Login

गावाकडच्या गोष्टी : आठवणीतला दीपस्तंभ कै.मारुती बागडी , कौलगे

सेवाभावीवृत्ती नेहमी स्मरणात राहते.

पाण्याच्या प्रवाहातून सुखरुपणे नेणारा नावाडी...!!

एक काळ असा होता शैक्षणिक मुल्ये रुजलेली नव्हती पण शैक्षणिक वाटचाल सरळमार्गाने चालु होती.जेमतेम पाचवीपर्यंत प्राथमिक शिक्षण गावातच मिळत असे.अशीच अवस्था आपल्या सरोळी गावात होती .माध्यमिक शिक्षणासाठी कौलगे हाच पर्याय होता .दळणवळणांच्या साधनांच्या अभावामुळे शाळेला ऐनापुरमार्गे चालत जाणे लांबच होते यासाठी जवळचा मार्ग म्हणजे नदीतील डोणक्यामधुन शाळेला जाणे. पावसाळ्यात प्रचंड दलदल असल्यामुळे चिखलातुन एक पाय काढत एक पाय पुढे टाकत तारेवरच्या कसरतीप्रमाणे मजल - दरमजल करीत डोणक्याजवळ सारी शाळकरी मंडळी जमायची. तेथे आल्यानंतर मग श्री. मारुती बागडी यांना मोठ्याने आरोळी ठोकली जायाची...! घरात हजर असलेले हे दिलखुलास निडर व्यक्तिमत्त्व ताबडतोब डोणके वल्हवण्यासाठी नदीवर उपलब्ध असायचे.हसमुख चेहरा , धारदार नाक , तेजस्वी नजर ,पल्लेदार मिशा, डोक्यावर टोपी, दणकट शरीरयष्टी अशा गुणांनी सजलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे कै.मारुती बागडी ...!
वडलोपार्जित होडी चालवणेचा वारसा पुढेही त्यानी चालु ठेवला . होडी चालवण्याचे त्यांचे कसब अप्रतिम होते. पुराच्या प्रचंड पाण्यातुन शाळकरी मुलांना ते लिलया सुरक्षित किनाऱ्यावर पोहचवत असत.पुरामध्ये घोंघावणारा वारा , पाण्याच्या लाटावर हेलकावे खाणारी होडी , होडी नदीच्या मधोमध गेल्यावर वाटणारी भिती ,खचाखच शाळेची मुले व माणसांनी भरलेली होडी हा फाकड्या न डगमगता पैलतिरावर घेउन जाई. अष्टोप्रहर शब्दाच्या हाकेला जागणारा माणुस माणसांच्या वहातुकीला कधी कंटाळला नाही.अडचणींना सामोरे जात ही सेवा त्यांनी नित्यांने सांभाळली.श्री.गुरुनाध महादेव पाटील यानी त्यांच्या नावाची ठोकलेली आरोळी आजही आठवते.शाळकरी मुलांना प्रेमाणे वागवणारा माणुस दरवर्षी सरोळी गावात पाठीवर पोते घेऊन सुगी गोळा करण्यासाठी यायचा त्यावेळी घरोघरी त्यांचा आदरपुर्वक पाहुणचार केला जात असे.
बघता - बघता काळ बदलला वैज्ञानिक जगात झपाट्याने प्रगती झाली , दळणवळणांच्या साधनांचा प्रभाव वाढला मात्र होडी व शाळेतील ते दिवस यांची आठवण झाली की कै. मारुती बागडी यांचे नाव तोंडात अलगद येते.आज कौलगे हायस्कुलमध्ये शिक्षण घेउन अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत पण या जुन्या आठवणींचा उजाळा अजुनही त्यांना मर्मबंधातील ठेवीप्रमाणे आहे.
अशा या सेवाभावीवृत्तीच्या वल्लीचे देहावसान जरी झाले असले तरी त्यांची आठवण मात्र नेहमी येते. अशा थोर व्यक्तीची अचानक अजाण शब्दांना जाग आली आणि विस्मृतीतले व्यक्तिमत्व समोर आले. जेंव्हा - जेंव्हा नदी ,नाव ,होडी , डोणके हे शब्द कानावर पडताच अजुनही पुर्विचा मारुती बागडी आठवतो आणि क्षणांत त्यांचा दृष्टीपटलावर चेहरा तरळत राहतो,या निस्सिम भक्ताचा....!!

जीना उसिका होता है,
जो औरोंको जीवन देता है.

*यादगार लम्हे को प्यार भरा प्रणाम....!!

ता.क. योगायोगाने कै. मारुती बागडी यांची पत्नी सरोळी गावात गेल्यावर्षी आली होती. तिला आमच्या घरी बोलवून आदरातिथ्य केले भात व पैसे दिले आणि वरील लिहलेला लेख वाचून दाखविला. आपल्या पतीची कर्तव्यनिष्ठा व प्रामाणिकपणा ऐकून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. कै. मारुती बागडी यांचे सरोळी गावाशी नाते चिरंतन स्मरणात राहिल.

©नामदेव पाटील


0