कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील हिरण्यकेशीच्या काठावर वसलेलं सरोळी हे छोटसं गाव, जेमतेम दिड ते दोन हजार वस्तीचं…! पारंपरिक शेती व्यवसायात गुंतलेला इथला शेतकरी प्रामाणिक कष्टाने आपले जीवन जगत आहे. मंदिरे, शाळा,सेवासोसायटी, दुध डेअ-या ,बँक अशा सुविधांची रेलचेल गावच्या दैनंदिन जीवनाला गतीमान बनवते. गावाला सभोवार हिरण्यकेशी नदीचा वेढा, हिरगवागार लाभलेला निसर्ग, ऊस, भात , मक्का या पीकांत रमणारा शेतकरी गावचे भूषण आहे. काळ बदलला ,अनेक तांत्रिक बदल झाले, भौतिक सुविधा वाढल्या पण गावातील ' माणुसकी ‘ अजूनही निरंतर जपली आहे. माणसांची दुस-यांना मदत करण्याची भावना सर्वांचे जीवन सुखकर व वृद्धीगंत करण्यास प्रेरीत करते.
आपल्या गावचे सर्वांगसुंदर वैशिष्ट्य म्हणजे आदरातिथ्य व पाहुणचार…! इथल्या माणसांच्या रोमांरोमांत माणुसकी ओथंबलेली आहे त्याला पाहुणचाराची जोड देऊन सरोळी गावचे नाव सर्वत्र अजरामर केले आहे. गावच्या वेशीत पाहुणा आला की रामराम पाव्हणंं..! असे स्वागत घरापर्यंत चालूच असते. पाहुण्यांची घरात सरबराई चालूच राहते. घरातील सर्वांची विचारपूस, इकडच्या तिकडच्या गप्पा छान संवादाने सुरु असतात. चहापाणी, नाष्टा अगदी आपुलकीने दिले जाते. गप्पांची मैफिल रगलेली असते. बोलता - बोलता कधी जेवणाची वेळ होते समजत नाही. घरातील सुगरणींनी मन लावून केलेल्या स्वयंपाकातील जेवणाचे ताट समोर येते. स्वादिष्ट, रुचकर जेवणाचा पाहुणे आस्वाद घेतात. जेंव्हा ते तृप्ततेचा ढेकर देऊन सुगरणींच्या जेवणाची मुक्तहस्ते प्रशंसा करतात. पाहुण्यांची प्रत्येक गोष्टीला प्राधान्य देत त्यांचे आदरातिथ्य केलं जातं. नंतर शेतावर मस्त फेरफेटका मारुन तेथंच चहापाणी घेत पाहुणे शेतशिवारातला आनंद लुटतात. गावात असं चित्र घरोघरी पाहायला मिळते. गावात आलेला पाहुणा हा आपलाच आहे ही भावना इथल्या माणसांची खाशीयत आहे. पाव्हणां इतका गावात रमतो की त्याला गाव सोडेणासं होतं. पाव्हणा माघारी जातो तेंव्हा त्याच्या पिशवीत, आंबे , काजू, केळी, मक्याची कणसे अशा इकडील वस्तू हक्काने दिल्या जातात. प्रेमाची ही भेट मोठ्या दिमाखाने पाहुणा आपल्या गावी आनंदाने घेऊन जातो.
केवळ पाहुण्यांचा पाहुणार करुन इथला माणूस थांबत नाही तर बाहेरील कोणत्याही माणसांना आदराने घरी बोलवून त्यांचे आदरातिथ्य केले जाते. गावात एकदा प्रसिद्ध किर्तनकार आले होते. दररोज त्यांचे गोड किर्तन चालू असायचे. माणसांची अफाट गर्दी असायची. या किर्तनकाराला इथला प्रेमभाव वा आदरातिथ्य भावलं त्यामुळे त्यांने आठवडाभर मुक्काम ठोकला. किर्तनकार गावात रमला होता. त्याच्या सेवेला गावातील माणसं जावू लागली. त्याची सगळी व्यवस्था पद्धतशीर होत होती. संध्याकाळी किर्तन असायचे. त्या अगोदर किर्तनकाराला घरी जेवणाला बोलवले जात. पाटाभोवती सुंदर रांगोळी, पंचपक्वानाचे जेवण अशी दररोज त्यांची सुविधा केली जायाची. किर्तनकार या आदरातिथ्याने भारावून गेला होता. इथली माणुसकी, प्रेम,आदर असं त्याला कुठेच मिळाले नव्हते. असे गावात कोणतेही कार्यक्रम असतात तेंव्हा सगळ्यांचा यथोचित पाहुणार ठरलेलाच असतो त्यामुळे आमचे गाव पाहुणचाराचा खळाळणारा झरा होता.
पावसाळ्यात पावसाचा कहर सुरु झाला की हिरण्यकेशी नदीला महापूर येतो. नदीवरील धरण लगेच पाण्यासाठी जाते. पाऊस सतत असलेमुळे आठ ते दहा दिवस सगळीकडील मार्ग बंद होतात. अशावेळी गावातील के.डी.सी.बॕँकेतील कर्मचारी, मेडीकल दुकानदार, डॉक्टर या अत्यावश्यक सेवा देणा-या लोकांची गावात राहण्याची व जेवणखाण्याची अत्यंत काळजीपूर्वक सोय केली जाते. यामुळे अडचणीच्यावेळी गावातील लोकांची गैरसोय दूर होते. आदराने या लोकांचा पाहुणचार केल्यामुळे गावातील आरोग्य व इतर सुविधा मिळण्याबरोबर समाधानही मिळते.
आपल्या गावची भावेश्वरी देवीची यात्रा दहा ते बारा वर्षानो होते.सर्वांना निमंत्रणे धाडली जातात. यात्रेला यायचं हं..! असे हक्काने सांगीतले जाते. यात्रा भरते. प्रचंड जनसमुदाय यात्रेला जमतो. घरोघरी पाहुण्यांचे छान स्वागत करुन जेवणखाण्याची यथेच्छ सोय केली जाते. गर्दीतून विचारपूस करुन अग्रहक्काने पाहुण्यांना सौजन्यपुर्ण वागणूक दिली जाते. अबालवृध व बालगोपालांचा यांचाही सन्मान केला जातो.
आपल्या गावची भावेश्वरी देवीची यात्रा दहा ते बारा वर्षानो होते.सर्वांना निमंत्रणे धाडली जातात. यात्रेला यायचं हं..! असे हक्काने सांगीतले जाते. यात्रा भरते. प्रचंड जनसमुदाय यात्रेला जमतो. घरोघरी पाहुण्यांचे छान स्वागत करुन जेवणखाण्याची यथेच्छ सोय केली जाते. गर्दीतून विचारपूस करुन अग्रहक्काने पाहुण्यांना सौजन्यपुर्ण वागणूक दिली जाते. अबालवृध व बालगोपालांचा यांचाही सन्मान केला जातो.
आपल्या या गावाची ख्याती अशा प्रेमळ पाहुणचाराने सर्वदूर पसरली आहे. काळाप्रमाणे आत्ता बदल होत आहेत. जीवनमान बदललेलं आहे. तरीही आपलं गाव पाहुणचार व आदरातिथ्यात अग्रेसर आहे. इथल्या माणसांनी ही संस्कृती जतन करुन ठेवली आहे. माणुसकी आणि पाहुणचार हे आजच्या युगात अत्यंत गरजेची आहे हे आपलं गाव मनापासून जपत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
गावाचा हा पाहुणचार काल्पनिक नाही ही वास्तविकता आहे तेंव्हा आमच्या गावाला जरुर भेट द्या तुमचे यथोचित आदरातिथ्य केले जाईल…!!
आपुलकी , आनंदाने
गाव आमचे नटलेले
पाहुणचार शिष्टाचाराने
नेहमीच ते बहरलेले
गाव आमचे नटलेले
पाहुणचार शिष्टाचाराने
नेहमीच ते बहरलेले