गवारचं आत्मचरित्र..

विनोदी कथा
नमस्कार..मी गवार..
गवार म्हणजे अनाडी वाली नाही हो भाजीतली गवार. माझा जन्म शेतात झाला जसा इतर भाज्यांचा होतो. कोवळी नाजूक सडपातळ बांद्याची सरळ नाकाची. कुणीही सहज माझ्या प्रेमात पडेल अशीच. मला बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कुणी कांदा टोमॅटो आणि बटाटा घालून वाफवून बनवत तर कोणी हलक्या हातांनी मला मोडून माझे धागे दोरे उसवून शिजवून घेतं आणि मग कांद्यात आणि हिरव्या मिरची मधे बनवतं. कुणाला मी तीळकुटात घोळवून आवडते तर कुणाला नुसती कुरकुरीत फ्राय करून आवडते.

एके दिवशी एक सुगरण आली मला घ्यायला. अगदी तिच्या नाजुक हातांनी शोधून निवडून मला वजन काट्यात टाकलं. काही सेकंद साठी पाळण्यात वरखाली झुलून अगदी आनंद झाला. त्यात जाडी मोठी गवार होती तिला उचलून पुन्हा बाकी घोळक्यात फेकुन दिलं आणि मापात बसलेल्या मला मात्र आरपार दिसणाऱ्या पिशवीत अगदी हलक्या हातांनी टाकल. मी खूप खूश होते. बाहेर इतर पिशव्यामधे दिमाखात मिरवणाऱ्या भाज्यांना बघून मी ही आनंदात फिरत होते. माझ्या हक्काच्या घरी आल्यावर मला पिशवी सहित कुठल्याश्या कपाटात बंद केलं. म्हणजे जेंव्हा ते कपाट उघडलं तेंव्हा लाईट होती आणि बंद केल्यावर लाईट नव्हती. आता कोणतं होत ते कपाट माहीत नाही मला. पण जेंव्हा जेंव्हा ते कपाट कोणी उघडायचं तेंव्हा लाईट पेटायची आणि बंद केल्यावर लाईट पण बंद व्हायची. पण एक गंमत सांगू का मला ते कपाट खूप आवडलं. तिकडे कसं..एकदम थंडगार वाटत होतं. एका लहान मुलाला त्याची आई सारखी ओरडायची. 'सोनू..फ्रिज बंद कर..' ते ऐकून तरी वाटते त्या कपाटाला फ्रिज म्हणत असतील.
तर मग पुढे..
दुसऱ्या दिवशी सकाळी माझी छानशी भाजी बनवण्यासाठी मला बाहेर काढलं गेलं. मला वाटलं आता छान पैकी माझे धागेदोरे काढून मला हलक्या हातांनी मोडून थंड पाण्याने आंघोळ घालून मला कांद्या तेलात वाफेवर शिजवून कोथिंबीरने सजवणार किंवा उकळून परतणार नाहीतर तीळकुटात घोळून तरी बनवणार. पण नाही..
काय सांगू माझी दशा..कोण होती सुगरण माहीत नाही पण तिने माझे धागेदोरे न काढता असच्या असचं गरम पाण्यात टाकलं. मला असं अख्ख कोणी टाकत का सांगा बघू? माझ्या धागेदोरे न काढलेल्या नाजूक शरीरावर मीठ टाकलं तशी मी बाहेर उडी मारायला तडफड करू लागले. काही गवार मधे असलेल्या किडी तर न निवडता डायरेक्ट शिजायला टाकल्याने आनंदित झाल्या. कारण त्या किड्यांचा जीव जरी जाणार असला तरी स्लीपर सेल्स सारखं माणसाच्या शरीरात मरणोत्तर प्रवेश करून त्यांच्या शरीरात हाहाकार माजवणार होत्या त्या. मी रडवेली झाले. काय करू मला काहीच सुचत नव्हतं . काय चूक होती माझी? का असा अन्याय केला माझ्यावर? माझ्यामुळे आता कोणाला डॉक्टर कडे जावं लागलं तर मी स्वतःला यासाठी कधीच माफ करणार नाही. याचसाठी मला विकत घेतली होती का? खूप रडू येत होतं मला. पण काय करणार मला बोलता येत नव्हत ना. मी अशीच पातेल्यात निपचित पडून होते. भरल्या डोळ्यांनी माझ्या मालकीण बाई कडे बघत होते जिने माझी अशी अवस्था केली होती पण ती मात्र गाणी गुणगुणत काहीच घडलं नाही अशी उभी राहून कांदा तेलात परतत होती. माझ्यासोबत घडणारी घटना कल्पनेच्या पलीकडे होती. बंद डोळ्यांनी मी सगळ बघत होते पातेल्यातून एकेक गवार काढून तिचे धागे काढत असताना बिया देखील उपोषणासाठी बाहेर पडत होत्या. शेवटी आमच्यातल्या काही नासक्या गवारी भाजी म्हणून आमच्या सोबत ताटात सजवल्या गेल्या तेंव्हा त्या खूप आनंदी होत्या. कारण त्यांची आमच्या सोबत साजण्याची पात्रताचं नव्हती. माझा जीव मात्र जळत होता जेंव्हा घास खाण्यासाठी आ करण्यात आलं. असं वाटतं होत चपातीच्या तुकड्यातून उडी मारून लादिवर जीव द्यावा आणि कचऱ्याच्या स्वाधीन व्हावं. पण मी एकटीने जीव देऊन काय होणार सांगा. इतर भाजी तर ताटात तशीच होती ना..शेवटी साश्रू नयनांनी मी हात जोडत मालकांच्या तोंडात प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने मी माझा जीव सोडला. माझं आत्मचरित्र लिहिण्याची वेळ कधी माझ्यावर येईल असं मला कधीच वाटलं नव्हत. पुन्हा या घरात मला कधीच पाठवू नको असंच मी हात जोडून देवाला प्रार्थना करेन.
धन्यवाद..
©®श्रावणी लोखंडे..