Login

गव्हाची कुरडई Recipe In Marathi

उन्हाळा स्पेशल वाळवणाचे पदार्थ अचूक प्रमाणासहित
गव्हाची कुरडई


साहित्य- गहू पाच किलो, मीठ चवीनुसार.

कृती -
१) प्रथम गहू निवडून घेणे आणि ते दोन दिवस मोठ्या पिंपात भिजत घालणे.

२) तिसऱ्या दिवशी ते गहू उपसून काढायचे मग पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे दोनदा.

३) त्यानंतर ते भिजलेले गहू दळून आणायचे.

४) आता त्याचा चिक काढायचा म्हणजेच ते मिश्रण पाण्यात घालून धुवून घ्यायचे. एकदा धुवून झाले की पुन्हा दुसरे पाणी घेऊन त्यात पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कोंडा बाजूला करायचा.

५) धुवून घेतलेले गहू म्हणजेच कोंडा बाजूला टाकायचा आणि राहिलेल्या पाण्याच्या तळाशी जमा झालेला गव्हाचा चिक आपल्याला खाली बसलेला दिसतो.

६) त्या पाण्यात रात्री बर्फ टाकायचा म्हणजे चिक जास्त बसतो खाली.

७) सकाळी उठून लवकरच चूल पेटवावी म्हणजे कुरडई लवकर होते.

८) खाली बसलेला चिक हाताने फोडून घ्यायचा आणि पातेल्याने मोजून घ्यायचा. जितका चिक असेल तितकेच पाणी घ्यायचे.

९) जे पातेले आपण चुलीवर ठेवणार आहोत त्याला आधी खालून मातीचा थर लावून घ्यायचा म्हणजे पातेले जास्त काळे होत नाही.


१०) आता त्या पातेल्यात पाणी घालून चुलीवर गरम करायला ठेवून द्यायचे.

११) पाणी गरम झाल्यावर त्यात ओंजळ भरून मीठ घालायचं आणि नंतर हळूहळू चिक ओतायचा म्हणजे गुठळी होत नाही.

१२) सर्व मिश्रण चांगले घोट्याने हलवत राहणे. ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते.

१३) ते सर्व एक दोनदा हलवून एकत्र करणे मग झाकण ठेवून चांगले शिजू देणे. साधारण चिक शिजायला अर्धा तास तरी लागतो. चुलीत मंद आचेवर चिक चांगला शिजतो.

१४) आता आपला तयार झालेला चिक साच्यात भरून घेणे. बारीक शेवची जाळी असते ती घालावी साच्यात म्हणजे कुरडई छान होते.

१५) सर्व कुरडई साडीवर घालणे, साच्याचा दोन चार फेऱ्या करून गोलाकार कुरडई पाडणे म्हणजे दिसायला छान मोठी दिसते ती.

१६) दोन दिवस कडक उन्हात कुरडई वाळल्या वरती डब्यात भरून ठेवणे.

कुरडई करायला दोघी तिघी जणी तरी लागतात, तेव्हाच त्या लवकर होतात. हा गव्हाचा शिजलेला चिक खायला खूप छान लागतो, आणि त्याहीपेक्षा अर्धवट वाळलेली कुरडई खायला भारी लागते; त्यामुळे लहान पोरांना राखणीला बसवावे लागते.

🎭 Series Post

View all