Login

गावाकडच्या गोष्टी : वीर जवान अमृत सुतार यांचे देशासाठी बलिदान

देशासाठी बलिदान देणारे वीर जवानांचे कार्य अभिमानास्पद आहे.
गावाकडच्या गोष्टी : देशासाठी प्राणाची आहुती देणारे सरोळीचे थोर सुपुत्र वीर हुतात्मा अमृत सखाराम सुतार..!

देशासाठी दिले बलिदान
आम्हास सार्थ आहे अभिमान
धन्य ती सरोळी गावची माती
अजरामर झाली अमृतची कृती


देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यास अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. भारतमातेबद्दल असलेली निष्ठा, जाज्वल्य देशाभिमान, कष्ट, जिद्द, प्रेम, जिव्हाळा यामुळे अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी सर्वस्व अर्पण करुन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे योगदान, त्यांचा त्याग, प्रामाणिक सेवावृत्ती क्षणाक्षणाला आठवणींचे रोमांच उभे करते. देशासाठी लढलेल्या अशा तमाम स्वातंत्र्य सेनानी यांच्या कार्यापुढे नेहमीच नतमस्तक व्हावे वाटते.

देशासाठी असेच शुरवीर स्वातंत्र्य सेनानी देशाच्या विविध भागातून लढले.नसानसांत देशप्रेम उफाळून आलेल्या स्वातंत्र्य सेनानी यांची देशभक्ती अफाट होती. असेच कोल्हापूर जिल्ह्यातील नैसर्गिक विविधतेने नटलेल्या, माणुसकीने बहरलेल्या, देशाप्रती उत्कट प्रेम असणा-या, हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेल्या सरोळी या छोट्याशा गावी वीर जवान अमृत सखाराम सुतार यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९४४ झाला.

दहा जणांचे एकत्रित कुटुंब वडिल सखाराम नाना सुतार चालवत होते.केवळ शेतीवर व सुतार कामावर इतके मोठे कुटुंब त्यांनी मोठ्या हिम्मतीने सांभाळले होते.अशा कुटुंबात वीर जवान अमृत सुतार यांचे बालपण गेले. त्याकाळी शिक्षणाची ओढ नसलेमुळे जेमतेम चौथीपर्यंतच अमृत यांचे शिक्षण सरोळीत झाले. शिक्षणाबरोबर त्यांना मैदानी खेळाची आवड होती. देशाबद्दल प्रेम व जिव्हाळा त्यांच्यात ओतप्रोत लहाणपणापासून भरला होता. सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याची त्यांची ईच्छा खूप होती. घरातील कुटुंबाचा त्यांना याला पाठिंबा होता. अखेर ते १९६२ साली सैन्यात भरती झाले. त्यांच्याबरोबर गावातील श्री. नारायण धोंडीबा केसरकर व श्री. राजाराम देसाई हे त्यावेळी लष्करात भरती झाले होते. मुंबई येथे भरती झाल्यावर त्यांचे प्रशिक्षण बेळगाव येथे झाले. प्रशिक्षण अत्यंत निष्ठेने पुर्ण करुन त्यांचा देशसेवा करण्याचा प्रवास सुरु झाला.

देशातील आसाम, जम्मू काश्मिर, दिल्ली, राजस्थान, पाकिस्तान सीमा, बांग्लादेश सीमा अशा विविध ठिकाणी त्यांनी लष्करी सेवा केली. सैन्यदलात सीमेवर रक्षण करताना त्यांची झुंजारवृत्ती दिसून आली. परकीय आक्रमण परतवून लावताना शत्रूला नामोहरण केले. देशाच्या सीमेवर अष्टोप्रहर पहारा करताना त्यांनी कधी कुचराई केली नाही. उन,वारा,पाऊस यांचा सामना करताना देशसेवेला प्राधान्य दिले. दहा वर्षे देशात सर्वत्र सेवा बजावली. अनेक अडचणीवर मात करत देशासाठी सेवा चालूच ठेवली.

१९७१ चा काळ देशात सारी जनता दैनंदिन जीवन जगत होती. पंतप्रधान इंदिरा गांधी देशाचा कारभार हाकत होत्या. सारे सैनिक देशाच्या सीमेवर जागरुकतेने रक्षण करत होते. याचवेळी भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला व युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. अखेर युद्धाची ठिणगी पडली. भारताने पूर्व पाकिस्तानी सीमेवर सैन्य जमा केले. २३ नोव्हेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी आणीबाणी जाहिर केली. पाकिस्तानने हवाई हल्ले सुरु केले. भारतानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. पश्चिम पाकिस्तानातून पाकिस्तानी लष्कराने जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला परंतु भारतिय सेनेपुढे त्यांचे कांही चालले नाही. भारत पाकिस्तान मध्ये तुंबळ युद्ध जोरात सुरु होते. यामध्ये अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले. भारतिय हवाईदलाने टिच्चून मारा केला. अनेक बंकर व लष्करी तळ उध्वस्त केले गेले. सीमेवर तोफगोळ्यांचा व बॉंबचा भडिमार सुरु होता. आपले सैनिक जिवाच्या आकांताने लढत होते.पाकिस्तानचा बराच भूभाग भारतीय सैन्याने जिंकून आपल्या ताब्यात घेताला होता.

२६ नोव्हेंबर १९७१ची ती काळरात्र ठरली. भारत पाकिस्तान यांच्यात सीमेवर चकमक सुरु होती. धुराचे लोट उठत होते.हवाईहल्ले सुरु होते.बाँबचा भडिमार चालू होता.पाकिस्तानी सैनिक भारतीय हद्दीत घुसत होते.आपले सैनिक निकराचा प्रतिकार करुन त्यांना मारत होते. याच युद्धात लढताना सरोळीचे सुपुत्र अमृत सुतार यांचा पाकिस्तानी सैन्याच्या बॉंबने वेध घेतला गेला. त्यांच्या देहाचे छिन्नविछिन्न तुकडे झाले होते. एक निधड्या छातीचा जवान पाकिस्ताच्या सीमेवर लढताना शहीद झाला होता. त्यांच्या मुखात शेवटचे शब्द होते 'भारत माता की जय …!!' पाकिस्तानचा मारा परतवून लावताना त्यांनी जिद्दीने लढून आपला कणखरपणा दाखवला होता. अनेक सैनिकांना त्यांनी ठार केले. देशासाठी त्यांनी आपले बलिदान दिले होते. भारताने हे युद्ध जिंकले पण अनेक सैनिकांचे योगदान कोणीही विसरु शकणार नाही. भारताने पाकिस्तानवर मिळवलेला विजय जवानांच्या त्याग व बालिदानातून साकारला होता. याच विजयात सरोळीचे सुपुत्र होते याचा सार्थ अभिमान गाववासियांना आहे.

रक्ताने माखलेला व तुकडे - तुकडे झालेला वीर जवान अमृत सुतार यांचा देह भारतिय तिरंग्यात गुंडळून मायदेशी आणला गेला. तिरंग्याचा प्रत्येक रंग शहीद जवानाला सलाम करत होता. अशोकचक्राला आभिमान वाटत होता.भारतीय भूमी या वीर जवानाला आनंदाने कवटाळत होती. देशासाठी दिलेल्या या बलिदानाचे गोडवे गात होती. अशा असंख्य शुर वीरांच्या बलिदानामुळे भारतमाता धन्य झाली होती.

अखेर वीर हुतात्मा अमृत सुतार यांचा देह सरोळी या मायभूमित आणला गेला. पंचक्रोशीतील सारा जनसमुदाय या हुतात्म्याला वंदन करण्यासाठी आला होता. गावातील पहिलाच मुलग्याला देशासाठी लढताना वीरमरण आले होते. त्यांचा मृतदेह फुलांच्या हारांनी सजला होता. गावातील पवित्र भूमित शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तोफांची सलामी देण्यात आली. ज्या मातीत आपले बालपण आनंदाने घालवले होते त्याच मातीत देशासाठी हौताम्य पत्करुन वीर जवान अमृत सखाराम सुतार अमर झाले होते. त्यांच्या या कृतीने इथल्या कणांकणांत रोमांच उभे राहिले होते.अभिमान वाटत होता. कुटुंबाने तरुण अर्पण केला होता.त्यावेळी त्यांचे वय अवघे २७ वर्ष होते.या अविवाहित तरुणाने देशासाठी आपल्या बलिदानातून देशभक्तीचा नवा धडा दिला होता.

या शहीद जवानाचे कार्य महान होते. रँक नंबर २२ मराठा, नाईक नंबर २७५००७५ असा बिल्ला असलेल्या जवानाला सैन्य ' सेवा मेडल’ व १९६५ साली सैन्यातील सेवेबद्दल ‘रक्षा मेडल ' या विशिष्ट पदकाने गौरवण्यात आले होते. यावरुन त्यांची लष्करी सेवा किती प्रामाणिक व प्रेरक होती हे
दिसून येते. आपल्या दहा वर्षाच्या सेनादलातील सेवेने त्यांनी सर्वांना प्रभावित केले. त्यांचे शिस्तबद्ध जीवन सर्वांनाच स्मरणात राहिल.

सुतार कुटुंबाचे देशासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. आजही त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १५ आॕगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त सुतार कुटुंबाकडून दरवर्षी खाऊ व शालेय साहित्य वाटप केले जाते. त्यांचे भाऊ श्री. ईश्वर सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. गावातील अनेक कार्यक्रमात सुतार कुटुंबाला अग्रहक्काने मान दिला जातो. शाळेत रांगोळी व वत्कृत्व स्पर्धा भरवल्या जातात.

त्यांच्या कार्याची सतत आठवण राहावी व त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी सरोळी गाववासियांनी आणि सिव्हिल इंजिनियर श्री.बाळासाहेब शामराव देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेली सुंदर व सुबक स्वागत कमान मोठ्या डोलाने उभा आहे. ' वीर हुतात्मा अमृत सखाराम सुतार प्रवेशव्दार असे तिचे नामकरण करण्यात आले आहे. त्यावर मध्यभागी वीर जवान अमृत सखाराम सुतार यांचे छायाचित्र आहे. गावात जाणारी प्रत्येक व्यक्ती या प्रवेशव्दारातून जाताना वीर जवान अमृत सुतार यांना मनोमन प्रणाम करते.

ज्यावेळी त्यांची आठवण येते त्यावेळी त्यांच्या बलिदानाचा अभिमान वाटतो. गावातील तरुण मुले यांचा आदर्श घेऊन लष्करी सेवेत दाखल झाली आहेत. अत्यंत निष्ठेने ती देशसेवा करत आहेत. इतरांनाही ती प्रेरणा देत आहेत. बिकट काळात व युद्धात दिलेल्या प्राणाच्या बलिदानाची आहुती आज गावक-यांना क्षणाक्षणाला प्रेरणा देत आहे. पाकिस्तानला धूळ चारुन भारतीय झेंडा अभिमानाने उंचावणारे वीर जवान देशाची खरी शान आहेत.

जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मा झाले
कार्यास सदैव वंदावे
स्मृतीस त्यांच्या जपावे


आपल्या प्राणाची आहुती देणा-या, देशासाठी बलिदान देणा-या थोर स्वातंत्र्य सेनानी वीर हुतात्मा अमृत सखाराम सुतार यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबास सलाम व प्रवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन …!!


© नामदेव तुकाराम पाटील