Login

बेरीज वजाबाकी आयुष्याची.. भाग ३( सारिका कंदलगांवकर)

बेरीज वजाबाकी आयुष्याची


गेले जगायचे राहून.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की लग्नानंतर विमलताईंचे सगळे आपल्याच मताने व्हावे असा हेका असतो. बघू पुढे काय होते ते.

" मी नोकरी केली तर चालेल का?" संगीताने सुधीरला विचारले.

" अशी अचानक? तुला काही कमी आहे का?" सुधीरला आश्चर्य वाटले.

" कमी म्हणजे?" संगीता घुटमळली. "मला घरात कंटाळा येतो. तसंही मला घरात फारसं काम नसतंच. जे काही वरकाम करायचे असते ते करून जात जाईन. मी जर घरातच राहिले तर अशीच कुढत राहीन त्यापेक्षा." बोलता बोलता संगीता गप्प झाली.

" काय झाले?" सुधीरने प्रेमाने विचारले.

" सांगून काही फायदा आहे का?"

" कशाबद्दल आहे?"

"अजून काय? सासूबाई घरातली एक गोष्ट मनासारखी करू देत नाहीत. घराच्या पडद्यापासून स्वयंपाकघरातील भांड्यांपर्यंत सगळीकडे त्यांना हवे तसेच करायचे. कधीच मला कसे हवे आहे हे विचारावेसे वाटत नाही. बरं मी केले की लगेच नन्नाचा पाढा लावायचा. कधीतरी मनासारखे होईल का?" संगीता उद्वेगाने बोलत होती.

" मी तुला आधीच सांगितले होते. आईचा शब्द मी खाली पडू देऊ शकत नाही." सुधीरचा आवाज कठोर झाला होता.

" म्हणूनच मला नोकरी करायची आहे. तेवढा वेळ तरी मला मनासारखे जगता येईल."

संगीता बोलत होती. पण ती वेळ आलीच नाही. ती गरोदर असल्याचे समजले. मग गरज नसताना उगाच का धावपळ करा असे विमलताईंचे म्हणणे आले. गरोदरपण, बाळंतपण होते ना होते तोच प्रतिभाचे लग्न आले. तिच्या लग्नात संगीताकडे लहान मूल आहे या बहाण्याने खरेदीपासून सगळे विमलताईंनीच केले. संगीता फक्त बघत बसली. आईचे वागणे बघून प्रतिभा सुद्धा बदलली होती. आधी वहिनी वहिनी करणारी प्रतिभा लग्नानंतर फक्त आई आई करायची. दोघींची बोलणी चालू असायची. थोरल्या विहंगच्या जन्मानंतर धाकट्या सुजलाचा जन्म झाला. एका बाजूला सुधीरची नोकरीत बढती होत होती. संगीता घरादारात अडकली होती. ते सुद्धा विमलताईंच्या तालावर. मुले मोठी होत होती. विमलताईंचेही वय होत होते. पण शरीराचा आणि मनाचा ताठा तसाच होता. मुलांनाही आजीचे घरातले महत्त्व समजले होते. बाबांसारखेच ते ही आजीचा एकही शब्द खाली पडू देत नव्हते. संगीताला याचा आनंदच होता. पण कधीतरी काळजात कळ यायची की लग्नाला इतके वर्ष होऊनही साधी भाजी कोणती करायची किंवा कशी करायची याचेही तिला स्वातंत्र्य नव्हते. तिने स्वतःच्या मनाने काहिही केले तरी विमलताईंचा चेहरा पडायचा. तसे झाले की सुधीरसोबत मुलेही नाराज व्हायची. त्यामुळे तिने तो कप्पा बंदच करून ठेवला होता.

विहंगचे शिक्षण पूर्ण झाले. त्याच्यासाठी लग्नाची स्थळे बघायला सुरूवात झाली. घरात नवीन सदस्य येणार याच आनंदात सगळे होते. बाथरूममधून बाहेर येताना पाय घसरल्याचे निमित्त झाले आणि विमलताई जोरात पडल्या. पडल्या त्या अंथरूणालाच खिळल्या. इतके दिवस घरात वावरणाऱ्या त्या एका जागी बसून रहायला लागल्यामुळे जास्तच चिडचिड्या झाल्या. सगळे बाहेर गेल्यावर त्यांच्या तावडीत सापडायची ती संगीता. ती कशी स्वतःचेच खरं करते याचे रडगाणे त्या आल्यागेल्याकडे किंवा फोन करुन प्रतिभाकडे गात असायच्या. सगळे करून सवरून स्वतःबद्दल हे ऐकताना संगीताला फार त्रास व्हायचा.. आपण मान्य केलेली ती अट किती भारी पडली आजकाल हाच विचार तिच्या मनात यायचा. तिचा स्वतःचा रजोनिवृत्तीचा त्रास या सगळ्यात कसा सामावून गेला, तिचे तिलाच समजलेही नाही.


संगीताची झालेली ओढाताण इतर कोणाला नाही पण सुधीरला तरी जाणवेल का? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all