आठवणीतील दिवाळी
दसरा संपल्यानंतर दिवाळी सणाचे वेध लागतात.आनंद , उत्साह व दिपपर्वाचा सण साजरा करण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. गावातील वातावरण हळूहळू आनंदमय होण्यास सुरवात होते. जसजसे दिवाळी जवळ येते तशी स्वच्छतेला सुरवात होते. घरातील सगळी स्वच्छता करण्यात सर्व दंग असतात. यामध्ये लहान मुलेही आनंदाने भाग घेतात. घराला विविध रंगाच्या रंगोटीने सजवले जाते. रंगाच्या या रंगेबेरंगी छटांनी दिवाळीत घराला सुंदर रुप प्राप्त होते. अंणातील साफसफाई दिवाळी सणाचे जोरदार स्वागत करते. गावातील गल्या स्वच्छ झाल्यामुळे मन प्रसन्न होते.
शेतकरी हा नेहमीच आपल्या शेतातील कामात व्यस्त असतो; पण खरी दिवाळी त्याच्या श्रमातूनच गावात होत असते. हिरण्यकेशी नदीचे पाणी सा-या शिवारभर फिरलं आहे. कसदार मातीत जिद्दीने कष्ट करुन आपला संसार चालवणारा शेतकरी ऐन दिवाळीत त्याचे हात राबतच असतात. शिवारभर डोलणारं भाताचे पिक पिवळधमक झालेलं असते. धनधान्यांच्या राशीनी घर भरायच आणि वर्षभर आनंदाने जगायच यातच गावातील शेतकरी मग्न असतो. जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करताना जनावारावर अतोनात प्रेम करायच , त्यांची सेवा करायची सकाळ , संध्याकाळ दूध डेअरीला घालायच आणि या घामाच्या पैशातून दिवाळी साजरी करायची हे चाललेले असते. वर्षभर गोकूळला घातलेल्या दूधाचा बोनस दिपावलीला येतो यातूनच सर्वांचा दिपावलीचा बाजार भरला जातो. मग दिवाळीच्या आनंदपर्वाला सुरवात होते.
गावात सगळीकडे फराळाची लगबग सुरु असते. फराळाचा खमंग वास सर्वत्र दरवळत असतो. लाडू , करंज्या , चकली , चिवडा , शंकरपाळ्या हे पदार्थ घरोघरी केले जातात. एकमेकांना मदत करुन महिलावर्ग या फराळातच गर्क असतो. लहानमुले दंगामस्ती करत फराळाचा आस्वाद घेत असतात.
दिवाळीच्या आनंद उत्सवाला सुरवात होते. दारोदारी अंगणात सडासारवण केले जाते. सुबक व रेखीव रांगोळीने दार सजले जाते. कार्तिकदिवा लावून घराला शोभा आणली जाते. गलोगल्ली पत्ताका लावल्या जातात. दारात पणत्यांची व विद्युत रोषणाई केली जाते. गावभर सगळीकडे दिव्यांचा झगमगाट दिसून येतो. उंब-यावर दोन्ही बाजूला शेणाच्या गवळण्या लावल्या जातात.त्यावर फुल ठेवून हळदीकुंकू लावून त्यांची पूजा केली जाते. पाच दिवस गवळण्या पुजल्या जातात. ग्रामीण संस्कृतीची जपणूक यातून दिसून येते.
दिवाळीत आनंदाची लयलूट सुरुच असते.दिपावली पाडव्याचा दिवस उगवतो.महिला पहाटे उठून दररोज दिवाळीत गवळण्या लावल्या जातात या एकत्र केल्या जातात याच्या परत गवळण्या करुन घरात सुंदर वाडा केला जातो. चौकौन , गोल असे वाड्याचे स्वरुप असते. वाड्यासमोर पेंदा केला जातो. मध्यभागी रवी व छोटासा झाडू ठेवला जातो. सभोवार रांगोळी काढली जाते. यानंतर महिलामंडळी पुरणपोळी करण्यात व्यस्त राहतात.
गावात भावेश्वरी' देवळाकडे जाण्यासाठी नैव्यद्य घेऊन जाण्यास अबालवृधांची लगबग सुरु असते. सगळीजण सकाळी आकराच्या सुमारास नटूनथटून लहानमुलसह भावेश्वरी देवळाकडे जातात. शेतशिवारात निसर्गरम्य वातावरणात भावेश्वरी देवीची मंदिर आहे. ग्रामदैवत असलेमुळे लोकांची अपार श्रद्धा भावेश्वरी देवीवर आहे. हळूहळू गावातील लोक देवळाजवळ जमा होतात. हलगीच्या व भावेश्वरी नावांने चांगभलं..! गजरात देवपाटील भावेश्वरी देवाला पाच प्रदक्षिणा घालतात. आत तेलाचा दिवा असतो तो विझू नये म्हणून देव पाटील याला संपूर्ण घोंगडे पांघरले जाते. गावातील अबालवृधांची गर्दी देवळाजवळ झालेली असते.पाच प्रदक्षिणा झाल्या नंतर भावेश्वरी देवीला गा-हाणे घातले जाते.
' स्वामी महाराजा..!
चव्हाटा प्रबता ईठलाई..!
थळाकुळा पांढरी महाराजा..!!
वर्षाची दिपावळी महाराजा..!
देसाई उभारल्यात , पाटील उभारल्यात..!
रयत रांगोळी उभारली..!
त्यांच्या ढोरा-गु-हा , मुलाबाळांसनी.!
सुखी ठेव महाराजा..!
घोटभर आंबील केलीया..!
डाव्या हातानं निवद ठेवलाय ..!
उजव्या हातानं मान्य करुन घे..!
हरहर चांगभलं ..!
चव्हाटा प्रबता ईठलाई..!
थळाकुळा पांढरी महाराजा..!!
वर्षाची दिपावळी महाराजा..!
देसाई उभारल्यात , पाटील उभारल्यात..!
रयत रांगोळी उभारली..!
त्यांच्या ढोरा-गु-हा , मुलाबाळांसनी.!
सुखी ठेव महाराजा..!
घोटभर आंबील केलीया..!
डाव्या हातानं निवद ठेवलाय ..!
उजव्या हातानं मान्य करुन घे..!
हरहर चांगभलं ..!
असे गा-हाणे मोठ्या आवाजात घातले जाते. यामध्ये गावच्या सर्वांना समृद्धीची मनोकामना केली जाते.
यानंतर पुरणपोळीचा नैव्यद्य दाखवून देवीला नारळ देण्यास सुरवात होते. वर्षाला प्रत्येक देवाला नारळ देण्याचा प्रथेनुसार सोबत नारळाची पिशवी घेऊन सगळेजण फिरत असतात. भावेश्वरी , ब्रम्ह , निंग , विठ्ठलाई, डोंगरातील मारुती , मसणाई ,मंगाई ,महादेव, गावातील मारुती , खायला ब्रम्ह ,लक्ष्मी , गणपती अशा सर्व देवांना नारळ देऊन घरी यायला बारा वाजून जाते. तेथून घरातील कुलदेवतेला नैव्यद्य व नारळ दिला जातो. यानंतर याच दिवशी भाउबीज साजरे केले जाते. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढली जाते. बहिण भावाला मनोभावे ओवाळते. तिच्या पाया पडून तिला ओवाळणी दिली जाते. यानंतर पुरणपोळीच्या जेवणाचा सर्वजण येथेच्छ आस्वाद घेतात. पहाटेपासून रंगणारा हा दिवाळीचा मंगलमय क्षण अपरिमित आनंद देतो. आपली संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते व तितक्याच उत्साहाने दिपावलीचा हा सण आजही साजरा होत आहे.
यानंतर पुरणपोळीचा नैव्यद्य दाखवून देवीला नारळ देण्यास सुरवात होते. वर्षाला प्रत्येक देवाला नारळ देण्याचा प्रथेनुसार सोबत नारळाची पिशवी घेऊन सगळेजण फिरत असतात. भावेश्वरी , ब्रम्ह , निंग , विठ्ठलाई, डोंगरातील मारुती , मसणाई ,मंगाई ,महादेव, गावातील मारुती , खायला ब्रम्ह ,लक्ष्मी , गणपती अशा सर्व देवांना नारळ देऊन घरी यायला बारा वाजून जाते. तेथून घरातील कुलदेवतेला नैव्यद्य व नारळ दिला जातो. यानंतर याच दिवशी भाउबीज साजरे केले जाते. पाटाभोवती सुरेख रांगोळी काढली जाते. बहिण भावाला मनोभावे ओवाळते. तिच्या पाया पडून तिला ओवाळणी दिली जाते. यानंतर पुरणपोळीच्या जेवणाचा सर्वजण येथेच्छ आस्वाद घेतात. पहाटेपासून रंगणारा हा दिवाळीचा मंगलमय क्षण अपरिमित आनंद देतो. आपली संस्कृती किती महान आहे याची प्रचिती येते व तितक्याच उत्साहाने दिपावलीचा हा सण आजही साजरा होत आहे.
गावातील दिवाळी मोठ्या दिमाखाने साजरी होते. याच दिवाळीला शेजारील निंगुडगे गावात बसवेश्वर देवाची मोठ्याने यात्रा असते. या यात्रेला गावातील सगळीजण आवर्जून जातात. खेळण्यांची व अनेक प्रकारची दुकाने यांनी बसवेश्वर देवालयाजवळ भरपूर गर्दी असते. पुरातन वास्तुशिल्पाचा अद्भुत नजराणा असलेल्या या मंदिरात बसवेश्वराची भव्य मूर्ती आहे. दरवर्षी दिपावलीला येथे यात्रा भरते. आजूबाजूच्या गावातील व बाहेरून अनेक भक्तगण येथे हजेरी लावतात. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जंगी कुस्त्यांचे मैदान ..! संध्याकाळी चारनंतर देवाजवळ कुस्यांचे आयोजन केले जाते. अनेक पहिलवान यांच्या रंगतदार कुस्त्या येथे बघायला मिळतात. पहिलवानासोबत निशाण फिरवले जाते त्याच्या तोडीस तोड पहिलावाना बरोबर कुस्ती लावली जाते. विजयी पहिलवानाला भरघोस बक्षीस दिले जाते. आमच्या गावातील गावठी मल्लांची कुस्ती लावली जाते. अत्यंत चुरशीने झालेल्या कुस्तीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतो. तरुण मुले , वयोवृद्ध लोक , कुस्ती शौकिन हे कुस्त्या पहायला असतात.गोंधळ ,आरडाओरडा , टाळ्या ,शिट्या अशा विलक्षण आनंदात हे कुस्तीचे मैदान पहायला मिळते.
बसवेश्वराला नारळ देवून हळूहळू गावाकडे जायाला पावले वळली जातात. जाताना कुस्तींची चर्चा , पहिलवालाने मारलेला डाव , मुलांची दंगामस्ती असे करत गाव गाठले जाते. दिवसभर प्रचंड उत्साहात दिपावलीचा आनंद लुटलेला असतो. घरात सगळ्यासोबत चर्चा , संवाद करत पुरणपोळीचा आस्वाद घेतला जातो. दिवाळीचा हा परमोच्च क्षण आपल्या संस्कृतीची क्षणाक्षणाला आठवण करुन देतो.
दिपावलीच्या या दिवसात फराळाचा मनमुराद आस्वाद घेतला जातो. प्रत्येक मित्रमंडळी यांच्या घरी फराळाला बोलवले जाते. प्रत्येक घरातील फराळाची चव यामुळे चाखायला मिळते. आपल्याआपल्यात छान संवाद होतात. एखाद्या विषयावर चर्चा होते.दिपावालीनिमित्त एकमेकांच्या भेटी होतात. त्यामुळे दिपावली केवळ दिव्यांची रोषणाई नसते तर मनामनाला जोडणारा नवा धागा असतो तो अत्यंत मनःपूर्वक जपला जातो.
दिव्यांचा झगमगाट ,तरुणांचा उत्साह , महिलांचे संस्कृतीला जपणं ,फराळाची चंगळ अशा विविध रुढी , परंपरा जपत दिवाळीचा हा सण मोठ्या दिमाखात साजरा होतो. याची आठवण क्षणाक्षणाला येते आणि मनाची कवाडे खुली होऊन लेखणी मोहरून जाते.
©नामदेव तुकाराम पाटील
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा