. वाईट विचांरांचे दहन व्हावेत, सर्वांनी गुण्यागोविंदाने रहावे असा संदेश यातून दिला जातो. दिवसभरातील सणाच्या आनंदात संध्याकाळी घरी सर्वजण पुरणपोळीचा आस्वाद घेतात. प्रत्येक घराघरात असे सणाचे अत्यंत आनंंददायक वातावरण असते त्यामुळे होळी हा सण मोठ्या दिमाखात साजरा होतो.
गावांतून असे सण, उत्सव अजूनही टिकून आहेत.ग्रामीण भाग आपल्या देशाचा कणा आहे. इथली संस्कृती ही देशाची शान आहे. पारंपारिक पद्धतीने सण साजरे करुन लोकजागृतीने संस्कृतीला प्राधान्य दिले आहे.जरी आधुनिकीकरण व वेगाने जीवनात बदल होत असले तरी आजही येणारे सण तितक्याच उत्साहाने साजरे करुन संस्कृतीला जतन करण्याचे महत्वाचे कार्य सर्व स्तरातून होत आहे. त्यातीलच होळी व शिमगा हा सण मनाला खूपच आनंंदीत करतो.
© नामदेव पाटील